८वी मराठी आळाशी (कविता)


१५.आळाशी
- हनुमंत चांदगुडे





              आळाशी

बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया
कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया
भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो.

हातापायाला चिखल बाप घामामधी ओला
पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला
बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो
दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

येता भरात जोंधळा बाप काढणी करतो
स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो
जातो आळाशी होऊन तरी 'आळा' का तुटतो?
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो..
                          ----  हनुमंत चांदगुडे


  🔴  कवितेची मध्यवर्ती कल्पना  🔴
शेतामध्ये ज्वारीच्या पेरणीपासून  पिकलेल्या ताटांची काढणी करण्यापर्यंतचा पिकाचा प्रवास या कवितेतून  स्पष्ट केला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टमय व समर्पित जीवनाचाही हृदय हेलावणारा प्रवास या कवितेतून आर्त शब्दांत व्यक्त झाला आहे. जगाचे पालनपोषण करण्यासाठी रात्रंदिवस चिखलपाण्यात राबणाऱ्या  शेतकऱ्यांविषयी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे, हा संदेश देणारी ही कविता आहे.



   🔴     शब्दार्थ    🔴
अनवाणी-  पायात चप्पल न घालता. 
ठसा - खूण.
भाळ - कपाळ. 
पान्हा - वात्सल्याने मातेला दुधाचा पाझर(धार) फुटणे .
उकल- उलघडा होणे, समजणे . 
नभ - आकाश. 
भेगाळल्या-  भेगा, चिरे पडलेली (जमीन) .
भुई - जमीन , माती. 
शिवारी - शेतात.
थवा - समूह. 
आरोळी मारणे - मोठयाने हाक मारणे. 
तान्हा - लहान मूल. 
रगात - रक्त. 
व्हातो- वाहतो.
जोंधळा - ज्वारी.
भरात येणे- पक्व होणे.
जगाचे पोट भरणे- जगाला खाऊ घालणे. 

   🔴    टिपा    🔴
(१) कुणबी : शेत कसणारा.
(२) पाट: शेतात सोडलेले पाणी. पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा प्रवाह जाण्यास केलेली वाट. (पाण्याची वाट) 
(३) ताट: ज्वारी/बाजरी/मक्का यांची वनस्पती.
(४) हुरडा : जोंधळ्याचे हिरवेगार कच्चे दाणे भाजतात,
त्याला हुरडा म्हणतात.
(५) काढणी: ज्वारी/बाजरी/मक्का पक्व झाल्यानंतर 
  बुंध्यातून उपसून काढणे किंवा  कापणी करणे.
(६) आळाशी :  कडब्याची पेंढी 
(७) आळा : कडब्याची ताटं एकत्र बांधण्यासाठी ओल्या ताटांची केलेली दोरी 

  🔴      वाक्प्रचार व त्यांचे अर्थ    🔴

(१) उकल होणे - कोडे सुटणे, समजणे, उलघडा होणे. 
(२) आरोळी मारणे - मोठ्याने हाक मारणे. 
(३) पोट भरणे - अन्न खाणे..
(४) आळा तुटणे- रोपे विस्कटणे (इथे अर्थ) जीवन विस्कटणे.

   🔴      कवितेचा भावार्थ      🔴

शेतात दिवसरात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाचे जीवन चितारताना कवी म्हणतात -
शेतकऱ्याच्या अनवाणी पावलांच्या खुणा शेतात उमटतात. शेतकरी शेतात अपार कष्ट करतो. शेतकऱ्याच्या अपार कष्टांतून आकाशालाही प्रेमाचा ,मायेचा पाझर फुटतो. शेतकऱ्याचे राबणे पाहून ढग बरसतात. म्हणजेच शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पान्हा आभाळाला फुटतो. ।। धृ।।
आकाशात पाण्याचे मेघ दाटतात, जणू आकाशच पाणी
होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो; तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोडी सुटतात. कुणब्याचे जीवन कसाला लागते. भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो. हृदय गलबलते. तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा आकाशातून खाली येतो. त्याच्या कष्टांचे चीज होते. ।।१।।

