6मराठी, ८. माय

 

८.माय

● ऐका. म्हणा. वाचा.

हंबरून वासराले चाटते जव्हा गाय
तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय ॥धृ॥

फनकाट्या येचायले माय जाये रानी
पायात नसे वहान साधी हिंडे अनवानी
इचू काट्यालेबी तिचा मोजत नव्हता पाय ॥१॥

सुट्टीमंदी जव्हा मी येत होतो घरी
उसने पासने आणून खाऊ घाले नानापरी
करू नको घाई म्हणे पोटभर खाय ॥२॥

बाप माहा रोज लावे मायच्या मागं टुमनं
बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं
शिकूनशानी कुठं मोठा सायेब होनार हाय ॥३॥

माय म्हने तुम्हाले माया गयाची हाये आन
भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान
भरून येत डोयात तिच्या तापी-पूर्नामाय ॥४॥

बोलता बोलता एकदा तिच्या डोयात आलं पानी
म्हने कव्हा दिसन सांग मले राजा तुही रानी
या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय ॥५॥

म्हणून वाटते मले तुही भरावं सुखानं ओटी
पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी
अन् ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय ॥६॥



स.ग.पाचपोळ (१९५०-२००५) काव्यरसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी. एस.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय, साखरखेर्डा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 'स.ग. पाचपोळांची कविता' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

■■ एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने समर्पक शब्दांत या कवितेतून व्यक्त केली आहे.
● कवितेचा आशय मुलाच्या प्रगतीसाठी आईने घेतलेले काट व आईविषयी मुलाच्या मनात असलेली कृतज्ञता यांचे मनोवेधक वर्णन या कवितेत कवीने केले आहे. (खानदेशी बोलीतील ही कविता आहे.)

शब्दार्थ
हंबरणे -  गाईचे ओरडणे,
वासराले - वासराला
जव्हा- जेव्हा
तिच्यामंदी - तिच्यामध्ये
मले - मला.
तव्हा -  तेव्हा
माही- माझी.
फनकाटया - जळणाची लाकडे,
येचायले- वेचायला.
वहान -  चपला.
अनवानी- पायांत चपला नसणे,
इचू-विंचू
काट्यालेबी - काट्यालाही.
उसनं पासनं - लोकांकडून उसने घेऊन,
नानापरी - वेगवेगळे (पदार्थ), वेगवेगळ्या प्रकारे .
खाय -  खा.
माहा -  माझा.
टुमनं मागणीसाठी सतत बोलणे.
शिक्शन -  शिक्षण,
रूमनं -  नांगर किंवा औत चालवता येण्यासाठी बसवलेला दांडा.
शिकूनशानी - शिकल्यावर , शिक्षण घेऊन
सायेब - साहेब,
हाय - आहे.
म्हने - म्हणायची.
तुम्हाले- तुम्हांला
माया - माझ्या
गयाची - गळ्याची.
आन -  शपथ, आण,
डोयात  - डोळ्यांत.
डोयानं  - डोळ्यांने
  कव्हा -  केव्हा.
  दिसन - दिसेल.
  तुही - तुझी
  रानी - राणी (इथे अर्थ) पत्नी, बायको,
  भरावं - भरावी.
  सुखानं आनंदाने.

टिपा
(१) तापी व पूर्णा -  खानदेशातील नदया.
(२) साय- दूध तापवल्यावर थंड होताना दुधावर येणारा जाड थर.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) टुमणे लावणे - सतत मागणी करणे.
(२) कान भरणे - उलट-सुलट सांगणे.
(३) ओटी भरणे - आदर करणे, कृतज्ञता व्यक्त करणे.

कवितेचा भावार्थ

आईची थोरवी सांगताना कवी म्हणतो- जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते, तेव्हा त्या गाईच्या रूपात मला माझी आई दिसते. ( आईची माया आठवते.) ।। धृ ।।

