८मराठी ११. स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा




पाठ इथे पहा 

सुनील चिंचोलकर हे समर्थ रामदासांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे एक प्रसिद्ध लेखक. संत साहित्याचे अभ्यासक. 'समर्थ रामदासांचे व्यवस्थापन', 'दहा संतचरित्रे', 'विदयाथ्यांचे श्री रामदास', 'संस्कारांचे मोती व इतर अशी ४५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. संतसाहित्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक मान्यवर संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रस्तुत पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारतभ्रमण यात्रेतील काही प्रसंग आले आहेत. स्वामींची अद्भुत स्मरणशक्ती आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जबरदस्त मानसिक शक्ती यांचे यात दर्शन घडते. सर्वसामान्य भारतीय माणसांबद्दलची स्वामींच्या मनातील कळकळ येथे व्यक्त होते.

महत्त्वाचे मुद्दे

१. भारताची सेवा करायची असेल, तर प्रथम भारत देश पूर्णपणे पाहून घेतला पाहिजे. याकरिता स्वामी विवेकानंद भारतयात्रेला निघाले.

२. पोरबंदरच्या वास्तव्यात स्वामींच्या वाचनाचा अफाट वेग प्रत्ययाला आला. ते पुस्तकाचा एक खंड एका दिवसात वाचून संपवत असत. पुस्तकातील तपशील, मुद्दे विचार इत्यादी स्वामींच्या वाचनातून सुटत नसत. ग्रंथपालाचा त्यांच्या या अफाट वेगावर विश्वास बसला नाही. त्याने स्वामींची परीक्षा घेतली. स्वामींचा वाचनाचा वेग बघून ग्रंथपाल थक्क झाला.

३. खेत्रीच्या महाराजांकडे स्वामींनी आपल्या अद्भुत स्मरणशक्तीचे स्पष्टीकरण दिले. स्वामींना तासन् तास ध्यानधारणा करता येत होती. ध्यानधारणेमुळे एकाग्रता साधता येते. एकाग्रतेमुळे समोरील मजकुराचे सहज आणि अत्यंत वेगाने आकलन होते. ते स्मरणात कायम टिकून राहते. स्वामींना एका दृष्टिक्षेपात एक अखंड परिच्छेद वाचता येत असे. काही काही वेळा ते एका दृष्टिक्षेपात पुस्तकांचे संपूर्ण पान वाचू शकत असत.

४. कन्याकुमारीला समुद्राच्या आत एक-दीड फर्लांग अंतरावर दोन मोठी कातळे होती. त्यांना त्या कातळांवर बसून ध्यानधारणा करण्याची इच्छा झाली 

५. नावाड्यांनी तेथे आपल्याला पोहोचवावे, अशी स्वामींनी नावाड्यांना विनंती केली. त्यांनी स्वामीकडे पैसे मागितले. स्वामींकडे पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे कातळापर्यंत पोहोचवण्यास नावाडयांनी नकार दिला. स्वामींनी समुद्रात उडी घेतली आणि ते पोहत पोहत कातळांपर्यंत पोहोचले.

६. त्या कातळांवर स्वामींनी तीन दिवस आणि तीन रात्री ध्यानधारणा केली. भारतमातेचे चिंतन केले. संपूर्ण भारतभ्रमणामध्ये स्वामींना भारताच्या विदारक स्थितीचे दर्शन घडले. सामान्य भारतीय माणूस अजूनही अर्धपोटीच जगतो. अशा माणसांना वेदान्त सांगणे धादान्त खोटे आहे. लोकांना आधी दोन वेळचे जेवण दिले पाहिजे आणि मग धर्म शिकवला पाहिजे, अशी स्वामींची धारणा होती.

शब्दार्थ

कंठस्थ - तोंडपाठ. 

मानवी कक्षेच्या बाहेर - कोणत्याही माणसाला न झेपणारे. तर्कसंगत - तर्काला धरून, तर्कानुसार.

नेत्रेंद्रिये-  डोळे.

