७मराठी ३. तोडणी

 ३. तोडणी

                    - दत्तात्रय  विरकर

पाठ परिचय 

शंकर  व तारा या  ऊसतोडणी कामगारांची  मीरा व वसंत ही मुले आहेत. मीरा व वसंत  आईवडिलांना तोडणीच्या कामात मदत करीत होती. मीराचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत झाले होते.वसंताच्या  मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ या पाठातून  व्यक्त झाली आहे.  वसंताचे वडील जेव्हा वसंताला शाळेत पाठवायला  तयार होतात , तेव्हा लहानग्या वसंताला अतोनात आनंद होतो. 




मूल्य / शिकवण / संदेश:  

 प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शिक्षणाने परिस्थिती  बदलते व जीवन समृद्ध होते, हे मूल्य  या पाठाद्वारे ठसवले आहे. शिक्षणाचे महत्व अधिक अधोरेखित केले आहे. 

शब्दार्थ

उमगलं नाही- समजले नाही. 

बाप्या माणूस - पुरुष 

झिऱ्यावर - झऱ्यावर ,झिरपणाऱ्या पाण्यावर 

वळकटी - गोल घडी 

पोचारा - पाण्याचा हबकारा 

आलू - आलो. 

जोगली होती-  पेंगत होती

वाढे - उसाचा  वरचा भाग ,शेंडा 

कोप्या-  खोपट्या, झोपडया 

गवसलं - सापडलं

तुपलं- तुझं 

ठाकला -  उभा राहिला.

मले - मला. 

साळांत - शाळेत.

कवा- केव्हा 

धाडणार - पाठवणार 

जोशात-  जोरात 

आन -आणि 

तांबड्याला -  पहाटेला

हाय- आहे. 

साळलेल्या- सोललेल्या छिललेल्या, ओरबडलेल्या,

अंधुक - अस्पष्ट

शिलगावून - पेटवून 

गुंडभर - गडू भरून 

उटीव -  उठव 

आरं -अरे.

कालवण - पातळ भाजी,

जुंपली - जोडली. 

धुडक्यात- रुमालात 

पेंडकं - चळत  पेंढी

घाव- आघात 

सडकेला -रस्त्याला 

कुटं- कुठे

मपली - माझी 

लिव्हलंय -  लिहिलय 

बग - बघ

काईच - काहीच 

नाइये-  नाही

तोडलं - थांबवलं. 

तूमी - तुम्ही,

व्हईल - होईल

समदं - सगळं.

डोईवर-  डोक्यावर 

वळ - ओळ, 

व्हय - होय. 

म्हंजी - म्हणजे 

माघारी - परत 

तवा- तेव्हा

उसागत - उसासारखे 

आवं -  अहो 

माय - आई

लेकर - पोरं, मुलं

यास्नीच - यांनाच.

इचारा / विचारा 

कावं-  काय हो. 

कशापाई - कशामुळे, 

ठिवलं - ठेवलं. 

मोटा / मोठा. 

म्या बी-  मी पण 

म्हंती - म्हणते

ऱ्हायलं - राहिलं.

म्हंतीया - म्हणत आहे 

इचारा-  विचारा 

कार्य - काम

पैके - पैसे 

वैणी - वहिनी.

नगस - नकोस, 

उदयापास्नं -उदयापासून

धाड-  पाठव. 

म्हंत्यात -  म्हणतात




टिपा

(१) ऊसतोडणी - तयार उसाचे दांडे मुळापासून तोडण्याचे काम.

(२) जू - बैलगाडीला बैल जोडताना त्यांच्या मानेवर ठेवला जाणारा लाकडी आडवा खांब.

(३) पाचुंदा - कडब्याच्या पाच पेंड्यांची एकत्रित बांधलेली मोळी.

(४) सरमड-  धान्याची कणसे वेगळे करून उरलेला  भाग ( याचा उपयोग गाई-गुरांसाठी कडबा म्हणून केला जातो.)

(५) जर्मनचे पातेले -  अॅल्युमिनिअमचा टोप.

