८मराठी१८.जलदिंडी - डॉ. विश्वास येवले
१८.जलदिंडी
- डॉ. विश्वास येवले
जलदिंडीचे कार्य पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा ..
प्रस्तावना
डॉ. विश्वास येवले हे प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोगतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक आहेत. नावाडी', 'योगार्थु' 'उवाच', 'सूर्यनमस्कार', 'द बिग मदर', 'थोरली आई', 'मैत्री करू नदयांशी' इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 'जलदिंडी' या अभिनव मोहिमेसाठी डॉ. येवले प्रसिद्ध आहेत. टप्प्याटप्प्याने नदीतून प्रवास करीत त्यांनी सहकाऱ्यांच्या साहाय्याने नदीस्वच्छतेची मोहीम राबवली. या मोहिमेचा अनुभव त्यांनी 'जलदिंडीची गोष्ट' या पुस्तकात रसाळ भाषेत सांगितला आहे.
स्वतःच्या मुलाला व त्याच्या मित्रांना लेखकांनी नौका चालवायला शिकवायचे ठरवले. नौका चालवायला शिकवण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांचा मुलगा भयभीत झालेला त्यांनी पाहिला. त्या सात वर्षांच्या मुलाने, नदीच्या घाण पाण्याला आपण घाबरलो, हे स्पष्ट केले. मुलाच्या उद्गाराने लेखकांच्या डोळ्यांत अंजन पडले. त्यांचे लक्ष नदीकडे वळले. नदी पराकोटीची प्रदूषित झालेली त्यांना आढळून आली. आपल्या मुलांसाठी आपण केवढा भीषण वारसा मागे ठेवीत आहोत, हे त्यांना जाणवले. त्या क्षणीच त्यांनी नदी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. सोळा वर्षे अव्याहत हे कार्य ते करीत राहिले. या काळातील अनुभव "जलदिंडीची गोष्ट' या पुस्तकात आलेला आहे. त्याच पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
१. मुळा-मुठेच्या संगमपात्रात अत्यंत रमणीय, प्रसन्न वातावरण होते. लेखक आपल्या मुलाला नौकानयन शिकवू पाहत होते.
२. तो सात वर्षांचा मुलगा सुरुवातीला उत्साहात होता. नंतर भयभीत झाला. आपल्या भीतीचे कारण त्याने स्पष्ट केले. त्याला बुडण्याची भीती वाटत नव्हती. घाण पाण्यात पडण्याची त्याला भीती वाटत होती.
३. मुलाच्या उत्तराने लेखकांचे लक्ष पाण्याकडे गेले. त्यांचे डोळे खाडकन् उघडले. पाण्यात वेगवेगळ्या प्रकारची प्रचंड घाण पसरलेली होती. पाण्याला उग्र दर्प येत होता. पाण्याचे पावित्र्य या लेखकांच्या भावनेला धक्का पोहोचला. त्यांनी नदी स्वच्छ करायचे ठरवले.
४. नदी स्वच्छ करण्याचे काम अवाढव्य आहे हे लक्षात आल्यावर लेखक थोडे धास्तावले. पण कुठेतरी सुरुवात करणे आवश्यक होते. त्यांनी जलपर्णी काढण्यापासून सुरुवात करायचे ठरवले.
५. लेखकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मित्रांना गोळा केले. दिवसभर चर्चा झाली. मग प्लॅस्टिकच्या पिशव्या व कचरा काढण्याचे ठरवून टाकले. स्वतः कामात उतरल्यावर अनेक जण सामील झाले. स्वच्छतेचे काम जोमात झाले. सर्वजण घाणीबद्दलची घृणा विसरले. नदीचा तेवढा भाग स्वच्छ झालेला पाहून सगळेजण आनंदले.
६. दुसऱ्या दिवशी सगळेजण आले. नदीत पुन्हा पूर्वीइतकीच घाण, कचरा पाहून कष्टी झाले. जाणवले की नदीची स्वच्छता सुरुवातीपासूनच सांभाळायला हवी होती. पण ते झाले नाही. नदीचे पावित्र्य नष्ट झाले.
