८.मराठी ६.असा रंगारी श्रावण
६. असा रंगारी श्रावण
कवी - ऐश्वर्य पाटेकर
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो
कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत
जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत
नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी
वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या पाना-फुलांचे पातळ थेंबाथेंबांनी सजल्या
झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला
देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला
पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा
दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा
पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो
खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो
इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो
रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
हिर्व्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो.
■ कवितेची मध्यवर्ती कल्पना ■
श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू ! श्रावणात निसर्ग बहरतो नि सण, व्रत-वैकल्यांनी माणूस सुखावतो. श्रावणातील निसर्गाच्या विविध रुपांचे व माणसाच्या आनंदमय जीवनाचे सुंदर शब्दांत या कवितेत वर्णन केले आहे.
■ शब्दार्थ ■
उधळीत-विखरत.
सृष्टीचा गा - निसगांचा रे.
हिर्वा- हिरवा.
देखावा - दृश्य
रेखितो- रेखाटतो, चित्र काढतो
कलावंत - कलाकार.
कलागत - कलाकृती , जादूगिरी.
साजिरा - सुंदर.
पंगत - रांग.
पहाळीचं - थेंबांच्या सरीचे.
वेण्या गुंफितो - केसांची तिपेडी वेणी घालतो.
पातळ - छोटे लुगडे.
लय- नाद, लकेर.
खेळगा - खेळगडी.
संगती - सोबत.
चिंब- संपूर्ण भिजलेला.
गोपाळ - गोपाल, गुराखी, श्रीकृष्ण.
अवघा - संपूर्ण, सर्व.
लख्ख - स्वच्छ, शुभ.
खट्याळ - खोड़कर.
झाडाआड - झाडामागे.
बांध - अटकाव.
नभ - आकाश.
गोंदतो- ठसवतो, उमटवतो.
मळा - शेत.
खोपा - चिमणीचे घरटे.
■ वाक्प्रचार व त्यांचा अर्थ ■
(१) बांध घालणे - मज्जाव करणे , बंधन घालणे.
(२) खोडी काढणे - कुरापत काढणे, मस्करी करणे.
■ टिपा ■
(१) रंगारी : रंगाचे काम करणारा कारागीर,
(२) चित्रकार : चित्र काढणारी व्यक्ती.
(३) झिम्मा : पोरीबाळींनी फेर धरून केलेला एक नाच.
(४) दहीहंडी : श्रावणात गोकुळाष्टमीला उंच बांधलेली दहीकाल्याची हंडी.
(५) इंद्रधनुष्य: ऊन-पाऊस एकत्र येऊन आकाशा उमटलेला सात रंगांचा झोत.
( पाऊस पडल्यानंतर अथवा पाऊस पडत असताना आकाशातील पावसाच्या थेंबावर सूर्यकिरण पडल्याने त्याचे अपस्करण होऊन आकाशात सात रंगांची कमान दिसते त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. )
■ कवितेचा भावार्थ ■
श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय व मनोहर दृश्यांचे वर्णन करताना कवी म्हणतात श्रावण हा रंगांचा जादूगार आहे. तो सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो.
श्रावण हा सुंदर कलाकार आहे. त्याची किमया काय सांगावी? हा किमयागार अजब आहे. जागोजागी निसर्गात जणू त्याने चित्रांचीच रांग मांडली आहे. सर्वत्र पंगतीत बसलेली चित्रे आहेत.
हा श्रावण दरी खोऱ्यात, डोंगरात नाचतो; नदीबरोबर झिम्मा खेळतो; रिमझिम सरींचे मधुर गाणे तो झाडांशी बोलतो.
वेलींच्या तो जेव्हा वेण्या घालतो, तेव्हा वेली लाजून चूर होतात. (खूप लाजतात.) वेली मग पानाफुलांचे पातळ नेसून थेंब ठसवून सजतात, नटतात.
पोरीबाळींना झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो. त्यांना झोके देतो. झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना नादमय लय देतो.
लहान मुलांच्या खेळात श्रावण त्यांचा सवंगडी होतो आणि दहीहंडीच्या काल्यात त्यांच्या संगे प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला बाळकृष्णच होतो.
शुभ्र उन्हात तो पावसाचे घर बांधतो आणि खोडकर श्रावण पावसाची खोड काढून, मस्करी करून झाडामागे लपतो.
आकाशाच्या अफाट निळाईत श्रावण इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध घालतो. रंगीबेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात सजवतो, ठसवतो.
असा हा कलावंत रंगारी श्रावण रंग उधळीत फिरतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो.
■■प्रश्न. कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा ■■
कृती १ (आकलन कृती )
(१) श्रावण महिन्याची विविध रूपे लिहा.
