८. मराठी गोधडी (कविता)

१२.



कवितेची मध्यवर्ती कल्पना

गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे आणि   इतर जुन्या कपड्यांचे  चौकोनी तुकडे जोडून, एकावर एक ठेवून शिवलेले पांघरूण !  या कवितेत 'गोधडी' हे कवीच्या आईवडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक आहे. 'गोधडी' या प्रतीकातून कवींनी  कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय व जिव्हाळ्याच्या  आठवणी भावस्पर्शी शब्दांत सांगितल्या आहेत. 'गोधडी' म्हणजे गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा आहे, याची जाणीव ही कविता करून देते.


१२.गोधडी.....

गोधडी म्हणजेच

नसतो फक्त चिंध्यांचा बोचका

गोधडी म्हणजेच गोधडी असते.

मायेलाही मिळणारी ऊब असते.

गोधडीला असते अस्तर

बापाच्या फाटक्या धोतराचे

किंवा

आईला बापाने घेतलेल्या

फाटक्या लुगड्याचे

आत

गोधडीत

अनेक चिंध्या असतात

बसलेल्या दाटीवाटीनं

आईनं दटावून बसवलेल्या 

तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात

त्यात असतो

मामानं घेतलेला भाच्याचा

जीर्ण कुडता

माहेरातून आलेलं

आईच्या लुगड्याचं पटकुर

आणि

पहिल्या संक्रांतीला

बानं घेतलेलं -

आईनं असंख्य ठिगळं लावलेलं

तिचं लाडकं लुगडं

आणि

बाच्या कोपरीच्या बाह्या

आईनं ते सगळं

स्मृतीच्या सुईनं

शिवलेलं असतं त्यात.

म्हणून गोधडी म्हणजे

नसतो चिंध्यांचा बोचका

ऊब असते ऊब !

शब्दार्थ : 

चिंध्या-  लक्तरे झालेले वस्त्र.

बोचका - गाठोडे.

माया  - प्रेम, जिव्हाळा. 

ऊब (इथे अर्थ)  - प्रेमाचा स्पर्श. 

लुगडे  - मोठे नऊवारी पातळ / साडी .

दाटीवाटीने - गर्दी   करून.

दटावून - मुद्दामहून , जबरदस्तीने .

जीर्ण  - खूप जुना, विरविरीत.

कुडता - सदरा .

पटकुर - चोळामोळा झालेले जीर्ण कापड.

बा- बाप. 

बाह्या - सदऱ्याचे हात.

स्मृती - आठवण, स्मरण.

टिपा:- 

(१) धोतर - पुरुषाने नेसायचे एक वस्त्र.

(२) अस्तर - कपड्याच्या आत शिवलेला कपड़ा,

(३) मामा -  आईचा भाऊ.

(४) भाचा - बहिणीचा मुलगा. 

(५) माहेर  - लग्न झालेल्या मुलीच्या आईबाबांचे घर.

(६) संक्रांत - १४ जानेवारीला सूर्यांचे भ्रमण मकर वृत्तात होते, तो दिवस मकरसंक्रांत.

(७) कोपरी - पुरुषाने अंगात घालायचे तोकडे वस्त्र.

(८) सुई - कपडे शिवण्याचे साधन

कवितेचा भावार्थ

' गोधडी' हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते, हे बिंबवताना कवी म्हणतात - गोधडी म्हणजे फक्त चिंध्या- चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते. ती केवळ एक मामुली पांघरूण नसते. त्यात माया ममतेला ऊब देण्याची ताकद असते. प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते.गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडी शिवताना लावलेले  अस्तर हे वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. गोधडीवर जणू आईबाबांची माया लपेटलेली असते.

गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात. त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा, पटकुर असते आणि पहिल्या मकरसंक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात. बाबांनी अंगात घातलेल्या नि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. ह्या सर्व गोष्टी  आईने आपल्या आठवणींच्या सुईने गोधडीत  ओवलेल्या  असतात, शिवलेल्या  असतात.   म्हणून ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते,  चिंध्यांचे गाठोडे  नसते  तर संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रु, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीत सामावलेली असते. अशा प्रकारे गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे.


