७ मराठी१४ कवितेची ओळख
१४ कवितेची ओळख
• शारदा दराडे
( पाठ्यपुस्तक पान क्र. ६४)
पाठाचा परिचय
सुधीरला 'काव्यप्रतिभा' या विषयावर प्रकल्प करायचा होता. कुटुंबातील सर्वजणांनी त्याला मदत केली. सर्वजण कवितेत बोलू लागले. कवितांमधून साधलेल्या संवादांची ही एक मजेशीर एकांकिका आहे.
मूल्य/ शिकवण/संदेश : शब्दांची जादू अनुभवून कविता तयार करण्याचे कसब मुलांना कळावे, हा हेतू या एकांकिकेतून स्पष्ट झाला आहे. यमक जुळवलेल्या वाक्यांतून गेयता कशी प्रकट होते, याचे प्रात्यक्षिक या पाठात साधले आहे.
शब्दार्थ
प्रवेश - (घरात) येणे. आकलनशक्ती - समजण्याची ताकद. सुपर - श्रेष्ठ, सरस ध्यास. ओढ - तीव्र - इच्छा. नाराजी - रुसवा, निराशा. खोपा - घरटे. नाष्टा - न्याहारी. युक्ती - शक्कल. धीट - धैर्यवान. रेलून - मागे झुकून आरामात (बसणे). टापटीपपणा - स्वच्छता. मळा -शेती. लळा - प्रेम. मनी - मनात.
टिपा
(१) काव्यप्रतिभा - कविता निर्माण करण्याची शक्ती.
(२) प्रकल्प - योजनाबद्ध केलेले कार्य.
(३) सांजवात - संध्याकाळच्या वेळी तुळशी वृंदावनात किंवा देवघरात पेटवायची ज्योत.
(४) शुभंकरोती - 'शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा' ही सांजवात पेटवल्यावर म्हणावयाची प्रार्थना.
(५) वात - एक रोग. सांध्यांमध्ये कापरे भरते तो संधिवात.
(६) पिठाची सोजी - जाड पिठाचा रवा.
(७) यमक - दोन ओळींच्या शेवटाला असलेले समान उच्चार असलेले शब्द (यमक - चमक असे).
(८) वाळा - एक प्रकारची सुगंधी वनस्पती (पाला).
(९) शांताबाई - सुप्रसिद्ध मराठी कवयित्री व गीतकार शांताबाई शेळके.
(१०) सुर्वे - सुप्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे.
(११) सुर्वेची गिरणी - कवी नारायण सुर्वे यांची 'गिरणीची लावणी ' ही सुप्रसिद्ध;कविता/ रचना.
(१२) गदिमा - सुप्रसिद्ध मराठी गीतकार ग. दि. माडगूळकर.
(१३) गदिमांचे घर - ग. दि. माडगूळकर यांचे प्रसिद्ध गाणे- 'खेड्यामधले घर कौलारू'.
(१४) बालकवी - सुप्रसिद्ध मराठी कवी त्र्यंबक बापूजी ठोमरे.
(१५) फुलराणी - बालकवींची अतिशय प्रसिद्ध कविता 'हिरवे हिरवे गार गालिचे',
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) विचारात गुंतणे- विचारात गुंग होणे.
(२) ताण येणे - मनावर / बुद्धीवर दबाव येणे.
(३) खो देणे - नकार देणे.धुडकावून लावणे.
(४) खो खो हसणे - मोठ्या आवाजात हसणे.
(५)पाश सोडणे- बंधनातून मुक्त होणे.
(६) हेका धरणे - हट्ट करणे.
(७) ठेका घेणे - बाजू घेणे (कंत्राट घेणे).
(८) सहभागी होणे - सामील होणे.
(९) बाजी मारणे - जिंकणे.
(१०) ताव मारणे - भरपूर जेवणे.
(११) गालातल्या गालात हसणे - स्मितहास्य करणे.
(१२) वाण नसणे - कमतरता नसणे.
