६मराठी,१८ .बहुमोल जीवन
१८ .बहुमोल जीवन
-रमण रणदिवे
(पाठ्यपुस्तक पान क्र. 50)
● कवितेचा परिचय : आयुष्यात सुखदुःखे येतात जातात. मनासारखे घडत नाही, म्हणून रडत बसू नये संकटांना सामोरे जावे. जीवन मूल्यवान आहे. त्याचा त्याग करू नये. असा संदेश या कवितेत दिला आहे.
शब्दार्थ
बहुमोल - अनमोल, खूप अमूल्य असे. निखळुनी- देठापासून गळून , निसटून. झडणे- जीर्ण होणे, वठणे, झुरणे. भोगावे लागते – सोसावे लागते, सहन करावे लागते. सकला - सर्वांना . लतिका- वेल, लता. धरणी- धरती, भूमी, सृष्टी - जग, निसर्ग. देह - शरीर, काया .नभ- आकाश . घन - ढग, मेघ. नक्षत्रे - तारे, चांदण्या . अवस - अमावस्या. लीलया- सहज. भिडावे-सामोरे जावे, तोंड द्यावे, सामना करावा. फिरुनी - पुन्हा.
टिपा
(१) वसंत - वनस्पतींना नवीन पालवी फुलण्याचा ऋतू.
(२) ग्रीष्म - उन्हाळा ऋतू.
(३) शालू - भरजरी वस्त्र, साडीचा एक प्रकार.
(४) अवस - अमावस्या , प्रत्येक मराठी महिन्यातील शेवटची तिथी.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) मनासारखे घडणे - हवे ते मिळणे.
(२) वाट्याला येणे - आपल्याला सहज मिळणे , नशिबात असलेले .
(३) भोगावे लागणे - सहन करावे लागणे.
(४) दाटून येणे - दाट होणे , गर्दी होणे
(५) बोटे मोडणे - तक्रार करणे, दोष देणे.
कवितेचा भावार्थ
आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखे घडत नाही. फुले गळून पडली, तरी झाड एकसारखे वठत नाही. ।।धृ।।
जे जे वाट्याला येईल, पदरात पडेल ते ते सर्वांना सहन करावे लागतेच. आपल्या आसपास काटे आहेत, म्हणून गुलाब तक्रार करीत नाही, दोष देत नाही. आपल्याला ( फुलाबरोबरच) काटे दिले म्हणून वेल कधीही मातीवर रागावत नाही. सर्व काही मनासारखे जीवनात मिळत नाही. ।।१।।
वसंत ऋतू येतो आणि जातो. ( वसंत ऋतूत फुले बहरतात व गळून पडतात.) कडक उन्हाळा धरतीला जाळतो. पण पुढे पावसाळा येताच धरणी हिरवा शालू नेसते. (जिकडे तिकडे हिरवळ उगवते.) पुन्हा सृष्टी नवीन होते. आपले शरीर उन्हाने जळले म्हणून धरती रडत बसत नाही. (दुःख करीत बसत नाही.) या जीवनात मनाप्रमाणे सर्व घडत नाही.।।२।।
दररोज आकाशाचे रंग बदलतात. तरीही काळे ढग दाटून येतात. निराशेत बुडालेले तारे पुन्हा नव्याने लखलखतात. (निराशेचे रूपांतर काही दिवसांनी आशेत होते.) अमावस्येला चंद्र दिसत नाही, अंधारी रात्र असते, म्हणून (पूर्ण चंद्राची) पौर्णिमा कधी रुसून बसत नाही. मनासारखे आपल्या आयुष्यात घडत नाही. ।।३।।
कधी सुख येते, कधी दुःख मिळते. सुखाचे ऊन आणि दुःखाची सावली येते नि निघूनही जाते. याचा राग येता कामा नये . सहजपणे संकटांना सामोरे जावे, आयुष्य सोडून देऊ नये. हे मानवी जीवन फार किमती व अमूल्य आहे. ते पुन्हा माणसाला मिळत नाही. एकदाच आयुष्य मिळते. (ते सुंदरपणे जगावे); कारण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कधी जीवनात घडतात का ? मुळीच नाही !! ।।४।।
संकलित मूल्यमापन
१. प्रश्नोत्तरे
● प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा :
(१) गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे ?
उत्तर : गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात. पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना गुलाब कधीही द्वेष देत नाही.
(२) ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो ?
उत्तर : ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते. हा कडक उन्हाळा धरणीला भाजून काढतो.
(३) निराश-आशा कवीला कोणाबद्दल वाटते ?
उत्तर: आकाशाचे रंग रोजच बदलतात. त्यामुळे निराश-आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते.
(४) सुखदुःखाची ऊनसावली म्हणजे काय ?
उत्तर :- कधी ऊन पडते, कधी सावली पडते. सुखदुःख तसेच असते. कधी सुखाचे ऊन मिळते, तर कधी दुःखाचे सावट येते.
(५) आयुष्याचा त्याग करू नको, असे कवी का म्हणतात ? उत्तर :- आयुष्य बहुमोल आहे. माणसाला ते एकदाच लाभते. पुन्हा परत मिळत नाही. म्हणून आयुष्याचा त्याग
करू नको, असे कवी म्हणतात.
