6म ४ .गवतफुला रे ! गवतफुला !
४ .गवतफुला रे ! गवतफुला !
- इंदिरा संत
(पाठ्यपुस्तक पान क्र. १२)
ऐका, म्हणा, वाचा.
(विद्यार्थ्यांनी कविता तालासुरात म्हणावी.)
रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला !
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा !
मित्रांसंगे माळावरती, पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना,
विसरून गेलो पतंग नभिचा, विसरून गेलो मित्रांला
पाहुन तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा!
हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजूंला सळसळती नीळनिळूली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती,
तळी पुन्हा अन् गोजिरवाणी, लाल पाकळी खुलती रे उन्हामधे हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे !
वारा घेउन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा
रात्रहि इवली होउन म्हणते, अंगाईचे गीत तुला,
मलाहि वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे
तुझ्यासंगती सदा रहावे, विसरूनि शाळा, घर सारे!
तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुजला शिकवाव्या, आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगित कपडे, फूलपाखरां फसवावे!
● कवितेचा आशय●
या कवितेत कवयित्रीने माळावर फुललेल्या गवतफुलाचे
बहारदार वर्णन केले आहे.
● शब्दार्थ ●
रंगरंगुल्या - रंगीबेरंगी
सानसानुल्या- लहानग्या ,छकुल्या
लळा -माया, प्रेम,
माळ- हिरवे पठार,
नभिचा -आकाशातला,
तुजला- तुला
रंगकळा- रंगछटा.
पराग- फुलातील केसर
झगमगती -चमचमती.
तळी -तळाशी, खाली,
गोजिरवाणी- सुरेख, गोंडस, सुंदर,
सानुले -छोटेसे.
झोपाळा- झुला, झोका
इवली - लहान
तुझ्यासवे -तुझ्यासोबत
तुझ्यासंगती -तुझ्यासोबत
फूलपाखरां- फूलपाखरांना
अंगाई- बाळाला झोप यावी म्हणून म्हणायचे गाणे.
● वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ●
(१) हरखून जाणे - गुंग होणे, आनंदी होणे, मुग्ध होणे.
(२) भान हरपणे- दंग होणे, मग्न होणे, जाणीव न उरणे. (३) हट्ट करणे - आग्रह धरणे.
● कवितेचा भावार्थ ●
माळावर पतंग उडवणाऱ्या एका लहान मुलाला इवलेसे गवतफूल दिसले. गवतफुलाच्या रूपाने मुलगा मोहून गेला. गवतफुलाला उद्देशून तो म्हणतो- हे रंगीबेरंगी, इवल्याशा गवतफुला तुला पाहताच माझे मन मोहून गेले. असा कसा
तुझा लळा मला लागला, ते सांग !
मित्रांबरोबर माळावरती पतंग उडवीत फिरत असताना अचानक तुला मी गवतावर पाहिले. तुला झुलत झुलत
हसताना पाहून मी आकाशातला पतंग विसरून गेलो. मी मित्रांनाही विसरलो. तुझ्या विविध रंगछटा पाहून मी मुग्ध झालो. हरखून गेलो.
हे गवतफुला ! तुझ्या दोन्ही बाजूंना हिरवीशी नाजूक रेशमासारखी तलम पाती आहेत. निळीनिळीशी एक पाकळी व त्यामधून चमचमणारे पिवळे पराग आहेत. तुझ्या तळाला पुन्हा एक गोजिरवाणी लाल पाकळी फुलली आहे. उन्हामध्ये झगमगणारे तुझे हे रंग पाहून माझे भान हरपून गेले. मी तुझ्या रूपात दंग झालो.
तुझ्यासाठी इवलेसे रूप घेऊन स्वतः वाराही लहान झाला. तुझ्याबरोबर तो झुला झुलवण्याचा खेळ खेळू लागला.रात्रसुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाई गीत गात आहे. मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घर, शाळा सगळे विसरून तुझ्यासोबत राहावेसे वाटते.
हे गवतफुला! मला असे वाटते की तुझ्या चिमुकल्या गोजिऱ्या बोलांची भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात, तुझे सगळे खेळ मी शिकावे आणि मला येणाऱ्या जादूच्या गोष्टी तुला शिकवाव्यात. आकाशाकडे हट्ट करावा. तुझ्यासोबत खाऊ खावा. तुझे कपडे घालून फूलपाखरांची फसगत करावी. (मी इतका तुझ्यासारखा छोटा दिसावा की फूलपाखरूही मला पाहून फसेल !)
१. प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) कवितेतील मुलाची गवतफुलाशी कुठे व कशी भेट झाली?
उत्तर :- कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर पतंग उडवत होता. अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेसे गोजिरवाणे गवतफूल पाहिले. अशा प्रकारे मुलाची गवतफुलाशी माळरानावर भेट झाली.
(२) गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला ?
उत्तर:- गवतफुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले. तो आकाशातला पतंग विसरला, तो सोबतच्या मित्रांना विसरला, इतका तो गवतफुलात हरखून गेला.
(३) कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर :- कवयित्री म्हणतात गवतफुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूकशी रेशीमपाती आहेत. निळीनिळी एक पाकळी आहे व त्याचे झगमगणारे पिवळे पराग आहे. गवतफुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी खुलली आहे.
