7म ४. श्रावणमास

 ४. श्रावणमास

           बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोमरे ) 

वाचा. म्हणा.


श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. 

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे! 

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे, तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. 

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा; 

सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. 

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,

उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते.

फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;

सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.

खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे,

मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे. 

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला! 

सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती, 

सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती. 

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात, 

वदनी त्यांच्या वाचुन घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

कविता ऐकण्यासाठी व स्पष्टीकरण साठी क्लिक करा


बालकवी-त्र्यंबक बापूजी ठोमरे (१८९०-१९९८) निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध. बालवयातच कवितालेखनाला प्रारंभ १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या कविसंमेलनात 'बालकवी' म्हणून गौरवण्यात आले. 'बालकवींची कविता काव्यसंग्रह प्रसिद्ध .

प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे.


कवितेचा आशय :- 

श्रावण महिन्यात फुललेल्या वातावरणाचे बहारदार वर्णन या कवितेत  बालकवी यांनी केले आहे. श्रावण महिन्यातील आकाशातील व धरतीवरील दृश्यांचे मनोहारी चित्रण सुंदर शब्दांत केले आहे .   गुरे- वासरे,  लहान मुले, स्त्री- पुरुष यांना  झालेला आनंद व्यक्त केला आहे.


मूल्य / शिकवण / संदेश

 प्रत्येक ऋतूमध्ये होणारा निसर्गातील बदल विद्यार्थ्यांना कळवा आणि  निसर्गाशी व पर्यावरणाशी स्नेहबंध जुळावा,  हे मूल्य या कवितेतून दिसून येते.

 ऑनलाईन टेस्ट (कवितेच्या गाळलेल्या जागा भरा . )


शब्दार्थ :- 


मास- महिना 

मानसी - मनामध्ये

 शिरवे - सरीमधील तुषार,  थेंबांची माळ. 

 दुहेरी-  दुपेडी, दोन्ही बाजूंनी 

 विणलासे- गुंफला असे 

 मंगल - पवित्र 

 नभोमंडपी - आकाशाच्या मंडपाला. 

 भासे - असे  वाटते 

 तरु शिखर - झाडाचा शेंडा 

 जलद - ढग

 अनंत - असंख्य

  रेखिले - चित्रित केले, रेखाटले. 

  महा - मोठे,

   बलाक माला -  बागळ्यांची माळ

 अवनी -  पृथ्वी धरती.

  एकमते - एकत्रित, एकमताने. 

  कुरणी - गवतात 

  पावा  - बासरी 

  तयाचा - त्याचा

   महिमा - गौरव,  महती.

   एकसुरे - एका आवाजात , एका तालासुरात 

    सुवर्ण - सोने,

     चम्पक - चाफा.

      विपिनी - जंगलात ,रानात 

      केवडा-  केतकी, 

      पारिजात - प्राजक्त 

      रोष-  राग, नाराजी 

      पुरोपकंठी - नगराजवळील बाग

      शुद्धमती -  निर्मळ मनाने 

      बाला  - मुली 

      पत्री - पाने ,

      ललना-  महिला , स्त्रिया 

       माईना- मावत नाही. 

       वदनी - मुखावर तोंडावर .


(१) गोफ  -  रंगीतधाग्यांची एकत्र वीण 

(२) संध्याराग - संध्याकाळी जिलगांवर उमटलेले सुंदर रंग (सांजेचे सूर.)

(३) कल्पमुमने-  कल्पवृक्षाची  फुले .( कल्पवृक्ष हा इच्छित

 गोष्टी पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष - त्याची अलौकिक सुंदर फुले.)

(४) भामा- श्रीकृष्णाची पत्नी - सत्यभामा


ऑनलाईन टेस्ट (कवितेचा अर्थ ) 

कवितेचा भावार्थ


श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवट पसरते. क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला उन पडते . पाहून  मन आनंदाने फुलून येते. वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपेडी गोफ विणलेला दिसतो. इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की, कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे.  

ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला नि संध्याकाळ झाली असे वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा  बाजूला होऊन उंच घरांवर नि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात . जणू ते ढग संध्या राग गात आहेत.  सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणी (चित्रकाराने) रेखाटले आहे असे वाटते. 

 आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की, जणू कल्पफुलांचा तो  हार आहे आणि जमिनीवर बगळयांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत, असे वाटते. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने आपले भिजलेले पंख सावरत  पक्षी  फडफडत आहेत. हिरवळीवर आपल्या पाडसांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत . 


             हिरव्या माळरानावर गाईगुरेवासरे मजेत चरत आहेत आणि गुराखीसुद्या आनंदाने गाणी गात फिरत आहेत. गुराख्याच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत. सोनचाफा फुलला आहे आणि सुंदर केवडा दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा  विरून गेला, तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते. 

             

              फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून - धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले-  पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी (सुवासिनी) स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही. त्यांच्या प्रफुल्लित चेह-यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. ते गाणे त्यांच्या वरून वाचता येते.


संकलित मूल्यमापन


■  प्रश्न १. कविचा वाचून पुढील कृती करा : 

       ( अ ) पुढील तक्ता पूर्ण करा.


कवितेत आलेली खालील पैकी नावे लिहा ....

(१) प्राणी :-


(२) पक्षी :-


(३) फुले :- 


(ब ) कोण / काय ते लिहा ..


(१)  देवदर्शनाला निघालेल्या :- 


(२)  फुले पाने खुडणाऱ्या :- 


(३)  गाणी गात फिरणारा:- 


(४)  स्त्रियांच्या चेहऱ्यावर लिहिलेले



उत्तरे:- 

(अ) 

(१) प्राणी  - हरिणी, पाडसे, खिल्लारे (गुरेवासरे).

(२) पक्षी -  बगळे, पाखरे

(३) फुले - सोनचाफा, केवडा, पारिजातक.


(ब ) 

(१) ललना (२) सुंदर बाल 

(३) गोप (४) श्रावण महिन्याचे गीत


प्रश्न २. 'सुंदर बाला या फुलमाला' या ओळीत सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड  नाद निर्माण 

होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.


उत्तर : 

(१) श्रावण मासी हर्ष मानसी


(२) तरुशिखरांवर उंच  घरांवर


(३) उठती वरती जलदांवरती 


(४) उतरुनि येती अवनीवरती


(५) सुंदर हरिणी हिरव्या कुरणी


प्रश्न ३. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा : (१) क्षणात पाऊस पडतो, तर क्षणात ऊन पडते.

उत्तर :- क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.


(२) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. 

उत्तर: तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.


 (३) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत. उत्तर: सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.


प्रश्न ४. पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा :


श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.


उत्तर : श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर  लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते हा ऊनपावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते.


मुक्तोत्तरी प्रश्न


१. पुढील प्रसंगी काय घडते ते लिहा :


(१) पहिला पाऊस आल्यावर.

उत्तर : कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. पहिला पाऊस सर्व प्राणिमात्रांना हवाहवासा वाटतो.


 (२) सरीवर सरी कोसळल्यावर...

उत्तर : आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात, तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते . झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु-पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात. 



२. निरीक्षण करा व लिहा :- 


श्रावण महिन्यात तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल


नमुना उत्तर :

►(१) पांढन्या ढगांचे पुंजके तरंगत असतात. 

(२) अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात.

(३) आकाश काळया ढगांनी दाटून येते.

(४) पावसाची जोरदार सर येते.

(५)  थोड्या वेळाने सूर्य ढगाआडून येतो व लख्ख ऊन पडते. कधी रिमझिमत्या सरीत  ऊन पडून क्षितिजावर

इंद्रधनुष्य उमटते.


भाषाभ्यास व व्याकरण


● प्रश्न १. पुढील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा


(१) बासरी  -पावा

(२) स्त्रिया  -  ललना

(३) आकाश - नभ

(४) मेघ  - जलद

(५) गुराखी  -गोप

(६) पृथ्वी -अवनी

(७) वृक्ष  - तरू

(८) मुख - वदन

(९) राग - रोष


प्रश्न २. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा . 


(१) हर्ष x दुःख


(२) उंच  x  खोल


(३) राग  x प्रेम


(४) मंजुळ   x कर्कश


(५) ऊन  x सावली


प्रश्न ३. पुढील शब्दांची स्त्रीलिंगी रूपे लिहा

(१) बगळा - बगळी

(२) गोप -गोपी

(३) पुरुष स्त्री


प्रश्न ४ तक्ता पूर्ण करा:


एक    अनेक


तोरण   तोरणे

बगळा   बगळे

फूल      फुले

केवडा    केवडे

पंख    पंख 



क्रियाविशेषण अव्यये


• लिंग, वचन, विभक्ती यांमुळे ज्या शब्दांच्या रूपात काहीच बदल होत नाहीत ,त्यास अव्यये किंवा अविकारी शब्द म्हणतात.


• पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष


(१) दररोज व्यायाम करावा. (कधी करावा? दररोज)

(२) घोडा जलद धावतो.  कसा धावतो? जलद) 

(३) सर्वत्र पाऊस पडला. (कोठे पडला? सर्वत्र )

(४) थोडा खाऊ खा. (किती खा ?  थोडा) 


• वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द क्रियापदांविषयी अधिक (विशेष) माहिती देतात.


(१) दररोज -  करावा 

(२) जलद - धावतो.

(३) सर्वत्र - पडला

(४) थोडा - खा.


"दररोज, जलद, सर्वत्र थोड़ा ही कियेची विशेषणे आहेत.


लक्षात ठेवा

 विशेषणे नाम व सर्वनामाबद्दल  अधिक माहिती देतात;  तर क्रियाविशेषण अव्यये क्रियापदांबद्दल अधिक माहिती देणारे शब्द असतात.


म्हणून


(१) दसरोज (२) जलद (३)   सर्वत्र (४) थोड़ा ही क्रियाविशेषण अव्यये आहेत.


प्रश्न ५. पुढील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये शोधून लिहा


(१) चोहिकडे हिरवळ दाटली आहे.

(२) क्षणात येते सरसर शिरवे

(३) हळू हळू सूर्यास्त होईल.

(४) पाडसे तुरुतुरु धावतात.


उत्तरे : क्रियाविशेषण अव्यये = (१) चोहिकडे (२) क्षणात (३) हळू हळू (४) तुरुतुरु..


२. लेखन विभाग


*(१) श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा. 


उत्तर : वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला भेगा पडतात. अंगाची लाहीलाही होते. घामाच्या धारा लागतात. नदीनाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो. 

श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. ऊन कोवळे होते. ऊनपावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो.  हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येते. शेतकरी आनंदात असतात. नदीनाले भरभरून वाहतात . गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशु-पक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात


(२) पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा.


उत्तर :

पाऊस : तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो नि तू मला अडवतेस ?


छत्री:  नाही, भाऊ! मी तुम्हांला अडवत नाही. मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते.

पाऊस : पण कधी तरी माणसांनी भिजावं की! गुरेढोरे, सारी सृष्टी भिजते... मग माणसांचे एवढे ते काय? 


छत्री: तसे नव्हे! माणसे भिजली तर त्यांना पडसे, खोकला येतो. डॉक्टरकडे जावे लागते. विशेषतः बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते. 


पाऊस : खरं आहे तुझं. तू त्यांचं संरक्षण करतेस. पण एक विचारू?


छत्री : विचारा ना!


पाऊस : तू माणसांचे रक्षण करतेस. मग तू का भिजतेस ? छत्री : उत्तर एकदम सोप्पं आहे! अहो, वर्षभर मी अडगळीत असते. तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो. हो की नाही ??

पाऊस : धन्य आहे गं तुझी बाई !!



प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :


३. तोंडी परीक्षा


(१) तुम्हांला कोणता मराठी महिना आवडतो? का? 

(२) श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये सांगा.



आकारिक मूल्यमापन


•१. प्रकट वाचन:


(१) श्रावणमास' ही कविता तालसुरात साभिनय म्हणा.


(२) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक १८ वरील 'सारे हसूसा' या विनोदाचे प्रकट वाचन करा.


२. कृती :


• पुढे समान अर्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे-उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरायच्या आहेत


जिना (१) 


(१) मस्तक


(२) कचरा


(३) रात्र


(४) पाणी


(५) जनता


(६) मुलगी


जिना (२) 


(१) पुढारी


(२) दिनांक


(३) पक्षी


(४) आकाश


(५) डोळे


(६) आश्चर्य



३. प्रकल्प :


* बालकवींच्या आणखी निसर्गकविता मिळवा. त्यांतील तुम्हांला आवडलेली कविता परिपाठात तालासुरांत सादर करा. बालकवींच्या कवितांचा संग्रह करा.





Comments

Popular posts from this blog

HOME