६मराठी २१ या काळाच्या भाळावरती
२१. या काळाच्या भाळावरती
२१. या काळाच्या भाळावरती
-उत्तम कोळगावकर (पाठ्यपुस्तक पान क्र. ८१)
■ कवितेचा आशय ■
अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी एखादी गोष्ट साध्य करता येते. अडचणींना न घाबरता नवीन विचारांनी नवीन दिशा शोधून काढा, असा संदेश या कवितेत दिला आहे.
■ शब्दार्थ ■
काळ- समय, वेळ, युग.
भाळावरती - कपाळावरती.
तेज - प्रकाश.
टिळा -कपाळावर लावतात तो गोल गंध, तिलक.
फुलू दे - फळाला येऊ दे, यशस्वी होऊ दे.
श्रम - कष्ट.
मानवतेचा - माणुसकीचा.
मळा - फुललेले शेत, पिकणारे शेत.
नित्य- नेहमी, सतत.
पाही- पाहत असतोस.
साकाराया - साकार करण्यासाठी, मिळवण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी.
यत्न - सायास, प्रयत्न.
घरोघरी - प्रत्येक घरी.
समृद्धी - ऐश्वर्य, प्रगती.
खळाखळा - 'खळखळ' असा आवाज करीत.
अलगद - हळूच, हळुवार, अचूट, धक्का न लावता.
नभ - आभाळ.
झळा - गरम वाऱ्याचा झोत.
सरून - संपून.
पानकळा - पावसाळा.
तुडवित - चेपत, ओलांडून, पायाखाली घेऊन.
उजळ - प्रकाशित कर, चकाकी आण, प्रकाशमान कर.
धरेचे - धरतीचे, भूमीचे.
ललाट - कपाळ (नशीब).
दिव्य- तेजस्वी.
फत्तर- दगड, खडक.
सुवर्ण - सोने.
कळा - रूप.
झेपा - उड्या, भरारी.
नव्या दिशा- नवा मार्ग, नवा पर्याय.
नवीन वारे- नवी कल्पना.
उषा- सकाळ, प्रभात.
करणी - कर्तबगारी, कर्तृत्व, कामगिरी.
शिळा - खडक, पाषाण
निगडित - संबंधित.
■ कवितेचा भावार्थ ■
हा जो आताचा काळ आहे, त्या काळाच्या कपाळावर तू एक तेजाचा गोल टिळा लाव (या काळाला तेजस्वी कर) आणि तुझ्या अविरत कष्टांमधून माणुसकीचा मळा फुलू दे. llधृll
तू सतत नवनवीन स्वप्ने पाहा आणि ती स्वप्ने सत्यात साकारण्याचा अथक प्रयत्न कर. सूर्यफुलांच्या बागा फुलवून त्यांचा प्रकाश प्रत्येक घरात येऊ दे. खळखळ आवाज करीत संपन्नतेच्या नद्या वाहत येऊ दे.ll१ll
काट्याकुट्यांच्या अवघड वाटेवर चालत तू पुढे पुढे जा. अडचणींतून मार्ग काढ. याच वाटा तुला पाऊस दाटून आलेल्या आकाशाकडे नेतील. (म्हणजे तुझ्या कष्टांचे फळ मिळेल.) आतापर्यंत सोसलेल्या उन्हाच्या झळा (सर्व दुःखे) संपतील आणि पावसाच्या धारा तुझ्याकडे नाचत येतील. (तुला सुख मिळेल.) ll२ll
हा अंधार तुडवून, त्याला भेटून तू नवीन पहाट तुझ्या जीवनात घेऊन ये. (दुःखाच्या अंधारावर मात करून नवीन आशेची पहाट जीवनात आण.) ही पहाट आपल्या कणकण उजेडाने या धरतीचे नशीब उजळेल. (दिव्य पहाट आयुष्यात प्रकाशेल.) हा पहाटेचा प्रकाश डोंगराला, समुद्राला, इथल्या खडकांना सोन्याची सुंदर झळाळी देईल. (पहाटेमध्ये चराचराला सोन्याइतके सुंदर रूप प्राप्त होईल.) ll३ll
आभाळात उंच भराऱ्या मारून जगण्याच्या नवीन दिशा शोधून काढ, नवीन वारे आणि नवीन प्रभात तू घेऊन ये. तुझ्या कर्तृत्वाची गाणी मग या धरतीवरल्या शिळाही गातील. (तू अशी कर्तबगारी गाजव की मुके पाषाणही तुझे गोडवे गातील.) ll४ll
■ संकलित मूल्यमापन ■
१. प्रश्नोत्तरे
★ प्रश्न १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा :
(१) नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे ?
