८मराठी ९ . विदयाप्रशंसा

कवी- कृष्णशास्त्री चिपळूणकर

कवितेची मध्यवर्ती कल्पना

विद्या म्हणजे ज्ञान. या कवितेत विद्येची महती सांगितली आहे. विद्येसारखा मित्र नाही. सर्व दुःखे दूर करण्याची ताकद विद्येमध्ये असते. म्हणून विद्यादेवीची सतत आराधना करावी, असा संदेश या कवितेत कवींनी गंभीर व उदात्त शब्दांत दिला आहे.

विद्याप्रशंसा विषयी आणखी काही श्लोक

न चोरहार्यं न च राजहार्यं

न भ्रातृभाज्यं न च भारकारि ।

व्यये कृते वर्धत एव नित्यं

विद्याधनं सर्वधनात् प्रधानम् ॥


नभसो भूषणं चन्द्रो

नारीणां भूषणं पतिः ।

पृथिव्या भूषणं राजा

विद्या सर्वत्र भूषणम् ॥


विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्

विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः।

विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता

विद्या सर्वसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः ॥



शब्दार्थ

विद्याप्रशंसा- ज्ञानाची स्तुती.

श्रेष्ठत्व- मोठेपण, उच्चतम गुण. 

जगामाजी - दुनियेमध्ये.

असाध्य - जे साध्य होत नाही ते, जे सहज मिळवता येत नाही ते. 

भोगुनी - अनुभव घेऊन, आस्वाद घेऊन .

उणे - वजा, कमी .

सदैव - सतत, नेहमी 

ऐसे - असे. 

धन - दौलत, संपत्ती .

अद्भुत - विलक्षण, अजब .

दुज्यात - दुसऱ्या गोष्टीत .

वसे - वसणे, राहणे, निवास करणे. 

नानाविध - विविध , अनेक.

रत्नांची - हिऱ्यांची.

कनक- सोने.

भूषणे - अलंकार. 

भुवनी - पृथ्वीवर, जगामध्ये. 

हितकर - कल्याणकारी ,मदत करणारा हात. 

सखा - मित्र. 

अनुकूळ - जी गोष्ट लाभते ती भावना.

जयाला -  ज्याला. 

परी - प्रमाणे .

समय - काळ, वेळ.

उपाय - इलाज. 

चिंतित - मनात असलेले. 

फळ - यश. 

मनोरथ - मनोकामना, इच्छा.

पुरवी - पुरवतो,  देतो.

यापरी  - याप्रमाणे. 

सकल - सर्व, सगळी.

समस्त- सर्व .

वारी-  निवारण करते. 

देवीतें- देवीला. 

सदा - सतत, नेहमी .

अनन्यभावें - मनापासून, हृदयापासून. 

भजे - पूजा करतो, उपासना करतो. 

भारी - खूप, चांगले, भलं. 

नित्य - नेहमी. 

तयाला - त्याला. 

गुरु - शिक्षक.

टीप

कल्पतरू:-  मनातील इच्छा पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) असाध्य असणे – मिळत नसणे, न लाभणे, प्राप्त न होणे.

(२) उणे नसणे - कमतरता नसणे.

(३) दुःख वारणे -  दुःख दूर करणे,   दुःख निवारण करणे.

कवितेचा अर्थ 

विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व ह्या जगामाजीं; 

न दिसे एकहि वस्तू विद्येनेंही असाध्य आहे जी.॥१॥

विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात,  या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठत्व लाभले आहे. जी विद्येमुळे प्राप्त होत नाही, अशी गोष्ट जगामध्ये नाही. विद्येमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट मिळू शकते. ॥१॥

देउनि किंवा भोगुनि उणें न होतां सदैव वाढतसे 

ऐसें एकच विद्या-धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे. ॥२॥

ज्ञान किंवा विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही वजा होत नाही, उलट ती सतत वाढतच राहते. विद्या ही अक्षय आहे. अशी ही एकच विद्यासंपत्ती आहे. तिच्यामध्ये असलेला हा अजब, विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. ॥२॥

नानाविध रत्नांची, कनकांचीं असति भूषणें फार;

परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार. ।।३।।

जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे, निरनिराळे बेसुमार असे रत्ने, हिरे, माणके, मोती व सोने यांचे अलंकार आहेत. पण विद्येसारखा शोभिवंत अलंकार एकही नाही. विद्या अलंकार एकमेव व अद्वितीय आहे. ॥३॥

या साऱ्या भुवनीं हित-कर विद्येसारखा सखा नाहीं; 

अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांही. ।।४।।

या सर्व पृथ्वीतलावर, सर्व जगात विद्येसारखा कल्याणकारी व शुभचिंतक मित्र नाही. ज्याला विद्या अनुकूल आहे, वश आहे, त्याला नेहमी कशाचीही कमतरता भासत नाही. ॥४॥