शिलाखंड - कातळ, खडक,

निष्कांचन - अत्यंतगरीब .

भावसमाधी - मनातील उच्च, उदात्त भाव, निष्ठा यांत पूर्णपणे विरघळून जाणे. 

प्रतिकूलता - विरुद्ध परिस्थिती. 

अंतःस्थ अग्नी - मनातील खळबळ, ईर्षा.

सर्वसंग्राहकता- सर्व गोष्टींचा स्वीकार करणे, सर्व गोष्टी समजून घेऊन स्वीकार करणे. 

समन्वयाचे - परस्परांना समजून घेण्याचे, परस्परांशी  जुळवून घेण्याचे. 

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) भ्रमण करणे - सर्वत्र फिरणे.

(२) डोळ्यांखालून घालणे- स्वतः तपासून पाहणे.

(३) समर्पित करणे - अर्पण करणे.

    टिपा

(१) वेदान्त : भारतीय परंपरेचे तत्त्वज्ञान. आपल्या उपनिषदांमध्ये हे तत्त्वज्ञान सांगितले आहे. 'वेदान्त' या नावाचा स्वतंत्र ग्रंथ नाही.

(२) फर्लांग  : अंतर मोजण्याचे एकक , १/८ मैल म्हणजे १ फर्लांग, १फर्लांग = २०१ मीटर.

कृति स्वाध्याय व उत्तरे

उतारा क्र. १ : (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४६ व ४७) 

ज्या देशाची आपल्याला सेवा.............................तिथे आपण गेलो तर ?

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती १: (आकलन कृती)

(१) स्वामीजींचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये उताऱ्यातून शोधा व लिहा :

(i) मनाची एकाग्रता (ii) दृढनिश्चय (iii) देशप्रेम

(iv) वाचनप्रेम

उत्तरे (i) मनाची एकाग्रता :

(१) ते रोज एक खंड वाचायचे.

(२) मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो.

(३) मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते.

(ii) दृढनिश्चय :

(१) स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. 

(२) ते रोज एक खंड वाचायचे.

(३) स्वामींनी समुद्रात उडी घेतली आणि ते पोहत पोहत कातळांपर्यंत पोहोचले.

(iii) देशप्रेम :

ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज, एकदा डोळ्यांखालून घालावा.

(iv) वाचनप्रेम :

(१) इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत.

(२) ते रोज एक खंड वाचायचे.

(३) त्यांनी तीन दिवसांत एकेक खंड वाचून परत केले.

(२) एक किंवा दोन शब्दांत उत्तर लिहा. 

(i) स्वामींच्या वाचनवेगाचा अनुभव आला ते गाव- 

(ii) स्वामींना एक खंड वाचण्यासाठी लागलेला काळ -

(iii) स्वामींनी वाचलेले एकूण खंड -

(iv) स्वामींच्या वाचनवेगाबद्दल संशय घेणारे- 

(v) स्वामीजींनी ज्यांना लक्षात ठेवण्याचे रहस्य सांगितले ते-

उत्तरे (i) पोरबंदर (ii) एक दिवस (iii) तीन (iv) ग्रंथपाल (v) खेत्रीचे महाराज

(३) ग्रंथपालांनी स्वामींची परीक्षा घेताना केलेल्या कृती लिहा.

उत्तर:-  (i) स्वामींना ग्रंथपालांनी तीन खंडांतले उभे आडवे प्रश्न विचारले.

(ii) प्रश्नाचे उत्तर असलेले अर्धे पाऊण पान स्वामी बोलून दाखवायचे, हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, 'हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे.

(४) खेत्रींच्या महाराजांजवळ स्वामींनी आपल्या शिक्षण व्यवस्थेचे व्यक्त केलेले स्वरूप लिहा.

उत्तर:- आपल्या शिक्षणव्यवस्थेत आपण प्रथम अक्षरे शिकवतो, मग शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. ही आपल्या शिक्षणव्यवस्थेची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन प्रयत्न केले जात नाहीत.

