८वी मराठी ,गे माय भू कविता
गे मायभू ........( सुरेश भट)
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला.
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी.
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला.
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी.
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!
प्रश्न : कविता वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे नोंदवा.
प्रश्न 1) व 2) शब्द आणि अर्थ यांच्या अचूक जोड्या लावा,
1) अ गट ब गट पर्याय
अ) मातृभू 1) लहानमूल 1) अ-2 ,ब -4, क-3, ड -1
ब) तान्हा 2) प्रार्थना 2) अ -3, ब-4, क-1, ड -2
क) पान्हा 3) मातृभूमी 3) अ-4, ब -2,क-1, ड -3.
ड) आरती 4 ) आईचे दूध 4) अ-3, ब-1, क-4, ड -2
2) अ गट ब गट पर्याय
अ) व्यथा 1) नशीब 1) अ-3, ब -2,क-1, ड -4.
ब) पायधूळ 2) भाषा 2) अ-4, ब -2,क-1, ड -3.
क) ललाटरेषा 3)वेदना 3) अ-3, ब -4,क-1, ड -2.
ड ) वाणी 4) चरणस्पर्श 4) अ-4, ब -1,क-2, ड -3
प्रश्न 3 ते 6. खाली वाक्यप्रचारांचे पर्यायी अर्थ दिलेले आहेत, वाक्प्रचार व त्याचे अर्थ योग्य येण्यासाठी बरोबर पर्याय निवडा.
प्रश्न 3ते 6 साठी पर्याय :
1)उपकार फेडणे 2 ) वंदन करणे
3) दुःख मांडणे 4) धन्य होणे
3) जन्माला अर्थ येणे .
4) पायधूळ घेणे.
5) पांग फेडणे.
6) व्यथा सांगणे .
7) या प्रश्नासाठी दोन पर्याय बरोबर नोंदवा .
कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो?
1) आईचे 2) मुलाचे 3) मातृभूमीचे 4) देशाचे
8) मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती ?
1) तारे 2) सूर्य 3) चंद्र 4) 1, 2 व 3 बरोबर
9 ) कवीच्या जन्माला कशामुळे अर्थ प्राप्त झाला?
1) तारे 2) मातृभूमी 3)चंद्र 4)सूर्य
10) कवी चंद्र,सूर्य आणणार आहेत ?
1) आरती करायची आहे. 2) उजेड हवा आहे.
3) महान देवतेची आरती सामान्य साधने वापरत नाहीत .
4) अंधार झालेला आहे .
11) कवी कवितेत आई कोणाला म्हणतात ?
1) आईला 2) कवितेला 3) शब्दाला 4) देशाला
12 ) कवी अजून कोणापुढे तान्हा आहे ?
1) आई 2) कविता 3) मातृभूमी 4) 1,2 व 3 बरोबर
प्रश्न 13 ते17 कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून बरोबर पर्याय निवडा.
13) 1) जराशी- काशी 2) वाणी -पाणी
3) कशाला -उशाला 4) तारे -वारे
14 ) 1) तान्हा - कान्हा 2) आला - गेला
3) सारे - तारे 4) गाणी -पाणी
15 ) 1) व्यथा -कथा 2) देश -वेष
3) सोड-गोड 4) तान्हा -पान्हा
16 ) 1) जीवन -पाणी 2) आरती-भरती
3) कशाला - आला 4) काशी -जाशी
17 ) 1) कशाला -उशाला 2) तान्हा - कान्हा
3)आला - गेला 4) गाणी -वाणी
प्रश्न 18 ते 21 साठी खाली सामायिक पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडून वर्तुळ रंगवा.
1) वाणी 2) पायधूळ 3) आरती 4) व्यथा
18) चंद्र, सूर्य, तारे यासाठी आणायचे आहेत .
19 ) आई पुढे ही मांडायची नाही.
20) कवी भाळावर ही लावणार आहे.
21 ) कवींची दुधाने भिजून जाणार आहे .
प्रश्न 22 ते 25 पुढील पर्यायांपैकी खाली दिलेल्या ओळींतील अलंकार ओळखा आणि अचूक पर्याय निवडा.
1) अनुप्रास अलंकार 2) उत्प्रेक्षा अलंकार
3) यमक अलंकार 4) उपमा अंलंकार
22) आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा -
23) अवखळ पोरी समान आज सकाळ .
24) सहदेव च्या सहचारिणीचे सुगीचे स्वन साकारले.