७. दुसऱ्या दिवसापासून जलपर्णी काढण्याचे काम पुन्हा सुरू झाले. कामाचे दिवस वाढले. स्वच्छतेची ही वारी आळंदीला सुरू करून पंढरपूरपर्यंत नेण्याचे ठरवले. एकेकजण जोडत गेले. नदीतून पंढरपूर या मोहिमेचे कुटुंब वाढत गेले.
८. या मोहिमेला 'जलदिंडी' हे नाव नक्की केले गेले.
२००२ साली सुरू झालेली ही दिंडी सलग सोळा वर्षे चालू राहिली.
शब्दार्थ
मुळा व मुठा - दोन नद्यांची नावे.
संगमपात्र दोन - नया एकत्र येऊन तयार झालेले पात्र. हुळहुळणे - अत्यंत हलक्याशा, अस्पष्ट स्पर्शानेही हर्ष होणे.
सुकाणू - नौका वळवण्यासाठी वापरले जाणारे साधन. करारी - ठाम निश्चय झालेला, पक्का निर्णय झालेला. नगण्य - क्षुद्र.
बेबंद - अमर्याद .
बेसुमार- ज्याला सुमार नाही असे, अमर्याद.
पैदास - निर्मिती.
घृणा - किळस, तीव्र तिटकारा.
कचराविरहित - कचरा नसलेले
वनराई- मुद्दाम राखलेले वन. - ,
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) हातावर हात ठेवून बसणे - समोर काम असतानाही ते न करता बसून राहणे.
(२) मदतीचा हात पुढे येणे - मदत करायला तयार होणे.
कृति-स्वाध्याय व उत्तरे
कृतिपत्रिकेतील गदय पाठावरील प्रश्नांसाठी....
उतारा क्र. १
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती १ : (आकलन कृती)
(१) मुळा-मुठा संगमपात्राच्या प्रसन्न वातावरणाचे दर्शन घडवणारी वाक्ये शोधून लिहा.
उत्तर:- (i) मुळा-मुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. (ii) काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. (iii) संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं. (iv) शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली.
(२) पुढील वाक्यांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा :
(i) मुळा-मुठेचे संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडाले.
उत्तर:- डोहात पाणी भरते, तेव्हा ते डोहाच्या सर्व सांदीकोपऱ्यांत शिरते. डोहाचा बिंदूएवढाही भाग रिकामा राहत नाही. त्याप्रमाणेच मुळा-मुठेचे संगमपात्र पूर्णपणे आनंदमय झालेले होते.
(ii) उन्हें डोक्यावर स्थिर झालेली होती.
उत्तर:- सकाळी ऊन कोवळे असते. ते हळूहळू कडक होत जाते. म्हणजे सकाळच्या वेळी तापमान हळू हळू बदलत जाते. सकाळ संपली की ते तापमान स्थिर राहते. सकाळ संपली आणि आता दुपार सुरू झाली आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे.
(iii) संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंव हलत, झुलत राहणारं.
उत्तर:-नदीच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते. पाणी सतत हलत असल्यामुळे प्रतिबिंबसुद्धा हलताना दिसते. लेखकांना ते आनंदाने झुलत आहे, असे वाटते. पाण्यावरून सूर्यकिरण परावर्तित होतात. हे परावर्तित किरण सतत हलत असल्याने ते किरण सतत चमचमत राहतात. त्यामुळे ते आनंदाने डुलत आहेत, नाचत आहेत, असे भासत राहते.
(iv) शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली.
उत्तर:-अलगद, हलक्याशा स्पशनिही गुदगुल्या व्हाव्यात आणि सर्व अंगातून हसू खळखळत बाहेर पडावे, अशी अवस्था म्हणजे हुळहुळणे. त्या परिसरातील ● वातावरणाने त्या नावेलाही खूप आनंद झाला आहे, असे लेखकांना वाटते.
