८.मराठी ५.सुरांची जादूगिरी
५. सुरांची जादूगिरी
लेखक - डॉ. द. ता. भोसले
सुरांची जादुगिरी पाठ ऐका व शिका
प्रस्तावना
डॉ. द. ता. भोसले हे ग्रामीण साहित्यप्रवाहातील एक महत्त्वाचे प्रसिद्ध लेखक. ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती, तेथील दारिद्र्य माणसाची भूक, तसेच शेतकरी व शेती यांच्या समस्या हे सगळे त्यांच्या साहित्याचे मुख्य विषय होत. शहरातील बकालपणावरही त्यांनी लेखन केलेले आहे. प्रमाण मराठीवरील प्रभुत्व आणि बोलीभाषेबद्दल अपार जिव्हाळा, बोलीभाषेचे सूक्ष्म ज्ञान हे त्यांचे महत्त्वाचे विशेष त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसून येतात. त्यांची अनेक पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तके म्हणून नेमली गेली आहेत.
दोन कादंबऱ्या, सात कथासंग्रह, सहा ललितलेखसंग्रह, लोकसंस्कृतीवरील पाच ग्रंथ, चार वैचारिक ग्रंथ, सात चरित्रपर ग्रंथ, सोळा संपादित ग्रंथ, ग्रामीण बोलींचे शब्दकोश, समीक्षात्मक ग्रंथ असा त्यांचा अफाट लेखन पसारा आहे. त्यांच्या काही ग्रंथांचे इंग्रजीत व हिंदीत अनुवादसुद्धा झाले आहेत.
"अगं अगं म्हशी, आठवणीतला दिवस', 'ग्रामीण साहित्य : एक चिंतन', 'चावडीवरचा दिवा', 'बाळमुठीतले दिवस', 'मनस्विनी', 'लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य', 'लोपलेल्या सुवर्णमुद्रा, 'शिक्षणातील अधिक उणे', 'साहित्य आस्वाद आणि अनुभव' ही त्यांच्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तके होत. त्यांच्या साहित्य कर्तृत्वामुळे त्यांना विविध प्रकारचे बावन्न पुरस्कार मिळाले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
१. खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते. त्यामुळे ते नेहमीच ताजे व टवटवीत असते. खेड्यातल्या परिसरात नेहमीच चैतन्यपूर्ण आवाज भरून राहिलेले असतात.
२. दिवसाची सुरुवात कोंबड्याच्या आरवण्याने होते. त्यानंतर दळणाचे आवाज सुरू होतात. त्यांना ओव्यांची साथ मिळते.
३. थोड्या वेळाने अंधार विरळ होतो. अवतीभोवतीच्या वस्तू, सर्व दिशा अस्पष्ट, अंधुकशा दिसू लागतात. प्रकाश अधिकाधिक उजळ होतो, तसतसे आसमंतातील आकार स्पष्ट होत जातात. चिमण्या, कावळे, पोपट यांचे आवाज कानांवर पडू लागतात.
४. आवाजांत भर पडत जाते. भुकेलेल्या वासरांचे आवाज, बकरीचा आवाज, गोठ्यातल्या जनावरांच्या गळ्यातील घंटांची किणकिण, गाईंची धार काढताना होणारा भांड्यात पडणाऱ्या दुधाचा आवाज, विहिरीवरील रहाटाचा आवाज, मोटेचा आवाज हे सर्व आवाज आसमंतात भरून राहतात.
५. आसमंतात आवाजांचे संमेलन भरते. त्यात शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज असतो. जनावरांचे हंबरणे असते. लहान मुलांचे आवाज तर आभाळभर पसरतात, घरातल्या भांड्यांचे आवाज, स्वयंपाक करतानाचे विविध आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज, झऱ्यांचे आवाज, ओढ्यांची खळखळ, पानांची सळसळ, कुत्र्यांचे आवाज, कोंबड्यांचे आवाज, देवळातल्या घंटांचे आवाज, जनावरांच्या खुरांचे आवाज, बायकांच्या कांकणांची किणकिण अशा शेकडो आवाजांचे रंगतदार संमेलन असते ते.
शब्दार्थ
लडिवाळ - लाडका, प्रिय, आवडीचा.
माखलेला - लेप दिलेला.
नानाविध - विविध प्रकार,
डालून (मूळ शब्द डालणे = कोंबड्या वगैरे पाटीखाली झाकून ठेवणे) झाकून ठेवून.
स्वप्निल- स्वप्नातल्यासारखे, स्वप्नासारखे, तरल, कोमल, हळुवार.