25) चंद्र नभीचा मज भासे तुझा चेहरा
१९. गे मायभू
-सुरेश भट
कवितेची मध्यवर्ती कल्पना
ज्या भूमीवर आपण जन्म घेतो, ती मातृभूमी आपल्याला प्रिय असते. भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे. तिचे ऋण आपल्यावर आहे. मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आई आहे. मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ, त्यासाठी आपण काय काय करायला हवे हा कवींचा हृदयभाव या कवितेत व्यक्त झाला आहे. तसेच कवींच्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दांत व्यक्त झाला आहे.
शब्दार्थ
मातृभू - मातृभूमी ,भारत देश .
आरती - प्रार्थना.
तान्हा - लहान मूल.
पान्हा - दूध (आईचे).
व्यथा - वेदना.
पायधूळ - चरणस्पर्श, पदस्पर्श.
ललाट रेषा- नशीब, भाग्य.
ललाट रेषा-नशिबाच्या रेषा
वाणी - भाषा.
टीप
प्रयाग काशी - काशी म्हणजे वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला प्रयागक्षेत्र म्हणतात.
वाक्प्रचार व त्याचे अर्थ
(१) पांग फेडणे - उपकार फेडणे, उतराई होणे.
(२) जन्माला अर्थ येणे - जन्म सार्थकी लागणे, जीवन धन्य होणे.
(३) पायधूळ घेणे - वंदन करणे, चरणस्पर्श करणे.
कवितेचा भावार्थ
मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात -
●(1) हे मातृभूमी, मी तुझे सारे उपकार फेडीन आणि आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य, चंद्र व सारे तारे पृथ्वीवर आणीन, हे भारत देशा, तुझी तेजोआरती मी गाईन.
(2 ) हे मातृभूमी, तू माझी माउली आहेस. तुझ्या अंगावर खेळणारे अजूनही मी तान्हे लेकरू आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पान्हा हळूच सोड. तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू देत.
(3) हे माते , तुझ्यापुढे मी माझी वेदना मांडणार नाही. तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले.
(4 ) मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो. तुझी जराशी पायधूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो. तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र प्रयागक्षेत्र होते. माझी भाग्यरेषा पावन होते.
(5) हे मातृभूमी, हे माझे आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा, माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे. माझे शब्द तुझ्या दुधाने न्हाऊन निघाले आहेत.
कृति-स्वाध्याय व उत्तरे
प्रश्न. 'गे मायभू' या कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती ९ : (आकलन कृती)
(१) मातृभूमीच्या आरतीला कवी कोणत्या गोष्टी आणणार आहे?
उत्तर:- सूर्य , चंद्र , तारे.
(२) एका वाक्यात उत्तरे लिहा
(i) कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो ?
उत्तर :- कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो.
(ii) मातृभूमीची आरती करण्याची कवींची साधने कोणती?
उत्तर :- सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत.
(iii) कवीच्या जन्माला कशामुळे अर्थ प्राप्त झाला?.
उत्तर :-मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला.
(३) पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा :
(i) आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे....
उत्तर :-मातृभूमी हे कवींचे देवत आहे. या अतिमहान देवतेची आरती सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते; म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र व तारे आणणार आहेत.
(ii) आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा.....
उत्तर :-कवी मातृभूमीला 'माउली' संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यापुढे मी तुझे तान्हे लेकरू आहे.
(४) हे केव्हा घडते ते लिहा :
(I) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते.
उत्तर :-जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात, • तेव्हा कवींची ललाटरेषा प्रयाग काशी बनते.
(ii) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो.
उत्तर :-जेव्हा कवींची वाणी (भाषा) मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते, तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात.
कृती २ : (आकलन कृती)
(१) पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा
(1) माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव.
उत्तर :-शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
(2) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणी गाईन,
उत्तर :-आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी.
(२) कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उत्तर :- (i) पांग फेडणे
वाक्य:- ज्या आईवडिलांनी आपले पालनपोषण केले, त्यांचे पांग फेडायलाच हवेत.
(ii) पायधूळ घेणे
वाक्य :-परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी.
(३) कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा.
उत्तर :-सारे- तारे , तान्हा - पान्हा , कशाला - आला, जराशी - काशी , गाणी - वाणी .
(४) काय ते लिहा :
(i) उपकार फेडायचे आहेत ती
(ii) चंद्र, सूर्य, तारे यासाठी आणायचे ते
(iii) आईपुढे ही मांडायची नाही.
