६.मराठी १४.आता उजाडेल !

 





१४. आतां उजाडेल!

सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील, याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे.

●ऐका. म्हणा, वाचा.


आतां उजाडेल!

खिन्न आंधळा अंधार 

आतां ओसरेल पार

लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल

आतां उजाडेल!


शुभ्र आनंदाच्या लाटा

गात फुटतील आतां

मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल

आतां उजाडेल!


वारा हसेल पर्णात  पर्णात

मुग्ध हिरवेपणांत 

गहिवरल्या प्रकाश दहिंवर मिसळेल 

आतां उजाडेल!


आनंदांत पारिजात

उधळील बरसात 

गोड कोंवळा गारवा सुगंधांत थरारेल 

आतां उजाडेल!


फुलतील नकळत

कळ्यांतले देवदूत 

निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल 

आतां उजाडेल!


निळे आकाश भरून 

दाही दिशा उजळून 

प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फुरेल 

आतां उजाडेल!


आज सारे भय सरे

उरी ज्योतिर्मय झरे

पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल 

आतां उजाडेल!


मंगेश पाडगांवकर- (१९२९-२०१५) 'धारानृत्य',

'जिप्सी', 'छोरी', 'मीरा', 'सलाम' इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'आतां उजाडेल!' ही कविता त्यांच्या 'जिप्सी' या कवितासंग्रहातून घेतली आहे.




• कवितेचा आशय : सूर्य  उगवण्याआधी असलेले वातावरण आणि सूर्य उगवल्यानंतर निसर्गात  होणारे  आनंददायी बदल  यांचे सुंदर चित्रण या कवितेत कवी मंगेश पाडगावकर यांनी केले आहे.


शब्दार्थ


उजाडेल - सूर्योदय होईल. खिन्न - उदास, दुःखी. ओसरेल- संपून जाईल. पार- सगळा.  लहरीत - लाटांमध्ये. कलाबूत- चांदीची किंवा सोन्याची जर.  मोहरेल-  फुलेल बहरेल. शुभ्र- स्वच्छ पांढऱ्या.  मृदू- कोमल, नाजूक. खग- पक्षी.  पालवेल-  फुटेल. पर्णात- पानात. मुग्ध -अबोल, गोड.  गहिवरल्या - मनात गलबललेल्या. दहिवर - दव . पारिजात - प्राजक्त.  बरसात  वर्षाव. थरारेल- थरथरेल.    नकळत  - सहज ,आपोआप, न समजता.  गौरव - सन्मान.  उमलेल -  फुलेल . महादान - सर्वात मोठे दान. स्फुरेल -  प्रसरण पावेल. सरे-  निघून जाते. उरी - मनात. ज्योतिर्मय – प्रकाशमान. 


कवितेचा भावार्थ


     आता सूर्य उगवेल. उदास आंधळा काळोख सगळा आता संपून जाईल. सूर्यकिरणांची कलाबूत (सोनेरी जर ) लहरत

तहरत बहरेल. आता उजाडेल.

    आनंदाच्या शुभ्र लाटा आता गात गात फुटतील. पक्ष्यांच्या कोमल गळ्यांतून किलबिलाट सुरू होईल. पानापानात वारा हसेल. मुग्धपणे आपल्या हिरवेपणात गढून जाईल. गहिवर दाटून आलेल्या प्रकाशात दव मिसळेल. (सुंदर आनंदी पहाट होईल.) आता उजाडेल. 

       पारिजाताचे झाड आनंदात आपल्या फुलांचा उधळून वर्षाव करील. पहाटेचा गोड कोवळा गारवा फुलांच्या सुगंधाने थरथरेल. आता सूर्य उगवेल.

      कळ्यांमध्ये (पराग) देवदूत आपोआप फुलतील. (कळ्यांची फुले होतील.) निळा सोनेरी प्रकाश (गौरव)  दिशादिशांतून उमलून येईल. आता उजाडेल.

     सूर्याच्या किरणांनी दाहीदिशा उजळून निळे आकाश प्रकाशाने भरून जाईल. प्रकाशाचे जणू महान दान चराचराच्या कणाकणात स्फुरण पावेल.  आता सूर्य उगवेल.

       सूर्याच्या आगमनाने सारी भीती आज सरून जाईल, मनामध्ये प्रकाशमान झरे वाहतील. असा पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राणांतून उगवेल (उजाडणारा प्रकाश मनामनातील आशा जागवेल.) आता उजाडेल.

           संकलित मूल्यमापन

      १. प्रश्नोत्तरे

प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा. 

(१) किरणांची कलाबूत कशी मोहरेल असे कवीला वाटते?

उत्तर : उदासवाणा गडद अंधार सगळा ओसरेल, मग उगवत्या सूर्याच्या लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल.

(२) आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत?

 उत्तर : उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील. त्या वेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत.

(३) पानांवर दहिवर केव्हा हसेल ?

उत्तर : मुग्ध हिरवेपणात वारा हसेल, तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहिवर हसेल.

(४) गारवा कशामुळे थरारेल?

उत्तर : उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करील. त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल. 

(५) प्रकाशाचे महादान कोणते?

उत्तर : दाहीदिशा उजळतील. प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल. हेच प्रकाशाचे महादान असेल.

(६) उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे?

उत्तर: उजाडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील; तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे.


