८म लाखाच्या कोटीच्या गप्पा
३. लाखाच्या... कोटीच्या गप्पा
- वसंत जोशी
प्रस्तावना
वसंत जोशी हे कथाकार, कवी आणि विनोदी साहित्यलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लोकनाट्ये बालनाट्येसुद्धा लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कथांची तमिळ व कन्नड या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या 'बिनबियांच्या गोष्टी ' खूप गाजल्याआहेत. या कथांमध्ये कल्पनाही नावीन्यपूर्ण आहे. त्यातले अनेक लेखक, अभिनेते यांच्यासंदर्भात कल्पकतापूर्णतेने वेगळेच प्रसंग रचले आणि त्यांच्या कथा केल्या. म्हणजेच कथांमधील प्रसंग काल्पनिक पण व्यक्ती मात्र खऱ्या, असे वेगळेच रसायन त्यांनी निर्माण केले आहे.
या पाठात शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्याभोवती काल्पनिक प्रसंग गुंफला आहे. इगतपुरी येथे इंजिनात बिघाड झाल्यामुळे गाडी तीन तास खोळंबली. अन्य प्रवासी कंटाळवाणेपणाने वेळ घालवत राहतात. या दोघांनी मात्र कल्पकतेने त्या वेळेचा सदुपयोग केला. पण त्याचा परिणाम मात्र हास्यस्फोटक झाला. ही कथा त्यांच्या 'हास्यकल्लोळ- बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतली आहे.
पाठ कार्टून स्वरूपात पहा .....
कथेचा आशय
इगतपुरी स्टेशनवर इंजिनात बिघाड झाल्यामुळे गाडी तीन तास खोळंबली. लोक कंटाळले. दोन प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारीत बसले. परंतु तासाभराने तेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते मुक्तपणे आणि मोठ्याने बोलत होते. त्यांच्या बोलण्याचे सार असे ते दोघे काका-पुतण्या होते. तरुण प्रवासी पुतण्या होता आणि म्हातारा प्रवासी काका होते. काका श्रीमंत होते. आपला पुतण्या खूप शिकावा, त्याने बॅरिस्टर व्हावे, असे त्यांना कळकळीने वाटत होते. त्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायला ते तयार होते. विमानाचा खर्च करणार होते. इंग्लंडमध्ये राहण्यासाठी भाड्याने बंगला घेऊन दयायची त्यांची तयारी होती. दरवर्षी १५ लाख रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी ४५ लाख रुपये ते देणार होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या बॅगेत कोट्यवधी रुपये होते. त्यांतील लागतील तेवढे पैसे ते पुतण्यासाठी खर्च करणार होते. पुतण्याची संपूर्ण युरोप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याची त्यांची तयारी होती. ऐकणाऱ्या कोणालाही काका खूपच श्रीमंत आहेत आणि ते लाखो-कोटी रुपये सोबत घेऊन हिंडतात, असे वाटले असते. तसेच झाले आणि एका भामट्याने त्यांच्या बॅगा पळवल्या. बॅगा पळवल्याची घटना उघड झाल्यावर चर्चा होते. चर्चेतून वेगळेच सत्य बाहेर येते. ते दोघे म्हणजे शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे अभिनेते होते. स्टेशनवर मोठमोठ्याने चाललेल्या त्यांच्या गप्पा म्हणजे खरेतर त्यांच्या नाटकातले संवाद होते. ते तिथे बसल्या बसल्या रिहर्सल करीत होते. त्यातून हा गमतीदार प्रसंग घडला.
पाठ कार्टून स्वरूपात पहा .....
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) येरझारा घालणे - अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या करणे, घालणे.
(२) हरी हरी करणे- झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत करीत बसणे.
टिपा:-
(१) पासपोर्ट : पारपत्र आपल्या देशातल्या नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेले परवानापत्र. हे पत्र असल्याशिवाय देशातला कोणताही नागरिक देश सोडून जाऊ शकत नाही. (२) व्हिसा : आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली, तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश दयायला हवा. परदेश त्यांच्याकडे प्रवेश देण्याचे जे परवानापत्र देतो, त्याला व्हिसा म्हणतात. जगात कुठेही जायचे असेल, तर पासपोर्ट व व्हिसा या दोन्ही गोष्टी अनिवार्य असतात.
कृति-स्वाध्याय कृतिपत्रिकेतील गदय पाठावरील प्रश्नांसाठी....