नखरेल - ऐटबाज, दिमाखदार.
बांग - कोंबड्याचे आरवणे.
कोलाहल - मोठ्या आवाजांचा गजबजाट, गोंधळ.
जाते - गहू, तांदूळ, नाचणी वगैरे धान्ये घरीच दळण्याचे दगडी साधन.
खुमारी- रुचकरपणा, गोडी, सौंदर्य.
शब्दातीत= (शब्द + अतीत)- शब्दांच्या पलीकडे, शब्दांत वर्णन करता येणार नाही असे.
भरभरीत - भरड, जाड, खरखरीत.
ढोली - खार किंवा काही पक्षी यांनी राहण्यासाठी झाडाच्या खोडात तयार केलेला खड्डा.
असुसणे - तीव्र इच्छा होणे.
टाहो - दीर्घ आक्रोश, ओरडण्याचा दीर्घ आवाज.
कोरड्यास - तोंडी लावणे, भाजी, कालवण इत्यादी. कालवणे - दोन पदार्थ एकत्र मिसळणे.
कालवण - भात, भाकरी यांसारखे कोरडे पदार्थ ज्यांच्यासोबत कालवून खाल्ले जातात असा पातळ पदार्थ.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) मोहरून जाणे - मोहून जाणे, मोहित होणे, आकर्षिले
जाणे, आनंदाने मन फुलणे.
(२) कानांवर येणे - कोणाकडून तरी कळणे.
(३) कानात प्राण आणून ऐकणे - अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे.
टीप
आलाप - तान - हरकत :
आलाप म्हणजे संथ लयीत 'आ ' काराच्या साहाय्याने (आ हा स्वर वापरून ) केलेले गायन.
तान म्हणजे द्रुत लयीत घेतलेले आलाप.
हरकत हा गायनातला अलंकार आहे. द्रुत लयीत छोटे छोटे स्वरसमूह घेऊन गायनाला नटवले जाते. प्रामुख्याने ठुमरी, गझल इत्यादी सुगम संगीत प्रकारात वापर.
कृति-स्वाध्याय व उत्तरे
कृतिपत्रिकेतील गद्य पाठावरील प्रश्नांसाठी...
संदर्भ उतारा क्र. १ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १६ व १७) निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर.................... ....................सकाळची प्रार्थना म्हणतात.
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : कृती १: (आकलन कृती)
(१) जोड्या लावा :
(i) चिमण्यांची चिवचिव म्हणजे जणू - व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात.
(ii) पहाटे तीन-साडेतीन पासूनच - तो नखरेल आवाज आसमंत भारून टाकू लागतो.
(iii) एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की- त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो.
(iv) चिमणीच्या प्रकाशात - गच्च अंधार पातळ होत जातो.
●(२) एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा :
(i) खेडे जिथे विसावते ते ठिकाण -
(ii) खेड्याला दिलेली उपमा -
(iii) लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य-
● {उत्तरे :- २) (i) निसर्गाची लडिवाळ मांडी.(ii) रानफुले. (iii) दळणाचे जाते. }
★(३) गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :- (१) मंद, लयबद्ध, प्रौढ व दमदार आवाज.
(२) जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज.
(३) पीठ होताना सौम्य सूर.
(४) गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट.
★(४) का ते लिहा :
घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते; कारण...
उत्तर :- घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते; कारण अर्धी जाग व अर्धी निद्रा अशी लेखकांची अवस्था झालेली असते आणि त्यातच अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा मिळालेला असतो.
कृती २ (आकलन कृती)
(१) 'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने उताऱ्यातील वाक्ये शोधून लिहा.
उदा.(i) निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
(ii) खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो.
(iii) पहाटेला पुरती जाग आलेली नसते.
(iv) त्या जात्याचा मंद, लयबद्घ, प्रौढ व दमदार आवाज छोट्या-मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो.
(v) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असते.
[ या उताऱ्यात आणखीही अशी वाक्ये आहेत, ती शोधून लिहून ठेवावीत.]
★(२) पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(i) पहाटेला पुरती जाग आली नव्हती.
उत्तर :- पहाटेच्या वेळी क्वचित कुठेतरी एखादे काम सुरू झालेले असते. त्याचा फारसा आवाज येत नसतो. सर्व माणसांच्या हालचाली सुरु झालेल्या नसतात.
(ii) थोड्या वेळाने दिशांना आकार आला.
उत्तर :- काळोख विरळ होत गेला. प्रकाश हळूहळू पसरू लागला. सर्व दिशांकडील झाडेझुडपे दिसू लागलो.
