शब्दविचार - शब्दांच्या जाती
शब्दविचार
विकारी व अविकारी शब्द
शब्द आणि पद
मागील पाठात आपण वर्ण कशास म्हणतात व त्यांचे विविध प्रकार कोणते ते पाहिले. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण 'वर्ण' असे म्हणतो व हे ध्वनी कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनींच्या या चिन्हांना 'अक्षरे' असे आपण म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पुरा अर्थ प्राप्त झाला तर आपण त्याला 'वाक्य' असे म्हणतो. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य होय. या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्द यांत थोडा फरक आहे. 'पाणी' हा शब्द; 'पाण्यात' हे पद. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्याचे जे रूप तयार होते त्यास 'पद' असे म्हणतात. पण व्याकरणात पदांनादेखील स्थूलमानाने 'शब्द' असेच म्हटले जाते. 'स्वातीने' हे पद आहे. यात मूळ शब्द 'स्वाती.' मूळ शब्दाला व्याकरणात 'प्रकृती' असे म्हणतात. 'ने' हा प्रत्यय. येथे शब्दाच्या मूळ - रूपाला म्हणजे प्रकृतीला 'ने' हा प्रत्यय लागून 'स्वातीने' हे जे रूप तयार झाले त्यास 'विकृती' असे म्हणतात. विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप. यालाच 'पद' असे म्हणतात. वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते. या शब्दांची वाक्यात कोणती कार्ये असतात ते आता पाहू :
शब्दांच्या जाती
वाक्यात जे काही शब्द येतात त्यांची कार्ये विविध असतात व या त्यांच्या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत :
१) नाम -
वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द दृश्य ,अदृश्य, प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना 'नाम' म्हणतात.
उदा. फूल, हरी, गोडी.
२)सर्वनाम-
बोलताना वाक्यात आपण नाम वापरतो. पण प्रत्येक वेळी नाम वापरणे शक्य नसते. नामा ऐवजी आपण काही शब्द वापरतो.
सर्व प्रकारच्या नामांच्याऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना 'सर्वनाम' म्हणतात.
उदा. मी, तू, हा, जो, कोण.
३) विशेषण-
जे शब्द नामांबद्दल विशेष माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना 'विशेषण' म्हणतात.
उदा. गोड, कडू, दहा .
४) क्रियापद -
जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांन 'क्रियापद' म्हणतात.
उदा. बसतो, आहे, जाईल.
५) क्रियाविशेषण अव्यय-
जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात.तसेच क्रिया कशी घडते हे सांगतात, त्यांना 'क्रियाविशेषण अव्यय' म्हणतात.
उदा. आज, काल, तेथे, फार
६) शब्दयोगी अव्यय -
जे शब्द वाक्यातील दोन नामांचा संबंध दाखवितात व नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात, त्यांना 'शब्दयोगी अव्यय' म्हणतात.
उदा.झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी, पिशवीत, टेबलावर.
७) उभयान्वयी अव्यय-
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना 'उभयान्वयी अव्यय ' म्हणतात.
उदा. व, आणि, परंतु, म्हणून, किंवा, अथवा, पण.
८) केवलप्रयोगी अव्यय-
जे शब्द आपल्या मनातील आश्चर्य तसेच तीव्र भावना व्यक्त करतात त्यांना 'केवलप्रयोगी अव्यय' असे म्हणतात.
उदा. शाबास, अरेरे, अबब.
वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे एकूण आठ प्रकार आहेत. यांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांची कार्ये आठ. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय ,केवलप्रयोगी अव्यय ह्या होत. शब्दांना
ही दिलेली नावे वाक्यातील त्या त्या शब्दांच्या कार्यांना अनुसरून दिलेल असतात.