कृति स्वाध्याय व उत्तरे

कृतिपत्रिकेतील पद्य पाठावरील प्रश्नांसाठी...

प्रश्न. पुढील  कृती कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार  करा: .

 १ : (आकलन कृती) उत्तर लिहा:

(1) गोधडीची वैशिष्ट्ये : 

 उत्तर:- (१)गोधडीची वैशिष्ट्ये :- 

 (i)फक्त चिंध्यांचा बोचका नसतो. 

 (ii)मायेलाही ऊब देणारी

 (iii)   बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर

  (iv)  आईच्या फाटक लुगड्याचे अस्तर

(२ ) गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती.

उत्तर :- आई , वडील, मामा ,भाचा .

(२) कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा :

उत्तर:- (i) आयुष्यभर कष्ट

(ii) संसारात खाल्लेल्या खस्ता 

(iii) मायेची ऊब

(iv) स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी.

कृती २ : (आकलन कृती)

(१) शोधून लिहा  :

(1) आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू:- 

उत्तर:- (1) आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू. 

(i) आईच्या लुगड्याचे पटकुर. 

(ii) बाबांच्या कोपरांच्या बाह्या. 

(iii) मामाने भाच्याला  घेतलेला जीर्ण कुडता. 

(iv) असंख्य ठिगळे असलेले आईचे लाडके लुगडे

(२) काय ते लिहा :

(i) मामाने भाच्याला घेतलेला. ........

(ii) माहेराहून आईने आणलेले लुगड्याचे.........

(iii) असंख्य ठिगळे लावलेले...........

(iv) बाबांच्या कोपरीच्या .................

(v) आईची सुई   ..............

(vi) दाटीवाटीने बसलेल्या   .............

उत्तरे :- (i) जीर्ण कुडता

           (ii) पटकुर

           (iii)  लाडके लुगडे

           (iv) बाह्या

            (v)  स्मृतीची

           (vi )  अनेक चिंध्या

 ● (३) आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा.

(1) मायेलाही मिळणारी ऊब  :- 

(ii) गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या

(ii) लुगड्याचे पटकुर

(iv) बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे

(v) आईची स्मृतींची सुई.

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती)

(१) 'गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.' या ओळीतील भाव स्पष्ट करा.

उत्तर:-  'गोधडी' हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. कवी म्हणतात आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचे बोचके नसते. त्यात आईबाबांच्या भावना गुंतलेल्या आहेत. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले. त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. गोधडीत मायेची ऊब तर आहेच, परंतु मायेलाही ऊब देण्याची ताकद त्या गोधडीत आहे. त्यात आईवडिलांच्या आठवणी गुंफल्या आहेत. त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर आहे. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई-वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे. 

(२) गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब !' या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

 उत्तर : 'गोधडी' या कवितेमध्ये कवी डॉ. कैलास दौंड यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र 'गोधडी' या प्रतीकातून साकारले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमांचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही. त्यात आईवडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत. गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे. जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे.

 (३) तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

नमुना उत्तर : मी पाचवीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत सुंदर भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा तिसरा नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा  पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी अजूनही भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आजतागायत मी  प्रत्येक सणाला व वाढदिवसाला त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मी एकटाच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणीही हात लावत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला  ते दृश्य आठवते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही, इतके माझे त्यावर प्रेम आहे.

व्याकरण व अलंकार

• अलंकार म्हणजे दागिने. अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने किंवा आभूषणे घालतात. त्याप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक आकर्षक व परिणामकारक होण्यासाठी लेखक व कवी भाषेला भाषिक अलंकारांनी नटवतात.अशा प्रकारे ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या त्या गुणधर्माना भाषेचे अलंकार म्हणतात.

