७मराठी ८.गचकअंधारी
८. गचकअंधारी - अशोक मानकर
(पाठ्यपुस्तक पान क्र. ३३)
पाठाचा परिचय :
ही एक विनोदी कथा आहे. सदा नावाचा गावातला माणूस गाडगीमडकी करण्याचा धंदा करीत असतो. एके दिवशी त्याचा लहान मुलगा गजानन त्याच्यासोबत बाजारात जाण्याचा हट्ट करतो. तो सोबत येऊ नये, म्हणून सदा गजाननला गचकअंधारी या विचित्र आणि काल्पनिक प्राण्याची / हाडळीची भीती घालतो. हा बापलेकाचा संवाद घराच्या मागच्या खिंडारात असलेला वाघ ऐकतो. तो घाबरतो. दरम्यान वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसतो व निघतो. आपल्या पाठीवर गचकअंधारी बसली आहे, असे समजून वाघाची घाबरगुंडी उडते नि सदाला खऱ्या वाघाची जाणीव झाल्यावर तोही हादरतो. अशा प्रकारे दोघांच्या घाबरण्याची ही मजेदार कथा वाचून आपल्याला हसू फुटते.
मूल्य / शिकवण/ संदेश:
कल्पनेच्या पातळीवर विनोदी लेखनाची खुमारी विद्यार्थ्यांना आकलन व्हावी , हे मूल्य प्रकट होते. तसेच प्राण्यांचे मजेदार संवाद कल्पनेने रंगवण्याचे कसब लक्षात घ्यावे, हाही हेतू दिसून येतो.
शब्दार्थ:-
जोडपे - नवराबायको.
हाकणे - चालवणे,
बेताने - अंदाजाने
आवरले - तयारी केली.
लगत- जवळ
तडाख्यात - संकटात.
बावचळून - घाबरून गोंधळून.
आसरा - निवारा, आश्रय .
झुंजूमुंजू - पहाटेचा अंधुक उजेड
पडके खिंडार - रिकामे विवर , मोठा खड्डा
खतरनाक - धोकादायक.
हादरला - खूप घाबरला.
शहारून - भीतीने अंगावर काटा येऊन.
अद्याप - अजून
गुडूप अंधार - खूप घनदाट काळोख .
गच्चकन - लगेच
तरातरा - जलद,
टांग - पाय.
रपदिशी - धाडकन .
हाणल्या - मारल्या.
निमूट - शांतपणे
किट्ट काळोख - गडद अंधार,
झुळका - हवेचे झोत.
प्रभा - उजेड, प्रकाश.
फाकणे - फैलावणे
राखाडी - राखेसारखा करडा रंग.
कलती - वाकडी.
साक्षात - समोर.
झटके - धक्के.
ओघळू लागल्या - गळू लागल्या.
विलक्षण चपळाई - अचानक चटकन होणारी जलद हालचाल
लोंबणारी - लटकलेली.
सुसाट - अतिशय वेगाने.
टिपा
(१) गचकअंधारी - एक भीतिदायक विचित्र काल्पनिक प्राणी / भुतणी (हडळीचा एक प्रकार).
(२) पंचक्रोशी - पाच कोसामधील आजूबाजूची गावे व खेडी मिळून झालेला प्रदेश.
(३) भाकरी थापणे - परातीत पिठाचा गोळा पसरट गोल करण्याची क्रिया.
(४) शिदोरी फडक्यामध्ये बांधलेली भाजी-भाकरी.
(५) गारपीट - गारांचा जोरदार पाऊस.
(६) उकिरडा - गावतला केरकचरा टाकण्याचा कोपरा.
(७) पारंब्या- वडाच्या झाडाच्या फाट्यांना मुळे फुटून ती पुन्हा मातीवर लोंबकळतात.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) हट्ट करणे - एकाच गोष्टीचा आग्रह धरणे.
(२) समजूत घालणे - समजावून सांगणे.
(३) मेटाकुटीला येणे - हेराण होणे, खूप त्रासणे.
(४) गिल्ला करणे - आरडाओरडा करणे, गोंधळ घालणे.
(५) डोक्याला हात लावणे हताश होणे.