(३) मुलाला नौकेत बसवल्यापासून ते नौका पुन्हा किनाऱ्याला लागेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.
उत्तर:-
(i) मुलगा उत्साहाने शिडाचा दोर धरून बसला होता.
(ii) नौका वेगाने धावू लागली, हेलकावू लागली..
(iii) मुलगा भयभीत होऊन नाव काठाला घेण्याची विनवणी करू लागला.
(iv) लेखकांनी धीर दिला व नौका चालूच ठेवली, तेव्हा मुलगा गयावया करीत विनवू लागला.
(v) लेखकांनी मुलाला भित्रट म्हणत नौका काठाला लावली.
(४) मुलाच्या उत्तराने लेखकांच्या मनावर झालेला परिणाम लिहा.
उत्तर:- स्वतःच्या मनातल्या उत्साहामुळे, आनंदामुळे लेखकांचे लक्ष वर म्हणजे झाडांकडे, आकाशाकडे होते. मुलाच्या उत्तराने ते भानावर आले. मुलाच्या उत्तरामुळे त्यांची नजर पाण्याकडे वळली आणि पाण्यातल्या सर्व प्रकारच्या घाणीकडे त्यांचे लक्ष गेले.
(५) पुढील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.
(i) परिणाम - लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला.
घटना / कृती :- लेखकांनी मुलाला भित्रट म्हटले.
(ii) परिणाम :- नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं.
घटना / कृती :- पाण्यावर सर्व प्रकारची घाण पसरली होती आणि ती घाण कुजून पाण्यावर एक प्रकारची काळी साय पसरली होती.
कृती २ : (आकलन कृती)
(१) पुढील उत्तरे पूर्ण करा:
(1)पाण्यातील प्रदूषित घटक :-
(i) प्लास्टिकच्या पिशव्या
(ii) एक नकोसा उग्र दर्प
(iii) अमर्याद वाढलेली जलपर्णी
(iv) घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरची माती
(2)पाण्याचा घाणेरडेपणा व्यक्त करणारे घटक:-
अ) काठाजवळच्या पाण्यावर पसरलेली काळी साय
ब) उकळी आल्यासारखा बुडबुड्यांसहित बाहेर येऊन पाण्यावर पसरणारा तळाचा गाळ
क) धगधगत्या शहरामुळे व लोकांच्या निष्काळजीपणामुळे काळवंडलेले नदीचे सौंदर्य व पावित्र्य
(3)नदी स्वच्छ करण्याचा सर्वात प्रथम सुचलेला मार्ग:-
अ) नदीचे सौंदर्य कधीकाळी अनुभवलेले साथी एकत्र करावेत.
ब) सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचे काम करावे.
(२) ओघतक्ता तयार करा.
(i) सफाईकामाला सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
(ii) समविचारी मंडळी एकत्र आली.
(iii) प्रत्येकाने चर्चेत भाग घेऊन सूचना केल्या.
(iv)प्लास्टिकच्या पिशव्या व अडकलेला कचरा काढायचा ठरवले.
(३) लेखकांच्या पिढीने स्वतःच्या मुलांसाठी मागे ठेवलेला वारसा सांगा .
उत्तर:- जे पाणी पूर्वी प्यायले जात होते, त्या पाण्याला करंगळीनेही स्पर्श करावासा वाटणार नाही, इतके ते प्रदूषित झाले होते. पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास झाला होता. हा वारसा लेखकांच्या पिढीने स्वतःच्या मुलांसाठी मागे ठेवला होता.
कृती ३ : (व्याकरण कृती)
(१) कंसांतील सूचनांनुसार उत्तरे लिहा :
(i) तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. (भविष्यकाळ करा.)
(ii) मी तशीच नौका चालवत ठेवली. (वर्तमानकाळ करा.)
(iii) मी भीत आहे तो या घाण पाण्यात पडायला. (भूतकाळ करा.)
उत्तर:- (i) तो पहिल्यांदाच नौकेत बसत असेल.