गुरुपरि उपदेश करी, संकट-समयीं उपायही सुचवी,

चिंतित फळ देउनियां कल्पतरूपरि मनोरथां पुरवी. ।।५।।

विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करते. संकटात मार्ग दाखवते. संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवते. कल्पतरू जसा तुम्ही इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमची मनोकामना पूर्ण करते. ॥५॥

यापरि सकल सुखें जी देई, दुःखें समस्त जी वारी, 

त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी ।।६।।

अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुःखे हरण करणारी ही विद्यादेवता आहे. तिची मनोभावे नेहमी उपासना करावी. अनन्यभावाने तिला शरण जावे. तिची खूप साधना करावी. ||६||

कृति-स्वाध्याय व उत्तरे 

कृतिपत्रिकेतील पद्य पाठावरील प्रश्नांसाठी...

प्रश्न. पुढील  दिलेल्या  कृती  कवितेच्या आधारे करा . 

कृती १: (आकलन कृती)

*(१) उत्तरे लिहा. 

(i) विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी :

 (1) जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते.

(2) सदैव कल्याणकारी असते.

(3) कुठलीही वस्तू प्राप्त होते.

(4) सगळी सुखे देते व दुःखे निवारण करते.

(ii) कवींच्या मते विद्येची वैशिष्ट्ये :

(1) अद्भुत गुण असलेले धन आहे.

(2) हित करणारा माणसाचा मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरू.

(२) कोणाप्रमाणे ते लिहा:- 

(i) विद्या उपदेश करते(ii) विद्या मनोरथ पुरवते

उत्तर :- (i) गुरुप्रमाणे   (ii)कल्पतरूप्रमाणे 

(३) 'विदया' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. 

 उत्तर:-  जिने माणसाला श्रेष्ठत्व लाभते,ती गोष्ट कोणती?

कृती २ (आकलन कृती)

(१) तुलना करा : धन आणि विद्या.

धन

(i) देऊन कमी होते.

(ii) भोगून सरून जाते.

(iii) सतत उणे होते.

विद्या 

(i) देऊन कमी होत नाही. 

(ii) भोगून संपत नाही.

(iii) सतत वाढत जाते.

(२) पुढील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा : नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार;

परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार.

उत्तर:-  आपण माणसे निरनिराळ्या रत्नांचे व सोन्याचे अनेक अलंकार धारण करतो. ही शरीराला सजवणारी भूषणे आहेत. हे अलंकार जीर्ण होतात किंवा तुटून जातात. पण विद्या किंवा ज्ञान हा असा शोभादायक अलंकार आहे की जो अक्षयरूपाने तुमच्या मनी वसतो.

(३) उत्तरे लिहा : 

(i) भूषणे ज्यापासून बनवतात ते-

(ii) ' हित-कर' या शब्दाचे दोन अर्थ -

(iii) अनन्यभावे भजावी अशी देवी -

उत्तरे:-  (i) रत्ने, सोने , माणिक ,मोती 

(ii) कल्याणकारी  , हित करणारा मदतीचा हात 

(iii) विद्यादेवी

कृती ३: (काव्यसौंदर्य कृती)

(१) कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर : माणसाच्या जीवनात विद्या ही उपकारक आहे, हे सांगताना कवींनी विद्येची महती कथन केली आहे. विद्येमुळे माणसाला जगात श्रेष्ठत्व मिळते. असाध्य गोष्टी प्राप्त करण्याची ताकद विद्येमध्ये आहे. सदैव उन्नत होणारे विद्या हे अजब व अनोखे धन आहे. इतर आभूषणांना विद्येची सर येऊ शकत नाही, असा विद्या हा एकमेव शोभादायक व दुर्मीळ अलंकार आहे. विदया हा माणसाचा कल्याणकारी मित्र आहे. ज्याला विद्या लाभते, त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता उरत नाही. विद्या गुरूप्रमाणे उपदेश करते, संकटाच्या वेळी उपाय सुचवते. माणसाची मनोकामना पूर्ण करणारी ती जणू कल्पतरूच आहे. विद्या सर्व दुःखे निवारण करून माणसाला अक्षय सुखी ठेवते. अशा प्रकारे नराचा नारायण करण्याची शक्ती विद्यादेवीमध्ये आहे.

(२) त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा मजा भारी, ' या ओळीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर : 'विदयाप्रशंसा' या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विद्येची थोरवी वर्णन केली आहे. विद्या ही माणसाला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी देवी आहे. सदैव सुखकारक असलेल्या विद्यादेवीची पूजा व आराधना मनोभावे करावी, नेहमी विद्यादेवीला हृदयापासून भजावे, असा उपदेश कवींनी लोकांना , जनतेला  या ओळीत केला आहे.