उत्तर : नवीन स्वप्ने साकारण्यासाठी या आताच्या काळावर तुझ्यातल्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाब, तुझ्या अमाप कष्टांतून या समाजात माणुसकीचा मळा फुलव. तुझ्या तेजस्वी विचारांच्या सूर्यफुलांच्या बागा फुलवून ज्ञानाचा उजेड घरोघरी पोहोचव. खळाखळा समृद्धीच्या नढ्या वाहू देत. असे प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे.
(२) पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते?
उत्तर : काट्याकुट्यांनी व अडचणींनी भरलेल्या वाटा जिद्दीने चालत पुढे पुढे गेले पाहिजे. याच वाटा माणसाला आपोआप पाऊस भरून आलेल्या आकाशाकडे घेऊन जातील, असे केल्यामुळे जेव्हा दुःखाच्या उन्हाच्या झळा संपून जातील, तेव्हा पानकळा नाचत येईल, असे कवीला वाटते.
(३) नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे ?
उत्तर : इथे दुःखाचा अंधार दाटला आहे. तो भेदण्यासाठी दुःखावर मात करून नवविचारांची पहाट आणायला हवी. या धरतीवरच्या माणसाचे ललाट उजळणारी पहाट व्हायला हवी. जुन्या बुरसटलेल्या विचारांनी दिशा कोंदलेल्या आहेत. म्हणून नवीन दिशा शोधायला कवी सांगत आहे.
• प्रश्न २. 'आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा' या ओळीचा अर्थ लिहा.
उत्तर : अज्ञानाच्या, विषमतेच्या आणि बुरसटलेल्या प्रथांच्या अंधकारात इथली मानवता झाकोळली आहे. नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी. अथक कष्टानेच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे. तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा, अशी कवीची अपेक्षा आहे.
• प्रश्न ३. पुढे काही कवितेच्या ओळी दिल्या आहेत. 'ब' त्या ओळींचा अर्थ लिहा :
(अ) सूर्यफुलांच्या फुलवी बागा
उजेड यावा घरोघरी
उत्तर :- सूर्यफुले सूर्याकडे सन्मुख असतात. जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवतात. म्हणून सूर्यफुलांच्या बागेतला प्रकाश प्रत्येक घरात यावा, असे कवीला वाटते.
(आ) काट्यांमधल्या वाटांमधुनि
चालत जा तू पुढे पुढे
उत्तर :- काट्याकुट्यांच्या वाटांमधून म्हणजेच अडचणींच्या मार्गामधून तू पुढे पुढे चालत जा. अडचणींवर मात कर.
(इ) अंधाराला तुडवित जाऊन
घेऊन ये तू नवी पहाट
उत्तर :- दुःखाचा अंधार पायदळी तुडवत जा व नवीन विचारांची सुखकारक पहाट घेऊन ये.
(ई) उंच आभाळी घेऊन झेपा
काढ शोधुनि नव्या दिशा
उत्तर :- उच्च विचारांच्या उंच आभाळात (भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे. त्यांचा तपास लाव.
मुक्तोत्तरी प्रश्न
■ (१) तुमची इतरांना मदत होईल, असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा.
उत्तर : यासाठी विदयाथ्यांनी दिलेल्या मुद्दांचा उपयोग करावा. [ मुद्दे : गरीब विदयाथ्यीच्या फी भरण्याच्या अडचणी सोडवणे
............ गरीब विद्याथ्यांना पुस्तकें व वहया पुरवणे ............ अशिक्षितांना अक्षर ओळख शिकवणे ..............आईच्या कामात मदत करणे- भावंडांना प्रेमाने वागवणे ...... वृद्धांना मदत करणे.]
■ (२) कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो, तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता?
उत्तर : (१) अज्ञान दूर व्हावे. (२) विषमता नष्ट व्हावी. (३) मानवतेचा प्रसार व्हावा. (४) कुणी दुःखी नसावे. (५) सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. (६) सर्वधर्मसमभाव नांदावा, (७) राष्ट्रीय एकात्मता साधावी. (८) बंधुभाव वाढावा इत्यादी.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा :
(१) कपाळ = भाळ (२) पृथ्वी = धरा (३) प्रयत्न = यत्ल
(४) सकाळ = उषा (५) आकाश - नभ (६) दगड = शिळा
• प्रश्न २. कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
उत्तर :- (१) टिळा - मळा (२) करी - घरी
(३) खळखळा - पानकळा (४) धरणी - करणी
(५) देऊन - जाऊन (६) पहाट - ललाट (७) दिशा - उषा
(८) नेतील - जातील
प्रश्न ३. 'कणाकणाला' म्हणजे प्रत्येक कणाला, अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा.
उत्तर : (१) घरोघरी (२) क्षणाक्षणाला (३) दारादाराला
(४) गल्लोगल्ली (५) पावलापावलाला.
