8मराठी 7अण्णाभाऊंची भेट

 

७.अण्णाभाऊंची भेट
          - विठ्ठल उमप


प्रस्तावना

शाहीर विठ्ठल उमप हे अमाप लोकप्रियता लाभलेले लोकशाहीर आणि सामाजिक कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते निष्ठावंत अनुयायी होते. स्वतःच्या कलेमधून त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचे विचार व कार्य यांचा प्रसार केला.
       विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजारांहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे. शाहीर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यांत पोवाडा, बहुरूपी, भारुड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मन्हाटमोळे कलाप्रकार होतेच; पण कव्वाली आणि गझल गायनातही ते आघाडीवर होते.. 'उमाळा' हा त्यांचा गझलसंग्रहही प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन आणि जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत. त्यांचे 'फू बाई फू' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. या आत्मचरित्रातून प्रस्तुत पाठ घेतलेला आहे.



           शाहीर उमप यांनी प्रस्तुत पाठामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे. अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय शाहीर आणि प्रसिद्ध कादंबरीकार होते. आपल्या साहित्यातून त्यांनी दीनदुबळे, दलित पीडित जनतेच्या  वास्तव जीवनाचे अत्यंत प्रत्ययकारक चित्रण केले आहे.

पाठाचा व्हिडीओ इथे पहा .....
रशियन लेखक मॅक्झीम गॉर्की


पाठाचा आशय

सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे हे मुंबई, घाटकोपर मधील चिरागनगर या झोपडपट्टीत राहत होते. शाहीर विठ्ठल उमप यांचे कार्यक्रम त्या काळात आकाशवाणीवर गाजत होते. अण्णाभाऊंना शाहीर उमपांना भेटण्याची इच्छा होती. उमपांना अण्णाभाऊंना भेटण्याची ओढ लागली होती. तशात अण्णाभाऊंनी भिकाजी तुपसौन्दर यांच्यामार्फत “चिरागनगरात येऊन भेटा" असा विठ्ठल उमपांना निरोप पाठवला.
         विठ्ठल उमप चिरागनगरात गेले. वाट खाचखळग्यांची ओबडधोबड होती. सर्वत्र चिखल, दलदल व पाण्याची डबकी पसरलेली होती. चौकशी करीत करीत उमप अण्णाभाऊंच्या झोपडीत पोहोचले. काळ्यासावळ्या वर्णाचे अण्णाभाऊ घामेजलेल्या अंगाने बाहेर आले. दोघेही झोपडीत गेले. मग बाहेरच असलेल्या एका झोपडीतल्या चहावाल्याच्या हॉटेलात गेले. दोघांनाही एकमेकाला भेटल्याचा आनंद झाला.
              पुन्हा एकदा विठ्ठल उमप अण्णाभाऊंच्या भेटीला गेले. या वेळी त्यांना अण्णाभाऊंच्या झोपडीचे पूर्ण दर्शन घडले.. झोपडीतच पाणी साचलेले डबके होते. मोडके टेबल, मोडकी खुर्ची हे फर्निचर, घरात एकच तांब्या, एकच अॅल्युमिनियमचे ताट, एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती. अण्णाभाऊंचा पोशाख म्हणजे एकच सदरा व एकच लेंगा.
           अण्णा प्रसिद्ध लेखक होते. एक प्रकाशक आला आणि केवळ एक ट्रॅन्झिस्टर देऊन त्यांचे लेखन घेऊन गेला. त्यांच्या कथा-कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या होत्या. त्यांची अमाप रॉयल्टी मॉस्कोतल्या बँकेत पडून होती. अण्णा ती घेतच नव्हते. पैसा आला की आपण वास्तवापासून दूर जाऊ; सकस साहित्य निर्माण करता येणार नाही; गरिबांची दुःखे वेशीवर टांगता येणार नाहीत, अशी अण्णाभाऊंना भीती वाटत होती.

