७.मराठी १३.अनाम वीरा....(कविता )
१३.अनाम वीरा....
कुसुमाग्रज
(पाठ्यपुस्तक पान क्र. ६०)
शब्दार्थ :-
अनाम - अपरिचित, माहीत नसलेला.
वीर - सैनिक.
जाहला - झाला.
जीवनान्त - जीवनाचा अंत, शेवट, मृत्यू.
स्तंभ - स्मारक. दगडाने बांधलेला खांब.
वात - ज्योत.
धगधगता - जळताना. प्रचंड उष्णता.
समर - संग्राम, लढाई, युद्ध.
ज्वाला - जाळ, आग.
देशाकाशी - देशाच्या आकाशात.
जळावयास्तव - जळण्यासाठी .
संसार - प्रपंच.
मूकपणे- अबोलपणे, शांतपणे.
तम - अंधार
तमी - अंधारात.
लोपती - विरून जातात. लोप पावतात.
संध्या - सायंकाळ. संध्याकाळ
विलीन - नामशेष, लुप्त.
भय- भीती .
आशा- आसक्ती, इच्छा .
जनभक्ती - लोकसेवा.
नच - नाही.
उधाणले - उफाळले, वर आले.
भाव - भावना.
रियासत - इतिहास , साम्राज्य
नोंदले - दाखल केले. लिहून ठेवले
भाट - गायक . स्तुती करणारे लोक.
डफ - एक चामडी वाद्य.
यशोगान - यशाचे गाणे, यशोगाथा.
सफल - यशस्वी.
बलिदान - प्राणार्पण .
पहाटतारा- पहाटे उगवणारा तारा.
प्रणाम - वंदन. नमस्कार, नमन
तुजला- तुझा .
मृत्युंजय - मृत्यूवर मात करणारा, चिरंजीव.
कवितेचा आशय :-
देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणारे सैनिक शत्रूशी लढताना प्राणाचे बलिदान देतात. त्या सर्व सैनिकांना प्रत्ययकारी शब्दांत कवींनी अभिवादन केले आहे. समाज दखल घेवो, न घेवो आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी व्रत घेतलेले असते.
मूल्य / शिकवण / संदेश:- भारतवासीयांचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची जाणीव सदैव मनात
असायला हवी. भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना हवी, ही शिकवण ही कविता देते.
१३. अनाम वीरा...(कविता )
ऐका. वाचा. म्हणा.
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशीं
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा -
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुशें यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
कवितेचा भावार्थ
हे देशासाठी प्राण देणाऱ्या अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास, तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही, कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. ।।१।।
या देशाच्या आकाशात, सीमेवर जेव्हा लढाईच्या (युद्धाच्या) धडाडणान्या ज्वाला भडकल्या तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वत: जळण्यासाठी तू तुझ्या हसत्याखेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास. (देशरक्षणाची हाक येताच, तत्परतेने तू निघालास.) ।।२।।
सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेषा मुकेपणाने अंधारात विरून जाते, तसा तू भीती न बाळगता, कुठलीही आशाआकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास. (मृत्यू पत्करलास) ।।३।।
ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास, त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत. इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोरले गेले नाही. ।।४।।
तुझी यशोगाथा डफाच्या तालावर जरी कुणी गायकाने गायिली नाही, तरी देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वी ठरणार आहे. ।।५।।
या घनघोर लवाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उदया विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल. आपला विजय होईल. परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे. मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे पहिले वंदन तुलाच आहे.।।६।।
संकलित मूल्यमापन
1. प्रश्नोत्तरे
● प्रश्न १. कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते ?
(१) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात!
उत्तर : देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे माहीत नसतात. तसेच आपला कुणी जयजयकार करावा; म्हणून सैनिक लढत नाही. लढणे ही त्याची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवींनी ही ओळ लिहिली आहे.
(२) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी ।।
उत्तर : सैनिकाचे जीवन असे असते की, एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे.
(३) सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ।
उत्तर : सैनिकांच्या कर्तबगारीचे यशोगीत कुणीही गायक डफ घेऊन जाहीररीत्या गात नाही किंवा इतिहासात त्याचे नाव कोरले जात नाही. कवी म्हणतात की, या साऱ्या प्रसिद्धीची सैनिकाला गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे. म्हणून तुझे हे बलिदान सफलच आहे, असे कवींनी म्हटले आहे.
• प्रश्न २.देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक 'अनाम' राहिला आहे. असे कवींना वाटते. त्याची पाच कारणे लिहा
उत्तर :देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक 'अनाम' राहिला आहे. असे कवींना वाटते, त्याची कारणे खालीलप्रमाणे --
(१) अनाम वीराचे कुणी स्मारक उभारले नाही.
(२) त्यांच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही.
