७मराठी १९ धोंडा
१९. धोंडा - डॉ. संजय ढोले
(पाठ्यपुस्तक पान क्र. ९०)
पाठाचा परिचय:-
ही एक विज्ञानकथा आहे. चौकस बुद्धीच्या व जिज्ञासू वृत्तीच्या राजूला रस्त्यात एक मिळतो. तो रात्रीचा चकाकताना दिसतो, तेव्हा राजूचे कुतूहल वाढते. राजू तो दगड शिक्षकांना दाखवतो. शेवटी शास्त्रज्ञ तो दगड ओळखतात. तो परग्रहावरून आलेला दगडरूपी नरभक्षक व उपद्रवी सजीव प्राणी असतो. ते भयानक दगड नष्ट केले जातात. राजूच्या चातुर्यामुळे पृथ्वीवरचे संकट टळते. मूल्य / शिकवण / संदेश : विज्ञानाचा नुसताच परिचय नव्हे, तर सखोल अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता वाढवावी हा हेतू या विज्ञानकथेचा आहे. गोष्टीरूपाने खगोलशास्त्रातली किमया जाणून घेण्याची आवड मुलांना लागावी, हे उद्दिष्ट साधले आहे.
शब्दार्थ
धोंडा - गोल खरखरीत दगड.
चौकस - कुतूहलमिश्रित (बुद्धी)
जिज्ञासू - जाणून घेण्याची वृत्ती.
घरंगळत - गडगडत.
अपेक्षा - इच्छा.
थबकला -थांबला.
करारी - कठोर विचारांचे.
करडा स्वर - हुकूमत असलेला आवाज.
बल - जोर, शक्ती.
विलक्षण - अजब.
वैताग - चिडचिड.
भिरकावले - फेकून दिले.
किट्ट – गर्द, दाट.
चकाकी - चमक असणारे, लकाकी.
दबक्या - हलक्या , भीतीने हळूच,
फुगीर - फुगलेला.
विचारशृंखला - विचारांची साखळी.
प्रखर - लख्ख, इतरांपेक्षा अधिक प्रकाशित,
विशिष्ट - विशेष असा.
लहरी - तरंग , लाटा.
आकलनापलीकडे - समजण्याच्या पुढचे, न समजेनासे. लख्ख- तेजस्वी.
मिश्रित - मिसळलेली.
व्याख्यान - निवडलेल्या विषयावरील भाषण.
समवेत - सोबत.
चलाख -चतुर.
स्वप्नवत - स्वप्नासारखे.
चाणाक्ष - कुशल .
नैसर्गिक प्रवृत्ती - जन्मजात स्वभाव.
डॉक्टरद्वयी - दोन डॉक्टर, डॉक्टरांची जोडी
निर्देश - सूचना, बोट दाखवणे.
संशोधन - विशिष्ट प्रकारचा सतत शोध.
धक्कादायक – भीती वाटणारी, धोका असणारे.
क्षमता - शक्ती, ताकद.
पर्यायाने - उलट , अधिक उपलब्ध.
श्रेय - मिळवलेले पुण्य.
अरिष्ट - संकट, आपत्ती.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) भंडावून सोडणे - हैराण करणे.
(२) रमणे गुंतणे - गुंग होणे, आनंद वाटणे.
(३) धास्तावणे - घाबरणे.
(४) भ्रम असणे - भास होणे. खोटी समजूत होणे.
(५) आशाळभूत नजरेने पाहणे- केविलवाणे होणे.
(६) अर्थबोध न होणे - काही न समजणे.
(७) नजर चुकवणे - पाहायचे टाळणे. नजरेला नजर न मिळवणे.
(८) कुतूहल जागृत होणे - उत्सुकता निर्माण होणे.
(९) ओढले जाणे - आकर्षित होणे.
(१०) गांगरणे - गोंधळणे, बावरणे.
(११) तर्क करणे - अंदाज लावणे.
(१२) शहारणे - अंगावर काटा येणे.
(१३) अंमल चढणे -च्या गुंगीत जाणे, अधीन होणे.
(१४) हृदय धडधडणे - घाबरणे.
(१५) घालमेल होणे - मन अस्वस्थ होणे, हळहळ वाटणे. (१६) ठाम निश्चय करणे - पक्का निर्धार करणे.
(१७) पाठिंबा मिळणे - आधार मिळणे, सहकार्य मिळणे.
(१८) पाठपुरावा करणे -सतत मागोवा घेणे.
(१९) कटाक्ष टाकणे - विशिष्ट गोष्टीकडे सहेतुक पाहणे.
(२०) चरकणे - धक्का बसून घाबरणे.
(२१) गिळंकृत करणे - गिळणे, खाणे.
(२२) उदरनिर्वाह होणे - पोट भरणे.