शब्दार्थ

वलानीला- कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर.
बाळवती - नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गुंडाळून ठेवण्याचे कपडे.
लाजतबुजत - संकोचाने.
जरमनचं  (जर्मनचं) - अॅल्युमिनियमचे.
डेचकी- मडक्यासारखे  परंतु उभट गोल भांडे.
गॉर्की  -एक रशियन लेखक.
मजकडे - माझ्याकडे.
ओढूनताणून – जबरदस्तीने, मनापासून नव्हे.
भगुलं- रुंद तोंडाचे गोल भांडे.

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ

(१) गट्टी जमणे- मैत्री जमणे.
(२) तोंड वासून पडणे - अत्यंत निराशेने चेहरा निश्चल ठेवून पडून राहणे.
(३) एखादयाला न करमणे -  मन आनंदी न राहणे, प्रसन्नपणे वेळ न जाणे.
(४) एखाद्याला न गमणे  - काहीही न सुचणे,
(५) पारखे होणे  -   दुरावणे.

बोली भाषेतील काही वाक्ये व त्यांचे अर्थ

(१) ही बघा,  डाव्या अंगानं आसंच म्होरं जावा, थितं  चावाल्याचं  हाटील हाय, आंगं त्येच्याच म्होरल्या आंगाला इचारा. थितंच जयवंताबाय  ऱ्हातीया.
अर्थ :-
हे बघा , डाव्या बाजूने असेच पुढे जा. तिथे चहावाल्याचे हॉटेल आहे. त्याच्याच पुढच्या बाजूला विचारा. तिथेच जयवंताबाई राहते.
(२) आवं, मग मी तेच की सांगतीया, आवं, जयवंताबाय
हाय ना, अण्णांची मालकीण हाय. जावा कडंकडंनं ,
चिरागनगरातली ही वाट सदान् कदा चिकलापान्यात
लोळत पडलिया  - कडंकडंनच जावा.

अर्थ: अहो, मग मी तेच सांगतेय. अहो, जयवंताबाई
आहे ना, ती अण्णांची पत्नी आहे. जा कडेकडेने. चिरागनगरातली ही वाट नेहमीच चिखलापाण्यात
लोळत पडलेली असते. कडेकडेने जा.

(३) वो क्या वो पाँचवा झोपडा है ना, वहांच अण्णा रहेता है।
अर्थ :- ती काय, ती पाचवी झोपडी आहे ना, तिथेच अण्णा राहतो.


कृति-स्वाध्याय व उत्तरे

उतारा क्र. १

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

संदर्भ उतारा क्र. १ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २७ व २८)
माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम .....................   ......
  ......      .........      .....   ...... त्यांच्या प्रेमात पडलो.

■■कृती १: (आकलन कृती)■■
★★ (१) कंसातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

(शाहीर विठ्ठल उमप,  भिकाजी तुपसौंदर,  मॅक्झीम  गॉर्कि ,  अण्णाभाऊ साठे.  )
(i) आकाशवाणीवर कार्यक्रम गाजवणारे :
(ii) चिरागनगरात भेटायला बोलावणारे :
(iii) अण्णांचा निरोप घेऊन येणारे :
उत्तर:- (१) (i)  शाहीर विठ्ठल उमप. (ii) अण्णा भाऊ साठे.  (iii)  भिकाजी तुपसौंदर.

★★(२) नातेसंबंध लिहा :
(i) विठ्ठल उपम - भिकाजी तुपसौंदर
(ii) जयवंताबाय - अण्णाभाऊ साठे :
उत्तर:-   (i ) मित्र- मित्र. (ii) पत्नी पती.

★★ (३)अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्वविशेष  लिहा :
    (१) साडेचार फूट उंचीची काळीसावळी मूर्ती.
    (२) आपले मळके गंजिफ्रॉक पुन्हा अंगात घालणारे.

■■कृती २: (आकलन कृती)■■

★★ (१) एका शब्दात उत्तरे लिहून चौकटी पूर्ण करा :
(i) अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण :
(ii) अण्णाभाऊ व विठ्ठल उमप यांच्या पहिल्या भेटीचे वर्ष :
  उत्तर :- (i) चिरागनगर (ii ) १९६३/१९६४
★★ (२) अण्णांनी विठ्ठल उमपांच्या गायनाची सांगितलेली वैशिष्ट्ये लिहा :
    उत्तर :-  (i) बुलंद पहाडी आवाज (ii) आवाजात गोडवा.