(६) शंकू - वर टोकदार व खाली गोल असलेला चण्याच्या उलट्या पुडीसारखा आकार.. 

(७) चिमणी -  तेलाच्या वातीचा छोटा गोल दिवा..

(८) उसाचे पाचट  - तोडलेल्या उसाच्या कांड्यांचा सुकलेला भाग, धारदार पाती, चिपाड

(९) पाटा -  मीठ , मिरची , मसाला यांचे वाटण वाटण्याचे दगडी साधन

 (१०) फुपाट्याचा रस्ता -  मातीच्या धुळीचा रस्ता, चाकोरीचा रस्ता.

(११) 'तमसो मा ज्योतिर्गमय' -  संस्कृत भाषेतील उपनिषदातील वचन, 'अंधारातून प्रकाशाकडे.'

 (१२) साखरशाळा -  ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी साखर कारखान्याच्या परिसरात केलेली  तात्कालिक शिक्षणाची सोय.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) मनात काहूर उठणे येणे. - मनात विचारांचे वादळ येणे. 

(२) तांबडं फुटणे- पहाट होणे. 

(३) थंडीने अंग काकडणे - थंडीने अंग गारठणे.

(४) दिवस माथ्यावर येणे  - टळटळीत दुपार होणे.

(५) हबकून जाणे  - घाबरणे. 

(६) मनात उलघाल होणे  - मनाची चलबिचल होणे, अस्वस्थ होणे.

(७) वाटेला लागणे  - मार्गाने जाणे.

(८) खुटून बसणे -  रुसून बसणे.

(९) नजर खिळणे  - नजर एका जागी स्थिर होणे.

(१०) उलगडा न होणे -  न समजणे.

 (११) हातभार लावणे  - मदत करणे.

(१२) गाडी रुळावर येणे -  पुन्हा व्यवस्थित होणे.

१३) माघारी फिरणे  -परत येणे. 

(१४) मानेला झटका देणे -  नाराजी व्यक्त करणे 

(१५) साद घालणे- हाक मारणे.

(१६) नजर लावणे -  एकटक पाहणे.

(१७) साथ देणे  - सोबत असणे.

(१८) आबाळ होणे  -  नीट देखभाल न होणे 

(१९) स्तुती करणे -  प्रशंसा करणे, कौतुक करणे

(२०) मान फिरवणे - नाराजी व्यक्त करणे

(२१) तोंड उघडणे   - बोलायला सुरुवात करणे 

(२२) उभारी येणे - उत्साह वाटणे, उमेद येणे

(२३) आडवे येणे - बंधन घालणे, नकार देणे

(२४) आनंदाला पारावर न राहणे -  खूप आनंद होणे 

(२५) डोळे पाण्याने भरणे  - रडू येणे.



रप्रश्न १. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा

(१) मीराने वसंताला 'तमसो मा ज्योतिर्गमय 'चा सांगितलेला अर्थ.

उत्तर : 'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंताला सांगितला.  या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली - 'तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे अंधार आणि वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!"

(२) वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ.

उत्तर : वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक  सापडले. तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार ? त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती. यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते.

 (३) अगं! पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हाला  समजलेला अर्थ.

उत्तर : दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊसतोडणीच्या कामात वसंत मदतनीस  म्हणून हवा होता. म्हणून दादांनी त्यांचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही , असा या वाक्याचा अर्थ आहे.

प्रश्न २. वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

उत्तर : वसंतची शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये :

 (१) मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेचीआठवण झाली. (२) 'दादा, मले साळांत कवा धाडणार?" (३) त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला. (४) सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. (५) 'ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिव्हलंय बग? (६) अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं, तवा वाचायला तरी कसं येणार. ताई, काही झालं तरी मी शिकणारच.' (७) कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली. (८) वसंतनं लगेच मित्रांना गाठलं. “आता म्या साळंला येणार,' असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला.

• प्रश्न ३. पुढे  योग्य शब्द लिहा :

(१) बैलांचे खाद्य  : उत्तर : (१) पाचुंदयातील सरमड

(२) ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा : उत्तर:- (२)साखरशाळा

* प्रश्न ४. पढील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा :

मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले?

