प्रस्तावना
खरंतर गोदावरी परुळेकर या स्वातंत्र्यातील कार्यकर्त्या त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका. 'जेव्हा माणूस जागा होतो.' 'बंदिवासातील आठ वर्षे' (कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक) आणि 'Adivasis' Revolt: The story of Warli peasants in struggle ' ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. डहाणू-उंबरगाव या परिसरातील आदिवासींमध्ये जागृती निर्माण करून त्यांना माणसासारखे जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी चळवळ केली. 'जेव्हा माणूस जागा होतो' या त्यांच्या पुस्तकाला १९७२ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
आदिवासी अत्यंत दारिद्रयात गैरसोयींनी भरलेले जीवन जगत होते. दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्यांना मिळत नव्हत्या. पूर्णपणे गुलामीचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेले होते. त्यांच्या या दीन व केविलवाण्या अवस्थेचे चित्रण ' पाड्यावरचा चहा' या पाठात आलेले आहे.
पाठाचा आशय
लेखिका आदिवासींची संघटना बांधण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यासाठी आदिवासींना एकत्र करणे आणि चळवळीचा विचार समजावून सांगणे आवश्यक होते. म्हणून त्या आदिवासींच्या वेगवेगळ्यां पाड्यांना भेट देत होत्या. अशाच एका 'सालकर पाडा' या पाड्यावर त्या गेल्या होत्या. तो प्रसंग या पाठात आलेला आहे. या भेटीत गोदावरी परुळेकर यांना वारल्यांच्या घरांचे दर्शन घडते. वारल्यांकडे इतरांनी चोरून नेण्यासारखे काहीच नसल्यामुळे त्यांची घरे तकलादू असत. सहज ढकलली तरी कोसळून पडतील इतकी कमकुवत असतात.
लेखिका त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आल्या होत्या. पण त्यांच्या येण्याची कोणी दखलच घेतली नाही. सर्वत्र शुकशुकाट होता. एक प्रकारच्या दबावाचे व भीतीचे वातावरण जाणवत होते. खोपट्याचे दृश्य दयनीय होते. एखादे अल्युमिनियमचे पातेले, मातीची एक-दोन मडकी, त्यात भाताचे चार दाणे, एक-दोन कांदे, एखादे हळकुंड, लसणीच्या पाकळ्या एवढाच संसार.
ग्लानी आलेल्या माणसासारखा तो पाडा निपचित पडून होता . त्यात पराकोटीचे दारिद्र होते. एकूणच भयाण वातावरण होते. चळवळीबद्दल निराशा वाटावी असे वातावरण होते. पण गरिबांविषयीची कळकळ आणि त्यांच्या उद्धाराचे ध्येय यांमुळे गोदावरी परुळेकर अविचल राहिल्या. आदिवासी भेटतील या आशेने ताटकळत वाट बघत बसल्या. हळूहळू बकऱ्यांच्या मागे गेलेली मुले परतली. मोठ्या माणसांना बोलावून आणण्यास त्यांतल्या दोन मुलांना सांगितले. बराच वेळ गेला तरी कोणीही आले नाही. कंटाळून निघणार तेवढ्यात थोड्या वेळापूर्वी पाठवलेली ती दोन मुले आणि दोन-तीन आदिवासी येताना दिसले. नेहरा निर्विकार होता. त्यांनी आदिवासींच्या शाळेत म्हणजे एका खोपटात बसण्याची व्यवस्था केली. त्यांची हातरी टाकून बसण्याची व्यवस्था केली. जेमतेम पंधरा वारली जमले.बहुतेकजण वेठीला गेलेले असल्यामुळे वारली जमणे अशक्य होते.
लेखिका आणि त्यांचे सहकारी यांच्यासाठी चहाची व जेवणाची तयारी सुरू झाली. पाटलांकडून गूळ आणायला एका मुलाला पाठवले. चहा करण्याची पद्धत कोणालाच पूर्ण ठाऊक नव्हती.त्यांची चर्चा होऊन मग कसाबसा चहा तयार झाला. लहान लहान पितळ्यांमध्ये मध्ये पाहुण्यांसाठी चहा दिला आणि आदिवासींनी स्वतःसाठी पानांचा द्रोण करून चहा घेतला. हे वर्णन पाठात अगदी सुंदर शब्दांत केले आहे .
शब्दार्थ
पाडा - दहा-पंधरा खोपट्यांचा समूह जिथे असतो ते ठिकाण.
खोपटी - झोपडी.
वसणे - राहणे. मेढ - वासा ठेवण्यासाठी वरच्या टोकाला बेचके असलेला खांब . (बेचके म्हणजे झाडाच्या खोडाला फांदी जिथे चिकटलेली असते ते ठिकाण किंवा दोन फांद्या फुटल्याने त्या ठिकाणचा आकार इंग्लिश Y सारखा होतो, त्यात वासा ठेवता येतो.)