(६) पळ काढणे - पळून जाणे,
(७) झुंजूमुंजू होणे - पहाट होणे,
(८) तोंड वेडावणे - चिडवणे, नाराजी व्यक्त करणे,
(९) युक्ती फळाला येणे - शक्कल वापरून यश येणे.
(१०) हीव भरणे - घाबवरून अंग थरथरणे..
(११) बला जाणे - संकट टळणे,
(१२) शंकेची पाल चुकचुकणे - शंकेचा मनात प्रवेश होणे, संशय येणे.
(१३) कापरे भरणे - घाबरून अंग थरथरणे.
(१४) करुणा भाकणे - (देवाची) प्रार्थना/आळवणी करणे.
(१५) दरदरून घाम फुटणे - खूप घावरणे.
(१६) घाबरगुंडी उडणे - खूप घाबरल्यामुळे गोंधळून जाणे. (१७) काळीज धडधडणे - घाबरल्यामुळे हृदयात धडधड होणे,
( १८) जिवात जीव येणे - बरे वाटणे, हायसे वाटणे.
(१९) सुसाट पळत सुटणे - वेगाने पळून जाणे.
■■ प्रश्न १. पुढील उतारा वाचून उत्तरे लिहा .■■
( पाठ्यपुस्तक पा. नं.३४)
(१) वादळी पावसाची दोन वैशिष्ट्ये लिहा:-
( i ) विजांचा कडकडाट (ii) गारपीट
(२) एका शब्दात उत्तर लिहा :-
(i) वादळाच्या तडाख्यात सापडलेला :-
(ii) वाघ येथे उभा राहिला :-
उत्तर :- (i ) वाघ (ii) पडक्या खिंडारात भिंतीलगत
■■ प्रश्न २. पुढील वाक्ये वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा .■■
(१) सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
उत्तर: सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे. जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे. म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
(२) गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
उत्तर : सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गचकअंधारीची भीती गज्याला दाखवल्यामुळे गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
(३) वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
उत्तर : सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता. परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचकअंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे, हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे बाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
(४) सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
उत्तर: वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले, तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी, म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला..
■■ प्रश्न ३. पुढील प्रत्येक मुद्द्यावर दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा :■■
(१) सदाचा व्यवसाय
(२) सदाचा मुलगा गजानन
(३) सदाची झालेली फजिती
(४) सदाने स्वतःची केलेली सोडवणूक
=========================
(१) सदाचा व्यवसाय
उत्तर : (१) सदाचा गाडगीमडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे. उरलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवून येत असे. आणि पुढच्या बाजारी पुन्हा विकत असे.
(२) सदाचा मुलगा गजानन
उत्तर :- सदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला. गजा काही केल्या ऐकेना . तेव्हा सदाने गचकअंधारी ची भीती घातल्यावर गजाने बाजारात जायचा हट्ट सोडला .
(३) सदाची झालेली फजिती
उत्तर:- खिंडारात असलेल्या वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला. सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचकअंधारीबद्दल कळले होते. तिची भीती वाघाच्या मनात होती. सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचकअंधारीच बसली आहे. म्हणून वाघ भयंकर घाबरला.
(४) सदाने स्वतःची केलेली सोडवणूक
सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे, हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला. अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबरगुंडी उडाली. या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता. तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर तो चढून गेला. पाठीवरून गचकअंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला..
■■ ४. कोण, कोणास व का म्हणाले ?
(१) " कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा."
उत्तर:- " कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा." असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला. सदाला आपला मुलगा गज्या याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गज्याला वाघाची भीती दाखवत होता . वाघाची भीती मला दाखवू नका. हे सांगण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला.
(२) "या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली न म्हनू नोको मले. "
उत्तर:- "या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली न म्हनू नोको मले." असे सदा गजाननला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता. सदाने त्याला कोल्हा, लांडगा व वाघाची भीती दाखवली, पण गज्या ते जुमानत नव्हता म्हणून सदाने त्याला गचकअंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले.
