८ म-माझ्या देशावर माझे प्रेम आहे
पाठ क्र. 2. माझ्या देशावर माझे प्रेम आहे
- लेखक यदुनाथ थत्ते
प्रस्तावना
यदुनाथ थत्ते हे एक स्वातंत्र्यसैनिक. साने गुरुजींचे शिष्य, संस्कारक्षम काम करणारे नामवंत लेखक. कथा कादंबऱ्या, लेख, निबंध, बालसाहित्य, अनुवादित साहित्य या क्षेत्रांत विपुल लेखन, त्यांचे लेखन देशाविषयीच्या कळवळ्याने भारलेले असते. 'विनोबा भावे', 'आपला मान, आपला अभिमान', 'आपला वारसा', 'प्रतिज्ञा' ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तके होत. ३२ वर्षे ते 'साधना' या साप्ताहिकाचे संपादक होते.
*******************************************
शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संपूर्ण भारतभर एक प्रतिज्ञा छापली जाते. त्या प्रतिज्ञेचा अर्थ समजावून सांगणारी एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी अशी पुस्तिका लेखकांनी लिहिली आहे. त्या पुस्तिकेत त्यांनी प्रतिज्ञेतील सर्व संकल्पनांचा अर्थ जिव्हाळ्याने समजावून सांगितला आहे. त्यांची ही पुस्तिका खूपच लोकप्रिय झाली आहे. प्रस्तुतः पाठ म्हणजे त्या पुस्तिकेतील एक भाग आहे. शाळकरी मुलांशी गप्पा माराव्यात अशी जिव्हाळ्याची, सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांचे लेखन मुलांना कळते आणि भावतेसुद्धा.
महत्त्वाचे मुद्दे
(१) लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे, 'भारत माझा देश आहे', ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना खूप आनंद झाला.
(२) आपण देशावर प्रेम करतो, याचा अर्थ काय? आई मुलावर प्रेम करते म्हणजे ती मुलाचे पालनपोषण करते आणि त्याला वाढवते. देशाचे पालनपोषण करणे आणि त्याचा गौरव वाढवणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय.
(३) देश = देशाची भूमी + देशातील लोक. देशातील लोक म्हणजेच देशबांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर प्रेम करणे आणि देशबांधवांवर प्रेम करणे.
(४) आता भगतसिंग, राजगुरु यांच्यासारख्या क्रांतिवीरांप्रमाणे देशावर प्रेम करण्याची गरज नाही. त्या वेळी देश गुलाम होता. राज्यकर्ते परकीय होते. आता आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच राज्यकर्ते आहोत. देश संकटात असला तरच देशावर प्रेम करायचे असते, असे नाही.
(५) देशबांधवांवर प्रेम करायचे म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांना मदत करायला धावायचे.
(६) शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतींद्वारे आपण देशावर प्रेम करू शकतो. ती कृती करताना तिचा देशबांधवांवर कोणता परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे. देशबांधवांचे भले होईल अशीच कृती आपण केली पाहिजे.
(७) आपल्या कृतीत देश बांधवांविषयी आत्मीयता असेल तर आपली कृती देशप्रेमाची ठरते. आपल्या मनात स्वतःविषयी जशी आत्मीयता असते, प्रेम असते, तशीच आत्मीयता, प्रेम देशबांधवांविषयी असले पाहिजे. देशबांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता व आपुलकी देणे म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता असणे होय. हेच देशप्रेम आहे.
पाठाचा व्हिडीओ इथे पहा ' दीक्षा 'अँप वर
शब्दार्थ
प्रतिज्ञा - शपथ, आण, पण, घोर निर्धार,
अलबत - नक्कीच (प्रामुख्याने मागील पिढीतील लोकांच्या तोंडी असलेला एक शब्द).
करंटा - वाईट अशुभ, दुर्दैवी
कपाळकरंटा = ज्याचे भवितव्य वाईट आहे, दुर्दैवी आहे असा.
भूमिपुत्र - विशिष्ट भूमीवर जन्मलेला शिकलेला व वाढलेला. आपत्काळ - संकटांचा काळ.
गुलाम - ज्याला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही असा. ओल्या डोळ्यांनी - प्रेमपूर्ण भावनेने, मायेने, आपुलकीने. निष्क्रिय - कोणतीही कृती न करणारा .
रचनात्मक- चांगले, प्रगतिकारक भविष्य घडवणारी.
फोल - व्यर्थ, फसवा, निरुपयोगी.