कृती २ : (आकलन कृती)


प्रश्न (१)खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या  उत्तराची वैशिष्ट्ये लिहा. 

उत्तर :- तर्कशुद्ध   तर्कसंगत

प्रश्न (२)श्रीपादशिला ची   वैशिष्ट्ये लिहा:-

उत्तर :-(i) किनाऱ्यापासून समुद्रात एक-दीड फर्लांग आत होती. (ii) पाण्याच्या भरपूर वर होती.


प्रश्न(३) हे केव्हा घडेल ते लिहा :

(i) परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील.

(ii) माणसाची अंतःस्थ चेतना फुलेल : 

(iii) मन एकाग्र करता येईल :

(iv) मन, बुद्धी व डोळे विकसित होतील: 

उत्तर;-  (i) मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर.

(ii) विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर.

(iii) तासन् तास ध्यानाचा अभ्यास केल्यावर.

(iv) वाक्य लिहायला शिकवण्याच्या पलीकडे जाऊन प्रयत्न केल्यावर.


प्रश्न (४) परिणाम लिहा :

(i) स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले -

(ii) ध्यानधारणा करता आली.

(iii) मन एकाग्र करता आले. 

(iv) मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केली.

उत्तर (i) स्वामी किती प्रामाणिक आहेत, हे ग्रंथपालांन तपासायचे ठरवले.

(ii) मन एकाग्र करणे शक्य झाले.

(iii) वाचलेले लक्षात राहू लागले..

(iv) परिच्छेदच्या परिच्छेद वाचता येऊ लागले.


प्रश्न (५) कन्याकुमारीला पोहोचल्यावर स्वामींनी केलेल्या कृती लिहा.

(i) कन्याकुमारीचे दर्शन घेतले. (ii) आनंदित होऊन दर्शनानंतर बाहेर आले. (iii) समुद्राच्या काठी उभे राहिले.


कृती ३ : (व्याकरण कृती)

प्रश्न (१) पुढील शब्दांचे दोन भिन्न अर्थ लिहा :

 (i) वाचणे (१) पठण करणे (२) बचावणे.

(ii) चाळणे : (१) चाळणीत घालून गाळणे. (२) वरवर नजर टाकून पुस्तकाची पाने भरभर फिरवणे.

प्रश्न (२) पुढील वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात लिहा :

 ते रोज एक खंड वाचायचे.

उत्तर  (i) ते -  सर्वनाम (ii) रोज - क्रियाविशेषण (iii) एक-  विशेषण (iv) खंड- नाम (v) वाचायचे - क्रियापद

प्रश्न (३) पुढील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा : ' हिमालयापासून'

उत्तर : (i) माल (ii) माया (iii) मान (iv) यान (v) पाल (vi) पाया (vii) पान (viii) सून (ix) नसू.

कृती ४ (स्वमत/अभिव्यक्ती)

० (१) तुमचे मत लिहा :

● ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.

उत्तर : ग्रंथपालाला स्वामींबद्दल शंका आली. यात त्याची कोणतीही चूक नाही. एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून से आपल्या उपयोगाचे नाही, हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात. पण स्वामींनी मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसांत तीन खंड वाचून परत केले. हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचनवेड आहे, असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडायचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात. या मार्गानि पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. ग्रंथपालाला कदाचित अशी शंका आलीसुद्धा असेल. स्वामींसारख्या महान व्यक्तीचा परिचय त्याला झालेला नव्हता. मुख्य म्हणजे स्वामींचा अपमान करण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती, हे येथे स्पष्टपणे आढळते. एकंदरीत हे माणसाच्या स्वभावाला धरुनच पडले.

• (२) तुमचा अनुभव लिहा :

• काम करीत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो, 'याविषयी तुमचा अनुभव.