 शेतात कसताना माझ्या बापाचे हात-पाय चिखलाने माखतात. जणू त्याच्या हातापायांचा चिखल होतो आणि घामाने ओला झालेला असतो. त्याही परिस्थितीत तो चिखलात राबतो. त्याच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते, ते पाहून पाखरांचा थवा पिकांवर घिरट्या घालतो. बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो, तेव्हा लहान मूल रडत रडत जागे होते. म्हणजे बापाच्या आनंदालाही दुःख व वेदना बिलगलेल्या असतात. तेव्हा त्याच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो. ।।२।।
    शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाप रक्त होऊन वाहतो. बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो, तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो. जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात. बाप त्यांच्या हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो. बापाच्या रक्त नि घाम यातून कणसे बहरतात. बाप कष्ट करतो, तेव्हा नभाला पान्हा फुटतो.।।३।।
जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते, तेव्हा बाप त्याची कापणी करतो. ते काढतो. स्वत: उपाशी राहून साऱ्या जगाचे पोट भरतो. काढलेल्या पिकांचा जुड़गा बांधायची आळाशी तो स्वतः होतो; तरीही त्यांचा 'आळा' का तुटतो ? हा प्रश्न आहे. शेतकरी कष्टाने राबून शेतात धान्य पिकवतो. तो जगाला पोसतो. परंतु त्याचे जीवन मात्र हलाखीचे राहते, असे शेवटच्या ओळीत सुचवायचे आहे. खरे तर त्यांच्या कपाळावरचा घाम नमामधून धारांच्या रूपाने बरसत असतो . ।।४।।

  🔴   कृति-स्वाध्याय व उत्तरे     🔴

कृतिपत्रिकेतील पद्य पाठावरील प्रश्नांसाठी.
प्रश्न:-  पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : कती १ : (आकलन कृती)
(१) पाऊस आल्यानंतर झालेले बदल लिहा:- 
      (i) नभ पाणी पाणी होते
      (ii) माती चिखल होते
(२) म्हणजे काय ते लिहा :
(i) नभातून फुटलेला पान्हा म्हणजे - बापाचा कपाळावरचा घामच आहे. 
(ii) पाटातले पाणी म्हणजे - बाप रक्त होऊन वाहणे.
(३) कवीच्या बापाच्या शेतातील पाच कृती लिहा:
 शेतात अनवाणी राबतो
भेगाळलेल्या भुईकडे पाहतो
आनंदाने आरोळी मारतो
हुरडा वाटतो
जोंधळ्याची काढणी करतो
(४)  खाली दिलेल्या घटनांचे परिणाम लिहा :
घटना
(I) बाप अनवाणी चालतो
(ii) बाप आरोळी मारतो
(iii) शिवारात पिके पाहताच
(iv) दाणे कणसाला येताच
उत्तर:- 
परिणाम
(i) त्याच्या पायाचा ठसा मातीत उमटतो. 
(ii) तान्हा रडत उठतो.
(iii) पाखरांचा थवा येतो.
(iv)बाप हुरडा वाटतो.

कृती २ : (आकलन कृती)
(१) कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचाओघतक्ता तयार करा....................
अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे
शेताची नांगरणी करणे
बियाणे पेरणे
अत्यंत मेहनतीने पाटातून शेताला पाणी देणे
जोंधळ्याची रोपे वर येणे
जोंधळ्याची काढणी करणे
(२) हे केव्हा घडले ते लिहा :
(i) पाखरांचा थवा येतो.
(ii) तान्हा रडत उठतो
 उत्तर :- 
 (i) पाखरांचा थवा येतो -  जेव्हा शिवारात पीक येते.
(ii) तान्हा रडत उठतो - जेव्हा बाप आनंदाने आरोळी
मारतो.
● (३)  काय ते लिहा  :
(i) बापाच्या हातापायांना माखलेला - 
(ii) ताटातून जन्म होतो ती - 
(iii) बाप रोपांच्या भोवती स्वतः होतो - 
(iv) कवितेत विचारलेला प्रश्न - 
(v) या कवितेत 'पान्हा ' म्हणजे - 
उत्तर :- 
(i) चिखल (ii) कणसे (iii)आळाशी (iv) 'आळा' का तुटतो ? (v) पावसाचे पाणी