(१३) पान न हलणे - ......च्याशिवाय काम न होणे.
(१४) होकार दर्शवणे - संमती देणे.
(१५) तल्लीन होणे - मग्न होणे, गुंग होणे.
(१६) भावनांचे मोहोळ चेतवणे - भावना जागृत करणे . (१७) अभिनंदन करणे - शाबासकी देणे. कौतुक
म्हण व तिचा अर्थ
लहान तोंडी मोठा घास
सामान्य माणसाने मोठ्या माणसांना काहीतरी वेगळे अनोखे बोलणे.
संकलित मूल्यमापन
१. प्रश्नोत्तरे
प्रश्न १. पुढील प्रश्नासाठी योग्य उत्तर लिहा:
(१) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ.
(२) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत.
(३) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण.
(४) कुटुंबातील सदस्यांनी सुधीर अभिनंदन करण्याचे कारण.
उत्तरे :
(१) कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे.
(२) सगळे कवितेत संवाद करू लागले.
(३) सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून.
(४) सुधीरता 'काव्यप्रतिभा' म्हणजे काय ते कळले म्हणून.
प्रश्न २. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे -
उत्तर :- (१) शांताबाई शेळके (२) नारायण सुर्वे
(३)ग. दि. माडगूळकर (४) बालकवी
(२) पुढील साहित्यिकांच्या कोणत्या रचनांचा उल्लेख आहे
(i) शांताबाई (ii) सुर्वे (iii) गदिमा (iv) बालकवी
उत्तर:- (i) शांताबाई - बाग (ii) सुर्वे - गिरणी
(iii) गदिमा - घर (iv) बालकवी - फुलराणी
(३) सुधीरला मदत करणारे कुटुंबीय
उत्तर :- सुधीरला मदत करणारे कुटुंबीय
आजोबा , आजी , बाबा , आई ,ताई
प्रश्न ३. कोण, कोणाला म्हणाले ?
(१) "मला दया काठी नि चप्पल. "
(२) "रागाचा तुम्ही सोडा हेका."
(३) "यमक जुळायला हवे फिट, "
(४) "दया थोडे पाणी टाकून वाळा.''
(५) "कसली घाई, कसली सही.''
उत्तर:-
(१) आजोबा आजीला म्हणाले
(२) आई आजीला म्हणाली
(३) ताई सुधीरला म्हणाली
(४) बाबा आईला म्हणाले
(५) सुधीर बाबांना म्हणाला
मुक्तोत्तरी प्रश्न
(१) पाठातील 'कवितेतून बोलण्याची गंमत' तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर : सुधीरला 'काव्यप्रतिभा कळावी, म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. प्रत्येक जण आपापल्या अनुभवविश्वातील सोपे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, आजी 'सांजवात आणि कांदयाची पात' असे यमक जुळवते; तर आजोबा त्यावर 'म्हाताऱ्याचा वाढतो वात' अशी शब्दरचना जुळवतात, तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभवात ऑफीस व बाँस असल्यामुळे ते 'ऑफिसला जाण्याची घाई बाँस करू देणार नाही सही' अशी शब्दकसरत करतात, तर आई 'काय बाई -- कवितेची कमाल - हसतात तोंडावर धरून रुमाल' असे यमक जुळवते. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते, तेव्हा तिच्या 'कवितेत मारेल तो बाजी, आई, आहे का घरात पिठाची सोजी' या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व प्रेम व्यक्त करते. अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात.
(२) पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.