(i) सृष्टीचा हिरवा देखावा
(ii) चित्रांची मांडलेली पंगत
(iii) रिमझिम सरीचे गाणे
(iv) पाना-फुलांचे पातळ व फुलांची नक्षी
(२ )श्रावणातील मुलामुलींचे खेळ
झुल्यावर झोके घेणे
दहिहंडी खेळणे
(२) प्रश्न तयार करा :
(i) 'श्रावण' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
● रंग उधळीत येणारा रंगारी कोण?
(ii) 'इंद्रधनुष्याचा बांध' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
● श्रावणाने नभाला काय घातला आहे ?
★ (३) अर्थ लिहा :
(३) (i) रंगारी - रंगांचे काम करणारा कारागीर.
(ii) सृष्टी - निसर्ग
(iii) झुला - झोका, हिंदोळा
(iv) खेळगा - खेळगडी, सवंगडी.
■कृती २: (आकलन कृती)■
(१) (i)कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे .
●●रंगारी ,खेळगा , गोपाळ
`(ii) श्रावणाने पोरापोरींसाठी केलेली कामे.
● झाडाला झुला टांगतो.
● पोरांसंगती दहिहंडी खेळतो.
■ श्रावणाने निसर्गघटकांबरोबर केलेल्या व अनुभवलेल्या गोष्टी लिहा .■
(१) रंग उधळून हिरवा देखावा रेखाटतो.
(२) जागोजागी चित्रांची पंगत मांडतो.
(३) दरी डोंगरात नाचतो, नदीशी झिम्मा खेळतो.
(४) झाडांशी रिमझिम सरींचे गाणे बोलतो.
(५) वेलींची वेणी घालून पाना-फुलांचे पातळ नेसवतो.
(६) उन्हात पावसाचे घर बांधतो.
(७) नभाला इंद्रधनुष्याचा बांध घालतो.
(८) रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात काढतो.
(३) एका शब्दात उत्तर लिहा :
(i) साजिरा कलावंत - श्रावण
(ii) रिमझिम पहाळीचे- गाणे
(iii) पाना-फुलांचे - तोरण
(iv) इंद्रधनुष्याचा - बांध
(v) रंगीबेरंगी फुलांची - नक्षी
(vi) हिरव्या मळ्यात श्रावणाने बांधलेला - खोपा
■ कृती ३: (काव्यसौंदर्य कृती) ■
● (१) जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत, या
ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर : श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे. श्रावणामधील निसर्गातील रंगबदल 'असा रंगारी श्रावण' या कवितेत कवींनी वर्णन केलेले आहेत. श्रावण हा सृष्टीचा चित्रकार आहे. त्याने हिरवा निसर्ग रेखाटला आहे. हा सुंदर कलावंत अशी किमया करतो की जागोजागी सृष्टीमध्ये त्याने चित्रांची रांगच सजवली आहे. यातील अर्थ असा आहे की श्रावणातील रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे डोंगर हिरवेगार होतात. झाडे तजेलदार होतात. धरतीवर हिरवी मखमल अंथरल्यासारखी वाटते. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलते. मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे पाना-फुलांचा रंग बहरतो. या सर्व गोष्टी श्रावणात दिसतात. म्हणून कवींनी अशी कल्पना केली आहे की जणू श्रावण हा थोर कसबी चित्रकार आहे नि सृष्टीमध्ये जागोजागी त्याने वेगवेगळ्या चित्रांची पंगत मांडली आहे.
● (२) 'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांचा
कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: श्रावण महिन्यात 'नागपंचमी' व 'गोकुळाष्टमी'
हे सण साजरे केले जातात. 'चल ग सये वारुळाला l नागोबाला पुजायाला' अशी नागपंचमीची गाणी मुली व स्त्रिया गात गात पूजा करतात. याचा संदर्भ कवींनी खुबीने कवितेतव आणला आहे. तो असा की, श्रावण मुलींसाठी झाडावर झुले टांगतो व त्यांना झुलवतो. त्या झुल्यांवर बसून मुली जी नागपंचमीची गाणी गातात, त्या पोरींच्या गाण्याला श्रावण नादमय लय देतो. दुसरा संदर्भ आहे गोकुळाष्टमीचा. 'गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत लहान मुले झुंडीने गोपाळकाला खेळतात. दहीहंडी लुटतात. याचा संदर्भ देताना कवी म्हणतात की, स्वत: श्रावण त्या पोरांमध्ये खेळण्यासाठी खेळगा (खेळ गडी) होतो. दहीहंडीच्या जुलुसात तो चिंब झालेला गोपाळ म्हणून सामील होतो.
