८मराठी १६.चोच आणि चारा
१६. चोच आणि चारा
मकरंद जोशी
प्रस्तावना
मकरंद जोशी हे सहल संयोजक, पर्यावरणप्रेमी आणि प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ' प्रवास एका प्रवासाचा' हे केसरी पाटील या सहल उद्योजकांचे आत्मकथन, दोन ध्रुवांवर दोन पावले' हे प्रवासवर्णन, पर्यटन मार्गदर्शक मालिका' ही पर्यटन विषयावरील पुस्तके; 'घर श्रमिकांचं' हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विविध नियतकालिकांमध्ये पर्यटन, पर्यावरण या विषयांवर आणि अन्य प्रासंगिक विषयांवर विविध प्रकारचे लेखन प्रसिद्ध.
• माणसाला अन्य प्राण्यांविषयी विलक्षण कुतूहल आहे. या सगळ्या प्राण्यांमध्ये पक्षी हे माणसाच्या अधिक निकट वावरणारे प्राणी आहेत. त्यामुळे पक्ष्यांविषयी माणसाला नेहमीच आपुलकी आणि कुतूहल वाटत आले आहे. या पाठात लेखकांनी पक्ष्यांविषयी खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे. पक्ष्यांचा अधिवास आणि त्या परिसरातील उपलब्ध अन्न यांच्या अनुषंगाने पक्ष्यांची चोच घडलेली दिसून येते. याच भिन्न-भिन्न प्रकारच्या चोची, त्यांचे कार्य आणि पक्ष्यांच्या हालचालींमध्ये होणारा त्यांचा उपयोग यांची माहिती या पाठात प्रसन्न शैलीत मांडलेली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
१. पक्ष्यांची चोच म्हणजे त्यांचे हात, पाय, दात, ओठ, सर्व काही आहे. फक्त खाण्यापिण्यासाठी तोंड म्हणजे चोच एवढेच चोचीचे वर्णन योग्य होणार नाही. त्याखेरीजही अन्य अनेक कामे चोचींच्या साहाय्याने पक्षी पार पाडतात.
२. साधारणपणे पक्षिनिरीक्षण करताना पक्ष्यांचा रंग, त्यांची उडण्याची व बसण्याची पद्धत आणि चोचींचा आकार या गोष्टी बघण्याची रीत आहे. चोचींवरून त्यांचे भक्ष्य कोणते आणि त्यांच्या घरट्यांचा आकार कोणता यांचा अंदाज बांधता येतो.
३. पक्ष्याच्या चोचीचे दोन भाग होतात. वरचा भाग आणि खालचा भाग. चोचीवर सुरुवातीला दोन लहान छिद्रे असतात. ते त्यांचे श्वसनेंद्रिय होय.
४. बहुतेक सर्व पक्ष्यांची पिल्ले अंड्यांत असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक चिमुकला दात उगवतो. दातांनी पिल्ले अंड्याचे कवच फोडतात. किवी पक्ष्याच्या पिल्लांना असा दात नसतो. ती पिल्ले पायांनी कवच फोडतात.
५. धनेश पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. गुलाबी शेंदरी रंगाच्या फ्लेमिंगोची चोच मध्येच थोई वाकडी असते. गरुड, घार, ससाणा यांची चौ अणकुचीदार असते. त्यांच्या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब असतो आणि टोकाशी बाकदार असतो. सुतार व हुप्पो यांची चोच सरळसोट असते. चिमुकल्या शिंजीर पक्ष्याची चोच बाकदार, लांब व पातळ असते. तर पोपटाची चोच बाकदार आणि जाडसर असते. खंड्या पक्ष्याची चोच सरळसोट टोकदार असते. वेड्या राघूची चोच तर सरळ आणि लांब असते. सुगरण किंवा बाया पक्ष्याची चोच चिमुकली असते. शिंपी पक्ष्याची चोच एखादया सुईसारखी आणि टोकदार असते.
६. पक्षी हा प्राण्यांच्या साखळीतील एक कडी आहे. एक कडी निखळून पडली तर प्राण्यांची साखळीच उद्ध्वस्त होईल. म्हणून निसर्गाने त्यांना जगण्याची सर्व आयुधे दिलेली आहेत. चोच हे त्यातले प्रमुख आयुध आहे. अधिवास आणि अन्नाची सोय यांनुसार त्यांच्या चोचीचा आकार ठरतो आणि ते जगण्यास समर्थ ठरतात.