(iv) कवी भाळावर ही लावणार आहे
(v) कवींची दुधाने भिजून जाणारी
उत्तर :- (i) मातृभूमी
(ii) मातृभूमीच्या आरतीसाठी
(iii)व्यथा
(iv) पायधूळ
(v) वाणी
कृती ३ : (स्वमत / काव्यसौंदर्य)
(१) कवीने पायधूळ कशाला म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर : ' गे मायभू' या कवितेमध्ये सुरेश भट यांनी मातृभूमीची थोरवी गायली आहे. ज्या भूमीवर आपला जन्म झाला त्या भारतदेशाचे गौरवगीत गायले आहे. कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. तिचा पान्हा पिऊन आपण समृद्ध झालो आहोत. मातेमुळे माझ्या शब्दांत सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणांशी लीन होऊन, तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे कवींनी म्हटले आहे. कवींचा विनम्रभाव यातून प्रकट झाला आहे.
• (२) गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे' या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर: मातृभूमीचे गौरवगीत 'गे मायभू' या कवितेमध्ये कवी सुरेश भट यांनी गायिले आहे. मातृभूमी ही माता आहे. मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माउलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्रभावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र-सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे.
● (३) कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :- आपल्या जीवनात मातृभूमीला , आपल्या आई इतकेच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ' गे मायभू' या कवितेत कवींनी आपल्या मनात असलेला मातृभूमीविषयीचा नितांत आदर व्यक्त केला आहे. तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्य, चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पान्ह्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच माझ्या भाग्योदयाची प्रयाग-काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरवगीते गाणार आहे.
रसग्रहण
'पुढील ओळींचे रसग्रहण करा :
"आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी,
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी.'
उत्तर :
आशयसौंदर्य :-
मातृभूमीचे गौरवगीत गाताना "गे मायभू' या कवितेमध्ये कवी सुरेश भट यांनी स्वतःला मातृभूमीचे लेकरू समजून राष्ट्ररूपी आईला आर्त विनवणी करताना प्रस्तुत ओळी लिहिल्या आहेत. तुझ्यामुळेच माझे जीवन सार्थकी लागले असून तुझ्यामुळेच माझ्या शब्दांचे सामर्थ्य पोसले गेले, असे कवी म्हणतात.
काव्यसौंदर्य : मातृभूमीरूपी आईला कवी म्हणतात - तुझ्या चरणांची धूळ जेव्हा मी माझ्या कपाळाला लावतो तेव्हा माझ्या भाग्यरेषेला प्रयाग-काशीचे पावित्र्य प्राप्त होते. मी पावन होतो. माझी कविता समृद्ध होते. हे आई, तुझ्या दुधात माझी भाषा भिजू दे. तुझ्या दुधाची असीम शक्ती माझ्या शब्दांत आली आहे. त्यामुळे मी तुझी गौरवगीते रोज गाईन,
भाषावैशिष्ट्ये:-
दोन-दोन ओळींच्या बंधांत दोहयासारखी केलेली ही काव्यरचना भावपूर्ण आहे. कवींच्या शब्दकळेमधून मातृभूमीविषयीचा आदरभाव प्रत्ययकारीरीत्या व्यक्त होतो. सुयोग्य यमकांनी साधलेली लयबद्धता कवितेला गेयरूप प्राप्त करून देते. थेट काळजाला भिडणारे भाषा वैभव कवितेत ओतप्रोत भरून आहे..
व्याकरण व भाषाभ्यास
अक्षरगणवृत्त :
पुढील दोन ओळीतील शब्दरचना नीट अभ्यासा:
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
(१) वरील पदारचनेत दोन चरण (ओळी) आहेत.
(२) प्रत्येक चरणात १२ अक्षरे आहेत.
(३) यात काही अक्षरे ऱ्हस्व व काही दीर्घ आहेत. आणि ती ओळीत ठरावीक क्रमाने आली आहेत. कवितेत अशी जी विशिष्ट शब्दरचना असते तिला वृत्त किंवा छंद म्हणतात.
लघुगुरुक्रम :-
ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो, त्याला लघु अक्षर म्हणतात व ते u या चिन्हाने दाखवतात. ज्या अक्षराच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो, त्याला गुरु अक्षर म्हणतात व ते __ या चिन्हाने दाखवतात.
उदा. म ना स ज्ज ना
U __ __ U __
• लघुगुरुक्रमाला लगक्रम असेही म्हणतात.
(ल' __लघू व __ 'ग' गुरु)
वरील पदयरचनेतील दुसऱ्या ओळीचा लगक्रम पाहा
त री श्री ह री पा वि जे तो स्व भा वे
U__ __ U__ __U __ __U __ __
यती : ओळीतील शब्दांचा उच्चार करताना आपण ज्या अक्षरांवर थोडे थांबतो, त्याला यती म्हणतात.