नमुना उत्तर: आजोबा म्हणतात. 'तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दातांची कवळी' आजी म्हणते 'तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास' हा काव्यसंवाद मला खूप आवडला. कारण या संवादातून आजी-आजोबा यांचा गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबांचा मिस्किलपणा 'चवळी - कवळी' या यमकांतून प्रकट होतो. आजीच्या अनुभवातली 'चवळीची भाजी' व आजोबांची 'दातांची कवळी' यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो. म्हणून हा काव्यसंवाद खास व गमतीशीर आहे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १. विरुद्धार्थी शब्दांचा जोड्या लावा :
नवीन , रात्र , होकार , सोपे , राग , सुरुवात ,कठीण, दिवस,
शेवट , प्रेम , जुने , नकार
उत्तर : (१) सोपे X कठीण (२) सुरुवात x शेवट
(३) राग x प्रेम (४) रात्र x दिवस (५) नवीन x जुने
(६) होकार x नकार
प्रश्न २. पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द लिहा
(१) काव्य = ................. (२) काळजी = .................... (३) दिवा = .................. (४) बाग = ....................... (५) तोंड = .................... (६) पाऊस = ....................
उत्तर :- (१) काव्य = कविता (२) काळजी = चिंता
(३) दिवा = दीप (४) बाग = उद्यान
(५) तोंड = मुख (६) पाऊस = वर्षा
३. अनेकवचन लिहा :
(१) काठी (२) रुमाल (३) चप्पल (४) दात (५) भाजी
(६) चपाती
उत्तर :- अनेकवचन
(१) काठ्या (२) रुमाल (३) चपला (४) दात (५) भाज्या
(६) चपात्या
प्रश्न ४. पुढील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा:
(अति तिथे माती. आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच , नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)
(१) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो.
उत्तर :- गर्वाचे घर खाली
(२) एखादयाकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले, की त्याला सोडून दयायचे.
उत्तर :- कामापुरता मामा
(३) सर्वत्र परिस्थिती समान असणे.
उत्तर :-पळसाला पाने तीनच
(४) थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे.
उत्तर :- थेंबे थेंबे तळे साचे
(५) एका संकटातून बचावणे व दुसन्या संकटात सापडणे
उत्तर :-आगीतून उठून फुफाट्यात पडणे
(६) कुठल्याही गोष्टीचा अति वाईट असतो.
उत्तर :- अति तिथे माती
(७) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती पसंत पडत नाही.
उत्तर :- नावडतीचे मीठ अळणी
५. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ कंसातून शोधून लिहा:
( हट्ट करणे,नकार देणे, भावना जागृत करणे बंधनातून मुक्त होणे.)
(१) खो देणे - .....................
(२) पाश सोडणे- ................
(३) हेका धरणे - ................
(४) भावनांचे मोहोळ चेतवणे - ................
उत्तर :- (१) खो देणे - नकार देणे.
(२) पाश सोडणे- बंधनातून मुक्त होणे.
(३) हेका धरणे - हट्ट करणे.
(४) भावनांचे मोहोळ चेतवणे - भावना जागृत करणे.
● प्रश्न ६. पुढे काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द दोन ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. पुढील वाक्ये याचा. त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.
(१) आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.
(२) सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही.
(३) एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला.
दूरध्वनीवर ते मला म्हणाले, "सर, आपण आमच्या शाळेला भेट दया." मी त्यांना विचारले, "काय भेट देऊ ?" ते शिक्षक म्हणाले, "ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.'
उत्तर : (१) (१) सर = शिक्षक (२) सर न येणे = तुलना नसणे
(२) (१) कपात = चहाच्या (२) कपात = कमी करणे
(३) (१) भेट देणे = भेटणे (२) भेट = नजराणा (भेटवस्तू)
आणखी उदाहरणे :
(१) रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही. (हार = माळ / हार = पराभव)
(२) नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय? (नाव = होडी / नाव = नाम)
(३) मान झुकवून थोरामोठ्यांना मान दयावा.
(मान = शरीराचा अवयव / मान = सन्मान, आदर)
वाक्यांचे प्रकार
■१. विधानार्थी वाक्य :
(१) मी दररोज शाळेत जातो.
(२) मी नियमित अभ्यास करतो.
वरील वाक्यांत केवळ विधान केले आहे. म्हणून त्यांस विधानार्थी वाक्ये म्हणतात.
■ २. प्रश्नार्थी वाक्य :
(१) तुझ्या शाळेचे नाव काय आहे ?