(ii) मी तशीच नौका चालवत ठेवतो.
(iii) मी भीत होतो, ते या घाण पाण्यात पडायला.
(२) कंसांतील सूचनांनुसार उत्तरे लिहा :
(i) जशी नाव वेगाने पावू लागली, तशी ती जोराने
हेलकावू लागली. (जशी - तशी हे शब्द वगळून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.)
(i) नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र
आणावेत. (मिश्र वाक्य तयार करा.)
उत्तर:-
(i) नाव वेगाने धावू लागताच ती जोराने हेलकावू लागली.
(ii) ज्यांनी कधी काळी नदीचे सौंदर्य अनुभवले आहे,
त्या साथींना एकत्र आणावे.
(३) पुढील शब्दांमधील भाववाचकनामे शोधून लिहा :
आनंद, वारा, नदी, सौंदर्य, नौका, प्रतिबिंव, सूर्य, काळजी, पावित्र्य, निष्काळजीपणा, धरण, चेहेरा.
उत्तर:- भाववाचकनामे: आनंद, सौंदर्य, काळजी, पावित्र्य, निष्काळजीपणा
कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)
• (१) नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत
असलेल्या मानवी कृती लिहा.
उत्तर : नदीचे पाणी प्रदूषित होण्यास माणूस फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. तो बेजबाबदारपणे व बेफिकिरीने, वागतो. माणसे नदीत अंघोळ करतात. तिथेच कपडे-भांडी धुतात. गुरांना तिथेच घुतात. शिवाय, नदीतच केरकचरा टाकतात. मलमूत्र विसर्जन करतात. वापरून झालेल्या सर्व टाकाऊ वस्तू नदीत टाकतात. लहान-मोठे उद्योग करणारे लोक आपल्या उद्योगांतले सांडपाणी नदीत सोडून देतात. रासायनिक कारखाने रसायनयुक्त सांडपाणी तसेच नदीत सोडतात. खरे पाहता, हे पाणी शुद्ध करून नदीत सोडले पाहिजे. पण तसे कोणीही करीत नाही. देवपूजेचे निर्माल्य, मृत माणसांच्या अस्थी नदीत सोडल्या तर पुण्य मिळते, या कल्पनेने या गोष्टीसुद्धा नदीतच सोडल्या जातात. या सर्व कृतींमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. •
(२) पोहायला येत असूनही लेखकांच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा.
उत्तर: मोठ्या हौसेने लेखकांनी आपल्या मुलाला नौका
शिकवायला नेले. हा अत्यंत आगळावेगळा उपक्रम होता. लेखकांना त्याचा आनंद वाटत होता. त्यांचा मुलगाही खुशीत होता. त्याला उत्साह वाटत होता. मात्र, होडी चालू झाली वेग वाढला तेव्हा ती हेलकावू लागली. होडी उलटी होऊन आपण पाण्यात पडू की काय, असे त्या मुलाला वाटू लागले. या क्षणी तो मुलगा घाबरला. लेखकांना वाटले की बुडण्याला घाबरत होता. खरे तर मुलगा पट्टीचा पोहणारा होता. खडकवासला धरणातही पोहण्याचा त्याला आत्मविश्वास होता. मात्र या नदीचे पाणी प्रचंड घाण झालेले होते. येथे नाना तऱ्हेचा केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र, टाकाऊ वस्तू जमा झालेल्या होत्या. अशा पाण्यात कोणालाही -उतरण्याची शिसारीच आली असती. किळस आली असती, तीच त्या मुलाला वाटली. त्या घाण पाण्याचा त्याला स्पर्शसुद्धा नको होता. म्हणून तो पाण्यात पडायला घाबरत होता.
उतारा क्र. २
प्रश्न पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
उतारा क्र. २ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८२ व ८३)
( ' मनात काहीतरी केलं पाहिजे' ...................१६ वर्षे चालू राहिली.)