शब्दार्थ
नजाकत -सुबकपणा
कलाकुसर -नक्षीकाम.
टीप
उत्क्रांती : सजीवांची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्यात प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत. हे सजीव पूर्वी होते तसेच राहिलेले नाहीत. त्यांच्यात सूक्ष्मपणे व वर हळूहळू निसर्गनियमांनुसार बदल घडत घडत आले आणि त्यांना आजचे रूप प्राप्त झाले आहे. या बदल घडण्याच्या प्रक्रियेला उत्क्रान्ती म्हणतात. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.
पाठावरील प्रश्नांसाठी...
प्रश्न. पुढील उतारा वाचा सूचनांनुसार कृती करा :
उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७२) 'तिची उलूशीच चोच, ....... ........... ........ ....... वेगवेगळे अर्थ असतात.
कती १ : (आकलन कृती)
(१) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(i) उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल लिहा.
उत्तर:-कालसुसंगत , उपयोग , आवश्यक
(ii)पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी कोणत्या ?
उत्तर:- पक्ष्यांचा रंग , उडण्याची किंवा बसण्याची पद्धत
चोचींचा आकार
(iii) उताऱ्यात आलेले चोचींचे विविध उपयोग लिहा.
उत्तर:- चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे.
बिया फोडणे. शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणे.
घरटे बांधणे. पिल्लांना भरवणे. झाडावर किंवा वेलीवर लटकणे.
(२) कुठे ते लिहा :
(i) माणसाचे श्वसनेंद्रिय:
(ii) पक्ष्याचे श्वसनेंद्रिय :
उत्तर:- (i) तोंडाच्या वर (ii) चोचीच्या वर
(३) कशाच्या साहाय्याने ते लिहा :
(i) माणूस अन्नपदार्थ गोळा करतो.
पक्षी अन्नपदार्थ शोधतो
(ii) माणूस बिया फोडतो
पक्षी बिया फोडतो
(iii) माणूस खाद्यपदार्थाचे तुकडे करतो
पक्षी खाद्यपदार्थाचे तुकडे करतो
(iv) माणूस फांदीला लटकतो
पक्षी फांदीला/वेलीला लटकतो
(v) माणूस झाडावर चढतो
पक्षी झाडावर चढतो
(vi) माणूस घर बांधतो
पक्षी घरटे बांधतो
(vii) माणूस बाळाला अन्न भरवतो
पक्षी पिल्लाला अन्न भरवतो
उत्तर:- (i) हात, चोच (ii) दात, चोच (iii) दात, चोच
(iv) हात, चोच (v) हात व पाय, चोच व पाय
(vi) हात, चोच (vii) हात, चोच.
कृती २ : (आकलन कृती)
(१) एका शब्दांत उत्तर लिहा :
(i) चोचीचा वरचा भाग -
(ii) चोचीचा खालचा भाग -
(iii) पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला असलेली दोन
लहान छिद्रे -
(iv) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग -
(v) 'एग टूथ' नसलेला पक्षी -
उत्तर:-(i) मॅक्सिला. (ii) मॅन्डिबल. (iii)श्वसनेंद्रिये
(iv) एग टूथ. (v)किवी.
(२) किवी पक्षी आणि इतर पक्षी यांच्यातील फरकाचे दोन मुद्दे लिहा .
किवी पक्षी
(i) एग टूथ नसतो.
(ii) पिले पायांनी अंड्याचे फोडतात.
इतर पक्षी
(i) पिलांना एग टूथ असतो.
(ii) पिले एग टूथने अंड्याचे कवच फोडतात.
(३) कोण ते लिहा :
(i) पायांनी अंड्याचे कवच फोडतात :
(ii) एग टूथने अंड्याचे कवच फोडतात :
(iii) स्वतःच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात :
उत्तर:-(i) किवी पक्ष्यांची पिले.
(ii)किवी खेरीज अन्य पक्ष्यांची पिले.
(iii)स्टॉर्क पक्षी.
कृती ३ : (व्याकरण कृती)
(१) सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा :
(i) बारीक बारकाई: गोल :
(ii) रचणे रचना :: करणे :
उत्तर:- (i) गोलाई. (ii) कार्य.
