७मराठी १०.गोमू माहेरला जाते

 १०.गोमू माहेरला जाते -  ग. दि. माडगूळकर

(पाठ्यपुस्तक पान क्र. ४५)

कवितेचा आशय : या गीतामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी कोकणातील निसर्ग व माणसे यांचे सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.

मूल्य/शिकवण/संदेश:-  महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाचा निसर्ग वेगळा व मनोहारी आहे. विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणच्या निसर्गाचा आनंद लुटावा, याची जाणीव या कवितेद्वारे देण्यात आली आहे.

गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले  , गोमू माहेरला जाते हे  'वैशाखवणवा' या मराठी चित्रपटातील हे  प्रसिद्ध गाणे आहे. या गीताचे गायक  पं. जितेंद्र अभिषेकी आणि संगीतकार दत्ता डावजेकर आहेत.  

शब्दार्थ

घोवाला  - नवऱ्याला, पतीला. 

दावा - दाखवा. 

तीर  - काठ, किनारा. 

ताटवा  - फुलझाडांचा समूह

काळजात - मनात, हृदयात. 

मापवा - मापा, मोजा. 

खोड्या -  खोडकरपणा, मस्करी, चेष्टा .

अवखळ- चंचल.

झणी - पटकन, लवकर .

गलबत - छोटी होडी, नौका. 

धरणी - धरती, जमीन. 

टिपा

(१) माहेर- वधूच्या आईवडिलांचे घर. (२) गोमू - मुलीचे (नववधूचे नाव. (३) नाखवा - होडी चालवणारा, नावाडी. (४) अबोली- फिकट शेंदरी रंगाचे सुंदर फूल.(५) शीड - होडीला दिशा मिळावी म्हणून उंच डोलकाठीला बांधलेले कापड.


कवितेचा भावार्थ

गोमू  माहेरला जाते  हो नाखवा ।

तिच्या  घोवाला कोकण दाखवा  ।।

अहो, नावाडी दादा, नुकतीच लग्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणात माहेराला जाते आहे. (ती व तिचा पती होडीत बसले आहेत.) तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा. 

दावा कोकणची  निळी निळी खाडी

दोन्ही  तीराला हिरवी हिरवी झाडी

भगवा अबोली फुलांचा ताटवा ।।१।। 

कोकणातली निळ्या पाण्याची खाडी दाखवा खाडीच्या दोन्ही काठांवर असलेली हिरवीगार झाडांची राई दाखवा, भगव्या रंगाचा अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छ दाखवा.

कोकणची माणसं साधी भोळी

काळजात त्यांच्या  भरली शहाळी 

उंची झाडांची जवळून मापवा  ।।२।। 

कोकणात राहणारी माणसे अगदी साधी, भोळी भाबडी आहेत. त्यांच्या मनात जणू कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे आहे. (म्हणजे कोकणी माणसांची मने मृदू आहेत.) किनाऱ्यावर उंचच उंच माडांची रांगआहे. त्यांची उंची जवळून मापता येईल. त्यांना माडांची झाडे दाखवा. 

सोडू् दे रे खोड्या साऱ्या 

शिडात शीर रे अवखळ वाऱ्या 

झणी धरणीला गलबत टेकवा ।।३।। 

हे अवखळ, चंचल  वाऱ्या , आता तुझा सर्व खोडकरपणा सोडून या होडीच्या शिडामध्ये ये. इकडे तिकडे न फिरता शिडात शीर म्हणजे होडी किनान्याला लागेल. पाहा, किनारा अगदी जवळ आला. आता आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकवूया. (नववधू माहेराला जायला अधीर झाली आहे.)


संकलित मूल्यमापन

१. प्रश्नोत्तरे

प्रश्न १. एका शब्दात उत्तरे लिहा :

(१) गोमूचे  माहेर - कोकण

(२) कोकणची माणसं - साधीभोळी

● प्रश्न २. पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा :

(१) कवितेचे कवी - ग. दि. माडगूळकर

(२) कवितेची भाषा -मराठी

(३) कवितेचा विषय- गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवन्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत.

(४) कवितेतील पात्र - गोमूचा नवरा , नाखवा, गोमू

(५) कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी -  निळी खाडी,  हिरवी झाडी , अबोली फुलांचा ताटवा,  उंच माड,  कोकणी माणसे

गलबत, शीड, वारा

• प्रश्न ३. कोकणची वैशिष्ट्ये लिहा:- 

उत्तर :(१) कोकणच्या खाडीच्या  पाण्याचा रंग निळा आहे.

