८मराठी १७अन्नजाल (कविता)

 १७ .अन्नजाल

     डॉ. हर्ष सदाशिव परचुरे 

कविता ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा 



कडीस जोडोनि दुज्या कडीला 

मनुष्य बनवीतसे साखळीला 

जरी तोडिले त्यात मधल्या कडीला

तरी भंगुनी जाइ संपूर्ण माला ! ।। १ ।।


पाहा कसे कोळि विणतात जाळे 

धाग्यास एका बहू जोडलेले 

बहुतांस त्या जोडलेले कित्येक

बिघडते न जरिही तुटले अनेक ॥ २ ॥


एकीस खायी दुजी प्राणिजात 

दुजीस तीजी अशी साखळीत

जर का दुजी जात मेली समस्त

उभी साखळी होउनी जाय नष्ट ! ॥ ३ ॥


निसर्गनारायणें देखिले हे

अन् वीणिले अन्नजालासि पाहे !

जरी प्राणिजाती किती लोपल्या रे 

तरिही टिकोनी महाजाल राहे ! ॥ ४ ॥


तगले असे की महाजाल रे ते

तरीहि जाणा ते क्षीण होते !

मारीत जाता बहू प्राणिजाती 

तुटोनि संपेल ते जाल पुढती ! ॥ ५ ॥


     

कवितेची मध्यवर्ती कल्पना


"जीवो जीवस्य जीवनम्।' हे प्राणिजीवनाचे सूत्र आहे. म्हणजे एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतो. अशी ही अन्नसाखळी मध्येच तुटत गेल्याने निसर्गाने अन्नजाल | निर्माण केले ; परंतु या प्रक्रियेत काही जीवजाती नष्ट झाल्यामुळे अन्नजालही कमकुवत होईल, असा इशारा या कवितेत मानवजातीला दिला आहे. निसर्गातील जीवसृष्टीचा परस्परसंबंध विवेकाने टिकवला पाहिजे, असा संदेश ही कविता देते.


शब्दार्थ

अन्नजाल - अन्नाची साखळी.

कडी  - साखळीचा एक घटक.

दुज्या  - दुसऱ्या.

भंगुनी जाइ - तुटून जाते. 

माला - माळ. 

बहू  - खूप.

बहुतांस - अनेकांना. 

एकीस - एकाला.

खायी - खाते.

तीजी - तिसरी 

समस्त - संपूर्ण.

जाय - जाते. 

नष्ट - नाहीशी. 

देखिले - पाहिले.

वीणिले - गुंफले.

पाहे - पाहा.

लोपल्या - संपल्या, नष्ट झाल्या. 

टिकोनी -  टिकून. 

राहे- राहते.

तगले - वाचले. 

जाणा- जाणून घ्या.

क्षीण- अबल, कमकुवत.

पुढती - पुढे, भविष्यात.


टिपा

(१) कोळी : एक कीटक,

(२) प्राणिजात :  संपूर्ण सजीव सृष्टी.

(३) निसर्गनारायण  - निसर्ग हाच देव (नारायण).

(४) महाजाल : जीवसृष्टीची प्रचंड मोठी साखळी.


कवितेचा भावार्थ


निसर्गातील जीवसृष्टीच्या अन्नसाखळीविषयी : मूल्यवान संदेश देताना कवी म्हणतात एक कडी दुसऱ्या  कडीत गोवून, कडीला कडी जुळवून माणूस साखळी बनवतो साखळीची निर्मिती कडीला कडी जोडून होते. या साखळी मधली कडी जर सुटली किंवा तोडली, तर संपूर्ण गुंफलेली माळ विस्कटून जाते, तुटून जाते. ॥१॥


धाग्याला धागा जोडून कोळी हा कीटक कसे जाळे विणतो ते पाहा. एका धाग्याला अनेक धागे जोडलेल असतात, त्या अनेक तंतूंना अनेक तंतू जोडलेले असतात. परंतु त्या संपूर्ण जाळ्यामधले अनेक धागे जरी तुटले, तरी जाळे न बिघडता अखंड राहते ||२||


प्राणिसृष्टीचा नियम कसा आहे की एका प्राण्याला दुसरा  प्राणी खातो. दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो. अशा त्यांच्या अन्नसाखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्यांची जमात सगळी मेली; तरी सगळी अखंड साखळी नष्ट होऊन जाते. ।। ३ ।।


निसर्गदेव या अन्नसाखळीचे व ती मध्येच तुटण्याचे रहस्य जाणतो. त्याने दिव्य दृष्टीने सर्व पाहिले आणि जरी अनेक प्राणि जाती नष्ट झाल्या, तरी अन्नसाखळीचे महाजाल टिकून राहील, अक्षय राहील असे अन्नजाल निसर्गनारायणाने निर्माण केले. ।। ४।।



