7मराठी, असे जगावे (कविता)
१५. असे जगावे
-- गुरू ठाकूर
कवितेचा आशय :- माणसाने जीवन जगताना प्रबळ इच्छाशक्ती ठेवून संकटांशी सामना करावा व समर्पित जीवन जगावे, हे या कवितेत ओजस्वी शब्दांत सांगितले आहे.
मूल्य / शिकवण / संदेश: माणसाने आयुष्यामध्ये चांगले कार्य करून जावे व वाट्याला आलेले जीवन समृद्धपणे हसतखेळत जगावे , ही शिकवण या कवितेतून दिली आहे.
शब्दार्थ:
छाताडावर - छातीवर.
आव्हान -संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती, संकट.
रोखुनी - खिळवून, थेट पाहत.
गुलामी - दास्य.
नक्षत्रे - ग्रहतारे.
भिडताना - सामोरे जाताना, स्वीकारताना.
चैन -मौज
दांडगी - जबरदस्त, बळकट.
मार्ग - रस्ता, वाट.
तयाला - त्याला.
कवेत - कुशीत, मिठीत.
अंबर - आकाश.
ठणकावून - ठामपणे, जोरात, जरबेने .
बेहत्तर - पर्वा नसणे.
स्वर - सूर, बोल.
काळ - समय, वेळ.
कातर- कापरा, भावनेने ओथंबलेला, कोमल.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
(१) नजर रोखणे - निर्भयपणे पाहणे.
(२) पाय जमिनीवर असणे - वास्तवाचे भान ठेवणे.
(३) कवेत अंबर घेणे अशक्य गोष्ट शक्य करणे.
(४) ओठावर हसू असणे - आनंद होणे.
(५) काळीज काढून देणे प्रिय गोष्ट दुसन्याला.
(६) ठणकावून सांगणे ठामपणे जोरात सांगणे
(७) गहिवर येणे - हृदय भावनेने उचंबळून येणे.
(८) निरोप देणे - निघून जाणे.
(९) शेवटचा निरोप देणे - मृत्यू पावणे.
• अत्तर - फुलाच्या गाभ्यातील सुगंधी रस.
कवितेचा भावार्थ :-
आयुष्य संपन्नपणे व समृद्धपणे कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात
- जीवन जगताना समोर कितीही कठीण आव्हाने आली, तरी अत्तरासारखी छातीवर घ्यावीत. संकटांना सुगंधी अत्तर समजून ती सहज, लीलया पेलावीत. अशा खडतर आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून, न घाबरता उत्तर दयावे.
ग्रहताऱ्यांची आंधळी भीती बाळगून नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नये. (कुंडली, नशिबाचे फेरे खुळचट कल्पनांवर विश्वास ठेवू नये.) आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस, मौज पुरवून घ्यावी. सुंदर जगावे. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, त्यांना सत्तर वाटा खुल्या होतात. जगण्याचे अनेक योग्य मार्ग सापडतातच. आयुष्याच्या नजरेला नजर देत ठामपणे जगावे.
जगताना पाय जमिनीवर ठेवावेत. वास्तवाचे भान ठेवावे नि मग मिठीत आकाश घ्यावे. अशक्य गोष्ट शक्य करावी. इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओठांवर हास्य ठेवावे. (विषाद वाटून देऊ नये) . संकटांना बजावून सांगावे की तुम्ही आलात की भी तुमची पर्वा करीत नाही. आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तर दयावे.
या दुनियेतून कायमचे निघून जाताना आपले कर्तृत्व मागे ठेवून असे जावे, की सगळ्या जगाचे हृदय हेलावून जायला हवे. आपण जगाचा निरोप घेताना जगाला हळहळ वाटायला हवी, असे समृद्ध कार्य करून जावे. काळाचा सूरही थोडा मवाळ व्हावा, कातर व्हावा, गलबलून जावा. आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला उत्तर दयावे.