व्याकरण व भाषाभ्यास 

१. व्याकरण :

*(१) पुढील शब्दांचे संधिविग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४४)

संधी आणि संधीविग्रह 

 (i) शरत्काल  =  शरद् + काल

(ii) जगन्नाथ = जगत् + नाथ

(iii) तल्लीन =  तत् + लीन

(iv) संताप = सत् + ताप

(२) पुढील संधिविग्रह वरून संधी  पूर्ण करा :

संधिविग्रह आणि संधी

(i) सत् + आचार = सदाचार

(ii) सत् + मती = सन्मती

(iii) शब्द + छल =  शब्दच्छल

(iv) शरद् + चंद्र = शरत्चंद्र

(३) पुढील शब्दांतील सामान्यरूपे लिहा :

(i) विद्येने (ii) रत्नांची (iii)  मनुष्याला (iv) जगामाजी

उत्तरे : (i) विदयेने – विदये (ii) रत्नांची रत्नां (iii) मनुष्याला - मनुष्या (iv) जगामाजी - जगा

२. शब्दसंपत्ती :

 (१) पुढील शब्दांना कवितेतील शब्द शोधा:

(i) मोठेपण- (ii) नेहमी - (iii) अलंकार -(iv) मनातील इच्छा -

उत्तरे : (i) श्रेष्ठत्व  (ii) सदैव, सदा, नित्य (iii) भूषणे (iv) मनोरथ.

(२) पुढील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा :

(i) मित्र = 

(ii) सोने =

उत्तरे : (i) मित्र = सखा, मित्र, दोस्त, सवंगडी, सोबती. 

(ii) सोने = सुवर्ण, कनक, हेम, कांचन.

(३) विरुद्धार्थी शब्द लिहा :

अनुकूल x प्रतिकूल

नित्य x अनित्य

गुण x अवगुण

उणे x अधिक

साध्य  ×असाध्य

सुख ×  दुःख

श्रेष्ठत्व x कनिष्ठत्व

(४) पुढील शब्दांचे दोन भिन्न अर्थ लिहा :

(i) कर:- हात ,  सारा (टॅक्स) 

(ii) उणे :- कमतरता , वजाबाकी 

(iii) परी :- पण , पंख असलेली काल्पनिक बालिका

(iv) भुवन: - पृथ्वी, घर 

३. लेखननियमांनुसार लेखन :

'पुढील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा :

(i)अनूकुल - अनुकूल

(ii) वीदयादेवि - विद्यादेवी

(iii)अदभूत अद्भुत

(iv)काल्पतरू -कल्पतरु

(v) भुशण-  भूषण

(vi) श्रेष्टत्त्व - श्रेष्ठत्व

४. विरामचिन्हे :

★ पुढे दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा :

(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४२ वरील कृती)

(i) ( .)  (ii)  (; )  (iii)  (? )  (iv)  (!)

(v)    (  '     '  ) (vi)  (  "           "  ) 

उत्तरे:- 

(i) ( .) पूर्णविराम (ii)  (; ) अर्धविराम

(iii)  (? ) प्रश्नचिन्ह (iv)  (! ) उद्गारचिन्ह

(v)  ( '      ' )  एकेरी अवतरणचिन्ह

(vi) (  "           "  ) दुहेरी अवतरणचिन्ह

(i) ( .) पूर्णविराम - वाक्य :- मी अभ्यास करतो.

(ii)  (; ) अर्धविराम-   वाक्य:-  काळे ढग दाटले; पण पाऊस पडला नाही.

(iii)   (? )  प्रश्नचिन्ह  -वाक्य:- तुझे नाव काय? 

(iv)  (! ) उद्गारचिन्ह - वाक्य:- ओहो! किती सुंदर चित्र हे!

(v)    (  '      '   )  एकेरी अवतरण-चिन्ह

वाक्य :- कलेसाठी 'साधना' आवश्यक आहे.

(vi)   (  "          " ) दुहेरी अवतरणचिन्ह

वाक्य :- सर म्हणाले,  " शिस्त पाळा."

५. वाक्प्रचार :

पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा :

(१) साध्य करणे- 

वाक्य : मनात जिद्द असेल, तर अशक्य गोष्ट साध्य करता येते. 

(२) दुःख निवारणे.- 

वाक्य : संकटाच्या वेळी हिमतीने ताकद मनात ठसवावी म्हणजे दुःख निवारण आपोआप होईल.

तोंडी परीक्षा

प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा.

(१) तुमच्या मते, ज्ञानाचा उपयोग कसा होतो, ते सांगा. 

(२) तुम्हांला विद्येची कोणकोणती वैशिष्ट्ये जाणवतात ?

आकारिक मूल्यमापन

उपक्रम :

* ही कविता एकत्ररीत्या समूहाने तालासुरात वर्गात सादर करा.




Comments

Popular posts from this blog

HOME