निसर्गदेवाने निर्माण केलेले हे अन्नसाखळीचे महाजाल आतापर्यंत जरी टिकून राहिले असले, तरी ते कमकुवत होत आहे, हे जाणून घ्या. हे मानवा, तू जर अनेक प्राणिजातांना नष्ट केल्या, त्यांना जिवानिशी मारून टाकले तर हे अन्नजात भविष्यात तुटून जाईल व संपून जाईल.।। ५।।


 (या विशाल अन्नसाखळीतील प्राण्यांची हत्या मानवाने करू नये, असा इशारा कवींनी दिला आहे.)



कृति-स्वाध्याय व उत्तरे

कृतिपत्रिकेतील पदय पाठावरील प्रश्नांसाठी...

प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे  दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : 

कृती १ : (आकलन कृती)


(१) अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे :

उत्तर:-(i)   माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो.   (ii)   अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो.

(२) चुकीची विधाने शोधून लिहा :

(अ) (i) मधली कडी तुटली, तरी संपूर्ण साखळी कायम राहते.

(ii) निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले.

(iii) कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.

(iv) कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.

(ब) (i) अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.

(ii) कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले, तर काही बिघडत नाही.

(ii) एक प्राणिजात नष्ट झाली, तर अन्नसाखळी तुटते. 

(iv) अनेक प्राणिजाती मारल्या, तरी अन्नजाल टिकून राहते.

 उत्तर:- (अ) • मधली कडी तुटली, तरी संपूर्ण साखळी कायम राहते. (ब) • अनेक प्राणिजाती मारल्या, तरी अन्नजाल टिकून राहते.




(३) तर काय होईत, ते लिहा :

(i) मधल्या कडीला माणसाने तोडले, तर 

(ii) कोळ्याने जोडलेले कित्येक धागे तुटले, तर


उत्तर:- (i) मधल्या कडीला माणसाने तोडले, तर 

संपूर्ण माळ भंगून जाईल. 

(ii) कोळ्याने जोडलेले कित्येक धागे तुटले, तर जाळे बिघडत नाही.


कृती २ : (आकलन कृती)


* (१) कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा :

कोळ्याचे जाळे

(i) अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो.

(ii) अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते.

अन्नजाल

(i) प्राणिजातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो.

(ii) कित्येक प्राणिजाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते.


(२) पुढील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा :

 मानवाने प्राण्यांना मारले, तर -

उत्तर:- मानवाने प्राण्यांना मारले, तर अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपून महाजाल तुटून जाईल.

(३) काय ते लिहा  :

(i) कोळी विणतो ते

(ii) माणूस बनवतो ती

(iii) अन्नजाल किंवा महाजाल विणणारा

(iv) क्षीण होत चाललेले

उत्तर(i) जाळे (ii) साखळी (iii) निसर्गनारायण 

(iv) महाजाल


कृती ३ : (काव्यसौंदर्य / स्वमत कृती)

(१) तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत

सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :-  एकास एक कड़ी जुळवून जशी माणूस साखळी तयार करतो, तसे प्राणिजातीसाठी निसर्गाने अन्नसाखळीचे महाजाल तयार केले आहे. एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी मारून खातो, दुसऱ्याला तिसरा मारून खातो. जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक वृत्तीतून येते, तेव्हा ही अन्नसाखळी तुटत नाही. काळाच्या ओघात काही प्राणिजाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटत नाही, ते टिकून राहते. परंतु माणसाने अनाठायी प्राण्यांना जर मारले, तर ते अन्नसाखळीला हानिकारक आहे. स्वतःच्या छंदासाठी माणसाने प्राणिजीवन संपवू नये. उदाहरणार्थ, वाघ, डुक्कर, सशासारखे छोटे-मोठे प्राणी जर माणसाच्या स्वैर शिकारीमुळे नष्ट झाले, तर पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. म्हणून प्राणिजीवनाची अन्नसाखळी अबाधित ठेवायला हवी.


*(२) कवितेच्या आधारे  " जीवो जीवस्य जीवनम् ।"  हे सुवचन स्पष्ट करा.

