६मराठी २६ संतवाणी

२६. संतवाणी   (पाठ्यपुस्तक पान क्र. १०१) 

• अभंग पहिला  - संत बहिणाबाई

अभंगाचा आशय -  जसे बीज असते, तसे फळ मिळते. त्याप्रमाणे चांगले कार्य केले, तर चांगले फळ मिळते, हा विचार संत बहिणाबाईंनी मांडला आहे. 

शब्दार्थ

निंबा -  लिंबाच्या झाडाला.

युक्षा - उसाला. 

कवण - कोण.

निवाडा -  न्याय.

उघडा-  स्पष्ट.

इंद्रवनमुळी - इंद्रवन झाडाच्या मुळात.

आम्रास - आंब्याला. 

बचनाग - एक वनस्पती. 

नलगे - नाही लागत. 

पुष्पा - फुलाला. 

मोइरी - एक तिखट पदार्थ.

बहेणि - बहिणाबाई.

वोंगळ - वाईट 

परीक्षावे - कसोटी घ्यावी.

अभंगाचा भावार्थ

लिंबाच्या झाडाला कडवटपणा (कडू चव) कोण देतो ? उसाला गोड कोण करतो. ॥१॥ 

बीज कडू असेल, तर फळ कडू येते व बीज गोड असेल, तर फळ गोड निपजते, हा चवींचा न्याय आहे. हा स्पष्ट अर्थ लक्षात घ्या. ॥२॥  

इंद्रवन नावाच्या वनस्पतीच्या मुळांत विष कोण घालते? आंब्याला अमृताची मधुरता कोण देते ?  ॥३॥ 

बचनाग वनस्पतीच्या अंगात विष कोणी भिनवले. फुलाला सुगंध बाहेरून आणावा लागत नाही. त्याच्या गाभ्यातच सुगंध असतो.  ॥४॥ 

मोहरीला तिखटपणा कोण देतो? खारकेत गोडवा कोण निर्माण करतो ?  ॥५॥  

संत बहिणाबाई म्हणतात जसे बीज असते, तसे फळ मिळते. उत्तम काय आणि वाईट काय, याची परीक्षा प्रत्येकाने नेहमी करावी.  ॥६॥ 

अभंग दुसरा -  संत निर्मळा

अभंगाचा आशय

संसाराच्या जंजाळातून सुटका करून भक्तिमार्ग अंगिकारावा, असा संदेश संत निर्मळा यांनी दिला आहे. 

शब्दार्थ

बहु - खूप .

हळहळ - अस्वस्थता, चिंता. 

पडिलीसे -  पडली आहे. 

गुंती- गुंत्यात, जंजाळात. 

गळें- गळ्यात - 

उबग - वीट, नकोसे वाटणे. 

फासा-  फास गळफास, मायाजाल. 

दुजेपण -  भेदभाव, एक दुसरेपण.

चोखियाची संत - चोखामेळा यांची (निर्मळा ही चोखामेळा यांची पत्नी). 

आण - शपथ.

अभंगाचा भावार्थ 

संत निर्मळा म्हणतात- रात्रंदिवस माझे मन तळमळत आहे. माझ्या जिवाला खूप हळहळ वाटते. मला चिंत लागली आहे.  ॥१॥ 

माझी पावले आता मला दिसत नाहीत. संसाराच्या जंजाळात मी गळ्यापर्यंत बुडाली आहे.  ॥२॥  

या प्रपंचाचा मला खूप वीट आला आहे. हे देवा, मला बसलेला हा संसाराचा पाश तोडून टाक  ॥३॥  

संत निर्मळा म्हणतात हे देवा, आता मला संसारापासून परकेपणा येऊ दे, चोखामेळ्याची शपथ मी तुम्हांल घालते आहे.  ॥४॥ 

अभंग तिसरा  : फादर थॉमस स्टीफन्स 

अभंगाचा आशय

फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या अभंगात मराठी भाषेची थोरवी वर्णन केली आहे.

शब्दार्थ

हरळांमाजि -  तेजामध्ये.

रत्नकिळा - रत्नाची चमक. 

भासांमाजि -  भाषांमध्ये.

चोखळा -  उत्तम.

पुस्पामाजि – फुलांमध्ये.

परिमळ – सुगंध. 

कस्तुरि- हरिणाच्या बेंबीत असलेला सुगंधी देठ.

साजिरी - सुंदर.

पखिओं - पाखरे, पक्षी, 

मयोरु - मोर.

व्रुखिआं - झाडे. 

कल्पतरू -  इच्छित फळ देणारे काल्पनिक झाड.

मानु – सन्मान. 

बारा रासी- बारा राशींचे तारे.

सप्त-सात वार दिवस. 

रवी - सूर्य.

ससी- चंद्र 

दीपिचेआं -  द्विपकल्पात, भूमिखंडात, दक्षिण गोलार्धात.

अभंगाचा भावार्थ

फादर थॉमस स्टीफन्स मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात जसे तेजामध्ये रत्नाचे तेज उत्तम असते आणि रत्नोंमध्ये निळा हिरा जसा उत्कृष्ट असतो; त्याप्रमाणे सर्व भाषांमध्ये उत्तम भाषा मराठी आहे.  ॥१॥  

जसे फुलांमध्ये मोगऱ्याचे फूल सुंदर असते किंवा सुगंधामध्ये  कस्तुरीचा सुगंध  सर्वात छान असतो तशी सर्व  भाषांमध्ये मराठी सुंदर आहे.  ॥२॥ 

जसा पक्ष्यांमध्ये मोर देखणा आहे. झाडांमध्ये कल्पतरू सर्वांत फलदायी आहे तसा सर्व भाषांमध्ये मराठी भाषेचा मान थोर आहे.  ॥३॥ 

सर्व तारकांमध्ये जशा बारा राशींच्या तारका महत्त्वाच्या आहेत सात वारांमध्ये (आठवड्यामध्ये) सूर्याचा वार रविवार व चंद्राचा वार सोमवार हे दोन वार महत्त्वाचे आहेत; त्याप्रमाणे या वीकल्पामध्ये (आशिया खंडात) सर्व भाषांमध्ये मराठी बोली सर्वोत्तम आहे.  ॥४॥ 









Comments

Popular posts from this blog

HOME