●(४)कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा.
उत्तर :- 
(i)उठतो - फुटतो
(ii) चिखल होतीया - उकल होतीया
(iii)  फाटतो फुटतो
(iv) ओला - आला
(v)उठतो - फुटतो
(vi) पाटातून व्हातो - ताटातून होतो
(vii) वाटतो - फुटतो
(viii) करतो - भरतो
(ix) तुटतो -  फुटतो

कृती ३ : (काव्यसौंदर्य / स्वमत)

● (१) 'भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो' या
ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. 
उत्तर: शेतकरी दिवसरात्र शेतामध्ये राबतो आणि स्वकष्टाने धान्य पिकवतो. शेतकऱ्याचे कष्टमय जीवन आर्त शब्दांत कवी हनुमंत चांदगुडे यांनी 'आळाशी' या कवितेत रंगवले आहे.
      शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. उन्हाळ्यात त्याच्या अनवाणी पायांचे ठसे उमटतात. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की, जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्या वेळी आकाशाला पान्हा फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो. 
      
● (२) 'शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. हे विधान
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 
उत्तर: पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. अन्नधान्यावर आपल्या शरीराचे पोषण होते. ज्या ज्या गरजेच्या गोष्टी माणसाला पोषणाला लागतात, त्या शेतात पिकतात. शेतामध्ये जे धान्य पिकते, ते पिकवणारा शेतकरी असतो. शेतकरी शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन भाजतो. नांगरतो. नांगरलेल्या मातीत बियाणे पेरतो. लावणी करतो. धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो. मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, असे म्हणतात.

रसग्रहण
 पुढील ओळींचे रसग्रहण करा :
"बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो."
उत्तर : आशयसौंदर्य  :- शेतातल्या पिकासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आभाळाला पाझर फुटतो. भरघोस पीक येते, पण त्याचे कष्टमय आयुष्य तसेच राहते. हा आशय आर्त शब्दांत सांगणारी 'आळाशी' ही कविता कवी हनुमंत चांदगुडे यांनी लिहिली आहे.
काव्यसौंदर्य : बियाणे पेरणीपासून ते पिके काढणी पर्यंतच्या शेतकऱ्याच्या कष्टाचा प्रवास कवींनी कवितेत व्यवस्थित टिपला आहे. शेतातल्या लहान रोपांना पोसण्यासाठी पाट काढावा लागतो व नियमित पाणी पुरवावे लागते. शेतकऱ्याच्या कष्टांचे - माझ्या बापाचे रक्तच जणू पाटातून वाहते, असे भीषण वास्तववादी वर्णन  कवींनी केले आहे.
रक्तरूपी पाण्यामुळे ताटाताटातून कणसांचा जन्म होतो, असे म्हटले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : 'अष्टाक्षरी' छंदात बांधलेली ही कविता प्रासादिक झाली आहे. क्रियापदांची यमके साधल्यामुळे आशयाची अभिव्यक्ती थेट झाली आहे. नेटक्या शब्दकळेतून शेतकऱ्याचे वास्तव वर्णन प्रत्ययास येते. 'रगात',   'व्हातो' अशा ग्रामीण शब्दरचनेमुळे कवितेला मातीचा गंध लागला आहे. अंगावर काटा येणाऱ्या शब्दलाघवामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी समरस होऊन कृतज्ञभाव रसिकांच्या मनात जागृत होतो.