उत्तर  :- प्राणिजीवनाची अन्नसाखळी ही नैसर्गिक आहे. एकमेकांना खाऊन प्राणी राहतात. ते एकमेकांचे अन्न असते. अशा प्रकारे त्यांची अन्नसाखळी तुटत नाही. एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो, दुसरा तिसऱ्याचा घेतो, असा त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. एका चित्रात असे दाखवले आहे की छोट्या कीटकांना एक पाल खात आहे, पालीला बेडूक खात आहे. बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष्य करतो. एकमेकांचे भक्ष्य होणे, म्हणजेच 'जीवो जीवस्य जीवनम् ।' होय! प्राणिजातीमधील हे अखंड अन्नजाल टिकून आहे. एखादी प्राणिजात नष्ट झाली, तरी ते टिकून राहते. या जीवनाच्या ओघवत्या सारणीला जीवो जीवस्य जीवनम् ।' असे म्हणतात.


रसग्रहण

पुढील ओळींचे रसग्रहण करा :


'मारीत जाता बहु प्राणिजाती

तुटोनि संपेल ते जाल पुढती ।' 

उत्तर : आशयसौंदर्य : अन्नजाल या कवितेमध्ये कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी प्राणिजातीमधील निसर्गाने विणलेल्या अन्नमहाजालाची प्रक्रिया विशद केली आहे. या अन्नजालातील प्राण्यांची हत्या केल्यास हे महाजाल क्षीण होऊन अखेर संपून जाईल असा कवींनी गंभीर इशारा दिला. आहे.

काव्यसौंदर्य :-  निसर्गदेवाने स्वतः प्राणिजातीचे अन्नजाल खुबीने विणले आहे. 'जीवो जीवस्य जीवनम्।' हा प्राण्यांचा जीवनाचा मूलमंत्र आहे. प्राणी एकमेकांना खाऊन जीवन कंठित असतात. या प्रक्रियेत काही प्राणिजाती लोप पावल्या तरी महाजाल तुटणार नाही; पण कमकुवत होईल. माणसाने जर स्वतःच्या छंदासाठी प्राण्यांची नाहक हत्या केली तर हे महाअन्नजाल तुटेल व कालांतराने संपून जाईल. म्हणून मानवाने प्राणिजातींच्या जीवनात ढवळाढवळ करू नये, असा संदेश कवींनी प्रस्तुत ओळींमध्ये दिला आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : महान तत्त्व विशद करणारी एकदम सोपी शब्दरचना या कवितेत मांडली आहे. वनाचे श्लोक - मधून घेतलेल्या काव्याचे हे सार थेट हृदयाला भिडेल, अशी भाषा या कवितेत योजिली आहे. चार-चार चरणांची ही यमकप्रधान रचना सुंदररीत्या साधली आहे. संपूर्ण कवितेच्या विधानात्मक रचनेमुळे संदेश थेट पोहोचवण्याची हातोटी अनोखी आहे.



९. अलंकार :


व्याकरण व




अन्नजाल  ही कविता वाचा आणि बरोबर पर्याय निवडा.  


प्रश्न क्र.(1) 

कवीने "अन्नजाल "या  कवितेमध्ये कोणती साखळी नष्ट होईल असे म्हटले आहे ?

(1)अन्नाची साखळी 

(2)प्राण्याची साखळी 

(3)फूलांची साखळी 

(4)मानवाची साखळी 


प्रश्न क्र.(2)

"अन्नजाल " या कवितेतील तिसऱ्या कडव्यामध्ये 

 कोणता शब्द दोन वेळा आलेला आहे ?

(1)महाजाल

(2)दुजी

(3)अन्नजाल 

(4)प्राणीजात



प्रश्न क्र.(3)

"अन्नजाल "या कवितेत प्राण्यांची दुसरी जात मेली तर काय होईल असे कवीने म्हटले आहे ?

(1)प्राण्यांची जात   टिकून राहतील .

(2) प्राण्यांची सगळी जात नाश होईल.

(3)नवीन प्राणिजात तयार होईल 

(4) प्राणी सुरक्षित राहतील 



प्रश्न क्र.(4)

"अन्नजाल"  या कवितेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द दिलेला नाही ?

(1) तूटूनी - भंगुनी 

(2) तिसरी - तीजी

(3) जास्त - बहू

(4)  स्तर - पातळी 


प्रश्न क्र.(5)

चुकीच्या अर्थाची जोडी ओळखा.


(1) समस्त - संपूर्ण

(2) लोपल्या- लवल्या

(3) तगले - टिकून राहिले

(4) क्षीण - कमकुवत


प्रश्न क्र.(6)

खाली  शब्द आणि अर्थाची जोडी दिलेली आहे परंतु "अन्नजाल" या कवितेत कवीने घेतलेल्या  शब्दाचा नेमका अर्थ असलेली  जोडी ओळखा.