(२)" सर्वसाधारणपणे " या शब्दातील अक्षरांपासून जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करा :
उत्तर:- ससा, सर, सण, साधा, सार, साप, घार, पाप, रस, रसा, रण, पर्व, पसा, पर, पण.
(३) पुढील अर्थांचे उताऱ्यातील शब्द शोधून लिहा :
ii) स्वाभाविक (ii) खादय (iii) हस्त (iv) पाय.
उत्तर:- (i) स्वाभाविक - नैसर्गिक (ii) खादय - अन्न
(iii) हस्त - हात (iv) पाय लाथा.
कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती)
• हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात आलेले विचार लिहा.
उत्तर : चोच आणि चारा या पाठातील हा उतारा आहे. वेगळ्या प्रकारची नवीन माहिती मला या पाठातून मिळाली. त्याचा खूप आनंद झाला. तसे पाहिले तर मी लक्षावधी वेळा पक्षी पाहिले आहेत. पण लक्षपूर्वक त्यांना कधीच पाहिले नव्हते, हा पाठ वाचला मात्र आणि पक्ष्यांबद्दल मला नवीनच दृष्टी मिळाली. त्यांच्या चोचींच्या वेगवेगळ्या आकारांकडे माझे लक्ष गेले. त्या आकारांचे महत्त्वसुद्धा मला कळले. त्यांच्या चोचींचा आकार कळला, तर त्यांचे खादय कळते आणि त्यांच्या घरट्यांचा आकारही कळतो, हे याआधी कधी जाणवलेच नव्हते. पक्षी निसर्गाचा समतोल साधतात, ते आपल्यासारखेच आहेत. आपले मित्रच आहेत.
उतारा क्र. २ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७३ व ७४)
चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण ........ ............ .......... .......
.......... ........... ......... ... अर्थ ध्यानात आला असेल.
प्रश्न : सुचवलेला उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १ : (आकलन कृती)
(१) कोण ते लिहा :
(i) अग्निपंख' हे नाव सार्थ करणारा पक्षी
(ii) चोचीचा सर्वांत वेगळा उपयोग करणारा पक्षी
(iii) ' शक्करखोरा' म्हणून ओळखले जाणारे पक्षी
(iv) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी
उत्तर:-(i) फ्लेमिंगो
(ii) पोपट
(iii) शिंजीर
(iv)सुगरण किंवा बाया.
(२) पुढील कृती पूर्ण करा:
चोचीच्या वैशिष्ट्यानुसार कार्य सांगा
वैशिष्ट्य
(i) अणकुचीदार
(ii) सरळसोट
(ii) शरीरापेक्षा लांब, पातळ बाकदार
(iv) पोपटाची जाडसर, बाकदार चोच
(v) वेड्या राघूची सरळ व लांब चोच
उत्तर :- चोचीच्या वैशिष्ट्यानुसार कार्य
(i) शिकार घट्ट पकडणे; तिचे तुकडे करणे.
(ii)जमिनीवरचे, खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढणे; मासे पकडणे,
(iii) फुलांमधील मध शोषून घेणे.
(iv) शेंगा किंवा लांब बिया फोडणे; डहाळी पकडून पुढे जाणे.
(v) उडणाऱ्या माश्या वा टोळ पकडणे.
कृती २ : (आकलन कृती)
• पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्यांचे वैशिष्ट्य लिहा.
उत्तर:- पक्षी आणि वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
(१) धनेश (हॉर्नबिल) :- वैशिष्ट्यपूर्ण आकाराची चोच.
(२) फ्लेमिंगो : - गुलाबी, शेंदरी रंग, भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी; चोच मध्येच वाकडी.
(३) गरुड, ससाणा , घार:- - सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. शिकार घट्ट पकडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार व अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो.
(४) सुतार, हुप्पो:- सरळसोट चोच: जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात.
(५) शिंजीर (शक्करखोरा), सनबर्ड्स :- बाकदार, पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते. चिमणीपेक्षाही लहान. फुलाच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतो.
(६) पोपट :- जाडसर, बाकदार चोच. शेंगा, तिळाएवढ्या लहान बियासुद्धा सहज फोडून खातो. डहाळयांवरून चालताना डहाळीला पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतो.
(७) खंड्या:- चोच सरळसोट असते. उडता उडता पाण्यात सूर मारून माशांना अचूक पकडतो.