■ कृती ३: (व्याकरण कृती) ■

★★ (१) कंसांतील सूचनांनुसार उत्तरे लिहा :
(i) माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. (अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.)
(ii) त्यांनी मला ओळखले. (अधोरेखित शब्दाच्या जागी 'ते' योजून वाक्य पुन्हा लिहा.)
उत्तर :- (i) माझा आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिला.
(ii) ते मला ओळखतात.

★★ (२) ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले.
(अधोरेखित शब्दांच्या जाती लिहा.)
उत्तर :-  (i) ते - पुरुषवाचक सर्वनाम
(ii) अण्णाभाऊ -  विशेषनाम
(iii) बऱ्याचदा -  क्रियाविशेषण
(iv) ऐकले -  क्रियापद

■ ■ कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती) ■■

● (१) अण्णाभाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : अण्णाभाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर व मोठे लेखक होते, ते आपल्या साहित्यातून दीनदलितांची हलाखी, त्यांचे दैन्य, दारिद्र्य मांडत होते. त्याच वेळी त्यांना एक नवीन, क्रांतिकारक कलावंत विठ्ठल उमपांच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला. विठ्ठलरावांच्या अनेक
रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या. त्यांचा बुलंद पहाडी आवाज, त्यांची वर्तणूक, त्यांच्या आवाजातला  गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील
कार्यक्रमांतून अनुभवले होते. दीनदलितांच्या  कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते. म्हणून त्यांना भेटण्याची  अण्णांना ओढ लागली  होती. तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात  आला. म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो सुदिन होता.

● (२) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
उत्तर : उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोककलावंत होते त्यांच्या मनात गरिबांविषयी, दीनदुबळ्यांविषयी अमाप  करुणा होती. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते. त्यामुळेच त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता. अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र त लागली होती. म्हणूनच ते अण्णांकडे गेले तेव्हा झोपडपट्टीची  अवस्था पाहून त्यांना तिटकारा, किळस वाटली नाही अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते. अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात, याची उमपांना खंत वाटत असे.


उतारा क्र. २

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या  सूचनांनुसार कृती करा :

 संदर्भ उतारा क्र. २ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २८)

अण्णांचा निरोप घेऊन .............................                 

........................मला ते मानधन नको. 


■■ कृती १: (आकलन कृती)■■ 


★ (१) उत्तरे लिहा :

(i) अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्वविशेष:

उत्तर:- मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून आणि एका दांडीच्या जागी धागा बांधलेला तुटका चष्मा लावून लिहीत बसलेले अण्णा.

जेव्हा जेव्हा उमप अण्णांना भेटायला जात तेव्हा तेव्हा अण्णा लिहीत बसलेले दिसत.

(ii) झोपडीतील वास्तव:

उत्तर:- झोपडीतच पाणी साचलेले एक डबके, चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडे.

झोपडीत मोडके टेबल व मोडकी खुर्ची.

त्यांच्याजवळ एक तांब्या, एक अॅल्युमिनियमचे ताट, एक डेचकी एवढीच भांडी आणि दोरीवर एक सदरा व हँगरला एक  लेंगा .

★  (२) एका शब्दात उत्तरे लिहून  कृती पूर्ण करा :

(i) विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळाले कथेचे मानधन :  ट्रान्झिस्टर

(ii) अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर : मॉस्को .

★ (३) अण्णांची लेखनाची पद्धत सांगा. 

उत्तर:-  अण्णांच्या झोपडीत एक मोडके टेबल व मोडकी खुर्ची होती; त्यावर बसून अण्णा लेखन करीत. त्यांच्या चष्म्याची एक दांडी मोडली होती. तिथे त्यांनी धागा बांधला होता. असा मोडका चष्मा लावून ते लेखन करीत. ऐंशी पानांच्या वहीत मजकूर सलग लिहिलेला असे. एकही शब्द किंवा एकही वाक्य खोडलेले नसे. म्हणजे ते एकटाकी लिहीत असत.