अक्षरगणवृत्त म्हणजे काय ?
एखादे वृत्त कोणत्या प्रकारचे आहे हे ठरवताना कवितेतील प्रत्येक ओळीतील तीन अक्षरांचा एक गट पाडतात. त्या गटाला गण म्हणतात. अक्षरांचे असे गण पाडून जे वृत्त तयार होते, त्यास अक्षरगणवृत्त म्हणतात.
सुरुवातीच्या ओळीचे गण पाहूया.
मना सज्जना भक्ति पंथेचि जावे
म ना स ज्ज ना भ क्ति पं थे चि जा वे
U __ __ U __ __ U __ __ U __ __
अशा प्रकारे तीन अक्षरांच्या गटांचा एक गण होतो.
या गटांतील अक्षरांच्या लघुगुरु स्थानानुसार एकंदर आठ गण पडतात.
• अक्षरगणवृत्तातील आठ गण पुढीलप्रमाणे
आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर
मध्य म्हणजे मधले अक्षर
अंत्य म्हणजे शेवटचे अक्षर
(१) आदय लघु U__ __ य गण (यमाचा)
(२) मध्य लघू __ U __ र गण (राधिका)
(३) अंत्य लघू __U __ त गण (ताराप)
(४) सर्व लघू U U U न गण ( नमन)
(५) आद्य गुरु __ U U भ गण (भास्कर)
(६) मध्य गुरु U __ U ज गण (जनास)
(७) अंत्य गुरु U U __ स गण (समरा)
(८) सर्व गुरु __ __ __ म गण ( मानावा)
प्रत्येक गणाच्या सुरुवातीचे अक्षर हे त्या गणाचे नाव असते. अशा रितीने 'य र त न भ ज स म 'असे आठ गण आहेत.
लक्षात ठेवा :
• प्रत्येक तीन अक्षरांचे गट पाडून जर चरणात शेवटी एक अक्षर शिल्लक राहिले, तर ते गुरु (__) समजावे. जर चरणात शेवटी दोन अक्षरे शिल्लक राहिली, तरी ती गुरु (__) समजावीत.
उदा., सावली च्या टोपलीत उन्हा चे गजरे
U
या इयत्तेत आपण 'भुजंगप्रयात, वसंततिलका व मालिनी' ही तीन अक्षरगणवृत्ते शिकणार आहोत.
१. भुजंगप्रयात :
लक्षणे- हे एक अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यात चार चरण (ओळी) असतात. प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात.
गण - य य य य.
यति - ५ व्या किंवा ६ व्या अक्षरावर.
उदाहरण - मना सज्जना भक्तिपंथेचि जावे,
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनी निंदय ते सर्व सोडोनि दयावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
जनी वं दय ते स वं मा वे करावे
U __ __ U __ __ U __ __ U __ __
य य य य
[ लक्षात ठेवा : य ये चारदा रे भुजंगीप्रयाती ]
२. मालिनी :
लक्षणे :- हे एक अक्षरगणवृत्त आहे.
चरण - चार. प्रत्येक चरणात १५ अक्षरे.
गण :- न न म य य
यति - ८ व्या अक्षरावर.
उदाहरण - पखरण बघ घाली भूवरी पारिजात
परिमळ उधळी हा सोनचाफा दिशात
गवतहि सुमभूषा दाखवी आज देही
धरणि हरितवस्त्रा मालिनी साजते ही
ध र णि ह रि त व स्त्रा मा लि नी सा ज ते ही
U U U U U U __ __ __ U __ __ U__ __
[ लक्षात ठेवा : 'न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते ]
३. वसंततिलका :
लक्षणे :- हे एक अक्षरगणवृत्त आहे.
चरण :- चार. प्रत्येक चरणात १४ अक्षरे.
गण :- त भ ज ज ग ग
यति - ८ व्या अक्षरावर.
उदाहरण: आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश
फेकी रसाल तरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्बर मंजुळे का?
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?
