बालगीते
बालगीत
गट्टी फू
गट्टी फू फू फू ,गट्टी फू
गट्टी फू फू फू ,गट्टी फू ।।
आईशी , बाबांशी, जमलंच तर ताईशी,
सगळ्यांशी गट्टी फू ।।धृ।।
साखर झोपेतून उठवती, बाबा भल्या पहाटे ।
डोळे नीट ना उघडले तर, देती दोन रपाटे ।।
उठता-बसता अभ्यास , रोजच आहे हा त्रास ।।
काय म्हणावे बाबांना , तुमच्याशी गट्टी फू ...।। १।।
खेळामध्ये नेहमी हरते , रडत बसते ताई ।
तरीही तिचीच बाजू घेऊन, आम्हा बदडते आई ।।
कुरवाळीते ते ताईला , दूर ढकलते आम्हाला ।।
काय म्हणावे आईला, तुझ्याशी गट्टी फू ...।। २।।
खेळत असता आम्ही, दुखते ताईच्या पोटात ।
गलबलते मग जाऊन सांगते , बाबांच्या कानात ।।
स्वतःच ताई पक्की चोर , एक नंबरची चहाडखोर ।।
तरीही आमच्या वरती मोर , ताईशी गट्टी फू ...।। ३।।
आई-बाबा दोघे चूप , कुणी का बोलत नाही ।
ताई सुद्धा आज तिकडे, ढुंकूणी पाहत नाही ।।
गट्टी गट्टी फू चा खेळ पुरे, आपण खेळूया सारे ।।
एकमेकांना समजून घ्यारे, नकोच गट्टी फू ...।। ४।।
बडबड गीत
ये गं ये गं चिऊताई खेळायला
ये गं ये गं चिऊताई खेळायला
हसायला अन नाचायला ।।धृ।।
पानांची पाटी काडीची पेन्सिल ,
हातात ऐटीत कशी कशी तू धरशील ।
छान छान लिहायला शिकवीन तुला ।। १।।
एकेका काडीचं घरटं तू बांधशील,
थकूनभागून गडे तू जाशील ।
चिंध्या आणि कापूस देईन तुला ।। २।।
एक एक घुंगरू पायात बांधीन,
चिऊताई तुला मी छान छान नटवीन।
छुम छुम नाचायला शिकवीन तुला ।। ३।।
आली आली चिऊताई खेळायला
हसायला अन नाचायला ...........
बडबडगीत
आमच्या शेतात गवत वाढलं
आमच्या शेतात गवत वाढलं ,गवत वाढलं ,गवत वाढलं रं।
आमच्या शेतात गवत वाढलं , ।।१
वाढलं गवत, विळ्यानं कापलं, विळ्यानं कापलं,विळ्यानं कापलं रं ।।२।।
कापलं गवत गाईला घातलं ।।३।।
गाईच्या दुधाने लोटकं भरलं ।।४।।
भरलं लोटकं तापत ठेवलं ।।५।।
तापल्या दुधात विरजन टाकलं ।।६।।
विरजन हलवून ताक केलं ।।७।।
ताकावरचं लोणी काढलं ।।८।।
काढल्या लोण्याचा काय काय झालं ।।९।।
आमच्या चिंगीनं हडप केलं, मडप केलं,
गडप केलं रं ।।१०।।
Comments
Post a Comment