एकदालनी - एक दालन असलेली, एकच खोली असलेली शुकशुकाट - कोणताही आवाज नसलेली शांतता.
राप - भांडे, पातेले, गाडगे सतत चुलीवर ठेवल्यामुळे धरलेली काजळी.
तवली - तव्यासारखे पण खूप खोलगट असलेले मातीचे किंवा अल्युमिनियमचे भांडे.
शिके - टांगाळे , वस्तू अधांतरी टांगून ठेवण्यासाठी केलेली दोरीची किंवा साखळीची योजना.
ग्लानी - आत्यंतिक थकवा, उभे राहता येत नाही इतका कमकुवतपणा.
खजुऱ्या - खजुरीच्या झाडाची फळे.
कुडाची भिंत, कामट्यांची भिंत.
हातरी- बसण्यासाठी किंवा अंथरलेली गोधडी चादर किंवा चटई.
गवसेल - मिळेल.
भुक्की - चहाची पूड, पावडर,
टोप - धातूचे उभट व रुंद तोंडाचे भांडे.
गळवट- काठापर्यंत भरलेले. भांड्याच्या गळ्यापर्यंत.
पितळी - लहान ताटली.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) चाहूल लागणे - कोणीतरी असल्याचे जाणवणे ,सुगावा लागणे.
(२) अठराविश्वे दारिद्र्य असणे - आत्यंतिक दारिद्र्य असणे.
(३) खाईत पडणे - चितेवर पडणे, मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे.
(४) रपेट करणे - (शब्दशः अर्थ = फेरफटका मारणे, सहल करणे) त्रासदायक कष्टदायक फेरा करणे.
(५) रडकुंडीला येणे - त्रासामुळे/दुःखामुळे रडण्याची वेळ येणे.
(६) टकामका बघणे - आश्चर्याने किंवा भीतीने डोळे ताणून बघणे,
(७) ब्रह्मांड आठवणे - (संकटाची चाहूल लागल्यामुळे) आत्यंतिक भीती वाटणे.
(८) जिवात जीव येणे - चिंतामुक्त झाल्याने बरे वाटणे.
(९) वेठीला जाणे - जमीनदाराच्या शेतीवर विनामोबदला सक्तीने काम करायला जाणे.
(१०) स्वप्नातही न येणे - कधीही कल्पनाही न करणे.
(११) बकरी गवसणे - बकरी पकडणे, बकरी धरणे,
बकरी पकडून दूध काढून आणणे.
कृति स्वाध्याय व उत्तरे
कृतिपत्रिकेतील गदय पाठावरील प्रश्नांसाठी....
उतारा क्र. १ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५७)
प्रश्न. पुढीत उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
( सात-आठ किंवा दहा-पंधरा .......... जंगलातील बरणीच होती.)
कृती १ : (आकलन कृती)
(१) पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत पुढील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा :
(i) खोपटे वसण्याचे ठिकाण -
(ii) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य
(iii) दारे, खिडक्या व छप्पर -
(iv) दालन
उत्तर:-
(१) (i) खोपटे वसण्याचे ठिकाण - बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर बसवलेली असतात.
(ii) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य- कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात. या भिंती शेणामातीने सारवतात. या खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर चार-सहा वासे वापरलेले असतात. काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते. छप्पर तर अगदी सामान्य असते. पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरांवर घालतात. कौले नसतातच.
(iii) दारे, खिडक्या व छप्पर - वारल्यांच्या घरांना एकच दार असते. सर्वसाधारण घरांना दिसतात, तशा खिडक्या वारल्यांच्या घरांना नसतातच. भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात. तीच खिडकी. भरभक्कम छप्पर नसतेच. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात.
(iv) दालन - घरात भिंती घालून जे भाग पाडलेले असतात, त्यांना दालन म्हणतात. वारल्यांच्या घराला एकच दालन असते. म्हणजे त्यात अनेक खोल्या नसतात. त्या एकाच दालनात स्वयंपाक व चहा होतो. बसण्या-उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी व झोपण्यासाठी देखील तेच दालन वापरले जाते. त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात.
(२) पाठाच्या आधारे पुढे दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा :
(i) माची -
(ii) लहान लहान खड्डे -
(ii) सारवलेला ओटा -
उत्तर:- (i) माची - वारली लोक बांबू व कामट्या यांपासून
लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात. तिला माची म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे टेबलच.
(ii) लहान लहान खड्डे - वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते.
(iii) सारवलेला ओटा - वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात. बसण्या- उठण्यासाठी याचाच उपयोग करतात.
कृती २ : (आकलन कृती)
(१) माहिती पूर्ण करा :
१ गाव= .........पाडे
..............पाडा = ----------------खोपटी
उत्तर :-
१ गांव = ५ ते ७ पाडे.
१ पाडा = ७ ते ८ किंवा १० ते १५ खोपटी.