वृ त्ती व सं त ति ल का न तु झी खु ले का
__ __ U __U U U__U U __ U __ __
त भ ज ज ग ग
[ लक्षात ठेवा : 'येती वसंततिलकी त भ ज ज ग ग]
१. वृत्त
(१) पुढील शब्दांचे गण पाडा :
पसारा काकडी मदन पाटण वैशाली अक्षर शब्द
● (२) पुढील ओळींचे गण पाडा :
(i) मना सज्जना तू कडेनेच जावे
(ii) सदा सर्वदा योग तूझा घडावा
(iii) फेकी रसाल तरुही मधुगंधपाश
(iv) मातीत ते पसरले अति रम्य पंख
(v) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
(vi) वचनि मननि त्याच्या , ध्येय हे एकटावे
२. अलंकार :
• पुढील ओळींतील अलंकार ओळखा :
• (i) आई तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा,
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा
(ii) ये अवखळ पोरीसमान आज सकाळ
(iii) सहदेवच्या सहचारिणीचे सुगीचे स्वप्न संपूर्ण साकारले.
(iv) चंद्र नभीचा मज भासे तुझा चेहरा
उत्तर:
(i) यमक अलंकार (ii) उपमा अलंकार
(iii) अनुप्रास अलंकार (iv) उत्प्रेक्षा अलंकार
३. व्याकरण :
(१) पुढील शब्दांचे मूळ शब्द ,सामान्यरूप आणि विभक्ती प्रत्यय सांगा .
(i) शब्दांत (ii) आरतीला (iii) दुधाने
उत्तर :(i) शब्दांत
मूळ शब्द -शब्द
सामान्यरूप -शब्दां
विभक्ती प्रत्यय - त
(ii) आरतीला
मूळ शब्द -आरती
सामान्यरूप - आरती
विभक्ती प्रत्यय -ला
(iii) दुधाने
मूळ शब्द- दूध
सामान्यरूप - दुधा
विभक्ती प्रत्यय -ने
(२) वचन बदला:
(i) तारे -
(ii) आरती -
(iii) गाणी -
(iv) रेष -
उत्तर:- (i ) तारे-तारा (ii) आरती-आरत्या
(iii) गाणी-गाणे (iv) रेष- रेषा.
(३) समास ओळखा :
(i) मायभूमी (ii) खरेखोटे. (iii) दशमुख
(iv) आसेतुहिमाचल
उत्तर:- (1) तत्पुरुष समास (ii) द्वंद्व समास
(iii) बहुव्रीही समास (iv) अव्ययीभाव समास
(४) संधी सोडवा :
(i) दुराचार =
(ii) वाङ्मय
(iii) महिलाश्रम =
(iv) होताहेत
उत्तर : (i) दुराचार = दु: + आचार
(ii) वाङ्मय = वाक् + मय
(iii) महिलाश्रम = महिला + आश्रम
(iv) होताहेत = होत + आहेत.
(५) लिंग ओळखा :
(i) दूध (ii) पायधूळ (iii) सूर्य (iv) वाणी
उत्तर : (i) दूध-नपुंसकलिंग (ii) पायधूळ-स्त्रीलिंग
(iii) सूर्य-पुल्लिंग (iv) वाणी-स्त्रीलिंग.
४. शब्दसंपत्ती :
(१) समानार्थी शब्द लिहा :
(i) दूध (ii) मायभू (iii) व्यथा (iv) आई
उत्तर :(i) दूध =दुग्ध (ii) मायभू = मातृभूमी
(iii) व्यथा = वेदना (iv) आई = माता.
(२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) हळू x
(ii) जेव्हा x
(iii) जन्म x
(iv) पुढे x
उत्तर: (i) हळू x जलद (ii) जेव्हा x तेव्हा
(iii) जन्म x मृत्यू (iv) पुढे x मागे.
(३) गटांत न बसणारा शब्द लिहा :
(i) तुझ्या, माझ्या, मी, आई, तू.
(ii) फेडीन, आणीन, घेईन, अजून, गाईन.
उत्तर : (i) आई (ii) अजून.
५. लेखननियमांनुसार लेखन :
पुढील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा :
उत्तर:शीरार्थाय - शिरोधार्य
भाशातज्ञ - भाषातज्ज्ञ
अभीव्यक्ति - अभिव्यक्ती
प्रसीध्द - प्रसिद्ध
आरति आरती
दूधाणे - दुधाने
तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) मातृभूमीविषयी तुमच्या भावना व्यक्त करा.
(२) तुमच्या आईविषयी आदरभाव व्यक्त करताना तुम्ही काय सांगाल ?
(३) तुम्हांला माहीत असलेल्या देशभक्तीपर गीताच्या दोन ओळी सांगा.
आकारिक मूल्यमापन
०१. गटचर्चा :
आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा.
उपक्रम .
(१) मातृभूमीचे पांग फेडण्यासाठी काम केलेल्या पाच लोकांची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
(२) स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'सागरास' ही कविता मिळवून वाचा.
Comments
Post a Comment