(१) मीरा आणि वसंत -  मीरा आणि वसंताने झिल्यावर पाण्यासाठी नंबर लावला.

(२) इतर बायका - इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. 

(३) दामू - दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले.

(४) तारा - ताराने भाकरी थापून  तव्यावर पिठले टाकले.

प्रश्न ५ नावे लिहा :

(१) वसंताने पुढे शिकावे असे या दोन स्त्रियांना वाटते.

(२) वसंता पुढे शिकू नये, असे याला वाटते.

(३) वसंताला शिक्षणाची प्रेरणा देणारी

(४) ऊसतोडणीला या गावात जायचे होते.

उत्तरे : (१) तारा व लक्ष्मी (२) शंकर  (३) मीरा  (४) थळ

(४)मुक्तोत्तरी प्रश्न

• (१) तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडते ? सकारण सांगा.

उत्तर : कथेतील वसंताची ताई-मौरा, हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. मीराचे शिक्षण आठवीपर्यंतच होते; परंतु ती हुशार होती. संस्कृतच्या वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला, मीरा आईवडिलांना ऊसतोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होतीच, परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे, अशी प्रेरणा तिने वसंताला दिली.यामुळे मोरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले.




• (२) साखरशाळेत जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत कराल ?

 उत्तर : राजेशला मी शाळेमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करीन. त्याला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगेन . त्याला वह्या-पुस्तके घेऊन देईन. नवा गणवेश देईन. शक्य झाल्यास त्याला दररोज शाळेत पोहोचवीन,  माझ्यासोबत त्याचा नियमित अभ्यास घेईन. अशा प्रकारे राजेशला मी शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईन.

भाषाभ्यास व व्याकरण

• प्रश्न १.  गटात न बसणारा शब्द शोधून लिहा :

(१) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती.

(२) रात्र, निशा, प्रभात, यामिनी

(३) अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित 

(४) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे,

उत्तरे-  (१) गरीब  (२) प्रभात (३) शिक्षित  (४) हरवणे..

• प्रश्न २. पुढील कंसात दिलेले वाक्प्रचार योग्य ठिकाणी वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.)

(१) वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली.

(२) गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही.

(३) सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते. (४) रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली.

प्रश्न ३. पुढील शब्दांत लपलेला अर्थ शोधा:

(१) तांबडं फुटलं.

(२) गाडी रुळावर आली.

(३) अंधाराकडून उजेडाकडे

(४) चूल शिलगावली.

उत्तर :- (१) पहाट झाली. (२) पुन्हा सुरळीत झाले. (३)अज्ञानातून ज्ञानाकडे (४) चूल पेटवली.

• प्रश्न ४. पुढील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा

(१) "पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय."

(२) अवं समदी लेकरं साळंला गेली आन तुपलं ? "

(३) “आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू ?'

(४) " आता म्या साळला येणार.'

उत्तरे-(१) "पोरा, मला तरी कुठं वाचता येतंय."

 (२) "अगं, सगळी मुले शाळेला गेली आणि तुझं?"

 (३) "आता तुम्ही सगळे म्हणताय , तर मी तरी कशाला आडवा येवू ?"

(४) "आता मी शाळेत येणार"

विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

(१) लवकर  x  उशिरा

     (२) सुरुवात x शेवट 

     (३) मागे  x पुढे 

    (४)  जवळ  x दूर 

खालील शब्दांचे एकवचन - अनेकवचन गट करा .

गाडी, कळशा,  चुली, भाकरी तवा, बैल ,पुस्तक, गाड्या, चूल, बैल, तवे, भाकऱ्या, पुस्तके, कळशी

एकवचन :-


अनेकवचन:- 


पुल्लिंग :- दादा, मुलगा, 


स्त्रीलिंग :- मुलगी


२. लेखन विभाग


पुढील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.