(८) वेडा राघू :- कीटकांवर, विशेषतः माश्यांवर उदरनिर्वाह करतो. उडत्या माश्या, टोळ पकडता यावेत म्हणून चोच
लांब व सरळ असते.
(९) सुगरण/बाया :- नजाकतदार, कलाकुसर केलेले घरटे विणतात.
(१०) शिंपी :- पाने शिवून घरटे तयार करतो. चोच सुईसारखी पातळ व टोकदार असते.
कृती ३: (व्याकरण कृती)
(१) धनेश = धन +ईश अशा प्रकारे अन्य दोन शब्द विग्रहांसहित लिहा.
उत्तर:- (i) रमेश = रमा + ईश
(ii) गणेश = गण+ईश.
(२) अणकुचीदार यासारखे 'दार' प्रत्यय असलेले अन्य
चार शब्द लिहा.
उत्तर:- (i) बाकदार (ii) टोकदार
(iii) नोकदार (iv) भांडवलदार.
(३) सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा :
(i) माशी : : माश्या : : माश्यांना
उशी : :
(ii) रशी : :
कळशी : :
उत्तर:- (i) माशी : : माशा : : माश्यांना
उशी : : उश्या : : उश्यांना,
(ii) रशी : : रश्या : :रश्यांना
कळशी : : कळश्या : : कळश्यांना.
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
● पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा :
(१) चोचींचे आकार भक्ष्यांप्रमाणे बदलतात, या विधानाचा अर्थ.
उत्तर : चोचींचे आकार भक्ष्यांप्रमाणे बदलतात, हे विधान खरे आहे. आपण पक्ष्यांचे निरीक्षण केले, तर हे म्हणणे सहज पटेल. आता हेच बघा, सापापासून ते अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार पक्ष्यांची . शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत, यासाठी चोच अणकुचीदार व टोकाजवळ बाकदार असते. शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व असतो. त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते. उडता उडता माश्या, टोळ पकडता यावेत, यासाठी वेडा राघू पक्ष्याची चोच सरळ व लांब असते. सुतार व हुप्पो पक्ष्यांची चोच सरळसोट असते. अशा चोचींमुळे जमिनीवर किडे व झाडाच्या खोडामधले किडे शोधून काढणे पक्ष्यांना सुलभ बनते. अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच समीकरण तयार झाले आहे.
(२) पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.
उत्तर : खरे सांगायचे तर हा पाठ वाचल्यावरच मला पक्ष्यांबद्दल नीट माहिती मिळाली. पक्ष्यांच्या पिल्लांना 'एग टूथ' असतो, हे तर मला आत्ताच कळले. पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच . माणसांचे नाक त्यांच्या तोंडाच्या वर असते. पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात. पक्ष्यांमध्येही अशीच रचना असावी, असे मला वाटू लागले आहे. पक्षी चोचीने अन्न खातात, हे मला दिसत होते. चोचीने ते आणखीही काही कृती करतात, हेही दिसायचे. पण खास लक्ष गेले नव्हते. हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की, चोच म्हणजे त्यांचा हातच. किती कामे करतात ते चोचीने. शिंजीर पक्ष्याची मध शोषून घेण्याची कृती कळल्यावर तर मला तो पक्षी बघावा असे वाटू लागले. सुगरण पक्ष्याचे घरटे मी पाहिले होते. शिंपी पक्ष्याचे घरटे पाहिलेले नाही. शिपी पक्ष्याच्या घरट्याबद्दल मिळालेली माहिती मला नवीनच आहे. शिंप्याचे घरटे मी नक्की पाहणार आहे.
(३) 'ज्याने चोच दिली तो चाराही देतो, या म्हणीच अर्थ,
उत्तर: या विश्वात लहान-मोठे अगणित जीव आहेत. या सर्व जीवांची एक साखळीच आहे. एक प्रकारचा जीव नष्ट झाला, तर सर्व जीवांना धोका निर्माण होतो. साखळी तुटते. म्हणून निसर्ग सर्व जीवांचे रक्षण करतो. या अर्थानेच ज्याने चोच दिली तो चाराही देतो' ही म्हण आलेली आहे. पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खादय एकच असते, तर त्यांना खादय अपुरे पडले असते. त्यांची उपासमार झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या
पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खादय मिळू शकते. म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला. अन्न दिले. हाच त्या म्हणीचा अर्थ आहे.