★ (४) अण्णांच्या मानधनाची स्थिती स्पष्ट करा.

उत्तर:-उमपांनी पाहिलेली स्थिती विदारक होती. ऐशी पानांच्या दोन वह्यांमध्ये अण्णांची कथा लिहिलेली होती. त्यांच्यासारख्या महान कथाकाराला त्या वेळी फक्त ट्रान्झिस्टर मानधन म्हणून मिळाला. त्यांच्या कथांचे, कादंबऱ्यांचे रशियन भाषेत खूप अनुवाद झाले. त्यांचे मानधनही त्यांना खूप मिळाले. ते त्यांच्या मॉस्कोतल्या बँकेतील खात्यात जमा झालेले होते. ते त्यांनी कधीच वापरले नाही.



■■ कृती २: (आकलन कृती) ■■


★ (१) अण्णांना मोह नव्हता, त्या गोष्टी सांगा.

उत्तर:- बंगला, मोटार, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या व असल्या सर्व गोष्टींचा अण्णांना मोह नव्हता.

★(२) अण्णांची झोपडपट्टीत राहण्यामागील भूमिका स्पष्ट करा. 

उत्तर:-झोपडपट्टीत दीनदलितांची दुःखे अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडिकीची भाषा, त्यांचे जीवनमान, तिथली वास्तवता हे सर्व झोपडपट्टीतच अनुभवता येते. असा प्रत्यक्ष अनुभव नसेल, तर त्या जीवनाचे चित्रणच करता येणार नाही. अशी अण्णांची झोपडपट्टीत राहण्यामागील भूमिका होती.

★ (३) झोपडीतील लोकांच्या जीवनाचे अण्णांनी सांगितलेले

स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर:-झोपडीतील लोकांच्या जीवनाचे विदारक वर्णन अण्णाभाऊंनी केले आहे. झोपडीतील माणसे उपाशी पोटी जगतात. पावसाळ्यात झोपडी गळतेच; त्य वेळी जागोजागी डेचकी, भगुले, परात अशी घरात असतील ती भांडी लावावी लागतात. थंडीच्या दिवसांत थंडीने कुडकुडत बसावे लागते. त्यातच त्यांची भांडणे, मारामाऱ्या चालू असतात. झोपडीतील माणसे दुःखे झेलीत जगतात.

★ (४) मॉस्कोतील मानधन स्वीकारल्यास अण्णांच्या मते, अण्णांवर होणारे परिणाम लिहा : 

उत्तर:- आपण बिघडून जाऊ असे अण्णांना वाटते. गरिबांना विसरून जाण्याचा धोका असेल. सत्य लेखन करता येणार नाही.

★ (५) नातेसंबंध लिहा :

अण्णाभाऊ -  गाँर्की 

उत्तर:-लेखक  - गुरु,   आदर्श.


 ■■■ कृती ३: (व्याकरण कृती) ■■■ 


★ (१) कंसांतील सूचनांनुसार उत्तरे लिहा :

 (i) एकदा कुठले दोन प्रकाशक आले.

(वर्तमानकाळ करा.)

(ii) जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा केल्या.

(भविष्यकाळ करा.)

(iii) तुमचे लिखाण सरस होईल. (भूतकाळ करा.)

उत्तर:  (i) एकदा कुठले दोन प्रकाशक येतात.

(ii) जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करू. 

(iii) तुमचे लिखाण सरस झाले.


★  (२) पुढील शब्दांमधून पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी नामांचे गट करा :


कादंबरी, मानधन, बंगला, पुस्तक, गाल, आदर्श, वही, कोळसा, ओळ, खुर्ची, लिखाण, मन.

उत्तर:-

पुल्लिंगी नामे : बंगला, आदर्श, गाल, कोळसा. 

स्त्रिलिंगी नामे : कादंबरी, वही, ओळ, खुर्ची.

नपुंसकलिंगी नामे : मानधन, पुस्तक लिखाण, मन,


■■■■ कृती ४ (स्वत/अभिव्यक्ती) ■■■■

★ (१) अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन शब्दांत करा.