एकच शब्द निरनिराळ्या वाक्यांत निरनिराळी कार्ये करताना आढळतो. जसे-
१) कैकयीला दशरथाने दोन वर दिले. (नाम)
२) तू त्या राजपुत्राला बर. (क्रियापद)
३) पक्षी झाडावर बसतो. (शब्दयोगी)
४) बाण खालून वर गेला. (क्रियाविशेषण)
५) वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. (विशेषण)
वरील पाच वाक्यात 'वर' हा एकच शब्द विविध कार्ये करतो म्हणून त्याला नाम क्रियापद, शब्दयोगी व क्रियाविशेषण अशी नावे दिली आहेत. क्रिकेटच्या खेळात तुम्ही पाहता ना ? एकच खेळाडू क्रीडांगणावर वेगवेगळी कामे करताना आढळतो. कधी तो 'फलंदाज' असतो तर कधी 'गोलंदाज' असतो. कधी तोच 'क्षेत्ररक्षका'चे काम करतान आढळतो, तर तोच क्वचित 'यष्टिरक्षक'ही होतो. ही जी नावे आपण त्या खेळाडूला देतो त्याच्या क्रीडांगणावरील वेगवेगळ्या वेळच्या कार्याला उद्देशून असतात. त्याचप्रमाणे व्याकरणातील ही आठ नावे शब्दांच्या त्या त्या वाक्यांतील कार्यांना उद्देशून असतात.
वाक्य हे शब्दांचे बनलेले असते हे खरे; पण वाक्यात हे जे शब्द येतात ते त्यांच्य मूळ स्वरूपात जसेच्या तसे ठेवले जात नाहीत. वाक्य होण्यासाठी त्यांच्या रूपात कधी-कधी आपण बदल करतो. असा बदल सर्वच शब्दांच्या रूपात होत नाही. काही शब्दांच्या रूपात बदल होतो तर काही शब्द मुळीच बदलत नाहीत. शब्दांच्या रूपात बदल होतो केव्हा ? तर शब्दांचे लिंग किंवा वचन बदलते तेव्हा, किंवा विभक्तीचे प्रत्यय लागतात तेव्हा. शब्दांच्या कोणत्या जातीत असा बदल होतो ते पाहू :
शब्दाचे पुल्लिंग रूप , स्त्रीलिंग रूप, एकवचन, अनेकवचन तसेच विभक्तीचे प्रत्यय जोडून शब्दांत बदल होताना दिसतात.
नाम :- मुले, मुली, मूलगा , मुलगी, मुलगे, मुलांना
सर्वनाम:- ते ,तो ,ती, त्यांना.
विशेषण : - चांगला, चांगली, चांगले ,चांगल्यांना
क्रियापद :- गातो ,गाते ,गातात ,गाण्याने.
नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार शब्दांच्या जातीत लिंग, वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होतो; पण पुढील शब्द पाहा :
१) आता, उदईक, येथे, इकडे (क्रियाविशेषणे)
२) मागे, पुढे, करिता, साठी (शब्दयोगी)
३) आणि, अथवा, परंतु, म्हणून (उभयान्वयी)
४) अरेरे, शाबास, अबब, ओहो (केवलप्रयोगी)
शब्दांच्या या वरील चार जातींत लिंग, वचन, किंवा विभक्ती यांमुळे बदल होत नाही. बदल होणे याला व्याकरणात 'विकार' असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातीपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार 'विकारी' आहेत म्हणजे ती बदलणारी आहेत. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार 'अविकारी' आहेत. म्हणजे त्यांच्या रूपात बदल होत नाही. विकारी व अविकारी यांनाच अनुक्रम 'सव्यय' व 'अव्यय' असे म्हणतात. (व्यय = खर्च, बदल) शब्दांच्या जाती पुढीलप्रमाणे :
शब्द
विकारी शब्द (सव्यय) :- नाम , सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी शब्द (अव्यय):- क्रियाविशेषण अव्यय,शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय.
अभ्यास
१) शब्द म्हणजे काय ? शब्दांच्या जाती कशा ठरविण्यात आल्या आहेत ?
२) एकाक्षरी, दोन अक्षरी व तीन अक्षरी असे प्रत्येकी पाच शब्द तयार करा व त्यांची जात कोणती ते त्यापुढे लिहा.
३) खालील वाक्यांतील प्रत्येक शब्दाची जात कोणती ते सांगा :
मी महात्माजींना प्रत्यक्ष पाहिले. त्यांच्याशी बोललो. त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला.
४) खालील वाक्यातील कोणते शब्द विकारी व कोणते अविकारी ते लिहा :
भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्यामागे टुमणे लावले होते; पण मी काही दाद दिली नव्हती.
नामांचे प्रकार व कार्य:-
नाम म्हणजे नाव. कोणत्याही खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम. सामान्यतः आपण 'वस्तू' हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या पदार्थाला उद्देशून वापरतो; पण व्याकरणात त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. 'वस्तू' या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे त्यांन व्याकरणात 'नाम' असे म्हणतात.
उदा. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, सखाराम, देव, स्वर्ग, नरक, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वत्ता.