व्याकरण व भाषाभ्यास
१. अलंकार
● पुढील ओळींतील अलंकार ओळखा :
(i) माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार
(ii) मुलांनी मातेला मनोमन स्मरावे
(ii) सुगरणीचे घरटे जणू झोकाच आसमंती
(iv) चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान, भारत देश महान
उत्तर : (i) उपमा अलंकार (ii) अनुप्रास अलंकार
(iii) उत्प्रेक्षा अलंकार (iv) यमक अलंकार
२. व्याकरण :
(१) संधिविग्रह करा :
सूर्योदय =
तत्कालीन =
चांगलेसे =
बहिरंग =
उत्तर :
सूर्योदय = सूर्य + उदय
तत्कालीन = तत् + कालीन
चांगलेसे = चांगले + असे
बहिरंग = बहिः + अंग
(२) संधी करा :
हात + आळू =
दु: + गुण =
दिक् + दर्शक =
सु+ अल्प =
उत्तर : दुः + गुण = दुर्गुण
हात + आळू = हाताळू
सु+ अल्प = स्वल्प
दिक् + दर्शक = दिग्दर्शक
(३) पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व विग्रह करा :
(i) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
(ii) त्या शहरात जागोजागी बागा आहेत.
(iii) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.
उत्तर: (i) यथाशक्ती - शक्तीप्रमाणे
(ii) जागोजागी - प्रत्येक जागेवर
(iii) आमरण - मरणापर्यंत.
(४) पुढील विग्रहांपासून सामासिक शब्द तयार करा :
(i) प्रत्येक गावी.
(ii) जन्मापासून -
(iii) प्रत्येक पावलावर -
उत्तर : (i) गावोगावी (ii) आजन्म (iii) पावलोपावली.
(५) पुढील वाक्यांतील सामासिक शब्द शोधून विग्रह करा :
(i) अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.
(ii) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
(iii) या सप्ताहात क्रीडामहोत्सव आहे.
उत्तर : (i) तोंडपाठ - तोंडाने पाठ.
(ii) महाराष्ट्र - महान असे राष्ट्र.
(iii) सप्ताह - सात दिवसांचा (आह) समूह.
(६) पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
(i) राजपुत्र (ii) क्रीडांगण (iii) अष्टकोन - (iv) अयोग्य
उत्तर : (i) राजपुत्र - राजाचा पुत्र
(ii) क्रीडांगण - क्रीडेसाठी अंगण
(iii) अष्टकोन - आठ कोनांचा समूह
(iv) अयोग्य - योग्य नाही असे.
(७) पुढील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा :
(i) सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात..
(ii) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.
(iii) तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.
(iv) घार आपली शिकार घट्ट पकडते.
उत्तरे :- (i) आरामात (ii) अचूक (iii) बारकाईने (iv) घट्ट.
३. शब्दसंपत्ती :
• (१) पुढे दिलेल्या शब्दांसाठी योग्य विशेषणे सुचवा व
त्याखालील चौकटीत लिहा :
(i) गुलाब
(ii) मोर
उत्तर:- (i) सुंदर / टपोरा/मनोहर
(ii) डौलदार/रंगीबेरंगी/ निळाभोर
(२) विशेषणे-विशेष्ये जोड्या लावा :
नैसर्गिक उत्तम वाकडी उदाहरण चोच
कठीण परिस्थिती कवच
उत्तर:- (i) नैसर्गिक - परिस्थिती
(ii) उत्तम - उदाहरण
(iii) कठीण - कवच
(iv) बाकदार - चोच
(३) 'दार' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर : बाकदार , टोकदार , अणकुचीदार , नजाकतदार
(४) 'सं' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
जसे संरचना :
उत्तर : संपूर्ण , संसार , संगीत , संन्यास
(५) गटात न बसणारा शब्द लिहा :
(i) गरुड, ससाणा, ससा, घार, पोपट,
(ii) साप, पाल, सरडा, सुतार, खेकडा,
उत्तरे : (i) ससा (ii) सुतार,
(६) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
उदरनिर्वाह
जमिनीवरचे
उत्तर : उदरनिर्वाह - दर , उर ,उदर, निर्वाह
जमिनीवरचे → जमिनी, वर , जर , नीर
४. लेखननियमांनुसार लेखन :
(१) अचूक शब्द शोधा :
(i) वैश्वीक/वैश्विक / वैश्वीक/वेश्विक.