         कवितेमध्ये कधी कधी शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास शब्दचमत्कृती म्हणतात : तर कधी कधी शब्दांतील वेगवेगळ्या अर्थामुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास अर्थचमत्कृती म्हणतात.

भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार आहेत :

 (१) शब्दालंकार (२) अर्थालंकार.

शब्दालंकार

(१) यमक अलंकार

पुढील कवितांच्या ओळी नीट पाहा : 

(१) हिरवळ आणिक पाणी

   तेथे स्फुरती मजला गाणी

वरील प्रत्येक ओळीच्या शेवटी 'णी' हे अक्षर पुनःपुन्हा आले आहे.

(२) तनू त्यागिता कीर्ति मागे उरावी

  मना सज्जना हेचि क्रीया घरावी 

  वरील प्रत्येक ओळीच्या शेवटी 'रावी' ही दोन अक्षरे पुनःपुन्हा आली आहेत.अशा प्रकारे कवितेतील ओळींच्या शेवटी ठरावीक अक्षरे आल्यामुळे नाद निर्माण होतो. या रचनेला यमक म्हणतात.

एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या (ओळीच्या) शेवटी पुनःपुन्हा आले की, यमक हा अलंकार होतो.

(२) अनुप्रास अलंकार

पुढील ओळी नीट वाचा व अधोरेखित अक्षरांकडे नीट लक्ष द्या : 

(१) पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला.

(२) वंशी नाद नटी तिला कटी ती खोवून पाटी पटी

पहिल्या वाक्यात 'प' या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे ते नादमय झाले आहे.दुसऱ्या ओळींमध्ये 'टी' या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे नादमयता आली आहे.

•एखादया वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. 

अर्थालंकार

(१) उपमा अलंकार

• पुढील ओळी नीट वाचा :

(१) आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही.

(२) गाई भरून गाईचे डोळे जसे लोणियाचे गोळे ।।

(३) तू याचकाते जलदासमान.

(४) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी.

(५) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे. 

वरील प्रत्येक ओळीत दोन गोष्टींची तुलना केली आहे. कोणकोणत्या गोष्टींची तुलना केली आहे, ते पाहा:

(१) आई आणि दैवत.

(२) गाईचे डोळे आणि लोण्याचे गोळे.

(३) देव आणि जलद (ढग).

(४) सावळा रंग आणि पावसाळी मेघ (ढग).

(५) आभाळ आणि माया.

तसेच वरील प्रत्येक दोन वस्तूंमध्ये सारखेपणा (साधर्म्य) दाखवला आहे. कसा तो पाहा :

(१) आई कशी?→ देवतासारखी. 

(२) गाईचे डोळे कसे ? → लोण्याच्या गोळ्यासारखे.

(३) देव कसा ?→ढगासारखा.

(४) सावळा रंग कसा ?  →  पावसाळी ढगासारखा.

(५) माया कशी ?→ आभाळासारखी. 

तसेच दोन वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवणारे कोणकोणते

शब्द वापरले आहेत, ते पाहा: 

(१) सारखे

(२) जसे

(३) समान

(४) परी 

(५) गत.

  अशा शब्दांना साधर्म्यसूचक शब्द किंवा साम्यसूचक शब्द म्हणतात.

दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो, तेथे उपमा अलंकार होतो. उपमा या अलंकारात ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते, त्याला उपमेय म्हणतात व उपमेयाचे साम्य ज्या वस्तूशी दाखवलेले असते, त्याला उपमान म्हणतात .  उपमेय  आणि  उपमान यांमधील साम्य दाखवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समानधर्म म्हणतात.

 • पुढील तक्ता नीट अभ्यासा  

कोणाला उपमा ?  