उतारा क्र. १ प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७ व ८) "इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ..............तेवढी रक्कम काढली आहे!"
कृती १: (आकलन कृती)
(१) इगतपुरी स्टेशनवरील प्रवाशांच्या कृतींमधून जाणवणारा त्यांचा स्वभावगुण लिहा :
(i) दोन प्रवासी:
(ii) अन्य प्रवासी :
(२) कृती पूर्ण करा :
(i) गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती
(ii)इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी
(३) योग्य विधान शोधा:
(i) (१) लेखकाची नागपूर-दादर पॅसेंजर गाडी होती.
(२) म्हातारा व तरुण करोडपती होते.
(३) तरुण वकिली करायला परदेशात जात होता.
(४) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !
(ii)
(१) काही प्रवासी स्टेशन मास्टर कडे तक्रार करायला गेले.
(२) दोन प्रवासी वर्तमान पत्रे घेऊन वाचत बसले होते.
(३) अन्य प्रवासी गाण्यांच्या भेंडया खेळत बसले होते.
(४) इगतपुरी स्टेशनवर गाडी तीन तास खोळंबली होती.
(४) त्या दोन प्रवाशांच्या बोलण्यातून जाणवणारे नाते :
तरुण :
म्हातारा :
उत्तरे :-
(१) (i) दोन प्रवासी :- कुरकुर करीत न बसता प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधण्याची वृत्ती.
(ii) अन्य प्रवासी :- प्रतिकूल परिस्थितीला आनंदाने तोंड देण्याऐवजी कंटाळवाणेपणाने व आळसात वेळ घालवण्याची वृत्ती.
(२) (i)गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती - काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले. दोन प्रवासी दगडी बाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरु केल्या. काही जणांनी बुकस्टॉलवरून वर्तमानपत्र घेतले आणि ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले. ते दोन प्रवासीसुद्धा कंटाळले. मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या.
(ii) इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी :- पासपोर्ट मिळवला..व्हिसा काढला. चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले. काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आताच वापरण्यासाठी बाहेर काढले.
(३)
(i) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा व एक तरुण !
(ii) इगतपुरी स्टेशनवर गाडी तीन तास खोळंबली होती.
(४) (i) तरुण म्हाताऱ्या प्रवाशाचा पुतण्या (ii) म्हातारा - तरुण प्रवाशांचे काका.
कृती २ (आकलन कृती)
(१) काकांनी दिलेल्या घडयाळाची माहिती लिहा.
(२) पुढील माहिती लिहा :
(i) पुतण्याचा संकल्प
(ii) काकांची भूमिका.
(३) पुढील कोष्टक पूर्ण करा:
पुतण्याची अपेक्षा
(i) ............
(ii) ..............
(iii) ....................
काकांनी केलेली सोय
(i) ..............
(ii) ..............
(iii) ..............
उत्तरे :-(१) ते घड्याळ काकांनी पिटस् बर्गला खास खरेदी केले होते. ते दहा हजार रुपयांचे म्हणजे खूप महागडे होते. (२) (i) पुतण्याचा संकल्प:
इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवावी.
(ii) काकांची भूमिका : बॅरिस्टर होण्यासाठी पुतण्याला येणारा सर्व खर्च काका करणार होते.
पुतण्याची अपेक्षा :- (i) इंग्लंडमध्ये उच्च दर्जाची जागा राहण्यासाठी मिळावी.(ii) वर्षाला १५ लाख रुपये याप्रमाणे तीन वर्षासाठी ४५ लाख रुपये मिळावेत. (iii) इंग्लंडमध्ये असताना मोटार घेण्यासाठी 20 लाख रुपये मिळावेत .
काकांनी केलेली सोय (i) बंगलाच भाड्याने घेण्यास मान्यता दिली.(ii) शेअर्स विकून आलेल्या ८० लाख रुपयांतून ४५ लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. (iii) बँकेतून त्याच दिवशी काढलेली तेवढी रक्कम देण्याचे मान्य केले.
कृती ३: (व्याकरण कृती)
(१) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द उताऱ्यातून शोधून लिहा :
(i) सुधारणा (ii) अल्पमोली (II) उत्साह (iv) गैरसोय.
(२) कोट्यवधी = कोटी + अवधी असा संधी असलेले अन्य चार शब्द लिहा.