(२) खाडीच्या किनाऱ्यावर हिरवीगर्द झाडी व उंचच उंच माड आहेत.

(३) भगव्या रंगाच्या फुलांचा अबोलीच्या ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो.

(४) कोकणातली  माणसं शहाळ्यासारखी गोड व साधीभोळी आहेत.

● प्रश्न ४. पुढील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :

(१) काळजात त्यांच्या भरली शहाळी →शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. 

(२) झणी धरणाला गलबत टेकवा→गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे  मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला (किनाऱ्याला) टेकवा म्हणजे गोमू माहेराला लवकरजाईल.

मुक्तोत्तरी प्रश्न

●● कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

 उत्तर :- कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनान्यावर नेण्यासाठी  वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडेतिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहेत.

भाषाभ्यास व व्याकरण

• प्रश्न १. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा :

     (१) नाखवा  - दाखवा   (२) खाडी -झाडी

     (३) भोळी - शहाळी (४) साऱ्या  - वाऱ्या 

• प्रश्न २. पुढील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा:

•  (१) शीड - होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड.

(२) माड - नारळाचे झाड.

(३) खाडी - भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी.

(४) शहाळी - कोवळा हिरवा नारळ.

(५) झणी - पटकन, लवकर, झटकन.

(६) गलबत - छोटी होडी, पडाव, नौका.

प्रश्न ३ एक / अनेकवचन लिहा :

एकवाचन :- शहाळे , माणूस , माड , ताटवा, गलबत

अनेकवचन :- , शहाळी , माणसे , माड ,ताटवे, गलबते

प्रश्न ४. लिंग ओळखा:

(१) खाडी - स्त्रीलिंग

(२) गलबत नपुंसकलिंग

(३) माड - पुल्लिंग

(४) धरणी- स्त्रीलिंग


उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्यांतील ठळक  शब्दांकडे नीट लक्ष द्या.  

(१) रमेश व सुरेश एकाच वर्गात आहेत.

(२) पाऊस पडला आणि अंगण ओले झाले.

(३) लवकर आवर कारण शाळेची वेळ झाली.

(४) जर पाऊस आला, तर आपण भिजू.

(५) तू भिजू नयेस; म्हणून  मी छत्री धरली.

• वरील 'व, आणि, कारण, जर-तर, म्हणून हे अधोरेखित शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे कार्य करतात. म्हणून या शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात.

'उभय' या शब्दाचा अर्थ दोन व 'अन्वय' या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे, हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. आणि, अन्, व, शिवाय, की, पण, कारण, जर-तर, म्हणून, किंवा, म्हणजे, अथवा, वा, परी, परंतु, अगर, नि, बाकी, यास्तव, सवय, तरी, जे-ते है सर्व शब्द उभयान्वयी अव्यये आहेत.

• प्रश्न ५. पुढील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा :

(१) की - तुझे काम झाले की आपण जाऊ. 

(२) म्हणून  - सहलीला जायचे; म्हणून मी आलो.

(३) पण- मी सांगितले तुला पण तू ऐकले नाहीस.

(४) परंतु • गाडी आली, परंतु महेश आला नाही.

(५) अथवा - सुनीला अथवा सुशीला यांपैकी एक मुलगी सहलीला जाईल.

(६) म्हणजे -  उत्तम गुण मिळवायचे, म्हणजे झटून अभ्यास करायला हवा.  

 • प्रश्न ६. पुढील वाक्यांतील उभयान्वयी अव्ययांना अधोरेखित करा :

(१) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.

(२) आईने काटकसर केली पण शिल्लक काही उरले नाही.

(३) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.

२. तोंडी परीक्षा

प्रश्न. पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा :

• तुमच्या परिसरातील निसर्गाविषयी पाच वाक्ये सांगा.

आकारिक मूल्यमापन

१. प्रकट वाचन :

(१) ही कविता तालासुरात मोठ्याने म्हणा.

(२) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४८ वरील   'कुपारी बोली'  

( कोकणी)   हा उतारा मोठ्याने वाचा.

२. चर्चा

• शहाळ्यातील पाणी आरोग्यदायी असते. याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा.

३. कृती :• माडाच्या झाडाचे चित्र काढून रंगवा.

४. उपक्रम :

(१) तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.

 (२) कोकणी बोलीभाषेत साहित्यलेखन करणाऱ्या विविध लेखक व कवींची माहिती मिळवा.


५. प्रकल्प :

 (१) आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजाल (इंटरनेट) वरून मिळवा व नोंद करा.

(२) आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.



Comments

Popular posts from this blog

HOME