कृती ९ : (आकलन कृती)
(१) पुढील परिणाम घडवून आणणाऱ्या घटना लिहा :
परिणाम
(i) जे काम तोंडी समजावून सांगून आठ-दहा दिवसांत हलले नव्हते, ते काम आठ दहा मिनिटांत पार पडले.
(ii) इतर लोक आपली घृणा विसरले.
उत्तर :- घटना
(i) लेखक स्वतः त्या घाण पाण्यात उतरून शेजारच्या झाडीत अडकलेले प्लास्टिक काढू लागले.
(ii) डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सगळ्यांनी बाहेर काढला.
(२) 'काहीतरी केले पाहिजे' यातील 'काहीतरी' म्हणजे काय, ते स्पष्ट करा.
उत्तर:- ' काहीतरी' म्हणजेच नदीला स्वच्छ करू शकणारी कृती. मात्र ही कृती कोणती हे लेखकांच्या मनात पक्के होत नव्हते. काय करायचे हे निश्चित होत नव्हते. म्हणू 'काहीतरी' हा शब्द वापरला आहे.
(३) लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा :
उत्तर :-
ओघतक्ता
(i) नदीकाठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे.
(ii) सांडपाणी शुद्ध होऊन मिळालेले पाणी व खत झाडाझुडपांना देणे.
(iii) नदीकाठची सर्व झाडेझुडपे फोफावणे.
(iv)नदीपात्रातून येत शहरात शुद्ध हवा पसरणे.
(१) (i) आईने लेखकाला दिलेला सल्ला कोणता ?
उत्तर : हातावर हात ठेवून बसण्याऐवजी व दुसऱ्यांच्या हातांनी काम करवून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापरावेत.
((ii) दुसऱ्या दिवशी रात्री अंथरुणात पडल्या पडल्या लेखकांच्या मनात आलेला विचार लिहा .
वाडी→ गांव → पेठ →नगर → महानगर असा विकास होत असताना नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखून ठेवायला हवा होता. सांडपाणी शुद्ध होऊन ते पाणी व निर्माण झालेले खत नदीकाठच्या झाडांना मिळाले असते. वनराई वाढली असती. नदीपात्रातून येणारी शुद्ध हवा शहराला मिळाली असती.
(२) (i)जलपर्णी
(ii) नदीचा काठ
(iii) नदीचा स्वच्छ झालेला भाग
(iv) इंद्रायणी व भीमा
पाणी प्रदूषित करणारे घटक कोणते ते लिहा.
मैलापाणी ,
रसायने
जलपर्णी
गाडीच्या चाकापणूसन ते चपलांपर्यंत तरंगत, बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू
कृती ३ : (व्याकरण कृती)
(१) गटात न बसणारे शब्द शोधून लिहा :
(i) करणे, जाणे, अंथरुणे, पसरणे,
(ii)कपट, दुप्पट, तिप्पट, चौपट.
(iii) झाड, पाड, माड, बाड.
उत्तर:- (i) अंथरुणे (ii) कपट (iii) पाड.
(२) पुढील वाक्यातील नामांचे व सर्वनामाचे अनेकवचन करून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला.
उत्तर:- लहानग्यांचे चेहरे करारी दिसू लागले.
(ii) मुलाच्या उत्तराने नदीकडे माझी नजर वळली.
उत्तर:-मुलांच्या उत्तरांनी नद्यांकडे आमच्या नजरा वळल्या.
(३) 'निर्मूलन' यासारखे निः = 'निर्' उपसर्ग असले चार अन्य शब्द लिहा.
उत्तर:- (i) निर्मळ (ii) निर्जल (iii) निर्वात (iv) निबंध,
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
(१) 'जलदिंडी मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल, ते लिहा.