उत्तर : त्या दिवशी रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा संप होता. माझी शाळा बुडू दे नको, असे मनात घोकत घोकतच शाळेत चाललो होते. सगळ्या बसगाड्या तुडुंब भरून चालल्या होत्या. बसथांब्यांवर अलोट गर्दी होती. वाटेत दोन मित्र भेटले. आज शाळेला दांडी मारण्याची संधी या आनंदात ते अर्ध्या वाटेवरुनच घरी परत चालले होते. मला मात्र काहीही करून शाळेत जायचेच होते. आज इंग्रजीच्या तासाला सर आमचे प्रत्यक्ष इंग्रजी संभाषण घेणार होते. त्यांनी आम्हांला विषय वाटून दिले होते. माझा मित्र शंतनू आणि मी आम्ही छान तयारी केली होती. या वर्षी मी तर इंग्रजीत उत्तम रितीने बोलण्याची प्रतिज्ञाच केली होती.

बस मिळण्याची खात्री नसल्यामुळे मी चालतच निघालो. वाटेत सिग्नलजवळ बस थांबली होती. लोक बसला लोंबकळत होते. मी कसाबसा आत घुसलो. एका काकांनी मला आधार दिला. पण बसमध्ये मी घुसमटू लागलो. मला श्वास घेता येईना. घामाने चिंब भिजून गेलो. पुढच्या थांब्यावर कसाबसा उतरलो आणि चालतच शाळेत गेलो

असा धडपडत मी शाळेत पोहोचलो. वर्गात सर होते. संभाषणाचा उपक्रम चालू होता. त्या दिवशी मी आणि शंतनूने सुंदर संभाषण सादर केले. शंतनूने तर कमालच केली. सर्वांनी खूप कौतुक केले. तेच संभाषण सरांनी आम्हांला दुसऱ्या वर्गावरही सादर करायला लावले. मला त्या दिवशी कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

उतारा क्र. २ :

 (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४७) 

 (त्यांनी तिथे असणाऱ्या त्या ...................... स्वामीजीनी समजावून सांगितले.

प्रश्न. वर सुचवलेला  उतारा  वाचा आणि दिलेल्या  सूचनांनुसार कृती करा :

कृती : (आकलन कृती)

(१) खलील उद्गार कोण कोणाला म्हणाले? ते लिहा. 

((i) "ते काय आहे?" 

(ii) "त्याला श्रीपादशिला म्हणतात."

(iii) "मला त्या शिलाखंडावर सोडा.

(iv) "तुम्हांला पाच पैसे दयावे लागतील. "

उत्तर :- (i) स्वामी विवेकानंद नावाड्यांना म्हणाले.

(ii) नावाडी स्वामी विवेकानंदांना म्हणाले.

(iIi) स्वामी विवेकानंद नावाड्यांना म्हणाले 

(iv) नावाडी  स्वामी विवेकानंदांना म्हणाले.

(२) एक किंवा दोन शब्दांत उत्तर लिहा. 

(i) स्वामींच्या मते देशाचे टोक.

(ii) स्वामी कन्याकुमारीच्या चरणी अर्पण करणार होते.

(iii) निष्कांचन संन्यासी असलेले.

(iv) शिलाखंडावर पोहोचण्याचा खर्च.

 उत्तर :- (i) समुद्रातील शिलाखंड (ii) भारतयात्रा  (iii)स्वामी विवेकानंद (iv) पाच पैसे

(३)  दोन वैशिष्ट्ये लिहा :

शार्क मासे

(i) जबरदस्त जबडा

(ii) दात हत्तीच्या सुळ्यांसारखे

 (४) पुढील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा :

  स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे

विचार: (i) उडी मारण्यापूर्वी (ii) उडी मारल्यानंतर

उत्तर:- (i) उडी मारण्यापूर्वी -  होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे ?

(ii) उडी मारल्यानंतर - स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले, त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर? त्याचा दम संपला तर ?

  (५) स्वामीजींचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये उताऱ्यातून शोधा व लिहा:

(i) निर्भयता (ii) दृढनिश्चय (iii) देशप्रेम 

उत्तर :- (i) निर्भयता :

(१) स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये मारली.