(ii) विपरित / वीपरित / विपरीत/वीपरीत.
(iii) वैयक्तिक / वैयक्तीक/ वेयक्तिक / वे यक्तीक.
(iv) वैशीष्ट्य/वैशीष्ठ/वैशिष्ट्य / वैशिष्ठ.
उत्तर : (i) वैश्विक (ii) विपरीत
(iii) वैयक्तिक (iv) वैशिष्ट्य.
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. :
(i) नैर्सगीक परीस्थीतीमध्ये टिकुन राहताना प्राण्यांच्या शरिरात बदल झाले.
(ii) शींपी पक्षाची चोच एखादया सूइसारखी पातल असते.
उत्तर : (i) नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल झाले.
(ii) शिंपी पक्ष्याची चोच एखादया सुईसारखी पातळ
असते.
५. विरामचिन्हे
• पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा :
(i) या 'तर ' वरही उत्तर आहे.
(ii) वरचा भाग - मॅक्सिला आणि खालचा भाग मॅन्डिबल!
उत्तर:- : (i) ' ' एकेरी अवतरणचिन्ह
. पूर्णविराम
(ii) - संयोगचिन्ह
! - उद्गारचिन्ह.
६. वाक्प्रचार :
पुढील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ निवडा :
(i) उदरनिर्वाह करणे
(१) पोट भरणे (२) बदल करणे (३) पायपीट करणे.
(ii) अंदाज बांधणे -
(१) नीट वागणे (२) अचूक निदान करणे (३) सहमत होणे.
उत्तर : (i) पोट भरणे (ii) अचूक निदान करणे.
७. म्हणी :
पुढील म्हणी पूर्ण करा :
(१) मूर्ती लहान, पण ..........................................
(२) शितावरून ..........................................
(३) सुंठीवाचून ..........................................
(४) .......................................... सोंगे फार
(५) .......................................... खळखळाट फार
(६) दोघांचे भांडण ..........................................
(७) .......................................... सव्वालाखाची
(८) .......................................... चुली
(९) .......................................... आंबट
(१०) अंथरूण पाहून ..........................................
(११) इकडे आड ..........................................
(१२) .......................................... गावाला वळसा
(१३) ......................................... तळे साचे
(१४) .......................................... उपाशी
(१५) .......................................... आरसा कशाला ?
उत्तरे : (१) मूर्ती लहान, पण कीर्ती महान.
(२) शितावरून भाताची परीक्षा.
(३) सुंठीवाचून खोकला गेला.
(४) रात्र थोडी सोंगे फार..
(५) उथळ पाण्याला खळखळाट फार.
(६) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
(७) झाकली मूठ सव्वालाखाची.
(८) घरोघरी मातीच्या चुली.
(९) कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
(१०) अंथरूण पाहून पाय पसरावे.
(११) इकडे आड तिकडे विहीर.
(१२) काखेत कळसा गावाला वळसा.
(१३)थेंबे थेंबे तळे साचे.
(१४) दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
(१५) हातच्या कांकणाला आरसा कशाला ?
तोंडी परीक्षा
(१) तुमच्या लक्षात आलेली पक्ष्यांची वैशिष्ट्ये सांगा.
(२) पक्ष्यांच्या चोचीचे महत्त्व समजावून सांगा.
आकारिक मूल्यमापन
• अधिवास आणि अन्नाची उपलब्धता या मुद्द्यांच्या आधारे 'चिमण्या सध्या कमी का दिसतात' या विषयावर वर्गात चर्चा करा.
२. उपक्रम
(१) या पाठातील, तसेच इतर पाठांतील म्हणी शोधा. त्यांचा लेखनात उपयोग करा. वर्गात वाचून दाखवा.
(२) तुमच्या परिसरात आढळणारा कोणताही पक्षी निवडा आणि त्याचे रोज १५-२० मिनिटे निरीक्षण करून पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा. ती संकलित करा. हा अहवाल वर्गात वाचून दाखवा. (i) रंग व आकार (ii) उडण्याची, बसण्याची व झेपावण्याची रीत (iii) अन्न मिळवणे व खाणे (iv) चोचीचा आकार व या आकाराचा अन्न मिळवण्यासाठी व घरटे बांधण्यासाठी होणारा उपयोग.
https://m.facebook.com/208027499275074/
स्कॉलरशिप प्रश्न (16 . चोच आणि चारा)
प्रश्न (1) 'चोच आणि चारा' या पाठाचे लेखक कोण?