उपमेय

(१) आई

(२) गाईचे डोळे

(३) देव

(४) सावळा रंग

(५) माया

कशाची उपमा ? उपमान

दैवत

लोण्याचे गोळे 

जलद (ढग) 

पावसाळी ढग

आभाळ

साम्य सूचक शब्द 

सारखे   ,जसे ,  समान , परी  ,गत

समानधर्म

देवत्व  , शुभ्रता ,  कृपाळूपणा,  रंगछटा  ,अमाप

अशा प्रकारे उपमेय हे उपमानासारखे आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे उपमा हा अलंकार असतो.

उपमा अलंकारात सम, समान, सारखे, जसे, तसे, प्रमाणे सदृश, परी, तुल्य, वाणी यांपैकी एखादा साम्यसूचक शब्द असतो.

(२) उत्प्रेक्षा अलंकार

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते, त्यांतील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच  आहे अशी कल्पना करणे, यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.

पुढील ओळी नीट वाचा :

(१) वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे.

(२) विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही।

(३) किती कोंबडा माझा मजेदार 

मान त्याची कितीतरी बाकदार

 शिरोभागी तांबडा तुरा हाले 

 जणू जास्वंदी फूल उमललेले 

 अर्धपायी पांढरीशी विजार

  गमे विहंगातिल बडा फौजदार 

  

(१) या ओळीत कवींनी स्वतः मंद झुळूक होण्याची कल्पना केली आहे.

(२) या ओळीत कवांनी विद्या हे झाकलेले द्रव्य असल्याची कल्पना केली आहे.

(३) या ओळींमध्ये कवींनी तांबडा तुरा हे जास्वंदीचे फूल आहे अशी कल्पना केली आहे. तसेच पांढऱ्या अर्ध्या विजारीमुळे तो पक्ष्यातील फौजदार असल्याची कल्पना केली आहे. आता आपण वरील ओळींतील उपमेय-उपमान शोधू या :

(१) उपमेय-मी, उपमान झुळूक

(२) उपमेय - विद्या, उपमान - द्रव्य

(३) उपमेय-  तांबडा तुरा, उपमान -  जास्वंदीचे फूल     

      उपमेय - पांढरी विजार, उपमान - फौजदार.

उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णन येते, तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काही, की, गमे, वाटे, भासे' यांसारखे शब्द येतात.

१. अलंकार :

(१) पुढील ओळींतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण दया.

मना चंदनाचे परी त्वां झिजावे। 

परी अंतरी सज्जना नीववावे ॥

उत्तर: अलंकार - यमक अलंकार

स्पष्टीकरण :- वरील कवितेच्या दोन्ही ओळींच्या शेवटी 'वे' हे अक्षर समान आल्यामुळे, हा यमक अलंकार आहे.

 (२) लिहा  :

(i) गडद निळे गडद निळे जलद भरून आले 

      शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

       पुनरावृत्ती झालेले वर्ण लिहा :

(ii) पुढील ओळींत कोणत्या अक्षरांमुळे अनुप्रास झाला

ते  लिहा :

 (अ) रजतनील, ताम्रनील

स्थिर पल जल पल सलील

(आ) संत म्हणती, "सप्त पदे सहवासें सख्य साधूशी घडतें।

उत्तरे : (i) ग , ल (ii) ल , त

(३) पुढील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो, अशा समान अक्षर/शब्दांच्या जोड्या शोधा.

(1) नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी 

     रिमझिम पन्हाळीचं गाणं बोलतो झाडाशी 

(ii) आई, तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा 

      शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा

(iii) कडीस जोडोनि दुज्या कडीला 

          मनुष्य बनवीतसे साखळीला.

उत्तरे : (i) तो - तो  ; शी-शी

              खेळतो-बोलतो

               नदीशी - झाडाशी

    (ii) आ-आ ,  न्हा - न्हा , तान्हा-पान्हा

(iii)  ला-ला

कडीला- साखळीला

२. व्याकरण :

(१) संधी सोडवा :

 (1) निष्कांचन (2) अंतःस्थ (3) ग्रंथालय (4) पुरेसा

उत्तरे:- (1) निष्कांचन =  निः + कांचन

(2) अंतःस्थ  = अंतः + स्थ

(3) ग्रंथालय = ग्रंथ + आलय

(4) पुरेसा =  पुरे + असा

(२)  खलील शब्दातील मूळ शब्द , विभक्ती प्रत्यय, विभक्ती आणि सामान्यरूप ओळखून लिहा .