(२) मी आता दोन-तीन दिवस इथेच राहणार आहे.

(३) रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही.

(४) तीन दिवस नुसते थांबले नाहीत. ते ध्यानस्थ बसले.

(ii) दृढनिश्चय :

(१) स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले. 

(२) तीन दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थबसले. 

(३) जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसातला अंतःस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. 

(४) त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे. थोड़ी संकटं असली पाहिजेत.

(iii) देशप्रेम :

(१) कन्याकुमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पित करावी. (२) तीन दिवस, तीन रात्री ते फक्त भारतमातेचे चिंतन करीत होते.

(३) या देशातले अनेक लोक उपाशी आहेत.

कृती २ : (आकलन कृती)

(१) परिणाम लिहा:- 

घटना

(i) स्वामीजींनी पैसे देण्याची असमर्थता व्यक्त केली.

(ii) नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले.

(iii) स्वामीजींनी समुद्रात उडी मारली.

(iv) स्वामीजी तीन दिवस नुसते थांबले नाहीत, तर ते ध्यानस्थ बसले. 

(v) स्वामीजी भावसमाधी मध्ये होते.

उत्तर:- 

परिणाम

(i)स्वामीजींनी पोहत जाण्यासाठी समुद्रात उडी घेतली..

(ii) नावाड्यांनी त्यांना नावेतून न्यायला नकार दिला.

(iii)नावाडी घाबरून गेले.

(iv) नावाडी स्वामीजींसाठी जेवण घेऊन आले.

(v) नावाड्यांनी मारलेल्या हाका त्यांना ऐकू गेल्या नाहीत.

प्रश्न (२) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(i) भारतीय जनतेबद्दल स्वामींचे निरीक्षण आणि स्वामींचे मत लिहा. 

(ii) स्वामी विवेकानंद यांच्या मते धर्माचे स्वरूप

(iii) कन्याकुमारीच्या समुद्रातील अडचणी

(iv) स्वामी विवेकानंद यांनी समुद्रात उडी घेतली तेव्हा नावाड्यांच्या मनातील भीती

उत्तर:- 

(i) भारतीय जनतेबद्दल- 

(१) स्वामींचे निरीक्षण:- लोक उपाशी होते. त्यांना जेवायला अन्न मिळत नव्हते.

(२) स्वामींचे मत :- ज्यांना जेवायला अन्न मिळत नाही. त्यांना वेदान्त शिकवणे धादान्त खोटे असते.

(ii) धर्माचे स्वरूप- 

(१) सूर्यासारखा सर्वप्रकाशक

(२)  वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक

(iii)कन्याकुमारीच्या समुद्रातील अडचणी - 

(१) एक-दीड फर्लांग आत पोहत जाणे कठीण व सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते.

(२) जबरदस्त जबडा असलेल्या व हत्तीच्या सुळ्यांसारखे दात असलेल्या शार्क माशांचा धोका होता.

(iv)नावाड्यांच्या मनातील भीती - 

(१) वाटेत संकट आले तर?

(२) मध्येच दम संपला तर?

कृती ३: (व्याकरण कृती)

प्रश्न (१) सहसंबंध ओळखून उत्तरे लिहा:

 (i) सांगणे :  सांगावा : : धावणे : ..................

(ii) विवेकानंद : विवेक + आनंद : :  शुक्राचार्य : ...............

(iii) अनुकूल : प्रतिकूल : : होकार :..................

(iv) दगड : दगडी : : कापड :..................

  उत्तर :- (i) धावा (ii) शुक्र + आचार्य (iii) नकार  (iv) कापडी

(२) लेखननियमांनुसार अचूक असलेले व चुकीचे असलेले असे पुढील शब्दांचे दोन गट करा : अंधकार, विपरीत, पाश्चात्त्य, दैदीप्यमान, अल्पसंख्यांक, पारंपारिक, महत्त्व, सामग्री.