सणंग - सलग विणलेले अखंड वस्त्र,
यच्चयावत - सर्व
संवर्धक - चांगली वाढ करणारे, चांगले पोषण करणारे
सस्य - धान्य.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) संकटाला आमंत्रण / निमंत्रण देणे- संकट येईल अशी स्थिती निर्माण करणे.
(२) पोटापलीकडे पाहणे - सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे.
(३) पाठीवर शाबासकी देणे - प्रोत्साहन देणे.
(४) कंबर कसणे - जिद्दीने सिद्ध होणे.
(५) फळ मिळणे - हेतू पूर्ण होणे.
(६) शब्दांकित करणे - शब्दांत व्यक्त करणे.
कृति-स्वाध्याय उत्तरे
कृतिपत्रिकेतील गद्य पाठावरील प्रश्न
उतारा क्र. १. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २ व ३)
प्रश्न: पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा .
( मी एकदा एका शाळेत गेलो होतो. ...........संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे ?" )
(1) 'प्रतिज्ञा' या शब्दाचे दोन अर्थ :- शपथ , घोर निर्धार
(2) आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे:- मुलांचे पालनपोषण ,
मुलांना वाढवणे.
(3) नागरिकांचे देशावरील प्रेम म्हणजे :-देशाचा गौरव वाढवणे , देशाचे पालनपोषण करणे.
(4) भारतावर प्रेम करतो, असे म्हणताना ज्यांच्यावर प्रेम करतो ते दोन मुख्य घटक :- भारतभूमी, भूमिपुत्र
सहसंबंध लिहा .....
(२) देश : देशातले लोक : : देशावर प्रेम :
(देशातील लोकांवर प्रेम)
(३) चूक की बरोबर लिहा :
(i) फक्त देशाच्या भूमीवर प्रेम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय.
(ii) केवळ भूमिपुत्रांवर प्रेम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय.
(iii) देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर व भूमिपुत्रांवर प्रेम करणे होय.
उत्तरे : - (i) चूक (ii) चूक (iii) बरोबर.
(१) कारणे लिहा
नव्या युगाचे गाणे
उतारा क्र. २
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३)
( "एकदा पंडित जवाहरलाल .........................तुम्ही ऐकले आहे ना? )
वरील सुचवलेला उतारा वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा .
(१) पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा .
हास्य आणि अश्रू यांची भाषा :
हास्य हे आनंदाचे प्रतीक. आपल्या देशबांधवांचा आनंद पाहून आपले मनही आनंदित होते. जेव्हा आपले देशबांधव दुःखात असतात, तेव्हा आपलेही मन व्याकूळ होते. आपल्या डोळ्यांत अश्रू दाटतात. आपण त्यांच्या मदतीला धावून जातो. म्हणजे आपण अन्य देशबांधवांशी समरस होतो. म्हणून हास्य व अश्रू यांची भाषा म्हणजे देशबांधवांशी समरस होण्याची भाषा होय.
(२) पुढील कृती पूर्ण करा :-
(i) 'भारतमाता की जय ' मधील भारतमाता म्हणजे........
(ii) महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये ...
(iii ) देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती .......
(३) पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा.
(i) 'भारतमाता' म्हणजे भारतातले सर्व लोक.
(ii) प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही.'-
(४) पुढील विधाने पूर्ण करा .
(i) पंडित नेहरूंच्या मते, देशावर प्रेम म्हणजे .......
(ii) लेखकांच्या मते, प्रेम करणे म्हणजे.......
(iii) जागतिक भाषा म्हणजे ............
उत्तरे :-
२ (i) भारतातील लोक
(ii) सक्रियता , सुबुद्धता
(iii) (a) नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे.
(b) आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे.
(c) हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने
साफसफाई करणे.
(d) आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल , असा विचार करीत कोणतेही काम करणे .
(३) (i) 'भारतमाता' म्हणजे भारतातले सर्व लोक. - पंडित जवाहरलाल नेहरू
(ii) प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही.'- महात्मा गांधी
(४) (i) पंडित नेहरूंच्या मते, देशावर प्रेम म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करणे.
(ii) लेखकांच्या मते, प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळ्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपण आनंदित होणे.
(iii) जागतिक भाषा म्हणजे हास्य व अश्रू यांची भाषा होय.
कृती ३: (व्याकरण कृती)
(१) तक्ता पूर्ण करा ...
पुल्लिंग :- मुलगा ,पंडित, पिता ,पुरुष .
स्त्रीलिंग :- मुलगी , पंडिता ,माता ,स्त्री .