शब्द:- (i) बापाने (ii) माहेरातून (iii) लुगड्याचे 

(iv) गोधडीला (v) बोचक्यात (vi) चिंध्यांचा

उत्तरे :  मूळ शब्द

 (i) बाप (ii) माहेर  (iii) लुगडे 

(iv) गोधडी (v) बोचके (vi) चिंधी

विभक्ती प्रत्यय:- (i) ने (ii) ऊन  (iii) चे  (iv) ला 

(v)  (v) चा 

विभक्ती

(i) तृतीया (ii) पंचमी  (iii) पष्ठी  (iv) चतुर्थी

(v)सप्तमी (v) पष्ठी

सामान्यरूप :-  (i)बापा (ii) माहेरा  (iii)लुगडया (ivगोधडी

(v)बोचक्या(v) चिंध्या

(३) लिंग बदला:

उत्तरे (i) मामा -  मामी

(ii) भाचा - भाची

(iii) आई - वडील 

(४) एकवचन अनेकवचन लिहा :

ए. व. :-  कुडता  ,चिंधी , सुई , बाही 

अ.व. :- कुडते , चिंध्या , सुया ,बाह्या

(५) पुढील वाक्यातील प्रत्येक शब्दची जात  ओळखा :

गोधडीत अनेक चिंध्या असतात.

उत्तर :-  गोधडी   - नाम;  चिंध्या  नाम ; 

 अनेक -   विशेषण ;  असतात  -  क्रियापद

३. शब्दसंपत्ती :

(१) विरुद्धार्थी शब्द लिहा.

 स्मृती x विस्मृती

 लाडके x नावडते

 माहेर x सासर

 आत x बाहेर

(२) पुढील नामांआधी योग्य विशेषणे लावा :

(i) कुडता (ii) - धोतर (iii) संक्रांत (iv) ठिगळे

 उत्तरे : (i) जीर्ण कुडता

 (ii) फाटके धोतर 

 (iii) पहिली संक्रांत 

 (iv) असंख्य ठिगळे.

●(३) आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. पुढे काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.

●  गजान्तलक्ष्मी - श्रीमंत मनुष्य

● गळ्यातला ताईत  - अत्यंत प्रिय

●  बाळकडू - लहानपणीचे संस्कार 

●  काथ्याकूट - निष्फळ चर्चा

●  अष्टपैलू - अनेक बाबींमध्ये प्रवीण

●  अळवावरचे पाणी- अल्प काळ टिकणारे

●  अजातशत्रू -  ज्याला कोणी शत्रू नाही असा

● झाकले माणिक - गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य

●   इतिश्री - शेवट

●   निरक्षर  - अशिक्षित

●  अकलेचा कांदा - मूर्ख माणूस

●  उंटावरचा शहाणा  - मूर्ख माणूस

●  ओनामा -  एखाद्या गोष्टीची सुरुवात

● उंबराचे फूल  - अगदी दुर्मीळ वस्तू

●  घरकोंबडा  - घराबाहेर न पडणारा.

(४) समानार्थी शब्द लिहा :

माया = ममता, जिव्हाळा

स्मृती  =आठवण

४. लेखननियमांनुसार लेखन :

पुढील शब्द शुद्ध करून लिहा.

(i) लूगडे ( ii) र्जिण (iii) गोधडि (iv) आइ 

उत्तरे : (i) लूगडे - लुगडे  (ii) र्जिण - जीर्ण

(iii)गोधडि -  गोधडी  (iv)आइ - आई

तोंडी परीक्षा

प्रश्न  - पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :

(१) कुटुंबासाठी तुमच्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट  थोडक्यात सांगा.