प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील, असे कवीला वाटते?

उत्तर : उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाबूत मोहरेल. आपल्या कोमल  गळ्यांतून  पक्षी गातील. वारा पानांत हसेल. गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळेल. पारिजात फुलांची उधळण करेल नि त्याच्या सुगंधात गारवा थरथरेल. कळ्यांमधले पराग जागे होतील. दाही दिशा उजळतील. निळे आकाश प्रकाशाने दाटेल. कणाकणात प्रकाशाचे महादान स्फूरण पावेल.


(२) ' पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल' या ओळींचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा.

उत्तर : रात्री अंधार दाटतो. तेव्हा मुलांना भीती वाटते. पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होते.. अंधार सगळा  ओसरून प्रकाश पसरतो.  सारी भीती पळून जाते नि मनात प्रकाशमान झरे उमलतात. कवी म्हणतात की, पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो. प्राणातून उगवतो.


मुक्तोतरी प्रश्न


• पुढील ओळी वाचा, त्यांचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :


(१) खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. 

उत्तर : खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदासवाणे दुःखी मन होय, सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल.

(२) मृदु गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल.

उत्तर : रात्री पाखरे आपापल्या घरांत गुपचूप बसतात, पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो. ते आनंदाने किलबिलू लागतात. त्यांच्या कोमल गळ्यांतून जणू किलबिल पालवू लागते. गाणे फुटू लागते. 

(३) आनंदात पारिजात उधळीत बरसात. 

उत्तर : पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात. टपटप खाली पडतात. पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो, सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते.

(४) प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल.

उत्तर : पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दशदिशा पसरतो. प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते. हे.सूर्याने दिलेले महान असे दान आहे. ते चराचरातील कणाकणात स्फुरण पावते.


भाषाभ्यास व व्याकरण


प्रश्न १. विरुद्धार्थी शब्द लिहा. 

(१) उजाडेल x मावळेल (२) खिन्न x प्रसन्न (३) मृदू  x राठ (४) आनंद x दुःख (५) आता x नंतर (६)अंधार x प्रकाश


प्रश्न २. समानार्थी शब्द लिहा

(१) दहिवर = दव (२) गौरव = सन्मान (३) गाणे = गीत (४) लाटा = लहरी (५) भय = भीती (६) प्राण = जीव

प्रश्न ३. लिंग ओळखा:

(१) लाट-  स्त्रीलिंग (२) आकाश नपुंसकलिंग (३) पारिजात -  पुल्लिंग (४) गारवा - पुल्लिंग

• प्रश्न ४. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा.

(१) शुभ आनंदाच्या लाटा (२) निळे आकाश (३) मृदु गळ्यांत (४) गोड, कोवळा गारवा.

• प्रश्न ५. दान-  महादान' यासारखे तुम्हांला माहीत असलेले शब्द लिहा.

उत्तर : (१) मानव महामानव (२) योगी - महायोगी (३) वीर - महावीर (४) रथी-महारथी,


२. लेखन विभाग


• विचार करून सांगूया.


डेव्हिड संध्याकाळी अभ्यासाला बसला. अचानक वीज गेली. ओह! आता कसला अभ्यास होतोय. समूहगीतही पाठ करायचे होते. किती अंधार पसरलाय सगळीकडे. सगळंच अडलंय; पण वीज गेली कशी ? सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार? 

उत्तर : डेव्हिड विचार करतो की, वीज कशी गेली? याचे कारण शोधून काढूया. तो बॅटरी (विजेरी) पेटवतो. सारी बटने बघतो. तो बंद करतो. वायरिंग्ज नीट बघतो. सारे सुरक्षित आहे, असे त्याला समजते. काही वेळाने वीज येईल, अशी त्याची खात्री पटते. तोपर्यंत अभ्यास करण्यासाठी तो मेणबत्ती पेटवतो व तिच्या शांत प्रकाशात त्याचा अभ्यास सुरू होतो.


३.   तोंडी परीक्षा

प्रश्न(१)  पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :

(१) सकाळी तुमच्या मनात कोणते विचार येतात ?

(२) पहाटेच्या वेळचे तुमच्या परिसराचे वर्णन चार वाक्यांत करा.


१. प्रकट वाचन


आकारिक मूल्यमापन


• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ५५ वरील 'माहिती मिळवूया' व 'सुविचार' हे उतारे वाचा.


२. कृती / प्रात्यक्षिक


• (१) 'आतां उजाडेल !' या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. 'आता पाऊस पडेल!' व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या चार ओळी लिहा: 

आता उजाडेल ! 

खिन्न आंधळा अंधार

आता ओसरेल पार 

लहरात किरणांची कलाबूत मोहरेल

आता उजाडेल !

उत्तर:-  आता पाऊस पडेल !

             सारी धरतो भिजेल

            झाडामधल्या मोरांचा

           हिरवा पिसारा फुलेल.




(२) ' तां, ना, पि, हि, नि, पा, जां' या सूर्यकिरणांमधील सात रंगांची नावे लिहा :

उत्तर:-  तां - तांबडा.  ना - नारिंगी.  पि - पिवळा.  हि - हिरवा . नि  - निळा. पा -  पारवा .जां - जांभळा


३. उपक्रम :


शब्दकोडे


• पुढील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा

उदा., कान टवकारणे.

















Comments

Popular posts from this blog

HOME