(३) कंसात दिलेले प्रत्यय जोडून पुढील शब्दांचे पूर्ण रूप लिहा :
(i) म्हातारा (ने)
(ii) तरुण (ला)
(iii) प्रवासी (ला)
(iv) कपडे (त).
उत्तरे
(१) (i) सुधारणा × बिघाड
(ii) अल्पमोली × भारी
(iii) उत्साह x कंटाळा
( iv) गैरसोय × सोय
(२) (i) गति + अंतर= गत्यंतर
(ii) इति + आदी = इत्यादी
(iii) अति + अंत= अत्यंत
(iv) प्रीति अ+ र्थप्री = त्यर्थ.
(३) (i) म्हाताऱ्याने (ii) तरुणाला (iii) प्रवाशाला (iv) कपड्यांत.
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
■ तुमचा प्रवासातील एखादा लक्षात राहिलेला अनुभव लिहा.
उत्तर : एकदा आम्ही गावी चाललो होतो. बस सुटायला अजून अर्धा तास अवकाश होता. मला चिक्की हवी होती. बाबांकडून पैसे घेऊन मी स्टॉलवर गेलो. तेथे एक गरीब मुलगा आशाळभूतपणे चिक्कीच्या पाकिटांकडे पाहत होता. तेवढ्यात त्याची आई आली. ती त्याला ओढत घेऊन जाऊ लागली. त्यातच त्या मुलाच्या हाताचा धक्का लागून दहा पंधरा पाकिटे खाली पडली. पावसाळ्याचे दिवस. खाली पाणी-चिखल होताच. चिक्कीवाला भडकला. तो त्या मायलेकरांना रागारागाने काहीबाही बोलू लागला. आई गयावया करीत होती. तेवढ्यात एक गृहस्थ पुढे झाले. त्यांनी त्या चिक्कीवाल्याला दम देऊन गप्प बसवले. खाली पडलेल्या सर्व पाकिटांची किंमत विचारली. ही सर्व पाकिटे त्यांनी त्या आईच्या हवाली केली. तेवढ्या पाकिटांचे पैसे त्यांनी चिक्कीवाल्याला दिले. त्या मुलाच्या सन्मानासाठी त्या गृहस्थांनी केलेली कृती माझ्या अजूनही लक्षात आहे.
उतारा क्र. २ . प्रश्न पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
{ उतारा क्र. २ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८) 'काका, मला सारा युरोप ...................... रिहर्सल करत होतो." }
कृती १ (आकलन कृती)
(१) उत्तरे लिहा :
(i) पुतण्याची युरोप बघण्याची योजना (ii) समोरच्या बाकावरच्या प्रवाशांच्या मनातल्या शंका
(२) काकांनी पुतण्याच्या युरोप बघण्याच्या योजनेला दिलेला प्रतिसाद लिहा.
(३) गाडी सुटणार अशी घोषणा झाल्यावर काका-पुतण्यांनी केलेल्या कृती लिहा.
(४) स्वतःच्या बॅगा चोरील्या गेल्या, हे कळल्यावर काका पुतण्यावर झालेला परिणाम लिहा.
(५) समोरच्या बाकावर बसलेल्या म्हाताऱ्या प्रवाशाने दिलेला सल्ला सांगा.
उत्तरे :-(१) (i) पुतण्याची युरोप बघण्याची योजना- आईने दिलेले ४० तोळ्यांचे सोन्याचे दागिने तो यासाठी वापरणार होता.संपूर्ण युरोप पाहायची इच्छा होती. निम्मा खर्च पुतण्या करणार होता. प्रत्येक देशात किमान एक वर्ष तरी राहायचे.
(ii) समोरच्या बाकावरच्या प्रवाशाच्या मनातल्या शंका - काका-पुतण्या आहेत तरी कोण? त्यांना नव्या मिश्या का हव्या आहेत ? कोट्यवधी रुपये असलेल्या बॅगा चोरीला गेल्यावरही हे शांत कसे राहतात?
(२) पुतण्याने युरोप बघण्याच्या योजनेबाबत कोणतीही फिकीर करू नये, असे काकांचे मत होते. पुतण्यासाठी वाटेल तेवढा खर्च करायला काका तयार होते. चहाचे दोन मळे आणि सफरचंदाचा एक मळा विकून आलेले दहा कोटी रुपये काकांकडे होते. त्यातून ते पुतण्याचा युरोपवारीचा खर्च करणार होते.