• प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा :
(१) मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात ?
उत्तर : मनासारखे काही घडते का, यासाठी कवी पुढील उदाहरणे देतात (१) गळणारी फुले, तरी न झडणारे झाड (२) गुलाव व त्याचे काटे (३) वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणी (४) रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग (५) अमावस्या व पौर्णिमा (६) सुखदु:ख आणि ऊनसावली.
(२) कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे ?
उत्तर : जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते, ते भोगावेच लागते. संकटाला सहज सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. परत हे आयुष्य मिळत नाही. म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे. असा संदेश कवीने माणसाला दिला आहे.
मुक्तोत्तरी प्रश्न
• तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
(१) तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता ?
(२) ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात ?
(३) खूप ऊन लागू लागले, की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हांला काय वाटते?
उत्तरे : (१) (मुद्दे: निराश न होता वाट पाहतो ,दुःख वाटून घेत नाही ,प्रयत्न करीत राहीन ,कधी तरी पूर्ण होईलच ही जिद्द बाळगीन.)
(२) (मुद्दे : ही दुष्काळाची सुरुवात आहे- दुष्काळ पडला तर माणसांना व पशुपक्ष्यांना पाणी मिळणार नाही – आहे ते पाणी जपून वापरायला हवे पाण्याचे नियोजन करायला हवे – पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करायला हवी.)
(३) (मुददे:- एकदम छान वाटते ,गार वाटते , वारा आला की आल्हाददायक वाटते– थकवा जातो – उत्साह येतो.)
भाषाभ्यास व व्याकरण
• प्रश्न १. या कवितेत सुखदुःख, ऊनसावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे आणखी पाच शब्द लिहा.
उत्तर : (१) उंचसखल (२) लांबरुंद (३) नफातोटा (४) खरेदीविक्री (५) लाभहानी (६) बरेवाईट (७)
प्रश्न २. समानार्थी शब्द लिहा :
लतिका = वेल
धरणी = धरती
देह = शरीर
नभ =आकाश
प्रश्न ३. खालील शब्दांसाठी अनेकवचनी शब्द लिहा:
एकवचन - काटा, बोट,फूल, झाड, संकट
उत्तर:- अनेकवचन:- काटे, बोटे,फुले झाडे, संकटे
प्रश्न ४. पुढील धातूंपासून धातुसाधिते तयार करा :
मूळ धातू (१) बोल (२) कर (३) धाव
उत्तर:- धातुसाधिते
(१) बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून बोलला.
(२) करणे, करीत, करता, करणारा, करून, केला.
(३) धावणे, धावत धावता, धावणारा, धावून, धावला.
• प्रश्न ५. पुढील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे ओळखून लिहा :
(१) मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली.
(२) पालक मुलांसाठी सतत राबत असतात.
(३) गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली.
(४) मला चित्रे रेखाटायला आवडते.
पुढील उदाहरणे वाचा कृदन्त , सहाय्यक क्रियापद व संयुक्त क्रियापद समजून घ्या :
कृदन्त + सहाय्यक क्रियापद = संयुक्त क्रियापद
उदाहरण (१) सुरेश समुद्रात पोहू शकतो.
मुख्य धातूचे कृदन्त -पोहू
सहायक क्रियापद - शकतो
संयुक्त क्रियापद - पोहू शकतो.
उदाहरण (२) चोर पोलिसाला पाहून पळाला.
मुख्य धातूचे कृदन्त- पाहून
सहायक क्रियापद - पळाला
संयुक्त क्रियापद -पाहून पळाला
उदाहरण (३) आरोपीला आपली बाजू मांडू दे.
मुख्य धातूचे कृदन्त- मांडू
सहायक क्रियापद - दे
संयुक्त क्रियापद -मांडू दे
उदाहरण (४) पोस्टमन हल्ली रोज येऊ लागला..
मुख्य धातूचे कृदन्त -येऊ लागला.
सहायक क्रियापद - लागला.
संयुक्त क्रियापद - येऊ लागला.
२. लेखन विभाग
• या कवितेत मनासारखे काही घडते का? असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे, असे तुम्हांला वाटते ? कल्पना करा व लिहा.
• उत्तर : (मुद्दे मनासारखा अभ्यास व्हावासा वाटतो, मनासारखे फिरायला मिळावे. मनासारखा खाऊ मिळावा.
मनासारखे खेळायला मिळावे इत्यादी.)
३. तोंडी परीक्षा
प्रश्न :- पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :
(१) तुम्हांला कोणता ऋतू आवडतो ? का?
(२) गुलाबाच्या फुलाकडून तुम्हांला काय शिकावेसे वाटते ?
आकारिक मूल्यमापन
९. प्रकट वाचन :
(१) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ७१ वरील ' सुविचार मोठ्याने वाचा.
(२) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ७२ वरील 'वाचा' हा उतारा वाचा.
२. कृती :
सुविचारांच्या वहीत पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ७१ वरील सुविचार सुवाच्य अक्षरांत लिहा व पाठ करा.
३. उपक्रम :
• वसंत ऋतूत झाडांना पालवी फुटते, अशा वेळी झाडांचे निरीक्षण करा व कडुनिंबाच्या झाडाचे पानाफुलांसहित चित्र काढा. रंग दया.
Comments
Post a Comment