(1) मकरंद जोशी (2) वि.वा.शिरवाडकर
(3) कैलास दौंड (4) द.ता. भोसले
प्रश्न (2) पक्ष्यांच्या चोचीचे आकार आणि रूपे कशावरून बदलतात?
(1) पक्ष्यांचा जन्म आणि विहार. (2) पक्ष्यांचे उड्डाण आणि झेप. (3) अधिवास आणि अन्नाची उपलब्धता.(4) परिसर आणि घरटे .
प्रश्न (3) "तिची उलूशीच चोच, तेच दात तेच ओठ"असे सुगरण पक्षाचे वर्णन कोणी केले आहे ?
(1) गोदावरी परुळेकर (2) शांता शेळके (3) सुनंदा भावसार (4) बहिणाबाई चौधरी
प्रश्न (4) पक्षी चोचीचा उपयोग कशाकशासाठी करतात?
(अ) बिया फोडणे व वेलींना लटकणे.
(ब) पिलांचे संरक्षण करणे व अंडी उबवणे.
(क) घरटे बांधणे व पिलाना भरवणे.
(1) अ व ब बरोबर. (2) ब व क बरोबर.
(3) अ व क बरोबर (4)अ ,ब,क बरोबर
प्रश्न (5) पक्षी निरीक्षण करताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे?
(1) पक्षांचा रंग व उडण्याची पद्धत. (2) चोचीचा रंग व अधिवास. (3) पक्षांचे भक्ष्य व घरट्याचा प्रकार. (4) पक्ष्यांचे रंग, चोचीचा आकार, बसण्याची व उडण्याची पद्धत
प्रश्न (6) चोचीच्या वरच्या भागाला काय म्हणतात?
(1) मॅक्सिला (2) मॅन्डिबल (3) एग टूथ (4) श्वसनेंद्रिय
प्रश्न (7) चोचीच्या खालच्या भागाला काय म्हणतात ?
(1) मॅक्सिला (2) मॅन्डिबल (3) एग टूथ (4) श्वसनेंद्रिय
प्रश्न (8) पक्षांना श्वसनेंद्रिय कोठे असते?
(1) चोचीच्या वर (2) चोचीच्या खाली (3) चोचीच्यासमोर (4)चोचीच्या बाजूला
प्रश्न (9) किवी पक्ष्यांमध्ये बाह्य श्वसनेंद्रिय कोठे असतात ?
(1) चोचीच्या वर (2) चोचीच्या खाली (3) चोचीच्या टोकावर (4) चोचीच्या बाजूला
प्रश्न (10) 'एग टूथ' म्हणजे काय ?
(1) अंड्यात असलेला दाता सारखा भाग (2) चोचीच्या वरचा भाग (3) चोचीचा खालचा भाग (4)पक्षी अंड्यात असताना चोचीच्या टोकावर असणारा दातासारखा भाग
प्रश्न (11) 'एग टूथ' केव्हा उगवतो ?
(1) पूर्ण वाढ झालेल्या पक्षाच्या चोचीवर. (2) अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर. (3) अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर. (4)पक्षी अंड्यातून बाहेर आल्यावर.
प्रश्न (12) 'एग टूथ' चा पक्ष्यांना उपयोग कशासाठी होतो?
(1) अंडी फोडण्यासाठी (2) अन्न फोडण्यासाठी (3) भक्ष्य पकडण्यासाठी (4) अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येण्यासाठी.
प्रश्न (13) मॅक्सिला कशास म्हणतात ?
(1) चोचीचा खालचा भाग (2) चोचीचा वरचा भाग (3) चोचीवर येणारा दाता सारखा भाग (4) चोचीवरील बाह्य श्वसनेंद्रिय
प्रश्न (14) मॅन्डिबल कशास म्हणतात ?
(1) चोचीचा खालचा भाग (2) चोचीचा वरचा भाग (3) चोचीवर येणारा दाता सारखा भाग (4) चोचीवरील बाह्य श्वसनेंद्रिय
प्रश्न (15) 'एग टूथ' कोणत्या पक्षाला नसतो ?