उत्तर : जलदिंडीत सहभागी झाल्यास मी कोणतीही कामे आनंदाने करीन. त्यांतही मी प्रथम पोहायला शिकेन पाण्यात कोणतेही काम करणाऱ्याला पोहता यायलाच हवे. त्याचबरोबर बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या युक्त्या मी शिकून घेईन. त्यानंतर मी होडी चालवायला शिकेन. जलदिंडीमध्ये वस्तूंची व माणसांची वाहतूक करण्यासाठी होडी चालवता येणे आवश्यक आहे. यामुळे जलदिंडीतील बरीचशी कामे मला करता येतील. तसेच मी साफसफाईचे कोणतेही काम अत्यंत आवडीने करीन, हे मी मनापासून सांगत आहे. केवळ तोंडदेखले बोलत नाही. जलदिंडीमध्ये नको नको त्या घाण वस्तू उचलण्याची वेळ येते. मी न कंटाळता या वस्तू उचलीन, कोणीही न सांगता मी आणखीही एक काम करीन, जलदिंडी चालू असताना मी नदीकाठी वेगवेगळी झाडे लावण्याचे काम करीन, अशा प्रकारे जलदिंडीत मी सर्व कामे आनंदाने करीन.
(२) स्वतःचे हात वापर की कचरा काढायला या लेखकांच्या आईच्या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.
उत्तर :- दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत. आम्हांला शाळेत उपक्रम पार पाडताना अनेक कामे सांगितली जातात. बहुतेक जण कामे टाळतात. हॉलमध्ये एखादा कार्यक्रम असला तर सतरंजी पसरणे, खुर्च्या लावणे, टेबल-खुर्च्या पुसणे वगैरे कामे लागतात. सर अनेकांना बोलावून ही कामे वाटून देतात. पण कामवाटून दिल्यावर बरेच जण कामे टाळतात. काहीजण कशीबशी पार पाडतात. आमचे गडदे सर ,महानोर सर मात्र कोणाला सांगत नाहीत. तेच सतरंजीचे एक टोक उचलतात पसरायला सुरुवात करतात. टेबल स्वतः धरतात . सुरपेटी स्वतः पुसतात. मग काय सर्व मुले धावतात. मग ते चार-पाच मुलांना सतरंजी पसरण्याचे काम वाटून देतात. टेबल-खुर्ची पुसायची असेल तर झटकणी स्वतः घेतात आणि सुरुवात करतात. अशा प्रकारे महानोर सर न बोलता काम करून घेतात. म्हणूनच लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पटतो, आवडतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो, हेच खरे.
व्याकरण व भाषाभ्यास
1. अलंकार :
• खलील वाक्यातील उपमान, साधर्म्यसूचक शब्द आणि अलंकार ओळखा :
(i) मना चंदनाचे परी त्वां झिजावे.
(ii) शेतकरी जणू सुगीचे स्वप्न पाहतो.
(ii) तू याचकाते जलदासमान
(iv) झाडांनी जणु मुकुट घातले डोईस सोनेरी,
उत्तर :
(i) उपमेय:- मन ; उपमान :- चंदन
साधर्म्यसूचक शब्द :- परी: अलंकार :- उपमा
(ii) उपमेय:-शेतकरी ; उपमान :- सुगी
साधर्म्यसूचक शब्द :- जणू ; अलंकार :- उत्प्रेक्षा
(iii) उपमेय:- तू उपमान :- जलद (ढग)
साधर्म्यसूचक शब्द :- समान अलंकार :- उपमा
(iv) उपमेय:- झाडे उपमान :- मुकुट साधर्म्यसूचक शब्द :- जणु; अलंकार :- उत्प्रेक्षा
व्याकरण
(१) संधीविग्रह वरून संधी/ संधीशब्द लिहा :
संधिविग्रह
(1) कर + ऊन = .......................
(2) तेज: + निधी =.......................
(3)भाः + कर =.......................
(4) सत् + आचार =.......................
(5)षट् + मास = .......................
(6) रूप + अंतर =.......................
(7) झाले+असे = .......................
(8) गण + ईश =.......................
उत्तर:-
(1) करून
(2)तेजोनिधी
(3) भास्कर
(4) सदाचार
(5) षण्मास
(6)रूपांतर
(7) झालेसे
(8) गणेश
(२) पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
(i) भाजीपाला ----.......................