(२३) उच्चाटन करणे - उखडून टाकणे.
(२४) नायनाट करणे - नाश करणे, नष्ट करणे.
(२५) लुप्त होणे - गायब होणे, नाहीसे होणे.
टिपा
(१) संधिप्रकाश - दिवस संपणे व रात्र सुरू होणे, या दोहोंमधील काळात असणारा मंद प्रकाश.
(२) बॉलिंग - क्रिकेट खेळामधील गोलंदाजी.
(३) चुंबक- आकर्षण शक्ती असलेला पदार्थ/ धातू.
(४) विज्ञान मंडळ - विज्ञानातील तत्त्वांची चिकित्सा करणारे मंडळ,
(५) विज्ञान कथाकार - विज्ञानातील तत्त्वांवर आधारित कथा लिहिणारे.
(६) अंतराळ - संपूर्ण अवकाश, आकाशगंगा.
(७) परग्रह - पृथ्वी सोडून इतर ग्रह.
(८) जीवसृष्टी - पृथ्वीवरील सजीव प्राणिमात्र.
(९) प्रजननक्षमता - जिवाची निर्मिती करण्याची शक्ती
स्वाध्याय
प्रश्न १. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) राजूची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :चौकस बुद्धीचा , जिज्ञासू , अतिशय चलाख , चाणाक्ष,हुशार.
(ब)राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :(१) गुळगुळीत ,खरखरीत, फुगीर व जड
(२) फेकल्यावर उड्या मारत जाणारा.
(३) प्रखर प्रकाशकिरण बाहेर फेकणारा.
(४) हिऱ्यासारखा चमकणारा.
(५) अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा.
(क) शास्त्रज्ञ डॉ. कसबे यांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती
उत्तर : (१) हा धोंडा म्हणजे परग्रहावरील सजीव प्राणी आहे. (२) मानवापेक्षा कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो.(३) सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो. (४) प्रजननक्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती करू शकतो. (५) अमेरिकेच्या एका प्रांतात हे घोडे नुकतेच सापडलेत.
प्रश्न २. हे केव्हा घडले ?
(अ) राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
उत्तर : गुळगुळीत नवीन घोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी बल लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
(ब) प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.
उत्तर : धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले, तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.
(क) राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
उत्तर : धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली, हे राजूने पाहिले. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अमल चढू लागला.
प्रश्न ३. राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्द लिहा.
उत्तर: चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब जाऊन थांबला; तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतिमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा असे दोन धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले, तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला, शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला.
प्रश्न ४. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी वरखाली दिलेल्या आहेत. त्यांचा योग्य क्रम लावा.
(१) राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला.
(२) राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉ. अनिल घोटे यांना दिले.
(३) राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
(४) राजू शाळेत गेला. त्याने डॉ. घोटे यांचे व्याख्यान ऐकले.
(५) राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला.
(६) रात्री दोन्ही धोंडे चमकत होते.
उत्तर : योग्य क्रम : (१) राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला.
(२) राजूने घोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
(३) रात्री दोन्ही धोंडे चमकत होते.
(४) राजू शाळेत गेला. त्याने डॉ. घोटे यांचे व्याख्यान ऐकले.
(५) राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला.
(६) राजूने घोंडे शास्त्रज्ञ डॉ. अनिल घोटे यांना दिले..
प्रश्न ५. पुढील सुचवलेला उतारा वाचून दिलेल्या कृती करा:
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९२ :
(त्याच दिवशी शाळेत .................... यांच्याकडे नेले.)
प्रश्न (१) उत्तरे लिहा व पूर्ण करा :
(१) शाळेत कोणाचे व्याख्यान होते?
उत्तर :शाळेत विज्ञान कथाकार श्री. अनिल घोटे यांचे व्याख्यान होते.
(२)शाळेत व्याख्यान कोणामार्फत आयोजित केले होते?
उत्तर :शाळेत व्याख्यान शाळेतील विज्ञान मंडळातर्फे आयोजित केले होते
(३) डॉ. घोटे यांनी कशासंबंधी कथा सांगितली ?
उत्तर :डॉ. घोटे यांनी अंतराळ व परग्रहावरील जीवसृष्टी विषयी कथा सांगितली .
(४ ) राजूच्या निश्चयाला पाठिंबा कोणी दिला?
उत्तर :राजूच्या निश्चयाला पाठिंबा राजूच्या बाबांनी दिला.
(५) राजूला व बाबांना डॉ. घोटे यांच्याकडे कोणी नेले?
उत्तर :राजूला व बाबांना डॉ. घोटे यांच्याकडे राजूच्या शाळेतील पाटील सर यांनी नेले.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न ;- चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा.