(३) इतर प्रवाशांबरोबर काका-पुतण्या आपल्या डब्यात शिरले. ते दोघेही खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. पाच-दहा मिनिटांत ते पेंगू लागले आणि चक्क घोरूही लागले.
(४) कल्याण स्टेशन आल्यावर पुतण्याला जाग आली. सावधगिरी म्हणून त्याने आपल्या बॅगेकडे लक्ष दिले. पण बॅग जागेवर नव्हतीच. त्याला धक्काच बसला. त्याने काकांना उठवले. आपली आणि काकांची दोघांच्याही बॅगा चोरीला गेल्याचे त्याने काकांना सांगितले. काकांनाही धक्का बसला. " आता काय करायचं?" असे दोघे किंचाळले.
(५) समोरच्या बाकावर बसलेल्या म्हाताऱ्या प्रवाशाला काका-पुतण्या दोघेही खूपच निष्काळजी असावेत, असे वाटले. त्याने त्या दोघांना उपदेशाचे दोन शब्द ऐकवले. त्या म्हाताऱ्या प्रवाशाच्या मते, काका पुतण्यासारख्या लखपती माणसांनी थ्री टायरमधून प्रवास करणे योग्य नव्हते. त्यांच्या उघड उघड चाललेल्या लाखो-कोटींच्या गप्पा एखादया भामट्याने ऐकल्या असणार. त्यानेच त्या पळवल्या असणार. दोघांनी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवावी. पुढे जाऊन त्या प्रवाशाने काका पुतण्याला मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी पैसे देऊ केले.
कृती २ (आकलन कृती)
(१) काकांनी मांडलेली स्वतःची कैफियत लिहा,
(२) ते दोन प्रवासी प्रत्यक्षात कोण होते ?(३) काका-पुतण्यांच्या लाखो कोटींच्या गप्पांमागील रहस्य स्पष्ट करा.
(४) योग्य विधान शोधून लिहा :
(i) (१) म्हाताच तरुण दोघांच्या बंगेत खूप पैसे होते.
(२) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.
(३) म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते.
(४) म्हातारा व तरुण बेजबाबदार होते.
(ii) (१) काका-पुतण्या दोघेही थापाडे होते.
(२) पुतण्या आपल्या काकांना फसवत होता.
(३) पुतण्या इंग्लंडला जाणारच नव्हता. (४) काका आपल्या पुतण्याला उगाचच आशा दाखवत होते.
(५) कारणे लिहा :
(i) काका-पुतण्याच्या बॅगा चोरीला गेल्या कारण
(ii) कोट्यवधी रुपये बॅगांत असतानाही काका-पुतण्या निर्धास्तपणे झोपी गेले होते ; कारण-
(iii) पुतण्याने समोरच्या बाकावरील प्रवाशाकडून मदत घेण्याचे नाकारले; कारण -
उत्तरे :- (१) बॅगा चोरीला गेल्यामुळे होणारी पंचाईत काकांनी बोलून दाखवली. त्यांच्या बॅगेत त्यांच्या मिश्या होत्या. त्या चोरीला गेल्यामुळे नवीन मिश्या घ्याव्या लागणार होत्या. त्यासाठी दहा रुपये खर्च करावा लागणार होता. दहा रुपये हा एक प्रकारे दंडच होता.
(२) ते दोन प्रवासी प्रत्यक्षात काका-पुतण्या नव्हते. दोघेही नाट्य अभिनेते होते. पुतण्याच्या भूमिकेत होते ते राजा गोसावी आणि काकांच्या भूमिकेत होते ते शरद तळवलकर.
(३) गाडीला तीन तास खोळंबा झाल्यामुळे सगळ्या प्रवाशांप्रमाणेच हे काका-पुतण्याही खरेतर कंटाळले होते. तासभर गप्पा मारून झाल्या होत्या. मग वेळ घालवण्यासाठी त्यांनी त्यांच्या नाटकातल्या भूमिकांची रिहर्सल करायला सुरुवात केली. नाटकामध्ये ते काका पुतण्या होते आणि श्रीमंतसुद्धा होते. त्यांच्या गप्पांमधील लाखोकोटींच्या गप्पा म्हणजे त्यांचे नाटकातले संवाद होते.
(४) (i) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. (ii) पुतण्या इंग्लंडला जाणारच नव्हता.