उत्तर: ऐषआरामात राहता येणे शक्य असून अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत राहत. त्यांची झोपडी गळकी होती. झोपडीत डबकी होती. मोडकी खुर्ची, मोडके  टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते. एक तांब्या, जर्मनचे एक ताट, एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती. एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे. चुलीत लाकडे होती. पण अर्धी जळलेली. कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मळके बनियन होते. अण्णा महान लेखक होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्या  गाजत होत्या, ते सतत लिहीत बसलेले दिसत. लिहिताना  लागणारा चष्माही मोडका होता. अशा दैन्याच्या अवस्थेत अण्णा राहत होते.

★ (२) प्रस्तुत पाठात उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.

उत्तर : विठ्ठल उमप यांनी अत्यंत जिव्हाळ्याने  अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे. अण्णा खरोखरच महान लेखक होते. दीनदुबळ्यांविषयी त्यांना  खरोखरीचा कळवळा होता. त्यांच्या व्यथा-वेदना, सुख- दुःखे  साहित्यातून मांडावीत, असे अण्णांना वाटे. मात्र हे साहित्य गरिबांची वास्तव स्थिती दाखवून देणारे असायला हवे. वास्तव स्थिती दाखवायची तर ती स्वतःला माहीत हवी. म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी झोपडीत राहत.

               साहित्यिकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे. त्यांच्याबरोबर जगले पाहिजे; तरच लोकांची दुःखे, त्यांच्या अडीअडचणी समजतील. लोकांच्या जीवनाचा परिचय नसेल, तर त्यांच्यावर लिहिलेले साहित्य कृत्रिम बनेल, खोटे बनेल. अण्णाभाऊंना अस्सल साहित्य निर्माण करायचे होते. यात अण्णांचे मोठेपण दिसून येते. खरा साहित्यिक असाच असला पाहिजे .

■■ व्याकरण व  भाषाभ्यास ■■

★ १. व्याकरण :
(१) पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा
(i) त्याने मागे वळून बघितले.
(ii) विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली.
(iii) तो नेहमी नवे संकल्प करतो.
उत्तरे : (i) भावे प्रयोग (ii) कर्मणी  प्रयोग
 (iii)  कर्तरी प्रयोग

२. कर्तरी , कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच - पाच वाक्ये लिहा :
उत्तर : कर्तरी प्रयोग :
(i) मनाली अभ्यास करते,
(ii) अथर्व व्यायाम करतो. 
(ii) काल मावशी बाजारात गेली.
(iv) मी दररोज थोडा वेळ खेळतो. 
(v) आई देवळात जाते.

कर्मणी प्रयोग :
(i) मनालीने चादर धुतली .
(ii) राजूने सायकल चालवली. 
(ii) तुषारने पेढा खाल्ला.
(iv) स्वातीने पुस्तक मागितले.
 (v) भैरूने बैल बांधला.

भावे प्रयोग
(i) रामाने रावणास मारिले.
(ii) शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले.
(iii) राजूने माकडाला पकडले. 
(iv) मितालीने वहीवर लिहिले.
(v) पोलिसाने चोराला पकडले.

(३)  खाली दिलेल्या  प्रतयेक शब्दांतील मूळशब्द , विभक्ती प्रत्यय , विभक्ती , सामान्यरूप इत्यादी ओळखून लिहा ...
शब्द :-  (i) अण्णांची (ii) बंगल्यात (iii) शाहिराने (iv) माणसाला
उत्तरे : (i) अण्णा,   बंगला , ची  , अण्णां . 
           (ii ) बंगला  , त  , सप्तमी  , बंगल्या.
       ( iii) शाहीर , ने , तृतीया , शाहिरा .
     (iv)   माणूस, ला ,  चतुर्थी , माणसा. 


२. शब्दसंपत्ती :

(१) विरुद्धार्थी शब्द लिहा :
उत्तर :-  (i) सरस x निरस
(ii) डाव्या ×  उजव्या
(iii) सायंकाळी ×  सकाळी
(iv) पुढे  × मागे
(v) बाहेर  × आत
(vi) सत्य x असल्य
(i) सरस



(२) पुढील शब्दाचे भिन्न अर्थ लिहा :
नाव
उत्तर :नाव:-   नाम, होडी . 