(२) पुढील अव्ययांचा वाक्यात उपयोग करा .
(i) आणि : शाळा सुटल्यावर प्रथम घरी जावे आणि नंतर खेळायला जावे.
(ii) पण : या वेळी खूप पाऊस पडला, पण एकही दुर्घटना घडली नाही.
(iii) जर-तर : जर तू आधी पैसे दिलेस, तर मी तुझे तिकीट काढीन.
(iv) की : पहिली घंटा झाली की शाळा भरते.
(३)पुढील शब्दांमधून केवलप्रयोगी अव्यये शोधून लिहा :
एकदा, आणि, अरेरे, किंवा, अबब, शाब्बास, म्हणजे, की, अहाहा.
उत्तर :- अरेरे, अबब, शाब्बास, अहाहा.
कृती ४: (स्वमत/अभिव्यक्ती)
'प्रेम कधीही निष्क्रिय नसते, ते सक्रियच असते, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर : आपण रोज शाळेत जातो. सकाळी प्रार्थना म्हणतो. प्रार्थनेसोबत प्रतिज्ञाही बोलतो. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे." असेच आपल्या घरात घडते का? आईबाबा सकाळी उठतात. एकत्र उभे राहतात. मुलांची नावे घेतात आणि म्हणतात, “ही आमची मुले आहेत. आमच्या मुलांवर आमचे खूप प्रेम आहे. त्यांच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करू." असे कधी घडते? शक्यच नाही. कारण याची गरजच नसते. मुलांवरील आईबाबांचे प्रेम त्यांच्या कृतीतूनच व्यक्त होते. मुलांची भूक प्रथम आईच्या मनात जागी होते. मुलगा पडला, तर त्याची वेदना प्रथम आईबाबांच्या काळजात उमटते. मुलांची परीक्षा जवळ आली की, आईबाबांची धावपळ सुरू होते. हे असे घडते कारण प्रेम शब्दांतून व्यक्त करण्याची गरजच नसते. ते कृतीतूनच व्यक्त होते. आपला बाळ रात्रभर भुकेने व्याकूळ होऊन रडेल, या कल्पनेने हिरकणीचा जीव कासावीस झाला. तिने बुरुजावरून उड्या घेत घेत रायगडाचा पायथा गाठला आणि घरी पोहोचली. हिरकणीच्या कृतीतूनच तिचे तिच्या बाळावरील प्रेम व्यक्त झाले. मनात प्रेम असेल, तर आपण पटकन कृतीच करतो. म्हणूनच म्हणतात की, प्रेम कधीही निष्क्रिय नसते.
उतारा क्र. ३
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३ व ४. "हो, ऐकले आहे ना !"..................... ....म्हणजेच देशावर प्रेम करणे.)
(१) कृती पूर्ण करा .
(i) सर्वसाधारण विणकरांच्या मनातील शेले विणण्याबाबतची भावना .......... (शेले विणणे म्हणजे पोटापाण्याचे काम करणे.)
(ii)कबीराच्या मनातील शेले विणण्याबाबतची भावना
........................ (शेले विणणे म्हणजे देशासाठी सतत अखंड वस्त्र विणत राहणे.)
(iii) भूमिपुत्रांवरील प्रेमाचे महत्त्वाचे घटक ............
( सर्व समाजघटकांना न्याय मिळणे , स्वातंत्र्य , समता , आपलेपणाची हमी )
२.पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा .
(i) 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.' - साने गुरुजी
(ii) 'देशाचे चित्र बदलण्यासाठी आपण कंबर कसायला हवी.' - लेखक यदुनाथ थत्ते
३) आपले आपल्या देशावर प्रेम नाही, हे दाखवणारी उदाहरणे लिहा .
उदा. (i) गावे मलमूत्राने वेढलेली दिसतात.
(ii) डोंगर उघडेबोडके दिसतात.
(iii) सर्वत्र प्रदूषण वाढले आहे.
(४) फायदा लिहा .
दैनंदिन जीवनातील बारीकसारीक कृती देशप्रेमाच्या भावनेतून केल्या पाहिजेत .
फायदा : देशापुढील अनेक अडचणी व गैरसोयी दूर होतील.
(५) पाठाच्या आधारे स्पष्ट करा .
सस्यश्यामला माता :-
सस्यश्यामला माता : सस्य म्हणजे धान्य. शेती पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो. म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणीमाता म्हणजे 'सस्यश्यामला माता' होय. या शब्दांतून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते.