नामांचे मुख्य प्रकार तीन :
(1) सामान्यनाम (2) विशेषनाम (3) भाववाचकनाम
(1) सामान्यनाम:-
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्यनाम' असे म्हणतात. सामान्यनाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाव आहे.
उदा. मुलगा, लेखणी, घर, शाळा, नदी.
(कळप, वर्ग, सैन्य, घड, समिती, ही समूहाला दिलेली नावे आहेत. यांना 'समुदायवाचक नामे' म्हणतात. तसेच सोने, तांबे, दूध, साखर, कापड हे संख्येशिवाय
परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून कोणी यांना 'पदार्थवाचक नामे' म्हणतात. पण मराठीत या सर्वांची गणना सामान्यनामांतच होते.)
(2) विशेषनाम:-
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास 'विशेषनाम' म्हणतात.
उदा. रामा, हरी, नलिनी, आशा, हिमालय, गंगा, भारत.
विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, तर सामान्यनाम हे जातिवाचक असते. विशेषनाम हे त्या व्यक्तीचे वा वस्तूचे स्वतःचे नाव असते; ते केवळ खुणेकरिता ठेवलेले नाव असते. सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंत असलेल्या सामान्यपणाला दिलेले नाव असते. साभान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. विशेषनाम हे त्या एकट्याचे असते.
(3) भाववाचकनाम :-
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यास 'धर्मवाचक' किंवा 'भाववाचक' नाम असे म्हणतात.
उदा. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद. पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र वेगळा असत नाही. तो कोणत्या तरी जड वस्तूच्या आश्रयाने राहतो. भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. कल्पनेने ते आहे असे मानून त्याला नाव दिले जाते.
जनन, मरण, वाल्य, तारुण्य, वार्धक्य हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवतात. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती व क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नामेच म्हणतात.
सामान्यनाम व विशेषनाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. भाववाचकनामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो. सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते; पण विशेषनामे व भाववाचकनामे ही एकवचनीच असतात.
सामान्यनामे व विशेषनामे यांना 'धर्मिवाचक' नामे म्हणतात. 'धर्मी' म्हणजे ज्यात धर्म किंवा गुण वास करतात तो.
भाववाचकनामे कशी तयार होतात?
सामान्यनामे व विशेषनामे यांना य, त्व, पणा, ई, ता, गिरी, वा, आई यांसारखे प्रत्यय लावून भाववाचकनामे तयार करतात, ते खाली पहा.
नाम /शब्द (प्रत्यय)
सुंदर (य) - सौंदर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, गांभीर्य.
मनुष्य (त्व)- मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, प्रौढत्व.
शहाणा (पण, पणा) - शहाणपण-पणा, देवपण, मोठेपण, प्रामाणिकपणा.
श्रीमंत - (ई ) श्रीमंती , गरिबी, गोडी, वकिली, लबाडी.
शांत - ( ता) शांतता ,क्रूरता, नम्रता, समता.
पाटील - (की) पाटीलकी, भिक्षुकी, आपुलकी.
गुलाम -(गिरी) गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी.
गोड -(वा) गोडवा , गारवा, ओलावा
नवल -(आई) नवलाई ,चपळाई, खोदाई, धुलाई, दांडगाई
नामांचे कार्य करणारे इतर शब्द
नाम, सर्वनाम, विशेषण ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात ती त्यांच्या त्या - त्या वाक्यांतील कार्यावरून दिली जातात हे आपण यापूर्वी पाहिले. तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी. सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम ही नावेदेखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत. सामान्यनाम हे केव्हाकेव्हा विशेषनामाचे कार्य करते, तर विशेषनाम हे सामान्यनामाचे कार्य करते. पुढील उदाहरणे पाहा: १) आत्ताच मी नगरहून पुण्यास आलो. २) आमची बेबी आता कॉलेजात जाते. ३) शेजारची तारा यंदा बी. ए. झाली.
वरील वाक्यात नगर, बेबी, तारा ही मूळची सामान्यनामे. नगर कोणतेही शहर, बेबी = लहान मूल, तारा = नक्षत्र. वरील वाक्यात ती विशेषनामे म्हणून वापरली आहेत.
२) आता पुढील उदाहरणे पाहा :
१) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
२) आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत
३) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदाम नकोत; भीम हवेत.