(iii) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.
उत्तर :- आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते. तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो.
● (३) जात्यावर दळण चालू असतानाच्या प्रसंगाचे वर्णन लिहा.
उत्तर:- पहाटे जाग येते. पण झोपही अनावर असते. आईच्या मांडीवर डोके ठेवून लेखक निवांत पडून राहतात. जाते चालवताना आईची मांडी मंद लयीत हलत असते. अर्धी जाग व अर्धी निद्रा अशी स्थिती असते. त्यातच, आईने पेटवलेल्या चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या सर्व वस्तूंवर अलगद तरंगत असतो.
■ कृती ३: (व्याकरण कृती) ■
★ (१) कंसांत दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा :
(i) नानाविध सुरांनी खेड्याचा जीवनक्रम मोहरून गेलेला असतो. (नकारार्थी करा.)
उत्तर :- नानाविध सुरांनी खेड्याचा जीवनक्रम मोहरून गेलेला नसतो, असे नाही.
(ii) सादाला प्रतिसाद दिला जातो (प्रश्नार्थी करा.)
उत्तर :- सादाला प्रतिसाद दिला जातो, नाही का?
(iii) या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला नसतो काय ? (होकारार्थी करा.)
उत्तर :- या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो.
★ (२) दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा.
(i) हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते.
(भविष्यकाळ करा.)
उत्तर :- हळूहळू या तानांची संख्या वाढत जाईल.
(ii) त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो.
(भूतकाळ करा.)
उत्तर :- त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटला.
(iii) त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजू लागले.
(वर्तमानकाळ करा.)
उत्तर :-त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजू लागते.
★ (३) दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
(1) त्या वेळी गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतात.( मिश्र वाक्य करा.)
उत्तर:- त्या वेळी जे कोंबडे गाऊन थकलेले असतान, से मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतात.
(ii) चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करीत. झोपलेल्या जात्याला बायका गायला लावतात.
(संयुक्त वाक्य करा.)
उत्तर:- चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला बायका पातळ करतात आणि झोपलेल्या जात्याला गायला लावतात.
(iii) त्या चिमण्या घराच्या भिंतींवर, अंगणात, एखादया झाडाच्या फांदीवर बसतात आणि सकाळची प्रार्थना करतात.. (केवल वाक्य करा )
उत्तर:- त्या चिमण्या घराच्या भिंतींवर, अंगणात, एखादया झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना करतात.
■ कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती) ■
●आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: कधी कधी आपल्याला खूप शांतता जाणवते. आपण त्या शांततेला नीरव शांतता म्हणतो. इंग्रजीत तिला 'पिन-ड्रॉप सायलेन्स' म्हणतात. त्या वेळी आजूबाजूला आवाजाचा टिपूसही नसतो, असे आपण समजतो. पण हे अजिबात खरे नाही. जर अचानक आवाजाला रंगरूप प्राप्त झाले, तर आपल्या अवतीभोवती हजारो आवाज असून, आपण आवाजाच्या समुद्रातच राहत असल्याचे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणाला शेकडो आवाज अस्तित्वात असतात. दिवसा किंवा रात्री कधीही एक प्रयोग करून पाहा .प्रयोग करायचे म्हणजे काही विशेष करायचे आहे, असे मुळीच नाही. डोळे मिटून घ्या. स्वतः पूर्णपणे शांत राहा. आता जवळचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तुम्हांला किती तरी आवाज ऐकू येऊ लागतील. आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतके आवाज निर्माण होत असतात. आता दुरून येणाऱ्या आवाजांवर लक्ष केंद्रित करा. दुरूनही खूप आवाज ऐकू येतात, हे लक्षात येईल. थोडक्यात, आपण आवाजाच्या सोबतच राहत असतो. किंबहुना आवाजच नसतील तर आपले जगणे कठीण होईल. या पृथ्वीतलावर समजा सगळी माणसे नष्ट झाली आणि आपण एकटेच एक मानव म्हणून शिल्लक राहिलो, तर आपण फार काळ जगूसुद्धा शकणार नाही. आपल्यालाआवाजाच्या सोबत राहावे लागते, आवाजाशिवाय आपण राहू शकत नाही.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
( संदर्भ उतारा पाठ्यपुस्तक पृष्ठ १७ व १८;
मध्येच झाडाच्या ढोलीतून ................................
......................संमेलनात तरंगत जाते. )
■ कृती १: (आकलन कृती ) ■
★ (१) योग्य जोड्या लावा :
'अ' गट
(i) सकाळचे हे संगीत -
(ii) एखादा पोपट -
(iii) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे -
(iv) कोंबड्यांचा काँक्-कॉक असा
'ब' गट
(अ) काचेच्या नाजूक आवाज.