उत्तर : चौकसपणा, जिज्ञासू वृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे, याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती, तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या वाणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १. पुढे कंसात काही शब्द दिले आहेत त्यापैकी विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा :
( फरक , गुळगुळीत , अंधूक , स्पष्ट, साम्य , सजीव , हल्ली, नरम, निर्जीव , खरखरीत, कडक, पूर्वी )
उत्तर : (१) फरक x साम्य (२) गुळगुळीत x खरखरीत
(३) अंधूक x स्पष्ट (४) पूर्वी x हल्ली (५) कडक x नरम (६) निर्जीव x सजीव.
प्रश्न २. गटात न बसणारा शब्द लिहा :
(१) दगड, धोंडा, खडक, गोटी, गोटा.
(२) मी, तू, ते, मीना, तो.
(३) सागर, समीर, समुद्र, सिंधू, रत्नाकर.
(४) सूर्य, भास्कर, शशी, रवी, मित्र.
उत्तर:- (१) गोटी (२) मीना (३) समीर (४) शशी
प्रश्न ३. कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा :
(करडा, विचारशृंखला, अस्वस्थता, घालमेल)
(१) लेखकांची ......................... टल्यामुळे त्यांना खूप राग आला.
(२) शिक्षकांचा ......................... कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले.
(३) वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड ......................... होत होती.
(४) रामरावांची ......................... बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले.
उत्तर:- (१) विचारश्रंखला (२) करडा (३) घालमेल (४) अस्वस्थता
प्रश्न ४. खाली दिलेल्या अक्षरांमध्ये म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा :
(१) ए , ना, रा ,भ , र ,चिं ,क , ध , ड, भा , ध्या.
(२) वे, ज, ना, ऐ, का, म, ना, चे, वे, क, रा , चे.
(३) हा,णा, त्या, अ, ल, रि, का, ति, श,चा, बै, मा.
उत्तर : (१) एक ना धड भाराभर चिंध्या. (२) ऐकावे जनाचे करावे मनाचे. (३) अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
प्रश्न५. अचूक शब्द निवडून लिहा.
(१) विशीष्ट, विशिष्ट, वीशिष्ठ.
(२) कुतूहल, कुतूहल, कुतुहल..
(३) जीवसृष्टि विसृष्टी, जीवसृष्टी
(४) नैसर्गिक, नैसर्गीक ,नैसर्गिक,
उत्तर:- (१) विशिष्ट (२) कुतूहल (३) जीवसृष्टी (४) नैसर्गिक
प्रश्न ६. पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडून लिहा:
(१) लुप्त होणे - ( लोभ होणे , गायब होणे, गुप्तता पाळणे )
(२) गांगरणे - ( गोंधळणे , रडणे , गलबलणे )
(३)नायनाट करणे -( अभिनय करणे , नष्ट करणे ,नाचणे )
(४)तर्क करणे - ( चाहूल येणे , अंदाज लावणे , माहिती घेणे )
उत्तर:- (१) गायब होणे (२) गोंधळणे (३) नष्ट करणे (४) अंदाज लावणे
शुद्धलेखनाचा नियम
पुढील शब्द वाचा :
पाऊण, पाऊस, खरीप, बहीण, जमीन, मूल, रूळ, फूल, कठीण, देऊन, चूल, गरीब, सामाईक, माणूस .
वरील प्रत्येक शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवले? या प्रत्येक शब्दामधील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार नाहीत आणि शेवटून दुसऱ्या (उपान्त्य) अक्षरांतील इकार व उकार दीर्घ आहेत.
जेव्हा मराठी शब्दांतील शेवटच्या अक्षरात काना, मात्रा, वेलांटी, उकार दर्शवलेले नसतात, तेव्हा शेवटून दुसऱ्या (उपान्त्य) अक्षरांतील इकार व उकार दीर्घ लिहितात. वर दिलेल्या वर्णनानुसार शब्द-
निर्जीव, शास्त्रीय, माहीत, विहीर, समीर, मोहीम, रागीट, आक्रीत, भारूड, वारूळ.
लक्षात ठेवा : तत्सम शब्दांतील शेवटून दुसऱ्या (उपान्त्य) अक्षरांतील इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दांप्रमाणेच ऱ्हस्व लिहितात.
उदा., नुपुर, चतुर, मानसिक, गुण, मंदिर, कुसुम, तरुण, प्रिय.
शब्दसिद्धी
• शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो, त्यास 'शब्दसिद्धी' म्हणतात.
(१) तत्सम शब्द : संस्कृत भाषेतून काही शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या मूळ रूपात मराठीत आले आहेत. त्यांना तत्सम शब्द म्हणतात.
उदा :- पिता, पुत्र, कन्या, जल, पुष्प, भूगोल इत्यादी.