(२) आईवडिलांचे प्रेम यावर पाच वाक्ये सांगा.

आकारिक मूल्यमापन

 १. लेखन :

 'गोधडीचे आत्मकथन' या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा.

 २. उपक्रम :

आईने घरातील टाकाऊ वस्तूंपासून जशी स्वकष्टाने गोधडी बनवली, तशी 'मकरसंक्रांत' या सणाला प्रेमाची भेट देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून भेटकार्डे बनवा. मित्रांना, नातेवाईकांना, शिक्षकांना प्रेमाने भेट दया.

 8 मराठी  गोधडी (कविता पा नं.53 ) 

NAS प्रश्न 

प्रश्न  (1) कवितेत आलेला जीर्ण या शब्दाचा खालीलपैकी बरोबर  अर्थ  ओळखा .

 (1)आवरण (2)  नवीन (3)  गाठोडे  (4) जुना 

प्रश्न  (2) कवितेत बाप या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही ? 

(1) पिता (2)  जनता (3) जन्मदाता (4)  वडील 

 प्रश्न  (3) गोधडी या कवितेत कोणत्या सणाचा उल्लेख आलेला आहे ?

  (1) दसरा (2)  संक्रांत (3)   दिवाळी (4)  नागपंचमी 

 प्रश्न  (4)  कवितेत आलेल्या व्यक्तींची संख्या किती 

(1)  दोन (2)  तीन (3)  चार (4) पाच 

 प्रश्न  (5 )    गोधडी या कवितेचे कवी कोण ?

(1) डॉ. विश्वास येवले (2)  डॉ. कैलास दौंड 

(3)  डॉ. द.ता. भोसले (4) डॉ. मकरंद दौंड 

 प्रश्न  (6 )  गोधडी कोणत्या सुईने शिवलेली आहे ?

(1) मोठ्या  सुईने (2)  कीर्तीच्या सुईने 

(3) जाणिवेच्या सुईने (4) स्मृतीच्या सुईने

  प्रश्न  (7 )   आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

(1) थोर (2) महात्मा (3)  जननी (4)  ममता 

   प्रश्न  (8 )     डॉ. कैलास दौंड यांचा खालीलपैकी लेखन संग्रह कोणता ?

      (1) चारोळीचे पाणी (2)  हसत जगावे 

       (3) आडोळीचे पाणी  (4) साधना

प्रश्न  (9)    जन्मदाता या शब्दा चे समानार्थी शब्द कोणते (अचूक  दोन पर्याय निवडा) 

(1)  वडील (2)  माता (3) जन्मदात्री (4)  पिता 

 प्रश्न  (10)    कवितेत  चिंधी  या शब्दाला दुसरा आलेला शब्द कोणता ?

(1) पटकुर  (2) बोचका (3)अस्तर  (4) जीर्ण 

प्रश्न  (11)   गोधडी बनवण्यासाठी काय वापरले जाते ?

(1) चिंद्या  (2) लुगड्याचे अस्तर 

(3) जीर्ण कुडता  (4) वरीलपैकी सर्व 

प्रश्न  (12)     पुढीलपैकी वचन बदला नुसार चुकीची जोडी कोणती?  

(1) लुगडे - लुगडी (2) चिंधी - चिंध्या 

(3) कोपरी - कोपरे (4)  बाही - बाह्या 

प्रश्न (13) 'उ' कारांत पुल्लिंगी नामाचा बरोबर शब्द ओळखा . 

(1) पेरू (2)  गोधडी (3) पटकुर (4)  चिंधु 

  प्रश्न  (14)      पुढील पैकी कोणता शब्द ऊकारान्त शब्द नाही ?

(1) आई (2) पशू (3)  पळू (4)  खाऊ 

  प्रश्न  (15 )    खालीलपैकी कोणता शब्द एकारान्त आहे 

(1) थोर  (2) जनक (3)  जननी (4) मढे 


ऑनलाईन टेस्ट 

Comments

Popular posts from this blog

HOME