कृती २: (आकलन कृती )
(१) कारणे लिहा :
(i) मुलांनी सज्ञान व्हावे, म्हणून शिकणे हे अन्य कोणत्याही प्रकारच्या शिकण्यापेक्षा श्रेष्ठ असते. कारण -
उत्तर : मुलांनी सज्ञान व्हावे, म्हणून शिकणे हे अन्य कोणत्याही प्रकारच्या शिकण्यापेक्षा श्रेष्ठ असते; कारण त्यात मुलांना ज्ञान मिळावे, ही इच्छा असते.
(ii) हॉटेलातील पदार्थांपेक्षा आईने बनवलेला पदार्थ अधिक आवडतो; कारण -
उत्तर : हॉटेलातील पदार्थांपेक्षा आईने बनवलेला पदार्थ अधिक आवडतो; कारण आईने बनवलेल्या पदार्थांमध्ये आपुलकी असते आणि हॉटेलातल्या पदार्थांमध्ये ती आपुलकी नसते.
(iii) पाठीवर फिरणारा आईचा हात आणि अन्य व्यक्तीचा हात यांत फरक असतो; कारण-
उत्तर :- पाठीवर फिरणारा आईचा हात आणि अन्य व्यक्तीचा हात यांत फरक असतो; कारण आईच्या स्पर्शात माया असते.
(iv) दैनंदिन जीवनात अनेक अडचणी व गैरसोयी निर्माण होतात; कारण-
उत्तर :- दैनंदिन जीवनात अनेक अडचणी व गैरसोयी निर्माण होतात; कारण लोक कोणतेही काम करताना देशाचा व देशबांधवांचा विचार करीत नाहीत.
(v) एसटी गाड्या, रेल्वे गाड्या घाणेरड्या दिसतात; कारण-
उत्तर : - एसटी गाड्या, रेल्वे गाड्या घाणेरड्या दिसतात; कारण एसटी कर्मचारी, रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांना देशबांधवांबद्दल आस्था नसते.
(२) कृती पूर्ण करा .
जर देशावर प्रेम करायचे असेल, तर -............
(i) देशाचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसली पाहिजे.
(ii) प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
(iii) हवा, पाणी व निसर्ग हे बिघडू देता कामा नये.
(३) लेखकाच्या मते पाठातील अर्थ सांगा .
(i) 'वंदे मातरम्' या गीतामधील आदर्श :
(भारतभूमीला सस्यश्यामला करणे.)
(ii) भारतमातेला न रुचणारी गोष्ट : ( जात, धर्म, वंश, भाषा यांचे निमित्त करून आपापसांत भांडणे.)
कृती ३: (व्याकरण कृती)
(१) गटात न बसणारा शब्द लिहा :
(i) शपथ, ताकीद, धमकी, इच्छा .
(ii) आळवणी ,दादागिरी, याचना, आर्जव.
उत्तरे :- (i) शपथ (ii) दादागिरी.
(२) खालील प्रत्यय असणारे दोन दोन शब्द लिहा .
(i) इक- सामाजिक, व्यावहारिक,
(ii) ईक - ठरावीक, पडीक,
(iii) इत - प्रमाणित,संबंधित,
(३) सहसंबंध लक्षात घ्या आणि लिहा .
(i) सुख - सुखावणे
(ii) दुःख - दुखावणे
(iii)ओल: ओलावणे
(iv) दूर- दुरावणे .
कृती ४: (स्वमत/अभिव्यक्ती)
• प्रतिज्ञेतील एखादया शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर :- माझ्या वाढदिवशी मी प्रतिज्ञा केली होती. रोज नियमाने सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. पहिल्याच दिवशी मी खरोखर खूप अभ्यास केला. पाठ्यपुस्तक वाचत बसलो, बसलो ते बसलोच. अन्य विषयांचा गृहपाठ शिल्लक राहिला. सरांना मी कारण सांगितले. त्यांना आनंद झाला. ते रागावले नाहीत. त्यांनी एक सूचना केली. " वेळापत्रक तयार कर." मी वेळापत्रक करायला घेतले. मनासारखे होत नव्हते. माझे मित्र तर हसायला लागले. "गणिताला एवढाच वेळ?" "विज्ञानाला आणखी वेळ दिला पाहिजे." "मराठी विषय दिसायला सोपा, पण लिहिताना वेळ पुरतच नाही." मित्रांचे असे शेरे ऐकल्यावर मी गांगरून गेलो. कागदच्या कागद मी फाडून टाकत होतो. प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा वेळापत्रकात माझा वेळ जाऊ लागला. शेवटी सरांनी मला वेळापत्रक तयार करायला शिकवले. आता मी त्यानुसार अभ्यास करतोय. पूर्ण नाही, पण काही प्रमाणात तरी प्रतिज्ञा यशस्वी झाली आहे.