(२) तद्भव शब्द : संस्कृत भाषेतून मराठीत येताना काही शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो, अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात.
उदा.:- संस्कृत शब्द - ग्राम , पुष्प , दुग्ध, पर्ण, हस्त, कोमल, कर्ण
मराठी शब्द - गाव, फूल , दूध , पान , हात, कोवळा, कान
(३) देशी शब्द : जे शब्द मूळचे मराठीच आहेत, ते कुठल्याही दुसऱ्या भाषांतून मराठीत आलेले नाहीत, अशा शब्दांना देशी शब्द म्हणतात.
उदा :- डोळा, दगड, झाड, चिमणी, बाजरी, गुडघा, वांगे इत्यादी.
(४) परभाषीय शब्द: इतर भाषांतील काही शब्द मराठी भाषेत आलेले आहेत, अशा शब्दांना परभाषीय शब्द म्हणतात.
पुढील शब्द नीट अभ्यासा :
अरबी - खर्च ,मेहनत, इनाम, करार ,अर्ज, कर्ज
तेलुगू - अनारसा,चेंडू
गुजराती - डबा ,दादर , शेट , घी, रिकामटेकडा
हिंदी - दाम ,करोड, मिठाई ,सडक ,भाई
कानडी- भाकरी, विळी, ताई,अडकित्ता, गाजर
इंग्रजी - टेबल, डॉक्टर,बस ,पेन, फाइल, बॅट,फी
पोर्तुगीज -पगार ,बटाटा ,मेज ,पेरू, चावी
फारसी - पेशवा ,कारभार, सरकार ,दरबार, सामना
२. लेखन विभाग
(१) विदयार्थ्यांनो, तुम्हांला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञानकथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
नमुना उत्तर: (१) राजूने तो धोंडा पाटीलसरांना दिला. पाटीलसरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहितीफलक लिहून म्युझियममध्ये धाडला. राजूला त्या वर्षीचे भारत सरकारने शौर्यपदक बहाल केले.
(२) दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल, ते संवादरूपाने लिहा.
डॉ. कसबे : बाळा, हा धोंडा तुला कुठे सापडला ?
राजू : रस्त्यात.
डॉ. पंडित : हा तू का उचललास ?
राजू : मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते !
डॉ. कसबे : हा वेगळा दगड आहे, हे तुझ्या लक्षात कसे आले?
राजू : रात्री हा ड्रॉवरमध्ये चमकायला लागला नि दुसरा एक लहान दगडही याने निर्माण केला.
डॉ.पंडित : याचे संशोधन करणे गरजेचे आहे. शाब्बास, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या लक्षात आले. तू फार मोठी कामगिरी केलीस!
राजू : आभारी आहे, सर!
(३) तुम्हांला कोणता न कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. पुढे काही मुद्दे दिले आहेत. त्या आधारे तुमचे विचार लिहा :
तुमचा आवडता खेळ
१. हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे? (वैयक्तिक / सांघिक)
उत्तर :- सांघिक खेळ
२.हा कोणत्या स्वरूपाचा क्रीडा प्रकार आहे? (शारीरिक / बौद्धिक)
उत्तर :-शारीरिक व बौद्धिक
३. हाच खेळ तुम्हांला का आवडतो ?
उत्तर :-हा मैदानी खेळ आहे. तसेच तो मदांनी खेळ आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे. शारीरिक क्षमता पणाला लागते.
४. या खेळामध्ये किती खेळाडू असतात ?
उत्तर :- प्रत्येक संघात सात खेळाडू असतात.
५. या खेळामुळे कोणते फायदे होतात ?
(१) व्यायाम होतो. (२) शारीरिक तंदुरुस्ती राहते. (३) बुद्धीचा कस लागतो.
६. या खेळात विजयी होण्यासाठी काय आवश्यक आहे?
उत्तर :-चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड चतुराईने करता यायला हवी.
७.या खेळामधील तुमचे प्रेरणास्थान कोण आहे ?
उत्तर :-'प्रो-कबड्डी लीग'मधील मुंबई संघाचा (यू मुंबा) कर्णधार व अष्टपैलू खेळाडू - अनुपकुमार
३. तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा
राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला, त्याप्रमाणे तुम्हांला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या ?
आकारिक मूल्यमापन
१. प्रकट वाचन :
(१) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक १५ वरील सुविचारांचे प्रकट वाचन करा व अनुलेखन करा.
(२) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ९६ वरील 'मल्लखांब' या विषयीची माहिती वाचा.
२. उपक्रम :
वेगवेगळ्या लेखकांच्या विज्ञानकथा मिळवा व त्यांतील एक वर्गात सादर करा.
Comments
Post a Comment