(४) गवतफुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे ?
उत्तर: - वारा लहान होऊन गवतफुलाशी झोपाळा खेळायला आला आहे. तसेच रात्रही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणते आहे. मुलालाही वाटते की आपण गवतफुलाहूनही लहान व्हावे व त्यास भेटावे.
(५) गवतफुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ?
उत्तर : - घर, शाळा सगळे विसरून मुलाला गवतफुलासोबत सतत राहावेसे वाटते. गवतफुलाशी गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात. गवतफुलाचे खेळ शिकावेत व त्याला जादू शिकवावी, आभाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा. गवतफुलासारखे कपडे घालून फूलपाखरांना फसवावे, अशा अनेक गोष्टी गवतफुलासोबत मुलाला करायच्या आहेत.
• प्रश्न२. पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा :
(१) तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो.
(२) मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते.
(३) तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात.
(४) तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे.
उत्तरे :
(१) पाहुन तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा !
(२) मलाहि वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे
(३) तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या.
(४) तुझे घालुनी रंगित कपडे, फुलपाखरां फसवावे !
• प्रश्न ३. या कवितेत गवतफुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा :•
उदा., रेशिम पाती - हिरवी
(१) पाकळी (२) पराग (३) तळीची पाकळी
उत्तर:- (१) पाकळी - निळी (२) पराग - पिवळे
(३) तळीची पाकळी- लाल
प्रश्न ४ गवतफुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून लिहा :
गवतफूल
रंगरंगुल्या,
सानसानुल्या,
झुलता झुलता हसणारे
सुंदर रंगकळा
मुक्तोत्तरी प्रश्न
• तुम्हांला फुलपाखरू भेटले, तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल ? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : हे फूलपाखरा, तू खूप गोजिरवाणे व सुंदर आहेस. पण तू दिवसभर काय करतोस? तुझ्या मित्रांशी खेळतोस का? तुझ्या घरात कोण कोण आहेत? आई-बाबा काय करतात? तुला आमच्यासारखी शाळा असते का? रात्री तू काय करतोस? कुठे झोपतो? तुला अंगाईगीत कोण म्हणते ? तुझ्याशी दोस्ती करावी असे मला वाटते.
व्याकरण
प्रश्न १ समान अर्थाचे शब्द लिहा.
गीत- गाणे
रात्र-रजनी
आभाळ - आकाश
वारा - पवन
• प्रश्न २. रंगरंगुल्या, सानसानुल्या, निळनिळूली यांसारखे शब्द शोधा व लिहा.
• उत्तर :- (१) रंगीबिरंगी (२) गोडगोजिरी (३) लाजलाजिरी (४) जांभूळगाभूळ (५) सोनछकुल्या.
• प्रश्न ३. सळसळ' यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:- घळघळ , खळखळ , झळझळ, वळवळ , मळमळ.
प्रश्न ४. पुढील शब्दांत लपलेले शब्द शोधून लिहा.
(१) माळावरती: माळा, मार, माती, वर, वरती, रती.
(२) फूलपाखरात: फूल, लपा, पाल, पाख, पारा, पात, खल, खरा, खत, राख,
प्रश्न ५.विरुद्धार्थी शब्द लिहा.
मित्र x शत्रू
इवली x प्रचंड
नाजूक x राठ , निबर
लहान X मोठे
ऊन X सावली
विसरणे x आठवणे
२. तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा.
(१) बागेतल्या फुलाशी तुम्ही काय बोलाल ते सांगा.
(२) पुढीलपैकी कोणत्याही एका वस्तूला किमान दोन प्रश्न विचारा: (१) झाड (२) नदी (३) डोंगर (४) आकाश
आकारिक मूल्यमापन
१. तोंडी काम / प्रकट वाचन :
• ही कविता तालासुरांत साभिनय म्हणा.
२. कृती :
(१) गवतफुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा. त्यांमधील साम्य व भेद लिहा,
(२) पाठ्यपुस्तक पान क्र. १४ वर दिलेली केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा कापरा (मे.), ता. जि. यवतमाळ या शाळेतील इयत्ता सहावीतील सोनाली श्रावण फुपरे हिने 'झाड' या विषयावर केलेली कविता वाचा, सोनालीप्रमाणे आपणही पुढे दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया,
(१) माझी शाळा म्हणते खेळ खेळा
वेळ ,काळ तुम्ही नियमित पाळा,
पाठ वाचा, कविता करा पाठ
शिक्षक तुमची धोपटतील पाठ
(२) जाऊ जंगल सफरीला
पाहू आनंदे निसर्गाला,
झाडे, फुले, पाने, पक्षी
आभाळावर सुंदर नक्षी
उपक्रम :
(१) एखादया माळरानावर फिरताना तुम्ही गवतफुले पाहिली आहेत का? ती कोणकोणत्या रंगांची असतात? तुम्ही पाहिलेल्या गवतफुलाचे चित्र काढा व रंगवा.
(२) मंगेश पाडगावकर यांची 'मी फूल तृणातिल इवले' ही कविता मिळवा व लिहा, कवितेला चाल लावून वर्गात सादर करा.
प्रकल्प
• वृत्तपत्रांमधून विविध फुलांविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे मिळवा. या कात्रणांपासून चिकटवही बनवा.
Comments
Post a Comment