(1) सुगरण (2) फ्लेमिंगो (3) किवी (4)हॉर्नबिल
प्रश्न (16) फ्लेमिंगो कोणत्या नावाने ओळखतात ?
(1) अग्निपंख (2) धनेश (3) हॉर्नबिल (4)शक्करखोरा
प्रश्न (17) शिकारी पक्ष्यांची चोच ...................... असते.
(1)अणकुचीदार (2) सरळसोट (3)चपटी (4)लांब नळीसारखी
प्रश्न (18) जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडात दडलेले किडे .................. पक्षी खातात .
(1) पोपट व घार (2) सुतार व हुप्पो (3) तितर व कावळा (4) बगळा व मोर
प्रश्न (19) 'सनबर्ड' या पक्षाला काय म्हणून ओळखतात?
(1) शिंजीर (2) अग्निपंख (3) रोहीत (4)धनेश
प्रश्न (20) 'शिंजीर' या पक्षाचे मुख्य अन्न कोणते ?
(1) मधुरस (2) जमिनीवरचे किडे (3) मासे (4)फळे
प्रश्न (21) पोपटाला त्याच्या चोचीचा उपयोग नेमका कशासाठी होतो?
(1) घरटे बांधण्यासाठी (2) किडे खाण्यासाठी
(3) शेंगा व बिया फोडण्यासाठी (4)शिकार करण्यासाठी
प्रश्न (22) डहाळीवरून चालताना चोचीचा उपयोग पायासारखा करणारा पक्षी कोणता?
(1) घार (2) सुगरण (3) पोपट (4)खंड्या
प्रश्न (23) खंड्या पक्षाची चोच ............... असते.
(1) सरळसोट व टोकदार (2) अणकुचीदार व बाकदार
(3)लांब व बाकदार (4)सरळसोट आणि चपटी
प्रश्न (24) खंड्या पक्षाचे मुख्य अन्न कोणते ?
(1) मासे (2) बिया (3) शेंगा (4)फळे
प्रश्न (25) शिंपी पक्षाची चोच कशी असते ?
(1) अणकुचीदार आणि बाकदार (2) सरळसोट आणि लांब (3) सरळसोट आणि बाकदार (4)सुईसारखी पातळ आणि टोकदार
प्रश्न (26) पक्ष्यांचे मुख्य शस्त्र कोणते ?
(1) पंख (2) चोच (3) नख्या (4) अंडी
प्रश्न (27) 'ज्याने चोच दिली तो चाराही देतो' या म्हणीचा नेमका अर्थ काय असेल?
(अ) चोची प्रमाणे चारा मिळतो
(ब) अन्ना प्रमाणे चोचीची रचना बदलते
(क) अधिवास व अन्नानुसार चोचीची रचना असते
(1) अ व ब बरोबर. (2) ब व क बरोबर.
(3) अ व क बरोबर. (4) अ ,ब,क बरोबर.
प्रश्न (28) "तिची उलूशीच चोच, तेच दात तेच ओठ"असे कोणत्या पक्षाचे वर्णन बहिणाबाई चौधरी यांनी केले आहे ?
सुगरण मैना पोपट घार
प्रश्न (29) गरुड घार आणि ससाणा या पक्ष्यांची चोच काशी असते?
(1) अणकुचीदार व बाकदार (2) सरळसोट (3)चपटी (4)लांब नळीसारखी
प्रश्न (30) 'सनबर्ड' या पक्षाला काय म्हणून ओळखतात?
(1) शक्करखोरा (2) अग्निपंख (3) रोहीत (4)धनेश
प्रश्न (31) 'शक्करखोरा' या पक्षाचे मुख्य अन्न कोणते ?
(1) मधुरस (2) जमिनीवरचे किडे (3) मासे (4)फळे
प्रश्न (32)पाण्यावर सूर मारून मासे पकडणारा पक्षी कोणता ?
(1) बगळा (2) खंड्या (3) गरुड (4) पोपट
प्रश्न (33) 'माश्या आणि टोळ ' हे अन्न कोणत्या पक्ष्याचे आहे?
प्रश्न (34) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी कोणता?
प्रश्न (35) ते प्रश्न (38) साठी सूचना.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
प्रश्न (35) सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.
फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात
प्रश्न (36) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.
सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन
प्रश्न (37) तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.
प्रश्न (38) घार आपली शिकार घट्ट पकडते.
Comments
Post a Comment