लिंगविचार
लिंगविचार
नामांच्या रूपात होणारा बदल
नाम म्हणजे काय हे आपण पाहिले. ही नामे वाक्यात वापरताना त्यांच्या त्यात केव्हा-केव्हा बदल होतो. जसे -
१) मुलगा पुस्तक वाचतो.
२) मुलगे खेळ खेळतात.
३) मुलगी गाणे गाते.
४) मुलांना खाऊ आवडतो.
वरील वाक्यात मुलगा या शब्दाची मुलगी, मुलगे,मुलांना अशी रुपे झाली आहेत. नामांच्या रूपात हा जो बदल किंवा विकार होतो त्यास व्याकरणात 'विकरण' असे म्हणतात . हा बदल केव्हा व कसा होतो ते आपण पाहू : 'मुलगा' याचे 'मूलगी' असे जे रूप बदलले ते त्याचे लिंग बदलल्यामुळे, 'मुलगे' असे जे रूप झाले ते वचन बदलल्यामुळे व 'मुलांना' असे जे रूप झाले ते विभक्ती बदलल्यामुळे. लिंग, वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रूपात बदल होतो. यांना 'नामांचे विकरण' असे म्हणतात. यांचा आपण क्रमाने विचार करू :
लिंग
नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूला दिलेले नाव. वस्तूंत आपण १) सजीव व २) निर्जीव असे दोन भाग करतो. सजीवांमधे १) मनुष्यप्राणी व २) मनुष्येतर प्राणी (पशू, पक्षी, कृमी, कीटक वगैरे) असे भाग पडतात. मनुष्यप्राण्यांत काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात. इतर प्राण्यांतील हा भेद आपण 'नर' व 'मादी' या शब्दांनी करतो. प्राणिमात्रांत पुरुष- स्त्री, नर-मादी असा जो भेद आपण करतो तो त्यांच्या लिंगावरून. लिंग याचा अर्थ 'खूण' किंवा 'चिन्ह' असा आहे. प्राणिवाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुरुषलिंगी, पुंलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात. जसे चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा.... वगैरे. स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात. जसे चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी वगैरे. निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही. जसे पुस्तक, दगड, शहर, दौत, शाई, कागद वगैरे. अशांना नपुंसकलिंगी असे म्हणावयास हवे. पण मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष तसे होत नाही. यांतील 'दगड, कागद' हे पुल्लिंगी व 'दौत, शाई' हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो. प्राणिमात्रांचे लिंग हे 'वास्तविक' असते तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे 'काल्पनिक' असते.
नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे, की स्त्रीजातीची आहे, की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.
मराठीत लिंगे तीन मानतात .
१) पुल्लिंग
२) स्त्रीलिंग
३) नपुसकलिंग.
काही निर्जीव वस्तू सजीव आहेत असे कल्पून आपण केव्हा केव्हा बोलतो. जसे- १) सूर्य ढगाआड लपला. २) सागर एकदम खवळला. ३) वनश्री हसू लागली. ४) झरे नृत्य करीत होते. अशा वाक्यांत निर्जीव वस्तूंवरही काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून आपण बोलत असतो. केव्हा केव्हा मोठा आकार, शक्ती, कठोरपणा, जोर, राकटपणा यांसारखे पुरुषप्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आपणांस आढळतात त्यांना पुल्लिंगी व लहान आकार, कोमलपणा, देखणेपणा, सौम्यपणा, चांचल्य यांसारखे स्त्रीप्राण्यांत आढळून येणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आढळतात त्यांना स्त्रीलिंगी असे आपण मानतो. उदाहरणार्थ - लोटा पुल्लिंगी तर लोटी स्त्रीलिंगी, वारा पुल्लिंगी तर झुळूक स्त्रीलिंगी, वृक्ष पुल्लिंगी तर वेल स्त्रीलिंगी. सूर्य, सागर, मृत्यू हे पुल्लिंगी तर वनश्री, वीज हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो.
पण हा नियम संपूर्णपणे पाळला जात नाही. त्याला अपवाद पुष्कळ आढळतात. दोरा हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी तर दोरी ही स्त्रीलिंगी. ओढा हा नदीपेक्षा लहान असूनही तो पुल्लिंगी व नदी ही स्त्रीलिंगी.
मराठीत एकाच अर्थाचे शब्द तीन वेगळ्या लिंगांत आढळतात. जसे १) फेटा (पु.), पगडी (स्त्री.) तर पागोटे (नपुं.) २) ग्रंथ (पु.), पोथी (स्त्री.) तर पुस्तक (नपुं.) ३) देह (पु.), काया (स्त्री.) तर शरीर (नपुं.).
निसर्ग-(पु.)
स्वप्न (नपुं.)
नदी -(स्त्री.)
खड्ग (नपुं.)
देश -(पु.)
अश्रू -(पु.)
चंद्र -(पु.)
मित्र - (पु.)
मराठीत लिंगव्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. त्यामागे काही विशिष्ट तत्त्व असे दिसत नाही. एखादा नियम सांगावा तर त्याला अपवादच जास्त.
