७मराठी ७ माझी मराठी

 ७. माझी मराठी

- मृणालिनी कानिटकर जोशी

कविता ऐका


कवितेचा आशय - मराठी भाषेची थोरवी या कवितेत व्यक्त केली आहे. मराठी बोलीचे सौंदर्य  व महत्ता  यांचा यथोचित गौरव केला आहे.


 मूल्य / शिकवण / संदेश: मातृभाषेविषयी गाढ  प्रेम व आस्था आपल्या हृदयात ठसावी , हे मूल्य या  कवितेत प्रकट झाले आहे.

शब्दार्थ

ऋणात-  कर्जात (कृतज्ञ राहावे). 

उतराई होणे - उपकार फेडणे. 

कांचन - सोने. 

मोल - किंमत 

तप्त -  गरम, उष्ण, 

लोहापरी - लोखंडाप्रमाणे 

शीतल -  थंडगार 

गंध - सुवास, 

लेऊनिया -  नेसून , अंगावर धारण करून, परिधान करून 

नाना - अनेक, विविध 

बोली -  बोलीभाषा. 

अमृत - सुधारस, अलौकिक पेय, पीयूष 

प्राशेल- पिऊन टाकेल,  प्यायला 

भाग्यवंतन - शीबवान.

दुजाभाव -  भेद, फरक, आपपरभाव, 

पंथ - एका विचाराच्या धारेने आचरण करणारा समूह , धर्म

वर्णावी  - वर्णन करावी, कथन करावी. 

थोरवी - मोठेपणा

दूर देशी - लांबच्या प्रदेशात. 

ओवी - एक छंदप्रकार 


कविता ऐका

कवितेचा भावार्थ

माझी भाषा माझी आई

अर्थ भावनांना देई, 

तिच्या राहावे ऋणात 

होऊ नये उतराई.

मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात माझी मराठी भाषा माझी आई आहे. ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते. कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये, तिच्या ऋणातून उतराई होऊ नये, असे वाटते.


तिच्या एकेका शब्दाला 

रत्न-कांचनाचे मोल, 

कधी तप्त लोहापरी 

कधी चांदणे शीतल.


माझ्या मराठीच्या एक-एक शब्दाला रत्नाचे, सुवर्णाचे मोल आहे. माझा मराठी शब्द अनमोल आहे. कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते, तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो.


रानवाऱ्याच्या गंधात 

माझी मराठी भिजली,

लेऊनिया नाना बोली 

माझी मराठी सजली.

माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या वासात भिजते. तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. विविध बोलीभाषाअंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे. (अनेक बोलीभाषांच्या वैभवाने नटलेली आहे.)

माझ्या भाषेचे अमृत 

प्राशेल तो भाग्यवंत, 

तिचा नाही दुजाभाव 

असो कोणताही पंथ.

माझ्या मराठी भाषेचे अमृत (गोडवा) जो कोणी पिऊन घेईल, (समजून घेईल तो खराखुरा भाग्यवान ठोस, नशीबवान असेल. कोणताही पंथ असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करीत नाही. (मराठीला सगळे पंथ समान आहेत.) 


माझ्या मराठी भाषेची 

काय वर्णावी थोरवी, 

दूर देशी ऐकू येते 

माझ्या मराठीची ओवी.


माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी. ती अवर्णनीय आहे. दूरदूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरली आहे. माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते.

संकलित मूल्यमापन

१. प्रश्नोत्तरे

★★ प्रश्न १. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :

◆(१) कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते:- 

उत्तर :- आई व मुलगी

◆(२) खरा भाग्यवंत:

उत्तर:-  मराठी भाषेचे अमृत प्यायलेला

◆(३) मराठी भाषेची वैशिष्ट्ये :- 

 उत्तर:- (१) रत्न कांचनाच्या मोलाची

(२) उष्ण लोखंडासारखी

(३) शीतल चांदण्यासारखी

◆(४) मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द :- 

उत्तर :- आई , अमृत , ओवी

★★ प्रश्न २. पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा :

(१) मराठी भाषा दूरवर पसरली आहे. माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते..

