७मराठी 1जय जय महाराष्ट्र माझा (गीत)

 जय जय महाराष्ट्र माझा (गीत)

ऐका    
वाचा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।। धृ ।।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।१।।
भीति न आम्हां तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा   ।।२।।
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा   ।।३ ।।


   म्हणा


राजा बढे (१९१२-१९७७): प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, माझिया माहेरा जा', 'हसले मनी चांदणे', 'क्रांति माला', 'मखमल' इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध; गीत गोविंद, गाथासप्तशती, मेघदूत इत्यादी काव्याचे अनुवादही प्रसिद्ध. प्रस्तुत  जय जय महाराष्ट्र माझा या गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितली आहे.

विद्यार्थ्यांनी  समूहगीत तालासुरांत म्हणावे. इतर समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकव्यात.

  

जय जय महाराष्ट्र माझा
- राजा बढे
(पाठ्यपुस्तक पान क्र.१)
शब्दार्थ
गर्जा - गर्जना करा, 
जयघोष करा.  
एकपणाचे - एकतेचे. 
भीमथडी - भीमा नदीचा काठ.
तट्टू - घोड्याचे पिल्लू, शिंगरू. 
गुंजला - निनादला. 
नभ -आकाश.
गडगडणारे नभ- पावसाळी ढगांचा गडगडाट.  
अस्मानी - नैसर्गिक आपत्ती. 
सुलतानी - परकीयांची आक्रमणे. 
जवाब- उत्तर.
सह्याद्रीचा सिंह – श्रीछत्रपती शिवाजी महाराज.
शिव शंभू राजा - श्रीछत्रपती शिवाजी महाराज.
मनगटे (इथे अर्थ)-  कणखर कर्तृत्व. 
निढळ -कपाळ. 
तख्त – सिंहासन.
 राखितो -रक्षण करतो.
टिपा
(१) रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी व भीमा - महाराष्ट्रातील नद्या.
(२) यमुना - भारतीय उत्तर खंडातील नदी..
(३) अस्मानी-सुलतानी - अस्मानी म्हणजे नैसर्गिक आपत्ती व सुलतानी म्हणजे परकीयांची आक्रमणे.
(४) सह्याद्रीचा सिंह – श्रीछत्रपती शिवाजी महाराज.
(५) शिव शंभू राजा श्रीछत्रपती शिवाजी महाराज.
गीताचा आशय क्लिक करा ,पहा , वाचा .
गीताचा आशय : हे गाणे म्हणजे महाराष्ट्राचे गौरवगीत आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो, त्या प्रदेशाचा, संस्कृतीचा व इतिहासाचा सार्थ अभिमान या गाण्यात व्यक्त झाला आहे.


कवितेचा भावार्थ
माझ्या महाराष्ट्राचा विजय असो. या माझ्या महाराष्ट्राचा जयघोष करा. ।। ध्रु. ।। रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी या नदयांमधले पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात. (महाराष्ट्रातील जनता एकोप्याने नांदते) भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना (मर्द मराठा मावळ्यांना) उत्तर खंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. (महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेशी प्रेमाने व एकोप्याने वागते.) ॥१॥

आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हांला मुळीच भीती वाटत नाही. हे अस्मानी संकट येवो अथवा परकीय आक्रमणाचे सुलतानी संकट येवो, आम्ही या संकटांना तोडीस तोड जवाब देऊ सामना करू. सह्याद्रीचे सिंह असले श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जयजयकाराचा नाद दरीदरीतून निनादत 
आहे. ।। २ ।।

मराठी माणसाच्या काळ्याकभिन्न कातळासारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहेत.
मराठी मनाची पोलादी मनगटे, पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटे लीलया झेलायला तयार आहेत. मराठी माणसे कष्ट करून घामाने थबथबली आहेत. दारिद्र्याच्या उन्हात जरी शिणत असली तरी भारताच्या थोरवीसाठी सतत झटायला तयार आहेत. दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जयजयकार असो.  ॥ ३ ॥

Comments

Popular posts from this blog

HOME