(३) 'गचकअंधारी झटके देऊन रायली,'
उत्तर:- 'गचकअंधारी झटके देऊन रायली,' असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले, तेव्हा घाबरून तो थाडथाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचकअंधारीचे कृत्य असावे, म्हणून वाघ स्वतःशी हे वाक्य म्हणाला.
(४)'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती."
उत्तर:- ‘गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती,' असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला . पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वत:ची सुटका करून घेतली, तेव्हा वाघाला वाटले की गचकअंधारी आपोआप गेली; म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला.
मुक्तोत्तरी प्रश्न
★★ हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग लिहा.
उत्तर प्रसंग १ : गजानन बाजारात येऊ नये म्हणून सदा जेव्हा त्याला कोल्हा, लांडगा व वाघ दाखवत होता व अखेरीस त्याने गचकअंधारीची भीती दाखवली. या प्रसंगी खूप हसायला येते.
प्रसंग २ : सदा आणि गजानन यांचे संवाद ऐकून वाघही घाबरतो, त्या प्रसंगी हसू फुटते.
प्रसंग ३ : सदाला जेव्हा कळते की आपण गाढवाच्या नव्हे; तर वाघाच्या पाठीवर बसलोय तेव्हाची त्याची स्थिती नजरेसमोर येऊन हसू येते.
■■ भाषाभ्यास व व्याकरण ■■
★★१. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा :
(१) लवकर x उशिरा
(२) रात्री x दिवसा
(३) बाहेर x आत
(४) जाग x झोप
(५) अंधार x उजेड.
★★ प्रश्न २. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
पुल्लिंग:- , वाघ मुलगा गाढव, लांडगा, वडील
उत्तर:-
स्त्रीलिंग:- मुलगी,वाघीण, गाढवीण ,लांडगीण , आई
★★ प्रश्न ३. आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून "पंचक्रोशी" म्हणतात. याप्रमाणे पुढील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा
(अ) ज्यास कोणी शत्रू नाही, असा.
(आ) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण.
(इ) धान्य साठवण्याची जागा.
(ई) दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा.
(उ) डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.
उत्तरे :- (अ) अजातशत्रू ( आ) पाणपोई (इ) कोठार
(ई) मनकवडा (ऊ) बोगदा
★★प्रश्न ४. खलील शब्द विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा :
विशेष्य - विशेषण
किट्ट -काळोख
विलक्षण- चपळाई
लोंबणारी - पारंबी
वादळी - पाऊस
★★ प्रश्न ५. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा :
(मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, सुसाट पळत सुटणे, शंकेची पाल चुकचुकणे.)
(१) पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच ...............................
(२) उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात ..............................
(३) लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव .....................................
(४) पोलिसांना बघून चोर ............................
उत्तर :- (१)गिल्ला केला. (२)शंकेची पाल चुकचुकली. (३) मेटाकुटीला आला. (४) सुसाट पळत सुटला.
■■■■■शब्दयोगी अव्यय ■■■■■
पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया
(१) झाडावर पक्षी बसला.
(२) शाळेबाहेर मुले जमली.
(३) रस्त्यासमोर शाळा आहे.
म्हणजे,
(१) 'झाड' या शब्दाला 'वर' हा शब्द जोडला आहे .
झाड + वर = झाडावर.
(२) 'शाळा' या शब्दाला 'बाहेर' हा शब्द जोडला आहे.
शाळा + बाहेर = शाळेबाहेर.
(३) 'रस्ता' या शब्दाला 'समोर' हा शब्द जोडला आहे.
रस्ता + समोर = रस्त्यासमोर,
म्हणजेच,
'वर', 'बाहेर', 'समोर' हे शब्द वाक्यांत स्वतंत्रपणे न येता ते नामाच्या किंवा सर्वनामच्या नंतर येतात.म्हणजे शब्दांच्या मागे जोडून आले आहेत.
◆ जेव्हा मूळ शब्दाला शब्द जोडून येतात त्यास शब्दयोगी अव्यय म्हणतात. (योग म्हणजे जुळून येणे.) म्हणून 'वर, बाहेर, समोर' ही शब्दयोगी अव्यये आहेत.