(ii) सुखदुःख ----.......................
(iii) स्त्री-पुरुष ----.......................
(iv) केरकचरा ----.......................
उत्तर : (i) भाजी, पाला वगैरे
(ii) सुख आणि / किंवा दुःख
(iii) स्त्री आणि पुरुष
(iv) केर, कचरा वगैरे.
(३) पुढील वाक्यांतील सामासिक शब्द शोधून विग्रह करा :
(i) चंद्र, तारे अनंत आकाशात उगवतात.
(ii) शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले.
(iii) लंबोदराला मोदक आवडतात.
(iv) दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे.
उत्तर :
सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह पुढीलप्रमाणे:
(i) अनंत - नाही अंत ज्याला तो.
(ii) चौकोन - चार आहेत कोन त्याला तो .
(चार कोनांचा समूह)
(iii) लंबोदर -लंब आहे उदर ज्याचे असा तो.
(iv) निर्धन - निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो.
*(४) पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
(i) नीरस -----.......................
(ii) दशमुख ----.......................
(iii) निर्बल ----.......................
(iv) मूषकवाहन ----.......................
उत्तर : (i) नाही ज्यात उरला रस ते
(ii) दहा मुखे आहेत ज्याला असा तो
(iii) निघून गेले आहे बळ ज्यातून तो
(iv) मूषक ज्याचे वाहन आहे असा तो.
●(५) पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा :
सामासिक शब्द (i) चहापाणी (ii) क्षणोक्षणी (iii) त्रिभुवन
(iv) गजानन
उत्तर :
(i) सामासिक शब्द :- चहापाणी
विग्रह :- चहा, पाणी वगैरे
समास :- द्वंद्व
(ii) सामासिक शब्द :- क्षणोक्षणी
विग्रह :- प्रत्येक क्षणाला
समास :- अव्ययीभाव
(iii) सामासिक शब्द:-त्रिभुवन
विग्रह:-तीन भुवनांचा समूह
समास:-तत्पुरुष (द्विगू)
(iv) सामासिक शब्द:-गजानन
विग्रह:-ज्याचे आनन (तोंड) गजासारखे (हत्ती) आहे असा तो
समास:-बहुव्रीही
(६) पुढील वाक्यातील काळ ओळखा :
(i) जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल.
(ii) मदतीचा हात लगेच पुढे आला.
(iii) त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते.
(iv) पंढरपूरला लोक चालत जातात.
उत्तर: (i) भविष्यकाळ (ii) भूतकाळ (iii) भूतकाळ (iv) वर्तमानकाळ.
(७) पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(i) पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का?
(ii) पण एवढं मोठं कार्य !
(iii) त्यांना थकवा जाणवत नव्हता.
(iv) कचरा काढायला स्वतःचेच हात वापर
उत्तर : (i) प्रश्नार्थी वाक्य (ii) उद्गारार्थी वाक्य
(iii) विधानार्थी वाक्य (iv) आज्ञार्थी वाक्य.
३. शब्दसंपत्ती :
(१) विरुद्धार्थी शब्द लिहा :
मित्र x ....................... ऊन X .......................
काळे x....................... अमर्याद × .......................
आरोग्य x....................... यशस्वी x.......................
उत्तर
मित्र X शत्रू
ऊन X सावली
अमर्याद X मर्यादित
काळे X पांढरे
आरोग्य X अनारोग्य
यशस्वी X अयशस्वी
(२) विशेषणे-विशेष्य यांच्या जोड्या लावा :
विशेषणे (1) रडका (ii) उग्र (iii) काळी (iv) दोवळ,
विशेष्य (1) साय (ii) रचना (iii) दर्प (iv) आवाज,
उत्तर (1) रडका - आवाज (ii) उग्र - दर्प (iii) काळी- साय (iv) ढोबळ - रचना.
(३) जोडशब्द पूर्ण करा :
(i).......गाठी (ii) खत.... (iii) आपो .......(iv) ..सामग्री
उत्तरे (1) भेटीगाठी (ii) खतपाणी
(iii) आपोआप (iv) साधनसामग्री.