व्याकरण व भाषाभ्यास

१. अलंकार :

• पुढील ओळींतील अलंकार ओळखा :
(i) बा  अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
     भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो
(ii) फुलासारखा चेहरा तुझा बाळा.
(iii) हा आंबा म्हणजे जणू मधाची बुधली.
(iv) शकूने शेतातली शेवंती शोधली

उत्तर:- : (i) यमक अलंकार (ii) उपमा अलंकार
(iii) उत्प्रेक्षा अलंकार (iv) अनुप्रास अलंकार

२. व्याकरण :

(१) समास :

• खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून  समास ओळखा  :
सामासिक शब्द
(i) वारंवार
(ii) भाऊबहीण
(iii) क्रीडांगण
(iv) नीळकंठ
उत्तर : ( दिलेला सामासिक शब्द - विग्रह- समास असे उत्तर दिले आहे,  हे लक्षात घ्या .) 
(i) वारंवार -  प्रत्येक वेळी - अव्ययीभाव
(ii) भाऊबहीण - भाऊ आणि बहीण - द्वंद्व
(iii) क्रीडांगण  -क्रीडेसाठी अंगण - तत्पुरुष
(iv) नीळकंठ - निळा आहे कंठ  ज्याचा तो- बहुव्रीही



(२) संधी :

(१) संधी करा :
(i) दु: + काळ = .........................
(ii) महिला + आश्रम =.........................
(iii) सत् + जन =.........................
(iv) निः + अंतर =.........................
उत्तर : (i) दु: + काळ = दुष्काळ
           (ii) महिला + आश्रम = महिलाश्रम
           (iii) सत् + जन = सज्जन 
            (iv) निः + अंतर  = निरंतर.

(२) संधी सोडवा :

(i) निष्कारण =.........................
(ii) नभांगण  =.........................
(iii) दुर्जन  =.........................
(iv) वाङ्मय  =.........................
उत्तर : (i) निष्कारण = निः + कारण
          (ii) नभांगण = नभ  + अंगण
           (iii) दुर्जन = दु: + जन
          (iv) वाङ्मय = वाक् + मय.

(३) लिंग ओळखा :
(i) पाणी
(ii) माती  
(iii) चिखल 
(iv) पीक
उत्तरे: (i) पाणी-नपुंसकलिंग (ii) माती-स्त्रीलिंग
(iii) चिखल-पुल्लिंग (iv) पीक-नपुंसकलिंग.

(४) सामान्यरूपे ओळखा :
कुणब्याच्या , भाळावरच्या , घामाचा ,  ताटातून
उत्तर:- कुणब्या , भाळा , घामा , ताटा

३. शब्दसंपत्ती :
(१) पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :
ताट
पाट
पाणी
जीवन
उत्तरे :
(1) ताट :-  (अ) ज्वारी ,,बाजरी, मका यांची वनस्पती 
             (ब) जेवणाचे ताट
(2 )  पाट:- (अ)बसायचे साधन
                 (ब)पाण्याचा प्रवाह
(3)   पाणी:- (अ)जळ
                    (ब)हात
(4) जीवन :-  (अ)आयुष्य
              (ब) पाणी

(२) समानार्थी शब्द लिहा :
नभ = 
भुई=
जोंधळा=
शिवार =
उत्तर : (i) आकाश (ii) जमीन (iii) शेत (iv) ज्वारी.

(३) गटात न बसणारा शब्द लिहा : 
(i) ज्वारी, बाजरी, माती, गहू
(ii) पाणी, जल, सोय, तोय
उत्तरे : (i) माती (ii) सोय.

(४) पुढील शब्दातील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
भालावर →
उत्तर : भाला, वर , भार , लाव . 

४. लेखननियमांनुसार लेखन :
पुढील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा :-
भूइ -
चीखल - 
दूश्काळ -
नीणर्य - 
महत्व - 
संस्कृति - 
उत्तर  : भूइ - भुई
चीखल -  चिखल
दूश्काळ - दुष्काळ
नीणर्य  - निर्णय
महत्व - महत्त्व
संस्कृति  - संस्कृती 

५. वाक्प्रचार :

अचूक अर्थ निवडा:

(i)उकल होणे:- 
आनंद होणे
कोडे सुटणे
छान वाटणे
उत्तर : कोडे सुटणे

(ii)राबणे: 
थर चढणे
कष्ट करणे
रागावणे
उत्तर : कष्ट करणे

तोंडी परीक्षा
पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) शेतीच्या अवजारांची नावे सांगा.
(२) एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही काय मदत करू शकाल? (३) 'आधुनिक शेती' याबद्दल तुम्हांस काय माहीत आहे ?