काही शब्दयोगी अव्यये : पुढे, नंतर, आधी, साठी, पर्यंत, मागे, आत, बाहेर, समोर, वर, मुळे, शिवाय इत्यादी.
मूळ शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडल्यास मूळ शब्दाच्या रूपात बदल होतो. त्याचे सामान्यरूप होते.
उदा., (१) झाड +वर = झाडावर = झाडा (सामान्यरूप )
(२) शाळा + बाहेर →शाळेबाहेर = शाळे (सामान्यरूप)
(३) रस्ता + समोर = रस्त्यासमोर = रस्त्या (सामान्यरूप) लक्षात ठेवा :
• शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यांत फरक आहे. एकच अव्यय वाक्यात दोन्ही प्रकारची कार्य करू शकते.
उदा.,
शब्दयोगी अव्यय
(१) झाडावर पक्षी बसला.
(२) शाळेबाहेर मुले जमली.
(३) रस्त्यासमोर शाळा आहे.
क्रियाविशेषण अव्यय
(१) वर पतंग उडाला.
(२) बाहेर पाऊस पडत आहे.
(३) समोर दुकान आहे.
★★ प्रश्न ६. पुढील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्ययांना अधोरेखित करा :
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे भासते. त्या झाडाप्रती माझ्या भावना मैत्रीपूर्ण आहेत.
२. लेखन विभाग
★★विचार करा. सांगा : ★★
• (१) 'गचकअंधारी' हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा.
नमुना उत्तर : गचकअंधारी हे पात्र काल्पनिक आहे. गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये, असे सदाला वाटत होते . त्यामुळे सदाने गजाननला भीती वाटेल, असे 'गचकअंघारी' हे काल्पनिक पात्र उभे केले, जेणेकरून येण्याचे टाळेल. गचकअंधारी हे खरे पात्र असते, तर स्वतः सदा घावरला असता. म्हणून 'गचकअंधरी पात्र काल्पनिक आहे.
(२) पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर : 'गचकअंधारी' हे पात्र लेखकांनी निर्माण केल्यामुळे पाठ विनोदी होण्यात खूप मदत झाली. गचकअंधारी काल्पनिक पात्र आहे; परंतु कथेतील सदा, गज्या व वाघाला ते खरे वाटते. त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत. 'गचकअंधारी मुळे कथेतील अद्भुतरम्यता शेवटपर्यंत टिकून राहते. म्हणून 'गचकअंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते.
२. तोंडी परीक्षा
प्रश्न :- पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
• कल्पना करून सांगा :
(१) तुम्हांला वाघ भेटला, तर काय बोलाल ?
(२) वर्गातल्या वस्तू आपापसात काय बोलतील?
आकारिक मूल्यमापन
१. प्रकट वाचन :
• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ३८ वरील 'भाषेची गंमत' हा मजकूर मोठ्याने वाचा.
२. कृती :
● मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणारे लेखक व त्यांचे साहित्य (पुस्तके) यांची माहिती लिहा.
उत्तर :
लेखक :- - पुस्तकांची नवे
चिं. वि. जोशी- एरंडाचे गुऱ्हाळ
पु. ल. देशपांडे- व्यक्ती आणि वल्ली
द. मा. मिरासदार - जावईबापूंच्या गोष्टी
३. उपक्रम :
• पुढील वाक्प्रचार अभ्यासा
'भीती वाटणे' हा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ आहे.
अंगाला कापरे भरणे.
हातपाय लटलटणे.
घशाला कोरड पडणे.
हीव भरणे,
बोबडी वळणे.
थरथर कापणे.
दरदरून घाम फुटणे.
डोळे पांढरे होणे.
अंगाचा थरकाप उडणे,
जीव घाबराघुबरा होणे.
धाबे दणाणणे.
पोटात गोळा येणे.
एकाच अर्थाचे इतके वाक्प्रचार असणे, हे मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे. याप्रमाणे एकाच अर्थाच्या
अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा..
४. प्रकल्प :
•● मराठी साहित्यात विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची शिक्षक व पालक यांच्याकडून माहिती घ्या. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाचे एखादे पुस्तक वाचा. त्यातील एखादी गोष्ट वर्गात सादर करा.
Comments
Post a Comment