(1) कोळी - मच्छीमार

(2) उभी - संपूर्ण

(3) जाल - जाईल

(4) जाइ- वेल


प्रश्न क्र.(7)

खालील वाक्याचा अर्थ असलेला बरोबर पर्याय क्रमांक निवडा 


" कडीस जोडोनि दुज्या  कडीला 

मनुष्य बनवीत असे साखळीला "


(1) एका कडीला दुसरी कडी जोडून लोक साखळी 

(2) बनवतात साखळी मोठी बनवतात

(3) एकच कडी जोडून साखळी बनवतात 

(4) साखळी बनवल्यामुळे  कडी तुटते 



प्रश्न क्र.(8)

"अन्नजाल "या कवितेमध्ये निसर्ग या शब्दाला जोडून आलेला शब्द कोणता ?बरोबर पर्याय क्रमांक निवडा.

(1)  निसर्गप्राणी 

(2)  निसर्गबहु 

(3)  निसर्गनारायण 

(4)  निसर्गनयन 


प्रश्न क्र.(9)

"अन्नजाल " या कवितेत अन्नजाल या शब्दाचा यमक असणारा यमक जुळणारा शब्द कोणता आहे ?

(1) बहुजाल

(2) मनुष्यजाल 

(3) प्राणीजाल 

(4) महाजाल 


प्रश्न क्र.(10)


"अन्नजाल " या कवितेत न आलेले वाक्य ओळखा.

 

(1) धाग्यास एका  बहु जोडलेले 

(2) मारिता जाते प्राणीजात

(3) बहु तास त्या जोडलेले 

(4) मनुष्य बनवीतसे साखळीला 



प्रश्न क्र.(11)

अन्नजाल " या कवितेत खालीलपैकी कोणता शब्द दोन वेळा आलेला नाही?


(1) कडीला

(2)बहू

(3) प्राणिजाती

(4) विणतात 


प्रश्न क्र.(12)

अन्नजाल " या कवितेत खालीलपैकी कोणता शब्द दोन वेळा आलेला नाही?

(1) दुजी 

(2) बनवणे

(3) महाजाल

(4) जोडलेले 


प्रश्न क्र.(13)

अन्नजाल कोणी तयार केले आहे? असे तुम्हाला वाटते. 


(1) प्राण्याने 

(2) वनस्पतीने

(3) निसर्गानारायणाने

(4) माणसाने



प्रश्न क्र.(14)

अन्नजालातील काही जीव जाती नष्ट झाल्या. याचे कारण काय असावे ?

(1) त्या जातींना जगावे वाटत नाही .

(2) त्याला जगता येत नाही.

(3) एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन जगू लागला 

(4) काही जाती आपोआप नष्ट झाल्या.



प्रश्न क्र.(15)

अन्नजाला चे महत्व पटवून देण्यासाठी कवीने खालीलपैकी कोणते उदाहरण योजले आहे ?


(1) मनुष्य एका कडीला दुसरी कडी जोडून साखळी

(2) बनवतो एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन जगतो 

(3) निसर्ग ही एक मोठी साखळी आहे 

(4) प्राण्यांना मारल्यास महाजाल कमकुवत होते 



प्रश्न क्र.(16)

खालीलपैकी चुकीचे विधान शोधा 

(1) मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते.

(2) निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले.

(3) कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.

(4) कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.



प्रश्न क्र.(17)

खालीलपैकी चुकीचे विधान शोधा 

(1) अन्नजालातील प्राणीजाती  नष्ट झाल्यास ते क्षीण होते.

(2) कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही 

(3) एक प्राणीजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.

(4) अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.




प्रश्न क्र.(18)

कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य ओळखा 

(1) एका धाग्यात अनेक धाग्याने जोडलेले असते.

(2) कुठेही तुटल्यास ते लगेच जोडता येते.

(3) निसर्गाने तयार केलेली आहे. 

(4) हे जाल अनेक वर्षे असेच टिकून राहील.



प्रश्न क्र.(19)

मानवाने प्राण्यांना मारले तर खलील पैकी कोणता परिणाम दिसून येईल ? 

(1) मानवाला शिकारीचा छंद जडेल. 

(2) मानव आनंदात राहील. 

(3) अन्नसाखळीवर कोणताही परिणाम होणार नाही.

(4) हे अन्नजाल कमकुवत होईल.



प्रश्न क्र.(20)

अन्नसाखळी नष्ट झाल्यास मानवजातीवर कोणता परिणाम होईल?

(1)  माणसाला सुखाने जगता येईल.

(2)  माणसाला जगणे अवघड होऊन जाईल. 

(3) माणूस दुसरी अन्नसाखळी तयार करेल.

(4)  याचा काही परिणाम माणसाच्या जीवनावर होणार नाही.

Comments

Popular posts from this blog

HOME