आकारिक मूल्यमापन

प्रकटवाचन 

कवितेला स्वतःची चाल लावून वर्गात सादर करा..

२. उपक्रम :
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेले जास्तीत जास्त शब्द शोधा. त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये लिहा. वर्गात वाचून दाखवा.




कविता वाचा  आणि खलील प्रश्न सोडवा.


              आळाशी
बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया
कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया
भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो.

हातापायाला चिखल बाप घामामधी ओला
पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला
बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो
दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...

येता भरात जोंधळा बाप काढणी करतो
स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो
जातो आळाशी होऊन तरी 'आळा' का तुटतो?
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो..
                          ----  हनुमंत चांदगुडे
प्रश्न 1ते11. गटात न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय रंगवा.
1)  1)आकाश 2)गगन 3) आभाळ 4)ढग
2)  1) पान्हा 2)पाझर 3)अभिषेक 4 )झिरप
3)  1)परिश्रम 2) कष्ट 3) आळाशी  4) प्रयत्न
4)  1) भुई 2) भूमी 3)जमीन 4)पृथ्वी
5)  1) बा 2)भाऊ 3)बाप 4)बाबा
6)  1) ललाट 2)चक्षु 3) भाळ 4)  कपाळ
7)  1) कुणबी 2) शेतकरी 3) किसान 4)मजूर
8)  1)माळ 2)शिवार 3) मळा 4)शेत
9)  1) पशु 2) पक्षी 3) खग 4) अंडज
10)  1) आरोळी 2) हाक 3)गोंगाट 4 ) ओरड
11)  1)तान्हा 2)बाळ 3) मूल 4) कुमार
 प्रश्न 12. जेव्हा ताटातून कणसांचा जन्म होतो,       
           तेव्हा ताटात भाकरी येते .
           ठळक शब्दांच्या अर्थाची जोडी निवडा.
       1) ज्वारी ची वनस्पती ,बाजरीची वनस्पती
       2) ज्वारीची वनस्पती , जेवणाचे ताट
       3) रुबाब, जेवणाचे ताट ,
       4) दिमाख ,ताठर भूमिका
प्रश्न13)  योग्य जोड्या  लावण्यासाठी अचूक पर्याय निवडा.
'अ'गट                               'ब' गट   पर्याय
 अ) उकल होणे.           1)  बांधलेली पेंढी सुटणे
ब) आरोळी मारणे.        2) समजणे
क) पोट भरणे.             3)मोठ्याने हाक मारणे
ड) आळा तुटणे.           4) अन्न खाणे
1 ) अ-2,ब-4, क-1,ड-3.  2)  अ-2,ब-3, क-4,ड-1.
3) अ-2,ब-3, क-1,ड-4.   4)  अ-2,ब-1, क-4,ड-3 .
 प्रश्न 14 ) घटना व परिणाम अचूक परिणाम निवडा.
           घटना                               परिणाम
अ) बाप आरोळी मारतो...         1) पाखरांचा थवा    
                                                 येतो.
ब)बाप अनवाणी चालतो ....      2) बाप हुरडा 
                                               वाटतो.
क)  शिवारात पिके येताच.......      3)  पायाचा ठसा उमटतो.
ड) दाणे कणसाला येताच......        4) तान्हा रडत उठतो.
  1)अ-4,ब-3, क-1,ड-2.    2) अ-2,ब-4, क-1,ड-3 .
  3) अ-4,ब-2, क-1,ड-3.   4) अ-3,ब-4, क-1,ड-2.
प्रश्न 15 ) कवितेत नसलेला शब्द कोणता ?