शाळेचा पहिला दिवस


आनंद , इमारत , पुस्तकांचा सुगंध, शाळेची इमारत , वर्गशिक्षक, 



शाळेचा पहिला दिवस 

मे महिन्याची सुट्टी संपत आली. मी नवीन वह्या पुस्तके व नवीन गणवेश घेतला. छानसे नवीन  दप्तर  घेतली . पहिल्या दिवशी मी लवकर उठलो.  पटापट तयारी करून नवीन गणवेश घालून ऐटीत निघालो. 'आदर्श विद्यामंदिर' हे माझ्या शाळेचे नाव !  माझी शाळा दुमजली आहे. 

शाळेच्या भोवताली मोकळे मैदान आहे. एक सुंदर बाग आहे. मैदानात आम्ही खेळतो . आमच्या शाळेतील सर्व वर्गखोल्या मोठ्या आहेत. वर्गात भरपूर हवा व प्रकाश खेळत असतो. 

 माझ्या शाळेत ग्रंथालय आहे. तसेच एक प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर एक अत्याधुनिक संगणक कक्षही आहे.

आम्ही सर्वजण वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो. काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले.   शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सगळे तास झाले. नव्या कोऱ्या  पाठयपुस्तकांचा सुगंध आम्ही अनुभवला. आमचे सर्व  शिक्षक चांगले आहेत. ते छान शिकवतात व  आम्हांला प्रेरणा देतात. शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टीही मजेत गेली. सगळ्यांनी डबे एकत्र खाल्ले. आम्ही खूप गप्पा मारल्या. असा माझा शाळेतला पहिला दिवस खूप आनंदात गेला.

प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा

(१) तुम्हाला कोणते शिक्षण घ्यावेसे वाटते? का? 

(२) ऊसतोडणीचे काम म्हणजे काय ,ते सांगा.



आकारिक मूल्यमापन

१. प्रकट वाचन:

• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक १४ वरील भाषेचा नमुना 'अहिराणी बोली ' याचे प्रकट वाचन करा. 

२. कृती :

पुढील शब्दांना 'पर' हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा :

 शब्द  :- प्रांत ,भाषा ,देश ,ग्रह ,राष्ट्र

(१) परप्रांत (२) परभाषा (३) परदेश  (४)  परग्रह 

 (५) परराष्ट्र.

आणखी शब्द: (१) परधाम (२) परमुलूख (३) परजातीय (४) परावलंबी (५) परलोक.

३. माहिती :

(१) साखरशाळा कोणत्या मुलांसाठी असते ? 

उत्तर : ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा असते.

(२) ही शाळा कोठे भरते ?

उत्तर : ऊसतोडणी ज्या भागात होते, त्या परिसरात (साखर कारखान्याजवळ) साखरशाळा भरते. 

 (३) साखरशाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत ?

उत्तर : ऊसतोडणीचे कामगार फिरतीवर असतात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत; म्हणून साखरशाळा सुरू झाल्या आहेत . 

(४) शेतीच्या पुढील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घ्या व नावे लिहा.

(१) खुरपणी (२) बांध घालणे  (३) पेरणी (४) नांगरणी

उत्तर : (१) खुरपणी - खुरपे, 

(२)  बांध घालणे-  दगड, माती, पाणी,

(३) पेरणी-  तिफन, बियाणे,

(४) नांगरणी - नांगर, बैल, ट्रॅक्टर,


कथाकथन ऐका - साखरशाळा

४. उपक्रम :

मा विद्या या विमुक्तये' हे ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक संस्थेला शाळेला मंडळाला आपले स्वतःचे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या.

• काही ब्रीदवाक्ये

(१) विद्या विनयेन शोभते। 

(२) कमवा आणि शिका

(३)शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, 

(४) न ही ज्ञानेन पवित्रम् इह वर्तते।

(५) ज्ञानाचा प्रकाश मतीचा विकास

• आपल्या महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे दर बारा कोसांवर भाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा बोलीभाषांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. कोणत्या भागात कोणती बोली बोलली जाते, त्यांची नोंद करा,

इथे पहा ....महाराष्ट्रातील बोलीभाषा 

Comments

Popular posts from this blog

HOME