प्रश्न क्रमांक 1 ते 4 दोन पर्याय ओळखा.
(1) 'प्रतिज्ञा' या शब्दाचे दोन अर्थ :-
(1) शपथ (2) घोर निर्धार
(3) निर्णय (4) निर्माण
(2) आईचे मुलांवरील प्रेम म्हणजे:-
(1) मुलांचे पालनपोषण (2) मुलांचे शिक्षण
(3) मुलांचे कौतुक (4) मुलांना वाढवणे.
(3) नागरिकांचे देशावरील प्रेम म्हणजे :
(1) देश वाढवणे (2) देशात कायदा मोडणे
(3) देशाचा गौरव वाढवणे (4) देशाचे पालनपोषण करणे.
(4) भारतावर प्रेम करतो, असे म्हणताना ज्यांच्यावर प्रेम करतो ते दोन मुख्य घटक :
(1) आई (2) मुलगा (3) भारतभूमी (4) भूमिपुत्र
प्रश्न क्रमांक 5 ते 6 पुढील सूचनांनुसार सोडवा.
प्रश्न क्र. (7 ) माझ्या देशावर प्रेम आहे या पाठाचे लेखक कोण ?
(1) माधव विचारे (2) वसंत जोशी
(3) यदुनाथ थत्ते (4) डॉ. द.ता.भोसले
प्रश्न क्र. (8 ) "माझ्या देशावर प्रेम आहे " हा पाठ कोणत्या पुस्तकातुन घेतला आहे ?
(1) गुजगोष्टी (2) धाडसी कविता
(3) धाडसी कथा (4) प्रतिज्ञा
प्रश्न क्र. (9 ) " माझ्या देशावर माझे प्रेम आहे " हे प्रतिज्ञा मधील कितवे वाक्य आहे ?
(1) पहिले (2) दुसरे (3) तिसरे (4) चौथे
प्रश्न क्र. (10 ) ते प्रश्न क्र. (13 ) साठी सूचना.
खालील शब्दातील विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी शोधा
प्रश्न क्र. (10 )
(1) गेलो x आलो (2) सुखावलो x दु:खावलो
(3) खरे x बरे (4) वाढवणे x कमी करणे
प्रश्न क्र. (11 )
(1) दुःख x सुख (2) ओल्या x सुक्या
(3) निष्क्रिय x अक्रिय (4) लहान-मोठा
प्रश्न क्र. (12 )
(1) स्वार्थ x परमार्थ (2) सज्ञान x विज्ञान
(3) सोय-गैरसोय (4) स्वच्छ x घाणेरडे
प्रश्न क्र. (13 )
(1) घाण x अस्वच्छ (2) अपार x पार
(3) धर्म-अधर्म (4) बिघाड x सुधार
प्रश्न क्र. (14 )
" खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे "
हा विचार कोणाचा ?
(1) महात्मा गांधी (2) स्वामी विवेकानंद
(3) सानेगुरुजी (4) लोकमान्य टिळक
प्रश्न क्र. (15 ) " प्रेम निष्क्रिय असू शकत नाही "
हा विचार कोणाचा ?
(1) सानेगुरुजी (2) महात्मा गांधी
(3)नेहरू (4) स्वामी विवेकानंद
प्रश्न क्र. (15 ) ते प्रश्न क्र. (25 ) साठी सूचना.
दिलेला शब्द पुल्लिंग , स्त्रीलिंग , नपुसकलिंग आणि उभयलिंगी या पैकी कोणता आहे ते ओळखा व योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा .
प्रश्न क्र. (15 ) ते प्रश्न क्र. (25 ) साठी पर्याय
(1) पुल्लिंग (2) स्त्रीलिंग
(3) नपुसकलिंग (4) उभयलिंगी
प्रश्न क्र. (15 ) गाव
प्रश्न क्र. (16 ) देश
प्रश्न क्र. (17 ) काम
प्रश्न क्र. (18 ) शेला
प्रश्न क्र. (19 लुंगी
प्रश्न क्र. (20 ) मूल
प्रश्न क्र. (21 ) यंत्र
प्रश्न क्र. (22 ) विश्व
प्रश्न क्र. (23 ) चित्र
प्रश्न क्र. (24 )पाणी
प्रश्न क्र. (25 ) निसर्ग
Comments
Post a Comment