  1)  हुरडा 2) कडबा   3) ताट   4)कणीस
 प्रश्न 16 ते 19 . दिलेल्या ओळीतील अलंकार ओळखा.
                     1)  यमक 2) उपमा 3)उत्प्रेक्षा  4)  अनुप्रास
 प्रश्न 16) शकुने  श्यामच्या शेतातील शेवंती शोधली.
 प्रश्न 17)   बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो,
               भाळवरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो .
 प्रश्न 18)  हा आंबा म्हणजे जणू  मधाची बुधली.
प्रश्न 19) फुलासारखा चेहरा तुझा .
प्रश्न 20 ते 23 . समास विग्रह ओळखा, योग्य पर्याय रंगवा.
                    1) अव्ययीभाव समास      2)द्वंद्व समास                            3) तत्पुरुष समास           4) बहूवृही समास
   20) क्रीडांगण              21) भाऊबहीण
   22) नीलकंठ                23) वारंवार
प्रश्न 24 ) योग्य क्रम लावा  व अचूक पर्याय रंगवा .
          अ) बिया पेरणे.            ब) जोंधळ्याची  रोपे वर येणे.
           क) पाटातून शेतीला पाणी देणे      ड ) शेताची                         नांगरणी करणे   ई) जोंधळ्याची काढणी करणे .
             1) अ, ब,क,ई, ड.   2)  ड,ब,क,ई, अ.
              3) अ, क,ब,ई, ड.  4) ड, अ, क,ब,ई.
प्रश्न 25 ) विसंगत जोडी ओळखा .
              1) उठतो -फुटतो      2)  उकल - सखल
              3)  फाटतो-फुटतो     4) चिखल -उकल.
प्रश्न 26 ) लिंग ओळखून योग्य क्रमाचा पर्याय निवडा.
              पाणी , माती , चिखल, पीक.
             अ) पुल्लिंगी,  ब) स्त्रीलिंगी , क)  नपुसकलिंगी
       1)  क,क, अ, ब.   2) क,अ, ब,क.
       3)  क, क, ब,अ.   4)क,ब,अ, क.
प्रश्न 27 ) अशुद्ध शब्द ओळखा.
       1) भुई  2)चिखल 3)महत्त्व 4) नीर्णय
प्रश्न 28) 'उकल होणे' या वाकप्रचाराचा अचूक अर्थ निवडा.
            1) चिखल होणे.   2) बरे वाटणे.
            3) कोडे सुटणे .   4) आनंद होणे .
प्रश्न 29 ते 34.   गटात न बसणारा शब्द ओळखा.
       29 ) 1)ज्वारी   2) माती   3) बाजरी  4)गहू.
       30)  1) पाणी   2) सोय  3) जल    4)  तोय .
       31)  1)शेतकरी  2) शेती  3) पीक  4) शाळा .
       32) 1) बैल   2)गाय   3) कुत्रा      4)  शेळी
       33) 1) वाटी    2) पाटी  3)काठी    4)घर  .
       34) 1)पाट   2)  चिखल  3) ताट     4) हवेली
प्रश्न 35)  योग्य पर्याय निवडून जोड्या लावा. पर्याय निवडा .
          ' अ' गट                           'ब' गट
 अ) बापाच्या पायाला लागतो .  1) कणीस
 ब) शिवारात येतात .               2)  चिखल
 क) पान्हा फुटतो.                   3) पाखरं
 ड) ताटातून जन्म घेतो.           4) आभाळाला
     1)  अ- 2, ब-3, क-4, ड-1. 2)अ-3, ब-1,  क-2, ड -4
     3) अ -2, ब-1,क- 4, ड -3.  4) अ-4, ब- 1 क-2  ड-3
 
उत्तर सूची
1-4,2-3,3-3,4-4,5-2,6-2,7-4,8-1,9-1,10-3,11-4, 12–2,13-2,14-1 ,15-2,16-4,17-1,18-2,19- 3,20- , 21- ,22- , 23- ,24- 4,25- 2, 26-4,27-4, 28-3,29- 2,30-2,31-4,32-1,33-4,34-4,35-1.


Comments

Popular posts from this blog

HOME