उत्तर :-  (i) अचूक असलेले शब्द :- विपरीत, पाश्चात्त्य

महत्त्व, सामग्री.

 (ii) चुकीचे असलेले शब्द :- अंधकार, दैदीप्यमान, अल्पसंख्यांक, पारंपारिक

कृती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)

प्रश्न (१) तुमचे मत लिहा :

पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत.

उत्तर : स्वामींच्या भारतयात्रेचा शेवट कन्याकुमारीत होत होता. आपली भारतयात्रा कन्याकुमारीच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा स्वामींच्या मनात निर्माण  झाली. मात्र शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतूनच  जावे लागणार होते. आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय पोहोचवण्यास तयार नव्हते. स्वामीकडे पैसे नव्हते. कोणालाही असे  वाटेल की, स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोहोचवायला हवे होते . परंतु नावाडी स्वामींचे मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे  घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा त्या नावाड्यांचा  पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे नावाड्यांनी नकार  दिला. शिवाय, त्या गरीब नावाड्यांचे उत्पन्न काय असणार! तसेच, स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्चात्तापही झाला. यामुळे नावाड्यांनी स्वामींना  नकार दिला, यात  मला कोणतीही चूक दिसत नाही.

व्याकरण व भाषाभ्यास

१. पूर्वरूपसंधी

• हा स्वरसंधीचाच एक प्रकार आहे.

• पुढील वाक्य वाचा व अधोरेखित / ठळक  शब्दांकडे नीट लक्ष दया.

ससा पळाला आणि झाडीत नाहीसा झाला. 'झाडीत' या शब्दामध्ये 'झाडी+ आत' असे दोन शब्द आहेत. 'नाहीसा' या शब्दामध्ये 'नाही + असा ' असे दोन शब्द आहेत. परंतु वाक्यात 'झाडी आत '  या दोन शब्दांऐवजी आपण झाडीत असा एक शब्द वापरतो. तसेच 'नाही असा ' या दोन शब्दांऐवजी आपण 'नाहीसा' असा एक शब्द वापरतो.

म्हणजेच, झाडी + आत = झाडीत (आ चा लोप) 

नाही + असा  = नाहीसा ('अ'चा लोप) 

 वरील संधींमध्ये पहिला शब्द कायम राहिला आहे व

दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर लोप पावला आहे. (लोप पावणे = नाहीसा होणे.)

अशा संधीमध्ये आधीच्या शब्दाचे रूप कायम राहते; म्हणून या संधीला पूर्वरूपसंधी म्हणतात. (पूर्व म्हणजे आधीचे , रूप म्हणजे शब्द.)

जेव्हा दोन स्वर एकापुढे एक आले असता, त्यातील पहिला स्वर न बदलता कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, त्यास पूर्वरूपसंधी म्हणतात. म्हणून, 'झाडीत, नाहीसा' हे पूर्वरूपसंधी आहेत.

काही पूर्वरूपसंधी लक्षात ठेवा :

साजे + असा = साजेसा 

नको + असे = नकोसे

असावे + असे = असावेसे

चांगले + असे = चांगलेसे

घालत + आहेत = घालताहेत 

शकत + असे = शकतसे

काही + असा = काहीसा 

थोडे + असे = थोडेसे

गाडी + आत गाडीत

नदी + आत =नदीत

कुणी + असे = कुणीसे 

खिड़की + आत =खिडकीत

फाटका + असा = फाटकासा 

दिस + आहेत =  दिसताहेत

पडत + आहेत = पडताहेत 

जरा + असे  =जरासे 

फार + असा = फारस

२. पररूपसंधी

• हाही एक स्वरसंधीचाच प्रकार आहे.

• पुढील वाक्य वाचा आणि अधोरेखित /ठळक शब्दांकडे 

नीट लक्ष दया :

 एकेक मुलाने उठा आणि दप्तर ठेवून या.