(५) (i) काका-पुतण्याच्या बॅगा चोरीला गेल्या कारण त्या दोघांनी प्लॅटफॉर्मवर मोठमोठ्याने गप्पा मारताना आपल्याकडे लाखो कोटी रुपये असून ते आता आपल्या बॅगांमध्येच आहेत, असे एकमेकांना सांगत होते. हे कोण्या भामट्याने ऐकले आणि त्यांच्या बॅगा पळवल्या..
(ii) कोट्यवधी रुपये बंगांत असतानाही काका-पुतण्या निर्धास्तपणे झोपी गेले होते कारण प्रत्यक्षात त्यांच्या बॅगांमध्ये पैसेच नव्हते. त्यामुळे त्यांना चिंता वाटण्याचे काहीच कारण नव्हते.
(iii) पुतण्याने समोरच्या बाकावरील प्रवाशाकडून मदत घेण्याचे नाकारले; कारण त्यांना पैशाची गरज नव्हती. त्याच्या स्वतःच्या खिशात तीन-चार रुपये होते. त्यातून त्यांचा चहाचा खर्च भागणार होता.
कृती ३: (व्याकरण कृती)
(१) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द उताऱ्यातून शोधून लिहा :
(i) यात्रेकरू (ii) फुटकळ (ii) ताबडतोब (iv) उबग
(२) पुढील वाक्यातील कोणतीही चार नामे लिहा :
इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर-दादर एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली.
(३) पुढील वाक्यातील मिळवला' व 'काढला' ही क्रियापदे न बदलता 'मी : च्या जागी 'तो' हे सर्वनाम योजा आणि वाक्य पुन्हा लिहा : मी पासपोर्ट मिळवला आणि व्हिसा काढला.
उत्तरे :-
(१) (i) यात्रेकरु = प्रवासी
(ii) फुटकळ- किरकोळ
(iii) ताबडतोब - तत्काळ
(iv) उबग = कंटाळा.
(२) (i) इंजिन (ii) बिघाड (iii) नागपूर (iv) तास. (या वाक्यातील आणखी नामे - दादर, इगतपुरी, स्टेशन)
(३) त्याने पासपोर्ट मिळवला आणि व्हिसा काढला.
कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
(१) समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा.
उत्तर : भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका-पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्यसुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एक तर प्रवासामध्ये उचले, भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरेतर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा अडका किती आहे, मोल्यवान वस्तू किती आहेत, हे मोठ्याने बोलून सांगू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका-पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका-पुतणे शांत कसे, हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले, यात नवल काहीच नाही.
(२) पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर: सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला.. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटांच्या गप्पा पटेनाशा होतात. त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी, ऐंशी लाख, चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वेप्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी, म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत, असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा होतो.
व्याकरण व व भाषाभ्यास
९. व्याकरण
★ (१) पुढील शब्दांचे मूळ शब्द आणि सामान्यरूप लिहा .
शब्द (i) भावाला (ii) शाळेतून (iii) पुस्तकांशी(iv) फुलाचा
(v) आईने
उत्तरे : मूळ शब्द:- भाऊ , शाळा , पुस्तक ,आई .
सामान्यरूप :- भावा , शाळे , पुस्तकां , फुला ,आई .
(२) पुढील शब्दांतील मूळ शब्द, समान्यरुप , विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती सांगा
शब्द :- (i) मुंबईला (ii) सोन्याचे (iii) भारतात (iv) गाडीने
उत्तरे : मूळ शब्द
(i) मुंबई (ii)सोने (iii) भारत (iv) गाडी
सामान्यरूप :- (i) मुंबई
(ii)सोन्या
(iii) भारता
(iv) गाडी
विभक्तीप्रत्यय :- (i) ला (ii)चे (iii) त (iv) ने
विभक्तीचे नाव :- (i) चतुर्थी (ii) षष्ठी (iii) सप्तमी
(iv) तृतीया
वाक्याचे प्रकार :
अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचे चार प्रकार आहेत.
(१) विधानार्थी वाक्य (२) प्रश्नार्थी वाक्य
(३) उद्गाराधी वाक्य (४) आज्ञार्थी वाक्य
(१) विधानार्थी वाक्य : ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.
उदा. -मी दररोज अभ्यास करतो.
(२) प्रश्नार्थी वाक्य :- ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
उदा.- तू कधी अभ्यास करतोस ?