(३) जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही,
(४) रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही.
(५) कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायिली नाही.
३. पुढील जोड्या जुळवा :
'अ' गट
(१) धगधगतां समराच्या ज्वाला
(२) मरणामध्ये विलीन
(३) ना भय ना आशा
(४) नच उधाणले भाव
'ब' गट
(अ) शांतपणे मरण स्वीकारणे
(आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता
(इ) भावना व्यक्त न करणे
(ई) महाभयंकर युद्ध
उत्तरे:-
(१) धगधगतां समराच्या ज्वाला -महाभयंकर युद्ध
(२) मरणामध्ये विलीन - शांतपणे मरण स्वीकारणे
(३) ना भय ना आशा - निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता
(४) नच उधाणले भाव - भावना व्यक्त न करणे
प्रश्न ४. पुढील शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(१) अनाम वीर :- ज्याला कुणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही.
(२) जीवनान्त - जीवनाचा शेवट, म्हणजेच मृत्यू .
(३) संध्येच्या रेषा - संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो, तशी क्षितिजरेषा धूसर होत जाते. काळोखात विरून जाते. तसा सैनिकाच्या जीवनरेषेचा अस्त होतो.
(४) मृत्युंजय - वीर देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो, तो चिरंजीव ठरतो.
प्रश्न.५. पूर्ण करा :
(१) वीराचा मृत्यू जिथे झाला तिथे काय झाले नाही ?:-
(२) पहाटेच्या काळोखातून उगवणारा कोण ?
(३) कवींचा पहिला प्रणाम कोणाला ?
उत्तरे : (१) स्तंभ बांधला नाही , वात पेटवली नाही.
(२) विजयाचा पहाट तारा
(३)मृत्युंजय वीराला
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १. समान शेवट असलेले कवितेतील शब्द लिहा :
(१) जीवनान्त- वात (२) देशाकाशी- जाशी
(३) रेषा - आशा (४) भाव - नाव (५) यशोगान - बलिदान
(६) तारा - वीरा
प्रश्न २. लिंग ओळखा :
(१) ज्वाला - स्त्रीलिंग
(२) संसार - पुल्लिंग
(३) बलिदान - • नपुंसकलिंग
(४) रेषा - स्त्रीलिंग
● प्रश्न ३. पुढील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा :
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे
उत्तर : मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र ? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल . आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो, अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे !
वाक्य
वाक्य म्हणजे काय ?
संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय.
'त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. ' या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून 'मुलगा' हे उद्देश्य, तर 'जातो' हे विधेय आहे. वाक्यातील 'त्याचा', 'मोठा' हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत, तर 'दररोज', 'आगगाडीने' हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.
• प्रश्न ४. काही छोटी वाक्ये तयार करून त्यांतील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पाहा!
उत्तरे :
(१) पाऊस पडला.
उत्तर :- पाऊस - उद्देश्य
पडला -विधेय
(२) काल रात्री पाऊस धो धो पडला.
उत्तर :- काल रात्री -उद्देश्य विस्तार
धो धो - विधेय विस्तार
(१) मोर ---उद्देश्य
नाचतो.- विधेय
(२) आपला सुंदर पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचतो.
उत्तर:- आपला सुंदर पिसारा फुलवून ----उद्देश्य विस्तार
थुई थुई नाचतो. -- विधेय विस्तार
५ वाक्ये वाचा, वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा (सूचना: योग्य म्हणी अधोरेखित / ठळक केल्या आहेत.)
(१) गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता, जसे ते सेवानिवृत्त झाले. तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना असतील शिते तर जमतील भुते.
(२) रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारी जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरात सापडली म्हणतात ना काखेत कळसा नि गावाला वळसा.
(३) पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना तहान लागली की विहीर खोदायची.
४) फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावतले सगळे म्हणू लागले खाण तशी माती .
२. लेखन विभाग
(१) तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी पुढे काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा :
• (१) तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता ?
• (२) तुमच्या आवडत्या छंदाबावत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हांला कोणती मदत करतात ?
नमुना उत्तर :
(१) माझा आवडता छंद म्हणजे वाचन! मला थोर व्यक्तींचे चरित्र पुस्तके वाचायला आवडतात. मी दिवसभरात एक दीड तास वेळ या छंदाला देतो/देते.
(२) मला माझे आईबाबा थोर व्यक्तींचे चरित्र पुस्तके आणून देतात. तसेच सार्वजनिक वाचनालयाचा/ची मी सभासद आहे.
(२) तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्यासंबंधित पुढे काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा :
मी डॉक्टर होणार
(1) मी डॉक्टर व्हायचे का ठरवले आहे ?
(2)मी डॉक्टर बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे?