संकलित मूल्यमापन
१. प्रश्नोत्तरे
१. जोडा लावा :
'अ' गट
(१) कवेत अंवर घेताना -
(२) काळीज काढून देताना -
(३) शेवटचा निरोप देताना -
(४) इच्छा दांडगी असेल तर
'ब' गट
(अ) जगाला गहिवर यावा.
(आ) अनेक मार्ग मिळतात.
(इ) ओठांवर हसू असावे.
(ई) पाय जमिनीवर असावेत.
उत्तरे
(१) कवेत अंबर घेताना - पाय जमिनीवर असावेत.
(२) काळीज काढून देताना - ओठांवर हसू असावे.
(३) शेवटचा निरोप देताना - जगाला गहिवर यावा.
(४) इच्छा दांडगी असेल तर - अनेक मार्ग मिळतात.
• प्रश्न २. पुढील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
उत्तर : या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दुनियेतून निघून जाताना मृत्यू येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तृत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. सगळ्यांना गलबलून यायला हवे. तुमची आठवण यावी, अशी कर्तबगारी करून जा.
• प्रश्न ३. संकटात कसे वागावे, हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : संकटांना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटांचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर दयावे.
४. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : निर्भयपणे संकटांचा सामना करीत हसतमुख जगावे. दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे. परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे. जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील, असे कर्तृत्व करावे. काळावर आपला ठसा उमटवावा. हा संदेश कवींनी या कवितेतून दिला आहे.
प्रश्न ५. उत्तर लिहून पूर्ण करा :
(१) छातीवर हे लावावे
(२) यांची गुलामी करू नये
(३) यांची भीती बाळगू नये
(४) हे कवेत घ्यावे
(५) यांना ठणकावून सांगावे
(६) यांची चैन करावी
उत्तरे:- (१)आव्हानाचे अत्तर (२) नक्षत्रांची (३) ताऱ्यांची
(४)अंबर (५) संकटांना (६) स्वप्नांची
मुक्तोत्तरी प्रश्न
'कातर कातर अवस्था' म्हणजे खूप वाईट वाटल्यावर होणारी स्थिती. तुमच्या मित्राची अशी अवस्था झाल्यास तुम्ही कोणती मदत कराल ?
उत्तर : मित्राची कातर अवस्था झाली, तर मी आधी त्याचे दुःख समजून घेईन. त्याला दिलासा देईन. संकटांना कसे सामोरे जायचे, याची हिंमत त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करीन. त्याला धैर्याने जगलेल्या माणसांची उदाहरणे देईन. मी तुझ्या सोबतीस आहे, असा विश्वास देईन. सर्वतोपरी त्याला मदत करीन.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १. पुढील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा :
'अ' गट
(१) नजर रोखणे.
(२) पाय जमिनीवर असणे.
(३) हसू ओठांवर असणे.
(४) कवेत अंबर घेणे.
(५) काळीज काढून देणे.
'ब' गट
(अ) वास्तवाचे भान ठेवणे.
(आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
(इ) निर्भयपणे पाहणे.
(ई) आनंद होणे.
(3) अशक्य गोष्ट शक्य करणे.
उत्तरे
(१) नजर रोखणे - निर्भयपणे पाहणे.
(२) पाय जमिनीवर असणे - वास्तवाचे भान ठेवणे.
(३) हसू ओतांवर असणे - आनंद होणे
(४) कवेत अंबर घेणे - अशक्य गोष्ट शक्य करणे.
(५) काळीज काढून देणे - प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
प्रश्न २. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
(१) अत्तर - उत्तर, सत्तर, बेहत्तर
(२) तान्यांची - स्वप्नांची
(३) जाताना -देताना
• प्रान ३. पुढील अधोरेखित / ठळक शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
(१) पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना.
(२) असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर,
(३) असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर.
(४) नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर.
(५) स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर.
उत्तरे : (१) पाय असावे जमिनीवरती, कवेत आकाश घेताना.