★ प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा :
(१) नवी X जुनी (२) उजेड X अंधार (३) सुंदर X कुरूप
(४)अलगद X जलद (५) उंच X खोल (६) ऊन X सावली
• प्रश्न ५. नवी स्वप्ने, नवी पहाट, नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत. हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा.
उत्तरे :- (१) नवी स्वप्ने :- उज्वल भविष्य.
(२) नवी पहाट - नवे आयुष्य, नवी आशा.
(३) नव्या दिशा - नवीन मार्ग.
भूतकाळाचे प्रकार
वर्तमानकाळाप्रमाणेच भूतकाळाचे चार उपप्रकार पडतात.
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रीती भूतकाळ
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा :
(१) सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली.
(२) काल आम्ही सहलीत खूप मजा केली.
(३) केवढा मुसळधार पाऊस पडला काल.
वरील वाक्यांतील सर्व क्रिया भूतकाळात घडतात, म्हणून हा साधा भूतकाळ होय.
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा :
(१) शंतनू क्रिकेट खेळत होता.
(२) जॉन चित्र काढत होता.
(३) मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती.
असे लक्षात येते की वरील वाक्यांत खेळण्याची, चित्र काढण्याची व वाचण्याची या क्रिया भूतकाळात अपूर्ण आहेत. अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो.
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा :
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा :
(१) गिर्यारोहकाने कड़ा सर केला होता.
(२) आमच्या क्रिकेटचा सामना जिंकला होता.
(३) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चलिदान दिले होते. क्रांतिकारकांनी
वरील वाक्यांतील क्रियापदांच्या रूपांवरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय.
(१) उन्हाळ्यात ऊसतोडणी सुरू होत असे.
(२) तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे,
(३) चंटू सनई वाजवत असे.
अधोरेखित क्रियापदांवरून ऊसतोडणीची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो, म्हणून हा रीती भूतकाळ होय.
• प्रश्न ६. पुढील वाक्यांत क्रियापदांची योग्य रूपे घाला :
(१) बिरबल स्वचातुर्यान सभा जिंकतो. (जिंकणे)
(२) अभय गोष्टी लिहितो. (लिहिणे)
(३) सायकल चालवण्यामागे वीणा पर्यावरणाचा विचार करते. (विचार करणे)
• प्रश्न ७. पुढील वाक्यांत क्रियापदांची अपूर्ण भूतकाळी रूपे घाला :
Y
(१) काल पाच वाजता सोनाली शाळेतून (येणे) येत होती.
(२) वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती. (करणे)
(३) काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करीत होता. (निरीक्षण करणे)
२. लेखन विभाग
३(१) मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ-दहा वाक्यांत लिहा.
उत्तर : मानवतेचे पुजारी : बाबा आमटे
महाराष्ट्रात अनेक साधुसंतांनी, देशभक्तांनी व समाजसेवकांनी इथल्या रंजल्यागांजल्या माणसांची मनोभावे सेवा केली. त्यांत बाबा आमटे यांचे कार्य मानवतेची शान उंचावणारे आहे. मालगुजाराच्या श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या बाबांनी वकिली ठोकरून कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली. त्यांच्यासाठी वरोरा येथे स्वयंपूर्ण ' आनंदवना 'ची निर्मिती केली. झडलेल्या हातांना काम देऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभे केले. समाजाने टाकलेल्या मानवांना प्रतिष्ठा दिली, बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा हे जीवनव्रत अंगिकारले व प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून मानवतेची पूजा केली. बाबा आमटे हे मानवतेचे पुजारी होते !!
(२) या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तसे तुम्हांला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात, ते लिहा.
उत्तर : यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करावा.
[मुद्दे : (१) अभ्यास करण्यासाठी. (२) दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. (३) माणुसकी जोपासण्यासाठी. (४) विचारशील होण्यासाठी. (५) सद्गुण अंगी बाणण्यासाठी.]
■ ३. तोंडी परीक्षा ■
प्रश्न : विचार करून सांगूया.
★ सानिया आईबाबांबरोबर बाजारात गेली होती. तिला बाजारात दोन अडीच वर्षांची एक मुलगी एकटीच रडताना दिसली. तो लहान मुलगी फारच घाबरलेली होती. कदाचित ती बाजारात हरवली होती. तिला पाहून सानिया अस्वस्थ झाली. तिला काही सुचेना. आता काय करावे? तुम्ही तरी सांगा...
आकारिक मूल्यमापन
प्रकट वाचन / श्रुतलेखन / अनुलेखन :
• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ८३ वरील 'वाचा' हा उतारा वाचा, त्याचे अनुलेखन व श्रुतलेखन करा.
Comments
Post a Comment