माझी आई जळणासाठी लागणारी लाकडे वेचायला रानात जायची. तिच्या पायात साध्या चपला नसायच्या. अनवाणी पायांनी ती रानभर हिंडायची. विंचू किंवा बोचरे काटे रुततील याची तिला पर्वा नसे. (आमच्यासाठी कष्ट उपसताना तिला काट्याकुट्यांची मोजदाद नव्हती.) ॥ १ ॥
( मी शाळेत शिकायला दूर होतो.) मी जेव्हा सुट्टीमध्ये घरी यायचो, तेव्हा ती उसनेपासने आणून मला वेगवेगळे दार्थ जेवू घालायची. 'घाई करू नको, सावकाश पोटभर खा' असे ती मला मायेने सांगायची. ॥ २ ॥
माझे बाबा माझ्या आईच्या मागे रोज टुमणे लावीत की बस झाले आता पोराचे शिकणे. त्याला नांगर धरायला,शेतीची कामे करायला लाव. शिकून काही तो मोठा साहेब होणार आहे का? (मला शिक्षणापासून वंचित करण्याचा बाबा  प्रयत्न  करीत असत.) ॥३॥
बाबांना आई म्हणायची की तुम्हांला माझ्या गळ्याची शपथ घालते. असे भलतेसलते (वाईट विचार) सांगून मुलाचे कान भरू नका. (वाईटसाईट सांगू नका.) हे सांगताना आईच्या डोळ्यांत जणू तापी व पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे  (तिचे डोळे अश्रूंनी डबडबायचे. ) ४॥
बोलता बोलता एकदा आईच्या डोळ्यांत अश्रू दाटले. ती म्हणाली की माझ्या राजा, तुझी राणी कधी दिसेल मला ?  ( माझी सून कधी आणशील ?) मी  असेपर्यंत लग्न झाले, तर माझ्या डोळ्यांनी मी दुधावरच्या सायेसारखे सुख (तुझा संसार फुललेला पाहीन, नातवंडे खेळवीन) ।। ५ ।।
ही सर्व आईची माया आठवून मला असे वाटते की आई तुझी ओटी सुखाने भरावी. तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा. आणि तुझे पाय पट्ट धरून ठेवावेत. (तुझ्या चरणापाशी राहावे, तुझा कायम आशीर्वाद मिळावा. )
॥ ६ ॥

संकलित मूल्यमापन

• प्रश्न १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा

(१) कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे ?
उत्तर :- चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी रानात जायची. तिच्या पायांत साध्या चपलाही नसायच्या
रात्रभर अनवाणी कष्ट करीत वणवण फिरायची. विंचू डसेल चावेल किंवा काटेकुटे बोचतील याची आईला भीती नसायची.
(२) कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करीत असे?
उत्तर : कवी सुट्टीत घरी येतो. आई त्याला उसनेपासने आणून खायला घालते. त्याच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ
आणते. आई कवीला म्हणते-घाई करू नको, पोटभर खा.
(३) कवीच्या आईचे डोळे का भरून येतात ?
उत्तर: कवींचे वडील कवीचे शिक्षण आता बस झाले, असे आईला सांगतात. त्याने शेतावर काम करावे, अशी त्यांची इच्छा असते. आईला मुलाला खूप शिकवायचे असते. त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही म्हणून तिचे डोळे भरून येतात.
(४) आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला का वाटते ?
उत्तर : आईला कवीने खूप शिकावे, असे वाटते. त्यासाठी ती अपार कष्ट करते. वडिलांना विरोध करते. सूनमुख पाहण्यासाठी तो अधीर आहे. म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला वाटते.
(५) आईसाठी कवीला काय करावेसे वाटते ?
उत्तर : अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी, असे कवीला वाटते. जी जन्मभर आपल्यासाठी झिजली. त्या माउलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात. तिला सुखीसमाधानी जीवन दयावे. अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे, असे कवीला वाटते.

• प्रश्न २. कोण, कोणास व का म्हणाले?
• (१) करू नको घाई म्हणे पोटभर खाय.
उत्तर : असे कवीची आई कवीला म्हणायची. कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला. तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल म्हणून आई त्याला मायेने म्हणाली.
(२) बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं.
उत्तर : असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले. मुलाने शिक्षण न घेता, शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते. म्हणून ते म्हणाले.
(३) या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय.
उत्तर:-  असे आई म्हणाली आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या सायीसारखी नातवंडे
डोळ्यांदेखत बागडावी, अशी आईची इच्छा आहे. म्हणून ती असे म्हणाली,
(४) अन् ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय.
उत्तर : असे कवी आईला म्हणाला. अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाले. 