● (३) कवितेतून व्यक्त झालेला 'रंगारी श्रावण ' तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणाला
कवींनी रंगारी म्हटले आहे. तो सृष्टीचा सुंदर व कुशल चित्रकार आहे. त्याने सर्वत्र हिरवा देखावा रंगवलेला आहे तो अवखळ व खटयाळही आहे. श्रावण अवखळपणे डोंगरदऱ्यांत नाचतो. नदीशी झिम्मा खेळतो. रिमझिम सरींचे गाणे झाडांना ऐकवतो. वेलीच्या वेण्या घालून त्यांना पानाफुलांचे, थेंबाथेंबांचे पातळ नेसवून नटवतो. तो झुल्यावर झुलणाऱ्या मुलींच्या गाण्यांना लय देतो. दहीहंडीमध्ये गोपाळ बनून सामील होतो. रंगारी श्रावण पावसाचे घर उन्हात बांधतो व त्याच्या खोड्या काढून झाडामागे दडतो. तो आकाशात इंद्रधनुष्याचा बांध घालतो आणि रानात रंगीबेरंगी फुलांची नक्षी कोरतो. शेवटी रंगारी श्रावण हिरव्या मळ्यामध्ये खोपा करून राहतो. असा हा हरहुन्नरी किमयागार व रंगांचा जादूगार असलेला श्रावण मला खूप आवडतो.
■■■■ व्याकरण व भाषाभ्यास ■■■■
★१. व्याकरण :
■(१) पुढील शब्दातील मूळशब्द, समान्यरूप आणि प्रत्यय लिहा .
शब्द :-(i) डोंगरात (ii) वेलींच्या (iii) नदीशी (iv) गाण्याला
उत्तरे :
मूळ शब्द:- डोंगर , वेली, नदी, गाणे .
सामान्यरूप :- डोंगरा , वेलीं , नदी , गाण्या.
प्रत्यय :- त , च्या , शी ,ला.
■ (२) लिंग ओळखा
(i) सृष्टी - स्त्रीलिंग (ii) ऊन - नपुंसकलिंग
(iii) चित्र – नपुंसकलिंग (iv) श्रावण - पुल्लिंग.
■ (३) एकवचन आणि अनेकवचन यांच्या जोड्या लावा.
एकवचन :- गाणे , फुले , वेल , झुले .
अनेकवचन:- झुले, वेली,फुले,गाणी
◆(१) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा :
(i) नदीशी - झाडांशी (ii) लाजल्या - सजल्या
(iii) झाडाला - गाण्याला (iv) बांधतो - लपतो.
◆ (२) कलावंत' सारखे चार शब्द लिहा :
●● भाग्यवंत ,प्रज्ञावंत , पुण्यवंत , गुणवंत
◆ (३) 'ळ' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
जसे- खट्याळ.
उत्तरे : मधाळ , ढगाळ , दुधाळ , रसाळ
◆ (४) इंद्रधनुष्यातील सात रंग क्रमवार लिहा.
उत्तरे : तांबडा ,नारिंगी, पिवळा,हिरवा,निळा, पारवा, जांभळा.
◆ (५) 'रा' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर : गोजिरा ,हसरा ,नाचरा, दुखरा, हावरा.
■■ ३. लेखननियमांनुसार लेखन : ■■
● पुढील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा :
रीमझीम - रिमझिम
चीत्रकार - चित्रकार
सृष्टि – सृष्टी -
हीरवि - हिरवी
■ ४. वाक्प्रचार ■
• वाक्यात उपयोग करा :
खोडी काढणे.
वाक्य : मधू नेहमी लहानग्या मुलांची उगाचच खोडी काढतो.
तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) श्रावण महिन्यात तुम्ही कोणती मजा लुटता? कशी लुटता ?
(२) आणखी कोणता मराठी महिना तुम्हांला आवडतो ? का?
(३) इंद्रधनुष्यातील सात रंग कोणते, ते सांगा.
आकारिक मूल्यमापन
■ उपक्रम :
(१) आश्विन महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभवलेखन करा.
(२) झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तर :
झोका: तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला.
झाड :पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला.
झोका : खाली- वर, वर-खाली मी झोकात किती झुलतो !
झाड: अरे, पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो !
झोका : मागे-पुढे आहे माझी ठेक्यावरती लय.
झाड: मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय.
झोका : तू तर आहेस एका जागी पूर्ण गाडलेला.
झाड: मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला.
झोका : तू एका जागी स्थिर, बघ मी किती गतिमान !
झाड : नको घरूस फुकटचा हा व्यर्थ अभिमान।
झोका : तू येतोस का झुल्यावर? येईल तुला मजा.
झाड : मी जर हललो जागेवरून तर तुलाच होईल सजा.. झोका : नको, नको रे झाडा! तू तर माझा मोठा भाऊ!
झाड : आरामात झोके घे तू; आपण दोघेही झुलत सुखात राहू!