(आ) ठेका धरणारा आवाज.
(इ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो.
(ई) वादयवृंदासारखे वाटते .
( उत्तर : (i) -ई ; (ii) - इ ; (iii) - अ; (iv)- आ .)
(२) आसमंतात भरलेले संमेलन कोणाकोणाचे आहे ?
उत्तर :- शब्दांचे ,सुरांचे , आवाजाचे .
■ कृती २: (आकलन कृती ) ■
★(१) का ते लिहा :
(i) कंटाळलेले वासरू टाहो फोडते;
कारण- ते दुधासाठी आसुसलेले असते.
(ii) या आवाजाकडे लक्ष जातेच जाते;
कारण - तो आवाज कुईकुई करणारा व अशक्त पोराने किरकिरावा तसा असतो.
★ (२) 'भाषेतील सौंदर्य ' या दृष्टीने उताऱ्यातील वाक्ये
शोधून लिहा.
उत्तर:- (i) बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते.
(ii) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा
काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात.
(iii) धारेच्या संगीतातही एक जादू असते.
(iv) गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर अन् वजनदार बनतो.
■ कृती ३: (व्याकरण कृती) ■
★ (१) ' कुर्रेबाज ' यात 'बाज' हा प्रत्यय आहे. हा प्रत्यय जोडलेले अन्य चार शब्द लिहा.
उत्तर:- (i) नखरेबाज (ii) दारुबाज (iii) दगाबाज
(iv) नफेवाज.
★ (२) या उताऱ्यातील ध्वनिवाचक / ध्वनिदर्शक शब्द लिहा.
उत्तर:- (i) कुईकुई (ii) किरकिर (iii) तडतड
(iv) खळखळ (v) सळसळ.
★ (३) या उताऱ्यातील कोणतीही चार सामान्यनामे लिहा.
उत्तर:-(i) ढोली (ii) वासरू (iii) बकरी (iv) जनावर,
■ कृती ४ (स्वमत/अभिव्यक्ती) ■
● दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर
पडणाऱ्या आवाजांचे ऐकावेसे वाटणारे आवाज आणि त्रासदायक वाटणारे आवाज असे वर्गीकरण करा :
उत्तर:-
◆ ऐकावेसे वाटणारे आवाज
सकाळची शाळेतील प्रार्थना, चिमण्यांची चिवचिव, कबुतरांचा गुटर्रगू , गाईचे हंबरणे,बकरीचा बेंबे, कपबश्यांची किणकिण, भाकरी थापण्याचा आवाज, चहा पितानाचा 'स्स् स्स् हाऽऽ. आवाज.
◆ त्रासदायक वाटणारे आवाज
कुकरची शिट्टी, मिक्सरचा आवाज, किरकिऱ्या मुलाचे रडणे, कुत्र्याचे भुंकणे, गाढवाचे ओरडणे, गंजलेल्या
बिजागरांचा आवाज, कावळ्याचा आवाज, रहाटाचा कुर्र असा दीर्घ आवाज.
■ व्याकरण ■
★ (१) पुढील शब्दांचे समान्यरूप आणि विभक्ती प्रत्यय लिहा .
शब्द :- सुराने, सुरात , सुराचे , सुराला, सुराशी.
उत्तरे : समान्यरूप - सुरा ,सुरा ,सुरा , सुरा , सुरा.
प्रत्यय :- ने , त , चे, ला , शी .
★ (२) लिंग बदला :
(i) कोंबडा - कोंबडी (ii) गाय - बैल
(iii) चिमणी - चिमणा (iv) कुत्रा - कुत्री.
★ (३) एकवचन आणि अनेकवचन .
ए. व.- फांदी ,भांडे ,लेकरू, कोंबडा.
अ. व. :- फांदया, भांडी , लेकरे,कोंबडे.
★ (४) पुढील वाक्यांतील प्रत्येक शब्दाची जात ओळखा :
अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी
असतात.
उत्तरे : (i) अनेक - विशेषण
(ii) खेडी - नाम
(iii) नेहमी - क्रियाविशेषण अव्यय
(iv) ताजी - विशेषण
(v) व - उभयान्वयी अव्यय
(vi) टवटवीत - विशेषण
(vii) रानफुले - नाम
(viii) सारखी - शब्दयोगी अव्यय
(ix) असतात - क्रियापद.
प्रयोग
पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या :
समीर आंबा खातो.