उत्तर : दूर देशी ऐकू येते

         माझ्या मराठीची ओवी

★★  प्रश्न ३. पुढील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा : 

माझी भाषा माझी आई 

अर्थ भावनांना देई,

तिच्या राहावे ऋणात 

होऊ नये उतराई. 

उत्तर: माझी मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते. मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते, तिचे उपकार कधीच फिटू नयेत.

★★ प्रश्न ४. कवितेतील समान शेवट असणारे शब्द लिहा :

(कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा ) 

(१) मोल-  शीतल (२) भिजली -  सजली (३) थोरवी -  ओवी (४)  आई - देई - उतराई 

★★ प्रश्न ५. एका शब्दात उत्तर लिहा :

(१) मराठी भाषा याच्या गंधात भिजते

(२)कोणत्याही पंथाबाबत मराठी भाषा  करीत   नाही.

(३) या लेवून मराठी भाषा सजते

उत्तरे : (१) रानवाऱ्याच्या (२) दुजाभाव  (३)नाना बोली

भाषाभ्यास व व्याकरण

■■ १. प्रत्येकी  दोन/ तीन  समानार्थी शब्द लिहा. 

(१)आई :-   माता, जननी, माय, 

(२) कांचन :-  सोने , सुवर्ण, कनक, हेम 

(३) तप्त:- उष्ण, गरम

(४) वारा:- पवन, वात, अनल. 

(५) रान :- वन, जंगल, क्षेत्र, मैदान 


■■ प्रश्न २. विरुद्धार्थी शब्द लिहा.

अर्थ x अनर्थ

अमृत x विष

शीतल x उष्ण

भाग्य  x दुर्भाग्य

सुगंध x दुर्गंध

दूर x जवळ

■■ प्रश्न ३. पुढील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा :

 (१) ऋण :-  महादूने बँकेतून ऋण काढले.

(२) थोरवी :- माझ्या भारत देशाची थोरवी मी गातो. 

(३) उतराई :- आईच्या ममतेतून कोणी उतराई होऊ शकत नाही. 

(४) भाषा:-  माझी भाषा मला प्रिय आहे.

■★ २. लेखन विभाग ★■ 

●• पुढील सणांसाठी तुमच्या आवडत्या  मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा :

सण:- गुढीपाडवा , दिवाळी ,  दसरा ,होळी,  गणेशोत्सव,

मकरसंक्रांत, नवरात्र

संदेश

(१) स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे,

पडता दारी पाऊल गुढीचे! 

(२) दिवाळी सण मोठा; नाही आनंदा तोटा.

(३) आला दसरा दसरा; भविष्याचा काळ जावो हसरा !

(४) आली तेजाची होळी; सर्व दुःखांना जाळी.

(५) विद्या, धन, समृद्धी, आशा शुद्ध मती दे रे गणेशा !

(६) तीळगूळ घ्या ,   नेहमीच गोड बोला.

(७) लखलखत्या नऊ रात्री; आनंद ओसंडो गात्री.

३. तोंडी परीक्षा

प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :

(१) मराठी भाषेविषयी कोणत्या शब्दांत गौरव कराल, ते सांगा. 

(२) तुम्हांला तुमची भाषा का आवडते, ते सांगा.

आकारिक मूल्यमापन

१. प्रकट वाचन :

● ही कविता तालासुरांत मोठ्याने म्हणा.

२. चर्चा :

 जागतिक मराठी राजभाषा दिनाचे तुमच्या शाळेत आयोजन करायचे आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचे  आयोजन कराल, त्याची यादी तयार करा.

३. कृती :

● ● पुढे दिलेल्या भेटकार्डावर तुमच्या आवडत्या मित्र/मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करा.

प्रिय समीर/समीरा तुझ्या वाढदिवसाला तुला लाख लाख शुभेच्छा! जीवनातील सर्व आनंद तुला मिळोत! तुला आरोग्यदायी भविष्यकाळ लाभो !

तुझा मित्र/मैत्रीण 

सुनील / सुनीता 

४. उपक्रम :

* • वेगवेगळ्या शुभप्रसंगांच्या निमित्त स्वतः भेटकार्डे तयार करा.


Comments

Popular posts from this blog

HOME