(३) घरोबा सारखे चार शब्द लिहा.
उत्तर: वाघोबा , नागोबा ,  लाडोबा , आजोबा . 

(४) विशेषणे- विशेष्ये जोड्या लावा :
विशेषणे:-  (i) मोडकी (ii) मळकं (iii) पहाडी (iv) तुटका
(v) छोटं
विशेष्ये :- अ) चष्मा , (आ) डबकं, (३) गंजीफ्राक 
(ई) आवाज (उ ) बाज
 उत्तर: (i) मोडकी - बाज (ii) मळकं- गंजीफ्राक
(iii) पहाडी - आवाज (iv) तुटका - चष्मा
(v) छोटं- डबकं

(५) पुढील जोडशब्द पूर्ण करा
(i) ......................बगीचा 
(ii).....................   दुबळे
(iii) ..................बुजत.
उत्तर : (i) बागबगीचा (ii) दीनदुबळे) (iii) लाजतबुजत..

(६) 'सु' हे उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
जसे:-  सुदिन .
उत्तर : सुमन, सुविचार  , सुगंधसुरस





४९३. लेखननियमांनुसार लेखन :

(१) अचूक शब्द  ओळखून लिहा :
(i) माहीती / माहिति / माहिती / माहीति.
(ii) महिणा / महिना / महीना / माहिना.
(iii) साहित्यिक / साहित्यीक/साहीत्यिक/साहीत्यीक. 
(iv) ऊत्तम / ऊतम / उतम / उत्तम.
उत्तर : (i) माहिती (ii) महिना  (iii) साहित्यिक  (iv) उत्तम.

(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) आण्णांच्या समोर येक पूतळा होता. 
(ii) त्या संपतीने मि बीघडुन जाइन. 
उत्तर : (i) अण्णांच्या समोर एक पुतळा होता.
 (ii) त्या संपत्तीने मी बिघडून जाईन.

४. विरामचिन्हे :
पुढील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
 (ii) अबब केवढा हा साप
(iii) आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
(iv) आपला सामना किती वाजता आहे 
(v) उदया किंवा परवा मी गावी जाईन 
उत्तर : (i) जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.
(ii) अबब! केवढा हा साप !
 (iii) आई म्हणाली, "सर्वांनी अभ्यासाला बसा. '' 
 (iv) आपला सामना किती वाजता आहे?
(v) उदया किंवा परवा मी गावी जाईन.

५. वाक्प्रचार : पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा :
(i) गट्टी जमणे. 
(ii) न करमणे
(iii) पारखे होणे

उत्तरे : (i) गट्टी जमणे -मैत्री जुळणे.
(ii) न करमणे - चैन न पडणे.
(iii) पारखे होणे - वंचित होणे.


तोंडी परीक्षा
(१) तुम्ही पाहिलेल्या एखादया लोककलावंताची माहिती वर्गात सांगा.
(२) तुम्ही कोणत्या शाहिराचा पोवाडा ऐकला आहे? पोवाड्यातील कोणते घटक तुम्हांला प्रभावी वाटले? का?
(३) पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्र. ३१ वर दिलेला उतारा वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे वर्गात तोंडी दया : (i) आईबाबांशी झालेला संवाद व मित्रांशी झालेला संवाद यांत कोणता फरक जाणवतो ? (ii) आपण मित्रांशी अधिक   मोकळेपणाने का बोलू शकतो ?


आकारिक मूल्यमापन

१. गटचर्चा:

आईबाबा, भावंडे, अन्य नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी, गुरुजन इत्यादी वेगवेगळ्या संबंधांतील व्यक्तींशी झालेल्या  संवादांचे स्वरूप  कसे होते वा कसे असावे ,या विषयावर वर्गात चर्चा करा.

२. उपक्रम :

१. मॅक्झीम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. 
२. अण्णाभाऊ साठे यांची 'स्मशानातील सोनं' ही कथा मिळवा व या कथेचे वर्गात प्रकट वाचन करा.




















Comments

Popular posts from this blog

HOME