स्कॉलरशिप प्रश्न
प्रश्न क्र.(1) श्रावणाला कवीने काय संबोधले आहे?
(1) रंगारी (2) चित्रकार (3) कलावंत (4) एक ते तीन बरोबर
प्रश्न क्र.(2) श्रावणाला साजिरा कलावंत का म्हटले आहे
(1) श्रावण सुंदर आहे म्हणून (2)श्रावण हिरवा देखावा रेखितो म्हणून (3) श्रावणाणे प्रत्येक ठिकाणी चित्रांची पंगत मांडली आहे म्हणून (4) श्रावण झिम्मा खेळतो म्हणून
प्रश्न क्र.(3) श्रावण नदी डोंगरात काय करतो ?
(1) झिम्मा खेळतो (2) रंग उधळतो (3) चित्रांची पंगत मांडतो (4) गाणं बोलतो
प्रश्न क्र.(4) वेळी का लाजतात ?
(1) पातळ नेसल्यामुळे (2) वेण्या गुंफल्यामुळे (3) पाऊस आल्यामुळे (4) झिम्मा खेळल्यामुळे
प्रश्न क्र.(5) श्रावण पोरींच्या गाण्याला ................ देतो.
(1) लय (2) नाद (3) ताल (4) ठुमका
प्रश्न क्र.(6) श्रावण खेळगडी कोणा सोबत होतो
(1) नदींशी (2) पोरांशी (3) झाडांशी (4) पोरींशी
प्रश्न क्र.(7) श्रावण श्रीकृष्ण बनवून केव्हा येतो ?
(1) नागपंचमीला (2) दहीहंडीला (3) पावसाळ्यात (4) मळ्यात
प्रश्न क्र.(8) श्रावण झाडाआड का लागतो ?
(1) दमल्यानंतर (2) लपंडाव खेळताना (3) खोडी काढून (4) चित्रे काढून
प्रश्न क्र.(9) श्रावण पानाफुलांची नक्षी कोठे गोंधतो ?
(1) घरावर (2) रानात (3) आकाशात (4) वेलींवर
प्रश्न क्र.(10) इंद्रधनुष्याचा बांध श्रावण कोठे घालतो ?
(1) आकाशाला (2) घराला (3) नदीला (4) सृष्टीला
प्रश्न क्र.(11) 'रंगारी' या शब्दाचा अचूक अर्थ काय?
(1)रंग काम करणारा (2) कलावंत (3) कलाकार (4)अभिनेता
प्रश्न क्र.(12) 'कलागत ' या शब्दाचा नेमका अर्थ काय ?
(1) कलाकृती (2) कलाकार (3) रंगारी (4) खोडी
प्रश्न क्र.(13) ' श्रावण झाडांशी गाणे बोलतो.' यामधील अधोरेखित झाडांशी या शब्दाची विभक्ती ओळखा.
(1) द्वितीया (2) तृतीया (3) षष्ठी (4) सप्तमी
प्रश्न क्र.(14) खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
(1) सृष्टी (2) घर (3) गाणे (4) मणी
प्रश्न क्र.(15) पुढीलपैकी पर्यायांमधून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
(1) रंगारी (2) साजिरा (3) श्रावण (4) पंगत
प्रश्न क्र.(16) खालील चार गटांपैकी स्त्रीलिंगी नामाच्या शब्दांचा गट ओळखा .
(1) दरी ,डोंगर ,झाडे (2) नदी, पंगत ,दरी . (3)पान, फूल ,पातळ . (4) थेंब ,सरी ,गाणे.
प्रश्न क्र.(17) खालील एकवचनी नामांचा गट ओळखा.
(1) वेण्या ,रंग, दरी. (2) कलावंत, पंगत,नद्या. (3) डोंगर, रंग, झूले . (4) घर,नदी ,खोडी.
प्रश्न क्र.(18) खालीलपैकी अनेकवचनी नामांचा गट ओळखा.
(1) नक्षी, खोपा, फुले. (2) रान, फूल, बांध. (3) खोडी ,झाडे ,थेंब. (4) वेली,वेण्या, पाने.
प्रश्न क्र.(19) श्रावण पावसाचं घर कोठे बांधतो ?
(1) सृष्टीत (2) झाडावर(3) उनात (4) डोंगरात
प्रश्न क्र.(20) कवितेत आलेल्या सणाचे नाव काय ?
(1) गोपाळकाला (2)नागपंचमी (3) रक्षाबंधन (4) गोकुळाष्टमी
प्रश्न क्र.(21) कवितेत नसलेली यमक जोडी कोणती?
(1) लाजल्या -सजल्या (2) खेळगा -अवघा (3) बांधतो - लपतो (4) नदीशी - दरीशी
Comments
Post a Comment