मुक्तोत्तरी प्रश्न

●●● कविता वाचताना तुम्हांला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा.
उत्तर : (१) काट्याकुट्यांची किंवा विंचवाच्या दंशाची पर्वा न करता आई रानावनात लाकडांसाठी हिंडते.
(२) मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ-पिऊ घालते. (३) वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते.
(४) कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो. हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत.

भाषाभ्यास व व्याकरण

• प्रश्न १ पुढील शब्द पाहा:
वहाण -  चपला, वाहन - प्रवासाचे साधन.
उच्चारात बरेच साम्य असलेले; पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या. लिहा. त्यांचे अर्थ समजून घ्या.
उत्तर: (१) दिन -  दिवस ; दीन - गरीब, दरिद्री,
(२) अर्पण - देणे ; अपर्ण - पानांशिवाय,
(३) उषा- सकाळ ; उश्या-  झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन.
(४) कपास - कापूस ; कंपास - आकृती काढण्याचे साधन.
• प्रश्न २. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
उत्तर :
(1) आई - माय
(2) चपला -वहाणा
(3) डोया - डाळा
(4) इचू- विंचू
८. माय

• प्रश्न २.पुढील  शब्दांचे    विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) सावकाश
(2) उपाशी × पोटभर
(3) अनेकदा × एकदा
(4) सुख × दुःख

• प्रश्न ४. गळयाची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा :
★ (१) गळा : -
(१) गळा भरून येणे (२) गळा दाटून येणे (३) गळ्यात पडणे (४) गळफास लागणे (५) गळा काढणे.
(२) कान :-
(१) कान फुंकणे (२) कानाशी लागणे (३) कान पकडणे (४) कानपिचक्या देणे (५) कानांवर येणे.

प्रश्न ५. पुढील वाक्यांतील सर्वनामांना अधोरेखित करा ::

(१) राधा म्हणाली, " प्रशांत, तू किती छान गाणे गातोस."
(२) ती माझी बहीण आहे.
(३) कोणी कोणाशी भांडू नये.
(४) ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे, त्याला मी घेऊन जाईन.
(५) मला कोणी काही विचारू नये.
(६) सदा माधवच्या बाबांना म्हणाला, "हा मला त्रास देतो, त्याला मी समजावून सांगितले; पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो."

• प्रश्न ६. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा :

(१ )................ वह्या मुलांना दया. (हा, ही, हया)
(२) त्याला ............…..आवडते ? ( काय, कोणते, कोणी )
(३) ..................आकाशकंदील बनवले. (तू , आम्ही ,  स्वतः)
(४) मी ............. स्वयंपाकघर स्वच्छ केले. ( आपण स्वतः, त्याने)
(५) त्याने ....................काही सांगितले नाही. (कोणाला ,  कोणी ,काय)

( उत्तर :- ह्या , काय, आम्ही, स्वतः, कोणाला .)

• प्रश्न ७. खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्ये लिहा :

उत्तरे

काय

आम्ही

स्वतः

- कोणाला

(१) कोण घरी कोण आले ?
(२) हे - हे झाड चाफ्याचे आहे.
(३) ती - ती शेते आमची आहेत.
(४) काय - तुला काय हवे ?
(५) कोणाचा शर्यतीत कोणाचा पहिला नंबर आला
(६) ही ही गुरे आमची आहेत.

प्रश्न ८. पुढील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा
(१) ................आज पतंग उडवणार आहे.
(२) .............. पतंग छान उडवते.
(३) मैदानावर ................. पतंग घेऊन गेलो.
(४) .................. पतंग उडवूया.
(५) पतंग उडवण्यात ................ तरबेज आहेत.
( उत्तर:- मी , ती, आम्ही,आपण,ते)

२. लेखन विभाग
• या कवितेचे स्वतःच्या शब्दांत रूपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शौर्षक दया. 'माझी आई' या विषयावर दहा पंधरा ओळी लिहा.

३. तोंडी परीक्षा

प्रश्न पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :

(१) तुमच्या आईविषयी चार वाक्ये सांगा.
(२) आईच्या मायेला तुम्ही कोणती उपमा दयाल ? का?

आकारिक मूल्यमापन

१. भाषण-संभाषण :

गटचर्चा-'आईची थोरवी' या विषयावर गटचर्चा करा. • या कवितेचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा.

२. उपक्रम :

(१) साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचा.

(२) 'आई' या विषयावरील कवितांचा संग्रह करा.

Comments

Popular posts from this blog

HOME