वरील वाक्यांतील कुंभकर्ण, जमदग्नी, सुदाम, भीम ही मूळची विशेषनामे आहेत. पण ती येथे कुंभकर्ण = अतिशय झोपाळू, जमदग्नी =अतिशय रागीट मनुष्य, सुदाम = सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मूळची विशेषनामें अशक्त मुलगे व भीम वरील वाक्यांत सामान्यनामांचे कार्य करतात.
३) पुढील वाक्ये पहा.
१) शांती ही माझ्या बहिणीची मुलगी.
२) विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
३) माधुरी उद्या मुंबईला जाईल.
वरील वाक्यांतील शांती, विश्वास, माधुरी ही गुणांना दिलेली नावे म्हणून ती मूळची भाववाचक नामे; पण वरील वाक्यांत त्यांचा वापर विशेषनामांसारखा केला आहे. भाववाचकनामे ही केव्हा केव्हा विशेषनामांचे कार्य करतात.
४) पुढील वाक्ये पाहा :
१) आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
२) या गावात बरेच नारद आहेत.
३) माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.
विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील. या वाक्यांतील विशेषनामे सामान्यनामे म्हणून वापरली आहेत.
५) पुढील वाक्ये पाहा :
१) शहाण्याला मार शब्दाचा.
२) श्रीमंतांना गर्व असतो.
३) जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.
४) जगात गरिबांना मान मिळत नाही.
वरील वाक्यांतील शहाणा, श्रीमंत, सुंदर, गरीब ही मूळची विशेषणे; पण येथे ती नामांसारखी वापरली आहेत.
६) पुढील वाक्ये पाहा :
१) आमच्या क्रिकेटपटूंची खूप वाहवा झाली.
२) त्याच्या बोलण्यात परंतूचा वापर फार होतो.
३) हरी नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.
वाहवा, परंतु, छी-थू ही मूळची अव्यये; पण वरील वाक्यात ती नामाचे कार्य करतात.
७) पुढील वाक्ये पाहा :
१) ज्याला कर नाही त्याला डर कसली ?
२) गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.
३) ते ध्यान पाहून मला हसू आले.
४) देणाऱ्याने देत जावे.
वरील वाक्यांतील कर, डर, वागणे, हसू, देणारा हे शब्द; कर, डर, वाग, हस, दे,
या धातूंपासून तयार झालेले आहेत. त्यांना घातुसाधित नामे असे म्हणतात. धातूला णे, ऊ, अ, ण हे प्रत्यय लागून नामे तयार होतात. जसे हसणे, रडू, धाव, दळण. धातुसाधित शब्द नामांसारखे योजता येतात.
वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांची कार्य करताना आढळतात. तसेच, विशेषणे, अव्यये, धातुसाधिते यांचा वापर नामांसारखा करण्यात येतो.
अभ्यास
१) खालील उताऱ्यातील नामे ओळखून ती पुढे दिलेल्या कोष्टकात भरा : मी डोक्याची गांधी टोपी काढून थाळीसारखी हातात घेतली. टोपी गर्दीपुढे धरलीआणि क्षणार्धात माझी ती टोपी नोटांनी आणि नाण्यांनी तुडूंब भरली. माझ्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. मी ती टोपी गांधींच्या समोर केली. त्यांनी तिला स्पर्श केला.
नामे
सामान्यनाम :-
विशेषनाम :-
भाववाचकनाम :-
२) पुढील विशेषणांचा नामांसारखा वाक्यात उपयोग करा : नकटी, दुष्ट, पांढरा, आंधळा, आळशी, लबाड, भित्रा, म्हातारा.
३) पुढील विशेषनामांचा सामान्यनामांसारखा वाक्यात उपयोग करा. :
कर्ण, सॅन्डो, शिवाजी, आनंदीबाई, दुर्वास, बाजीराव, नेपालियन, गंगायमुना.
४) पुढील सामान्यनामांचा विशेषनामांप्रमाणे वाक्यात उपयोग करा. :
कालिदास, गीतांजली, पुरी, दौलत, कुंकू, झेंडूची फुले, पराग.
५) पुढील शब्दांना प्रत्यय लावून भाववाचकनामे तयार करा व ती वाक्यात वापरा :
थोर, उदार, मित्र, हुशार, वक्ता, जादू, रसिक, नवीन.
६) पुढील शब्दांना प्रत्यय लावून भाववाचकनामे तयार करा व ती वाक्यात वापरा:
वाच, गा, फसव, हस, जळ, पाठव, ओढ.
Comments
Post a Comment