(३) उद्गारार्थी वाक्य :- ज्या वाक्यात भावनेचा उद्गार
व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
उदा.- अबब! केवढी मोठी आग ही!
(४) आज्ञार्थी वाक्य :- ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद प्रार्थना, विनंती, उपदेश या गोष्टींचा बोध होतो, त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
उदा.- मुलांनो चांगला अभ्यास करा.
लक्षात ठेवा :
(१) गुलाब सुंदर आहे. - विधानार्थी वाक्य
(२) तुला गुलाब आवडतो का ? - प्रश्नार्थी वाक्य
(३) किती सुंदर आहे गुलाब ! -उद्गारार्थी वाक्य
(४) गुलाबाचे फूल कोटाला लाव. - आज्ञार्थी वाक्य
* (३) पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा
(1) "राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना ?"
(ii) " तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. "
(iii) "तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये."
(iv) " म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!"
उत्तरे : (i) प्रश्नार्थी वाक्य (ii) विधानार्थी वाक्य
(iii) आज्ञार्थी वाक्य (iv) उद्गारार्थी वाक्य.
◆ (४) पुढील वाक्यांतील अधोरेखित / ठळक शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) त्यांचा खेळातील दम संपत आला.
(ii) कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
(iii) क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
उत्तरे : (i) त्याचा खेळातील दम संपत आला. (ii) कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला.
(iii) क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
◆(५) लिंग बदला:
(i) तरुण (ii) म्हातारा (iii) काका (iv) पुतण्या
उत्तरे : (i) तरुण-तरुणी (ii) म्हातारा - म्हातारी
(iii) काका-काकी (iv) पुतण्या - पुतणी
■ २. शब्दसंपत्ती :
★(१) विशेषणे-विशेष्ये जोड्या लावा :
स्वतंत्र ,एक , वरचा, लखपती
प्रवासी ,कप्पा, माणूस , बंगला
उत्तरे : (i) स्वतंत्र - बंगला
(ii) एक- प्रवासी
(iii)वरचा - कप्पा
(iv)लखपती - माणूस
★(२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) किमान x कमाल (ii) आदर्श x अनादर्श
(iii) न्याय x अन्याय (iv) निश्चित x अनिश्चित
(v) आनंद x दुःख vi) चांगले × वाईट
(३) समानार्थी शब्द लिहा :
(i) प्रवास = सफर (ii) काळजी चिंता
(iii) निम्मा = अर्धा (iv) कप्पा = खण
★ ३. लेखननियमानुसार लेखन :
(१) अचूक शब्द ओळखा:-
(i) मुंबइ/मुंबई/मूबंइ/मुबंई.
(ii) पंचाईत / पंचाइत / पंचइत / पचांईत.
(iii) घोशणा / घोसणा / घोषणा/ घोषना.
(iv) पोलीस/पोलीश/पोलिश/पोलिस.
उत्तरे (1) मुंबई (ii) पंचाईत (iii) घोषणा (iv) पोलीस
★ (२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) कोटयावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरिला गेल्या.
(ii) त्यांचा शब्द दुरवर ऐकू जात होता.
उत्तरे : (i) कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या. (ii) त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता.
■ ४. विरामचिन्हे :
★(१) नावापुढे चिन्हे लिहा :
(i) पूर्णविराम (.)
(ii) प्रश्नचिन्ह (?)
(iii) संयोगचिन्ह (-)
(iv) दुहेरी अवतरणचिन्ह (" ........" )
★ (२) पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा :
(i) राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे.
(ii) तू बॅरिस्टर कसा होणार ?
(iii) पण बेटा सांभाळून जायचं बरं का!
उत्तरे : (i) स्वल्पविराम, पूर्णविराम (ii) प्रश्नचिन्ह (iii) उद्गारचिन्ह.
■ ५. वाक्प्रचार
● (१) पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
(i) गप्पा रंगणे -
वाक्य : बऱ्याच वर्षांनी घरी आलेल्या काकांशी
मोहनच्या छान गप्पा रंगल्या.
(ii) पंचाईत होणे -
वाक्य : 'या वर्षी सहलीला जायचे नाही' असे सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचाईत झाली.
© तोंडी परीक्षा
प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) मोठमोठ्याने गप्पा मारण्यामुळे होणारे तोटे सांगा.
(२) काका-पुतण्याने कोणती खबरदारी घ्यायला हवी होती ?