(२) गटात न बसणारा शब्द शोधून लिहा :
(i) वाडा, बंगला, महाल, खोपट.
(ii) बाज, माची, ओटा, आरामखुची.
उत्तर :- (i) खोपट (1) आरामखुर्ची.
(३) कारणे लिहा :
(i) ढकलली तरी कोसळून पडतील अशी वारल्यांची खोपटी होती: कारण ...........
उत्तर :- ढकलली तरी कोसळून पडतील अशी वारल्यांची झोपडी होती; कारण पळवून नेण्यासारखे वारल्यांकडे काहीही नसल्याने खोपटी भक्कम करण्याची गरजच नसे.
(ii) पक्षी व कोंबडी यांच्यामुळे होणारा आवाज सोडला;
तर सारा शुकशुकाट होता, कारण-
उत्तर :- पक्षी व कोंबडी यांच्यामुळे होणारा आवाज सोडला; तर सारा शुकशुकाट होता, कारण- एक म्हणजे पाड्यातील सर्व मोठी माणसे वेठीला गेली होती आणि दुसरे म्हणजे आत्यंतिक दारिद्र्यामुळे वस्तीवर कसलेही चैतन्य नव्हते.
(iii) हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीय होती;
कारण -
उत्तर :- (iii) हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणी होती: कारण आदिवासीकडे धान्य वा तत्सम वस्तु ठेवण्यासाठी ते एकमेव साधन होते. तीच त्यांची बरणी होती.
कृती ३: (व्याकरण कृती)
(१) पुढील शब्दांना कंसांतील प्रत्यय जोडून पूर्ण रूपे लिहा :-
(i) खोपटे (ना) (ii) पाडे (ना) (iii) उंचवटा (त) (iv) लाकूड (चा).
(२) सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा :
(i) झोपणे : झोपाळू : : लाजणे:
(ii) गाव : गावकी : : माणूस :
(३) 'कड' या नामापासून 'कडे' हे शब्दयोगी अव्यय तयार झाले आहे. याप्रमाणे पुढील नामांपासून तयार झालेली शब्दयोगी अव्यये लिहा :
(i) मध्य (ii) पुढा (iii) विषय (iv) माग.
उत्तर:-
(१) (i) खोपटांना (ii) पाड्यांना (iii) उंचवट्यात (iv) लाकडाचा.
(२) (i) झोपणे : झोपाळू : : लाजणे : लाजाळू
(ii) गाव : गावकी : : माणूस : माणुसकी.
(३) (i) मध्य - मध्ये (ii) पुढा - पुढे
(iii) विषय - विषयी (iv) माग - मागे.
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
• लेखिकांनी वारली लोकांच्या घरांचे जे दर्शन घडवले, त्याबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर: पाठातले वारली लोकांच्या घरांचे वर्णन वाचले आणि मी अवाक् झाले. आपलेच देशबांधव आहेत. अजूनही किती हलाखीत राहतात. सर सांगत होते, "अजूनही अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. मनात आले, त्या खोपटांना घर तरी म्हणता येईल का? घर महटल्यावर जे डोळ्यासमोर येते
यापैकी काहीही त्या खोपटात नव्हते. त्यामानाने आम्हांला किती सुखसोयी मिळतात! त्यांना का असे राहावे लागते? आपले सरकार त्यांच्याकडे का दुर्लक्ष करते? तिथली आमच्यासारखी मुले काय करीत असतील? त्यांची शाळा कशी असेल? आम्हांला किती किती गोष्टी मिळतात! माझी स्वतःची सायकल आहे आणि त्या वारल्यांच्या मुलाला साधी चहापूड आणण्यासाठी तीन मैल अंतरावरील दुकानात पायपीट करीत जावे लागले! मला घरात अभ्यासासाठी स्वतंत्र टेबल आहे, खुची आहे. पुस्तकांचे कपाट आहे. वारल्यांच्या मुलांना यातले काय मिळते? तीसुद्धा आमच्यासारखीच मुले आहेत ना? आमच्या घरात स्वयंपाकासाठी ओटा आहे. गॅसची शेगडी आहे तर वारल्यांच्या घरात तीन दगडांची चूल आहे. चुलीच्या धुरात घुसमटत त्या मुलांची आई अजूनही स्वयंपाक करत आहे! माझ्या वाढदिवशी आमच्या घरात किती आनंद असतो! तिथल्या मुलांचा वाढदिवस कसा साजरा होत असेल ?
खरेच खूप दुःखदायक स्थिती आहे ही.
उतारा क्र. २
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
( पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५८ व ५९)
(आम्ही खोपटात........ ......... ...... ........ आमच्यापुढेही प्रश्नच होता.)
कृती १: (आकलन कृती)
(१) सुचवलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(i) निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द
(ii) वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत
उत्तर :- (i)निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द :- खाई.
(ii) वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत
डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा.
Comments
Post a Comment