८मराठी १४.फुलपाखरे
१४.फुलपाखरे
- वि. पां. दांडेकर
प्रस्तावना
वि. पां. दांडेकर हे प्रसिद्ध लघुनिबंधकार होत. त्यांनी कादंबरीलेखन आणि समीक्षालेखनसुद्धा केले आहे. मात्र ते लघुनिबंधकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. 'फेरफटका', 'टेकडीवरून' असे त्यांचे अनेक लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. 'प्रतारणा', 'कुचंबणा' वगैरे कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. नाटयविषयक लेखनही त्यांनी खूप केले आहे.
जीवनाकडे आनंदी व खेळकर दृष्टीने पाहावे, असा दृष्टिकोन त्यांच्या लघुनिबंधांतून व्यक्त होत राहतो. माणसाचे जीवन सुखदुःखाने भरलेले आहे. किंबहुना सुख कमी व दुःख जास्त असते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. आनंदी, खेळकर नजरेने जीवनातील प्रसंगांकडे पाहिल्यास जीवनातील सुख आपल्या हाती लागेल. यासाठी फुलपाखरासारखी वृत्ती अंगी बाणवली पाहिजे.
महत्त्वाचे मुद्दे
●●
१. पावसाळ्याचे दिवस होते. लेखक आगगाडीने प्रवास
करीत होते. सभोवती अत्यंत रमणीय दृश्य होते. त्या वेळी लेखकांचे मन निरुत्साही होते. त्यामुळे निसर्गातील चैतन्याचा लेखकांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही.
●●
२. एका मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली. समोरच्या सुंदर दृश्याने लेखकांच्या मनाचा ताबा घेतला. नाचणारी, डोलणारी फुले आणि नाचणारी बागडणारी फुलपाखरे. लेखकांच्या मनातील निराशा नष्ट झाली. त्यांचे मन प्रफुल्लित झाले. आनंदाने भरून गेले.
●●
३. फुलांनी, फुलपाखरांनी लेखकांची वृत्ती पूर्णपणे बदलून टाकली. त्यांच्या मनात स्फूर्ती व उत्साह निर्माण केला. यामुळे लेखकांच्या मनात एक वेगळाच विचार आला. फुलांचे किंवा फुलपाखरांचे आयुष्य फक्त काही दिवसांचे असते. तरीही ती अत्यंत आनंदाने जगतात. माणसांचे जीवन त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक असते. पण आपण दुःख गिरवीत बसतो आणि जीवन दुःखी करून टाकतो..
●●
४. लेखकांना कळून चुकते की, अडचणी, संकटे, रोग हे तात्पुरते असतात. आकाशात ढग जमतात ते तात्पुरते. जमा झालेल ढग गेले की आभाळ निरभ्र होते, सूर्य झळाळू लागतो. त्याप्रमाणे संकटे अडचणी दूर गेल्या की आपले जीवन आनंदी बनते. म्हणून आपले मन स्थिर व शांत ठेवले पाहिजे. जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनावरचे मळभ काढून टाकण्यासाठी बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. मग जीवन सुखकारक, आनंदमय व रसमय बनेल.
Comments
Post a Comment