(3) मी डॉक्टर होण्याबाबत माझ्या - कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत?
(4) डॉक्टर होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे ?
नमुना उत्तर :
मी डॉक्टर होणार!
डॉक्टर नसेल तर आजारी माणसाचे किती हाल होतात हे मी पाहिले आहे. एकदा बाबांच्या कामासाठी आम्ही काही दिवस खेडेगावात राहिलो होतो. त्या गावात तापाची साथ आली होती. लोक तापाने फणफणले होते; पण गावात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना औषधोपचार होत नव्हता. त्याच क्षणी मी मनात निश्चय केला की, आपण डॉक्टर होऊन ग्रामीण लोकांची सेवा करायची.
डॉक्टर होण्याबाबत मी जेव्हा माझा मानस आईबाबांना सांगितला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु ते म्हणाले की तुला खूप मेहनत घ्यावी लागेल व खूप मन लावून अभ्यास करावा लागेल, डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार. त्यासाठी मला शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल.त्याकरिता मी नियमित व्यायाम करीन. स्वच्छतेच्या सवयी काटेकोरपणे पाळीन. रोजच्या जेवणात चौरस आहार घेईन. भरपूर अभ्यास तर करीनच. पण न समजलेला भाग वेळच्या वेळी शिक्षकांना विचारून समजून घेईन. बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक माझ्या वाचनात आले. आदिवासी लोकांत राहून ते त्यांची सेवा करीत आहेत. मी डॉक्टर झालो तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मी रंजल्यागांजल्या लोकांसाठी करीन; मी असाध्य रोगांवरील उपचार शोधून काढीन.
"सेवाव्रत' हे डॉक्टरी व्यवसायाचे ब्रीद आहे. मला डॉक्टर होऊन जनसेवा करायची आहे. जनसेवेचे पुण्य मोठे असते. म्हणूनच थोर लोक म्हणतात की, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.
(२) नमुना २.
तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्यासंबंधित पुढे काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा :
मी शिक्षक होणार
(1) मी शिक्षक व्हायचे का ठरवले आहे ?
(2)मी शिक्षक बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे?
(3) मी शिक्षक होण्याबाबत माझ्या - कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत?
(4) शिक्षक होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे ?
नमुना उत्तर :
मी शिक्षक होणार!
शिक्षक नसेल तर निरक्षर माणसाचे किती हाल होतात हे मी पाहिले आहे. एकदा बाबांच्या कामासाठी आम्ही काही दिवस खेडेगावात राहिलो होतो. त्या गावात बँक होती. लोक त्या बँकेत येत होते; पण गावात एकही शिक्षक नसल्यामुळे त्यांना अक्षरज्ञान नव्हते . त्यांना प्रत्येक ऑफिसमध्ये दुसऱ्यांची मदत घ्यावी लागत असे. त्याच क्षणी मी मनात निश्चय केला की, आपण शिक्षक होऊन ग्रामीण निरक्षर लोकांची सेवा करायची.
शिक्षक होण्याबाबत मी जेव्हा माझा मानस आईबाबांना सांगितला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु ते म्हणाले की तुला खूप मेहनत घ्यावी लागेल व खूप मन लावून अभ्यास करावा लागेल, शिक्षक होण्यासाठी खूप मन लावून अभ्यास करावा लागणार. त्यासाठी मला शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल.त्याकरिता मी नियमित व्यायाम करीन. स्वच्छतेच्या सवयी काटेकोरपणे पाळीन. रोजच्या जेवणात चौरस आहार घेईन. भरपूर अभ्यास तर करीनच. पण न समजलेला भाग वेळच्या वेळी शिक्षकांना विचारून समजून घेईन.
साने गुरुजी यांचे पुस्तक मी वाचले आहे .शिवाय सिंधुताई सपकाळ यांची अनेकवेळा भाषणे ऐकली आहेत .
जे जे आपणासी ठावे , ते ते लोकांशी सांगावे
शहाणे करून सोडावे , सकल जण।
" मला शिक्षक होऊन जनसेवा करायची आहे. जनसेवेचे पुण्य मोठे असते. म्हणूनच थोर लोक म्हणतात की, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.
३. तोंडी परीक्षा
प्रश्न :- पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) एखादे देशभक्तीपर गीत म्हणा.
(२) तुम्हांला सैनिक व्हावेसे वाटले का? का? का नाही?
आकारिक मूल्यमापन
१. प्रकट वाचन:
(१) ही कविता तालासुरात मोठ्याने म्हणा.
(२) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ६३ वरील 'हे करून पाहूया' हा उतारा वाचा.
२. उपक्रम :
• हे गाणे लता मंगेशकर यांनी गायिले आहे. पालक किंवा शिक्षकांच्या मदतीने ते मिळवा व ऐका..
Comments
Post a Comment