वरील वाक्यात खातो हे क्रियापद आहे. त्यात खाण्याची क्रिया दाखवली आहे. ही खाण्याची क्रिया समीर करतो आहे आणि खाण्याची क्रिया आंब्यावर घडते आहे.
• जो क्रिया करतो, त्याला कर्ता म्हणतात; म्हणून समीर हा कर्ता आहे.
• ज्यावर क्रिया घडते, त्याला कर्म म्हणतात; म्हणून आंबा हे कर्म आहे.
समीर - कर्ता
आंबा- कर्म
खातो - क्रियापद
वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी लिंग वचन पुरुषाच्या बाबतीत जो संबंध असतो, त्याला प्रयोग म्हणतात.
● मराठीत प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत :
(१) कर्तरी प्रयोग (२) कर्मणी प्रयोग (३) भावे प्रयोग.
★ (१) कर्तरी प्रयोग:-
● पुढील वाक्य नीट वाचा :
समीर आंबा खातो.
वरील वाक्यात : समीर → कर्ता, आंबा- कर्म,
खातो - क्रियापद.
आता या वाक्यात आपण कर्त्याच्या लिंग- वचन पुरुषाप्रमाणे बदल करूया.
वाक्य: समीर आंबा खातो.
(१) समीरा आंबा खाते. [ लिंगबदल केला.]
(२) ते आंबा खातात. [वचनबदल केला.]
(३) तू आंबा खातोस. [पुरुषबदल केला.]
म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलले.
जेव्हा कर्त्यांच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा कर्तरी प्रयोग होतो.
कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा :
(१) कर्तरी प्रयोगातील क्रियापद बहुधा वर्तमानकाळीअसते. (२) कर्तरी प्रयोगात कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय लागत नाहीत.
★ (२) कर्मणी प्रयोग
पुढील वाक्य नीट वाचा :
समीरने आंबा खाल्ला.
वरील वाक्यात : समीरने→ कर्ता,
आंबा→ कर्म, खाल्ला→ क्रियापद.
आता या वाक्यात आपण कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदल करूया.
मूळ वाक्य: समीरने आंबा खाल्ला.
(१) समीरने चिंच खाल्ली, [ लिंगबदल केला.]
(२) समीरने आंबे खाल्ले. [ वचनबदल केला.]
(३) समीरने चिंचा खाल्ल्या. [वचनबदल केला.]
म्हणजे, कर्माप्रमाणे क्रियापद बदलले.
जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा कर्मणी प्रयोग होतो.
म्हणून, 'समीरने आंबा खाल्ला' हा कर्मणी प्रयोग आहे.
कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा :
(१) कर्मणी प्रयोगातील क्रियापद बहुधा भूतकाळी असते.
(२) कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो, कर्माला लागत नाही.
★ (३) भावे प्रयोग
● पुढील वाक्य नीट वाचा :
भैरुने बैलाला बांधले.
वरील वाक्यात : भैरुने - कर्ता, बैलाला - कर्म,
बांधले→क्रियापद,
आता या वाक्यात आपण कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन-पुरुषाप्रमाणे बदल करूया.
मूळ वाक्य :- भेरुने बैलाला बांधले
(१) भैरवीने बैलाला बांधले.
[कर्त्यांचा लिंगबदल केला आहे.]
(२) सर्वांनी बैलाला बांधले.
[ कार्याचा वचनबदल केला आहे. ]
(३) दोघांनी बैलाला बांधले.
[कर्त्याचा पुरुषबदल केला आहे.]
(४) भैरूने गायीला बांधले.
[ कर्माचा लिंगबदल केला आहे.]
(५) भैरूने बैलांना बांधले.
[ कर्माचा वचनबदल केला आहे.]
म्हणजे, कर्त्यांप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे क्रियापद बदलले नाही. ते स्वतंत्र राहिले.
जेव्हा कर्त्यांच्या आणि कर्माच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, तेव्हा भावे प्रयोग होतो. म्हणून, 'भैरुने बैलाला बांधले' हा भावे प्रयोग आहे.
भावे प्रयोग ओळखण्याच्या खुणा :
(१) भावे प्रयोगात कर्त्याला व कर्माला विभक्ती
प्रत्यय लागलेले असतात.
(२) भावे प्रयोगातील क्रियापद बहुधा एकारान्त असते.
लक्षात ठेवा :
(१) समीर आंबा खातो. कर्तरी प्रयोग.
(२) समीरने आंबा खाल्ला. कर्मणी प्रयोग.
(३) समीरने आंब्यास खाल्ले. भावे प्रयोग.
Comments
Post a Comment