(२) असे जगावे, छाताडावर संकटांचे लावून अत्तर,
(३) असे दांडगी इच्छा ज्यांची, वाटा तयाला मिळती सत्तर. (४) नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला दयावे उत्तर.
(५) स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा.
४. शब्दांपुढे तो, ती, ते' लिहा.
ते- स्वप्न
तो- तारा
ती- नजर
ती - इच्छा
ते - अत्तर
तो - स्वर
२. लेखन विभाग
* (१) 'संकटांना न घाबरता तोंड दयावे', याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखादया प्रसंगाचे वर्णन करा.
नमुना उत्तर: सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार वि. स. खांडेकर यांची 'हरिणी व पारथी' ही एक रूपक कथा आहे. हरिणी जिवाच्या आकांताने धावत होती. तिच्यामागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करीत होता. धावता धावता ती एका पहाडाच्या टोकावर आली. खाली दरी होती नि मागे पारथी. पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार नि पाठीमागे साक्षात मृत्यू बाण रोखून! हरिणीने क्षणभर विचार केला, थांबली नि वळून पारध्याला सामोरी झाली. डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला.
(२) सांगा :
तुम्हांला येथे काही अॅप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही अप्स वापरली जातात, यांची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा.
ॲप्स काय म्हणतात ? कशासाठी वापरतात?
(१) कॉन्टैक डिरेक्टरी - संपर्क यादी साठवणे.
(२) मेल बॉक्स - आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे.
(३) होम - तातडीचे व नियमित अँप्स साठवणे.
(४) वेब ब्राऊजर्स - आंतरजालावरील विविध वेबसाईट उघडणे.
(५) फाईल मॅनेजर - विविध प्रकारच्या साठवलेल्या फाईल दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे.
(६) फेसबुक - सामाजिक संपर्क करणे.
(७) म्यूझीक - गाणी संगीत ऐकणे.
(८) व्हाट्सअप - मजकुराची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे.
(९) नेटपॅड - टिपण नोंद करण्यासाठी
(१०)सेटिंग्स -भ्रमणध्वनीचे अंतर्गत अँप नियंत्रित करणे.
(११) ट्विटर - सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी.
(१२) कॅमेरा - (छायाचित्र) फोटो काढणे,छायाचित्रण करणे.
(१३) इन्फ्रारेड - बिनतारी यंत्रणेद्वारे इतर साधने आंतरजालास जोडणे.
(१४) लॉक स्क्रीन आणि सुरक्षितता- भ्रमणध्वनीच्या वापराच्या सुरक्षिततेसाठी व आपली माहिती गोपनीय ठेवणे.
• विचार करा. सांगा.
(१) तुम्हांला मोबाइल/ संगणकावरील कोणती अॅप्स वापरायला आवडतात ?
(२) अभ्यास करण्यासाठी असा एखादया अॅप्सचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.
(३) या विविध अॅप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास / नसल्यास का ते सांगा.
(४) मोबाइल / संगणकावरील अॅप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल?
तुम्हांला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात? त्यासाठी कोणती अॅप्स तयार व्हावीत ।
तुम्हांला वाटते ?
३. तोंडी परीक्षा
प्रश्न पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :
(१) तुमच्या मते, कसे जगावे, ते सांगा.
(२) तुमचा मित्र/मैत्रीण निराश झाली, तर तुम्ही त्याला/तिला काय सांगाल ?
आकारिक मूल्यमापन
१. प्रकट वाचन :
● * पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ७२ वरील 'वाचा' व 'सारे हसूया' या मजकुरांचे प्रकट वाचन करा..
२. चर्चा व अनुलेखन :
(१) आयुष्य जगताना स्वप्ने पाहावीत. (२) इच्छा असेल तर मार्ग मिळतो..
३. उपक्रम :
• ही कविता समूहगीत म्हणून सादर करा.
Comments
Post a Comment