(४) जसे धीर धैर्य तसे
सुंदर गंभीर
उत्तरे : (i) सौंदर्य (ii) गांभीर्य,
(५) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
(i) वातावरणात (ii) हातावर
उत्तरे : (i) वार , तार , वर , वात
(ii) ताव , तार , वर , हार
४. लेखननियमांनुसार लेखन :
(१) अचूक शब्द निवडा:
(i) प्रतिबिंब / प्रतिबींब / प्रतीबिंब/प्रतीबींब.
(ii) किंचित / किंचीत/कींचीत / कींचित,
(iii) सांस्कृतीक/सांस्कृतिक/ संस्कृतिक / संस्कृतीक.
(iv) तिर्थरूप / तीर्थरूप/तिर्थरुप / तीर्थरुप..
(v) सर्वागीण / सर्वांगिण / सर्वांगीण / सार्वागीण.
उत्तरे:- (1) प्रतिबिंब (ii) किंचित (iii) सांस्कृतिक
(iv) तीर्थरूप (v) सर्वांगीण.
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i) दूसऱ्या दीवशी जलपर्नि काढण्याचे काम पून्हा सूरु झाले.
(ii) नदिचे प्रदुशण अणेक परकारचे होते.
उतरे (1) दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचे काम पुन्हा सुरू झाले.
(ii) नदीचे प्रदूषण अनेक प्रकारचे होते. :
विरामचिन्हे
● पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे योजून पुन्हा लिहा :
(i) नदीतून पंढरपूर प्रवाशांचं एक कुटुंब तयार झालं
(ii) पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी
उत्तरे : (i) 'नदीतून पंढरपूर' प्रवाशांचं एक कुटुंबतयार झालं.
(ii) पण एवढं मोठं कार्य ! कशी सुरुवात करावी ?
वाक्प्रचार
• योग्य अर्थ निवडा:
(i) काळवंडणे -
पर्याय :- (अ) झाकोळून जाणे (आ) काळे पडणे (इ) नजर वळणे.
(ii) -हास होणे -
(अ) भास होणे (आ) ध्यास घेणे (इ) शेवट होणे.
(iii) हातावर हात धरून बसणे -
(अ) गप्प बसणे (आ) गप्पा मारणे (इ) सहकार्य करणे.
(iv) पैदास होणे -
(अ) लागवड करणे (आ) निर्मिती होणे (इ) पैसे मागणे.
उत्तरे :- (i) काळे पडणे (ii) शेवट होणे
(iii) गप्प बसणे (iv) निर्मिती होणे.
तोंडी परीक्षा
प्रश्न:- पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) मुलाला नौका चालवायला शिकवण्याची कल्पना लेखकांनी बोलून दाखवली, तेव्हा त्या मुलाला काय वाटले असेल ?
(२) लेखकांनी जलदिंडीची मोहीम राबवल्यावर त्यांचे
आईवडील, पत्नी, मुले यांना काय वाटले असेल, याची कल्पना करून त्या भावना वर्गात सांगा.
आकारिक मूल्यमापन
०१. गटचर्चा :
(१) वर्गातील मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून 'वापरा आणि फेका' या संस्कृतीत मोडणाऱ्या वस्तूंची यादी करा. प्रदूषण टाळण्यासाठी या वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी, याबद्दल तुमचे मत वर्गात सांगा.
(२) प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयामागील कारणांची चर्चा करा. या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वी व्हावी, म्हणून तुम्ही काय कराल ते वर्गात सांगा.
०२. उपक्रम :
नदी/तलाव/विहीर/ओढा यांपैकी उपलब्ध जलस्रोतांची
पाहणी करा. पाणीप्रदूषण व त्याची कारणे, जलचरांवरील परिणाम आणि पाणी वापराबाबत लोकांच्या सवयी यांबाबत माहिती लिहा.
Comments
Post a Comment