मग मराठीतील लिंग ओळखण्याची पद्धत कोणती ? प्राणिमात्रांतील पुरुष किंवा नर यांचा उल्लेख आपण 'तो' या शब्दाने करतो व स्त्री किंवा मादी यांचा उल्लेख आपण 'ती' या शब्दाने करतो. जसे तो बाप ती आई, तो घोडा ती घोडी, तो पोपट ती मैना. सजीव प्राण्यांतील एखादा नर आहे की मादी हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख 'ते' या शब्दाने करतो. जसे ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू.
निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो-ती-ते हे शब्द वापरून आपण त्यांचे लिंग ठरवितो. उदा. -
पुल्लिंग- तो वाडा, तो भात,तो दिवा,तो दरवाजा.
स्त्रीलिंग - ती इमारत,ती भाकरी,ती लेखणी,ती पणती
नपुंसकलिंग- ते घर , ते वरण ,ते पाणी, ते आकाश.
वरील पद्धत मराठी भाषा जाणणाऱ्यांना ठीक आहे; पण अ-मराठी भाषिकांना मराठी शब्दांचे लिंग ओळखणे कठीण जाते. अमक्या शब्दामागे 'तो' का लावायचा ? 'ती' का नाही ? याचे उत्तर देणे व निश्चित नियम सांगणे कठीण आहे. पुल्लिंगी शब्दामागे 'तो' लावायचा व 'तो' लागतो म्हणून त्या शब्दाला पुल्लिंगी म्हणावयाचे हा मोठा विचित्र प्रकार होय. मराठीत अर्का शब्द पुल्लिंगी का व अमका स्त्रीलिंगी का, हे सांगणे कठीण आहे.
केवळ रूढी किंवा परंपरा हेच त्याचे उत्तर. मराठी भाषा ही ऐकून व बोलण्यात तिचा वारंवार वापर करून तिच्यातील लिंगव्यवस्था समजून घेता येते. केवळ नियमाने ती ठरविता येत नाही.
लिंगभेदामुळे नामांच्या रूपांत होणारा बदल
१) पुढील उदाहरणे पाहा :
पुल्लिंगी शब्द - स्त्रीलिंगी शब्द
मुलगा - मुलगी
कुत्रा - कुत्री
पोरगा - पोरगी
घोडा - घोडी
सुतार - सुतारीण
माळी - माळीण
कुंभार - कुंभारीण
पाटील - पाटलीण
वाघ - वाघीण
तेली - तेलीण
हंस - हंसी
दास - दासी
वानर - वानरी
बेडूक- बेडकी
गोप - गोपी
तरुण - तरुणी
लोटा - लोटी
गाडा - गाडी
खडा - खडी
दांडा - दांडी
भाकरा - भाकरी
आरसा - आरशी
राजा - राज्ञी (राणी)
युवा - युवती
श्रीमान - श्रीमती
भगवान - भगवती
विद्वान - विदुषी
ग्रंथकर्ता - ग्रंथकर्ती
बाप - आई
नवरा - बायको
बोकड - शेळी
वर-वधू
मुलगा - सून
रेडा - म्हैस
राजा - राणी
दीर - जाऊ
मोर - लांडोर
पती - पत्नी
भाऊ - बहीण
पिता - माता
पुत्र - कन्या
सासरा - सासू
पुरुष - स्त्री
बैल - गाय
बोका - भाटी
खोंड - कालवड
वेगवेगळ्या रुपात आढळणारी नामे.
पोर (पु. स्त्री. नपुं)
संधी (पु. स्त्री.)
वेळ (पु. स्त्री.)
वीणा (पु. स्त्री.)
तंबाखू (पु. स्त्री.)
मजा (पु. स्त्री.)
व्याधी (पु. स्त्री.)
मूल (पु. स्त्री. नपुं.)
नेत्र (पु. न.)
बाग (पु. स्त्री.)
ढेकर (पु. स्त्री.)
हरीण (पु. न.)
८) परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवितात. उदा.-
बूट (जोडा) पु.
पेन्सिल (लेखणी) स्त्री.
क्लास (वर्ग) पु.
बुक (पुस्तक) न.
कंपनी (मंडळी) स्त्री.
ट्रंक (पेटी) स्त्री.
साखरभात (पु.)
भाजीपाला (पु.)
मीठभाकरी (स्त्री.)
गायरान (नपुं.)
भाऊबहीण (स्त्री.)
देवघर (नपुं.)
१०) मासा, गरुड, पोपट, साप, टोळ, सुरवंट हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगीच करतात तर घार, मैना, सुसर, घूस, ऊ, पिसू, जळू हे शद पुल्लिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात.
अभ्यास
१) खालील पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे सांगा व ती वाक्यात वापरा : उंदीर, देव, बोका, वानर, सासरा, भट, धोबी, दास, नळा, बालक.
२) खालील स्त्रीलिंगी नामांची पुल्लिंगी रूपे सांगा व ती वाक्यात वापरा : शेळी, भावजय, पेटी, गवळण, कोंबडी, शिक्षिका, मादी, कन्या, लांडोर.
३) खालील नामांची लिंगे सांगा व त्यांचा वाक्यात वापर करा :-
खेळ, मोटार, घड्याळ, तार, चिंच, सुसर, बाग, दही, सोने, उष्णता, पोल लठ्ठपणा, कमाई, चकचकाट, गरिबी, माणुसकी, थंडी
Comments
Post a Comment