(३) काका-पुतण्याने आपल्या सामानाबाबत खबरदारी
का घेतली नसावी ?
(४) काका-पुतण्याच्या गप्पांमध्ये असलेला तुमच्या मते
न पटणारा भाग सांगा.
■ आकारिक मूल्यमापन ■
★१. मौखिक कार्य :
(१) प्रवासाची पूर्वतयारी' या विषयावर तुमचे विचार सांगा.
(२) गाडीत शेजारी शेजारी बसलेल्या दोन प्रवाशांमधील चर्चा सादर करा.
(३) एस.टी. स्थानक, रेल्वे स्टेशन येथे दिल्या जाणाऱ्या
उद्घोषणा सादर करा.
★२. उपक्रम :
● (१) पुढील महिन्यात होणाऱ्या तुमच्या घरातील खर्चाविषयी आईशी गप्पा मारा आणि खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा.
●(२) या पाठाचे नाट्यरूपांतर करून वर्गात सादर करा.
●(३) रेल्वे स्टेशन, एस.टी. स्थानक, टॅक्सी/ रिक्षा स्टैंड अशा ठिकाणी प्रवाशांसाठी लिहिलेल्या सूचनांचे संकलन करा.
●(४) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या साहाय्याने घ्या. त्याची यादी तयार करा.
★३. गटचर्चा :
● 'राजाचे परदेशातील खर्चाचे अंदाजपत्रक' या विषयावर वर्गातील मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.
प्रश्न क्र.(1) लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचे लेखक कोण ?
(1) वसंत जोशी
(2) शरद तळवलकर
(3) राजा गोसावी
(4) द.ता. भोसले
प्रश्न क्र.(2)लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ कोणत्या पुस्तकातून घेतला आहे ?
(1) प्रतिज्ञा (2) हास्यकल्लोळ (3) बिनबियांच्या गोष्टी (4) हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी
प्रश्न क्र.(3)रेल्वे स्टेशन वर गप्पा मारणाऱ्या दोन कलाकारांची नावे पाठातून खालीलपैकी कोणती ते ओळखा .
(1) शरद तळवळकर व शरद जोशी
(2) महेश कोठारे व अशोक सराफ
(3) राजा गोसावी व महेश कोठारे
(4) शरद तळवलकर व राजा गोसावी
प्रश्न क्र.(4) ते प्रश्न क्र.(9) साठी सूचना.
" लाखाच्या ....कोटीच्या .....गप्पा " या पाठात खालीलपैकी कोणता इंग्लिश शब्द आलेला नाही?
प्रश्न क्र.(4)
(1) इंजिन (2) एक्सप्रेस (3) न्यूज पेपर (4) स्टेशन
प्रश्न क्र.(5)
(1) प्लॅटफॉर्म (2) बुकस्टॉल (3) पासपोर्ट-व्हिसा (4) एअर पोर्ट
प्रश्न क्र.(6)
(1) ट्रेलर (2) टेलर (3) बॅरिस्टर (4) हॉटेल
प्रश्न क्र.(7)
(1) बायपास (2) बॅग (3) शेअर्स (4) मोटार
प्रश्न क्र.(8)
(1) कॉलेज (2) बँक (3) मेकअप (4) स्पीड
प्रश्न क्र.(9)
(1) रिहर्सल (2) बॉक्स (3) शेअर्स (4) मोटार
प्रश्न क्र.(10) योग्य विधान शोधा.
(1) लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती .
(2) म्हातारा व तरुण करोडपती होते .
(3) तरुण शिकण्यासाठी परदेशात जात होता .
(4) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता .
प्रश्न क्र.(11) योग्य विधान शोधा.
(1) म्हातारा व तरूण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते .
(2) म्हातारा व तरूण दोघेही कलाकार होते.
(3) म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते .
(4) म्हातारा व तरुण बेजबाबदार होते .
प्रश्न क्र.(11)
गाडीच्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर खालीलपैकी कोणती कृती झालेली नाही .
(1( येरझारा घालू लागले .
(2) बुक स्टॉल वरची वर्तमानपत्र घेऊन वाचू लागले .
(3) दगडी बाकावर जाऊन बसले .
(4) काही प्रवाशी झोपी गेले.
प्रश्न क्र.(12) इंग्लंड ला जाण्यासाठी राजा ने कोणती तयारी केली ?
Comments
Post a Comment