(२) तू कधी अभ्यास करतोस ?
वरील वाक्यांत प्रश्न विचारला आहे. म्हणून त्यांस प्रश्नार्थी वाक्ये म्हणतात.
■३. उद्गारार्थी वाक्य :
(१) शाबास! जिंकलात तुम्ही!
(२) अरेरे! त्याला खूप मार लागला !
वरील वाक्यांत 'शाबास, अरे' हे भावनेचे उद्गार आहेत. म्हणून त्यांस उद्गारार्थी वाक्ये म्हणतात.
■ ४. आज्ञार्थी वाक्य :
(१) सगळ्यांनी रांगेत उभे राहा.
(२) दररोज व्यायाम करा.
वरील वाक्यांत आज्ञा किंवा आदेश दिला आहे. म्हणून त्यास आज्ञार्थी वाक्ये म्हणतात.
◆ प्रश्न ७. वाक्यांच्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
(१) विधानार्थी वाक्ये :
(१) काल खूप पाऊस पडला.
(२) गुलाबाचे फूल सुंदर आहे.
(२) प्रश्नार्थी वाक्ये :
(१) काल किती पाऊस पडला ?
(२) कोणते फूल सुंदर आहे ?
(३) उद्गारार्थी वाक्ये
(१) बापरे! किती पाऊस पडला काल!
(२) अहाहा! किती सुंदर गुलाब हा!
(४) आज्ञार्थी वाक्ये :
(१) छत्री घेऊन जा.
(२) तो गुलाब मला दे.
२. लेखन विभाग
• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ६९ वरील 'कविता करूया' हा मजकूर नीट मन लावून वाचा व त्यातील काही शब्दांचा वापर करून एक छानशी कविता तयार करा.
नमुना उत्तर :
माझे पहिले भाषण
मित्रांमध्ये मी करतो बडबड
म्हणूनच झाली एकदा गडबड
वर्गात होती वक्तृत्व स्पर्धा
मी लपवला पुस्तकात चेहरा अर्धा
मित्र म्हणाले, 'तू कर भाषण
नाही केलेस, तर देऊ दूषण
म्हटलं, बच्चमजी, मी करणारच पहा
मलाच मिळतील बक्षिसं महा
होईल कौतुक, टाळ्या मिळतील
सारे मिळून सत्कार करतील
येईल माझा पेपरात फोटो
हाच तर आहे माझा मोटो
सर्वांनी मिळून व्यासपीठावर ढकलले
तेव्हा पाय लटपटले, मन गलबलले
उभा राहिलो मंचावर कसाबसा
पण माझा सुकूनच गेला घसा.
(सगळे ओरडले खाली बसा, खाली बसा !!)
३. तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल ?
(२) प्रकल्प म्हणजे काय ?ते लिहा.
(३) या पूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पांपैकी तुम्हांला कोणता प्रकल्प सर्वांत जास्त करायला आवडला?
(४) प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा.
प्रकट वाचन :
आकारिक मूल्यमापन
ही एकांकिका मोठ्याने वाचून वर्गात सादर करा.
चर्चा 'काव्यवाचना'चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
'आम्ही चित्र काढतो' या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून नमूद करो.
नमुना उत्तर :
माधव : हा बघ आणला मी कुंचला .आहे की नाही तो चांगला ?
मथुरा : हे पहा मी रंग आणले लाल, पिवळे नि निळे जांभळे
महेश: मी आणला भला मोठा कागद , त्यावर रंग चढवू या आता गडद.
मथुरा : पण आपण कशाचे काढायचे चित्र ? माधवने काढले तर होईल विचित्र!
माधव तुझं नाव मयुरा, आपण काढू मोर.
रान काढू, कमान काढू आणि ढग घनघोर.
४. उपक्रम
● या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करा.
प्रकल्प :
• तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करीत असाल. या वर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला, त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओघतक्ता बनवा.
Comments
Post a Comment