'एक एक' या दोन शब्दांऐवजी आपण एकेक  असा एक शब्द वापरतो. 

तसेच, 'ठेव ऊन' या दोन शब्दाऐवजी आपण 'ठेवून' असा एक शब्द वापरतो. म्हणजेच एक +एक = (ए + क् + अ) + एक =  एकेक

(पहिल्या शब्दातील 'अ' या स्वराचा लोप. )

ठेव + ऊन = (ठे + व् + अ) + ऊन = ठेवून (पहिल्या शब्दातील 'अ' या स्वराचा लोप) अशा संधीमध्ये पहिल्या शब्दातील स्वर लोप पावतो. व दुसऱ्या शब्दातील स्वर त्यात मिसळतो. म्हणजेच, दुसरा शब्द कायम राहतो. म्हणून या संधीला पररूपसंधी म्हणतात. (पर म्हणजे दुसरा,  रूप म्हणजे शब्द.)

जेव्हा दोन स्वर एकापुढे एक आले असता, त्यांतील पहिला स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहतो, त्यास पररूपसंधी म्हणतात. म्हणून 'एकेक' व 'ठेवून' हे पररूपसंधी आहेत.

• काही पररूपसंधी लक्षात ठेवा :

कर +ऊन =करून 

घर + ई = घरी

घाम + ओळे = घामोळे

झोप + आळू=  झोपाळू 

न + उमजे = नुमजे

न + उरली =नुरली

भारत + ईय = भारतीय

मन +  ई = मनी

मार + ईत = मारीत

वाचन + ईय = वाचनीय

चिंधी  + ओटी =  चिंधोटी

स्वप्न + ई = स्वप्नी

सांग + एन  = सांगेन

हर + एक = हरेक

ध्यान + ई  = ध्यानी

लक्षात ठेवा :

(१) पूर्वरूपसंधीत पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो.

(२) पररूपसंधीत पहिला स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहतो.

१. व्याकरण :

प्रश्न (१)संधी शब्दाचा संधिविग्रह करा :

संधी शब्द 

अधोमुख , दुर्दैव , मनोबल, दुष्कीर्ती  बहिष्कृत

उत्तरे : संधिविग्रह

अधोमुख  = अधः + मुख

दुर्दैव  =  दुः + दैव

मनोबल =  मनः+ बल

दुष्कीर्ती  = दुः + कीर्ती 

बहिष्कृत  = बहिः + कृत 

प्रश्न (२) दिलेल्या संधी विग्रहापासून संधी शब्द लिहा: 

संधिविग्रह

मनः + वृत्ती = .........

निः + विवाद  = .........

मनः + धैर्य  = .........

तेजः + पुंज  = .........

आयुः + वेद = .........

उत्तरे :

संधिविग्रह      संधी

मनः + वृत्ती =  मनोवृत्ती

निः + विवाद =निर्विवाद

मनः + धैर्य = मनोधैर्य

तेजः + पुंज = तेजःपुंज 

आयुः+ वेद = आयुर्वेद

प्रश्न (३) संधी सोडवा :

(i) नाहीसा =

(ii) नदीत = 

उत्तरे : (i) नाहीसा = नाही + असा

(ii) नदीत = नदी  + आत

प्रश्न (४) संधी करा :

भेट + ऊन =

घर + ई =

उत्तरे : घर + ई = घरी

भेट + ऊन- भेटून

प्रश्न (५) लिंग बदला :

(1) साधू (2) शिष्य (3)  संन्यासी (4) राजा

उत्तरे : (1) साधू-साध्वी (2) शिष्य - शिष्या (3) संन्यासी - संन्याशीण (4) राजा-राणी

प्रश्न (६) वचन बदला:

 (i) मासे (ii) फुले (iii) दिवस. (iv) उडी (vi) भाकरी.(v) हाक 

उत्तरे : (i) मासे -  मासा (ii) फुले - फुल (iii) दिवस- दिवस (iv) उडी - उड्या (v) हाक - हाका (vi) भाकरी - भाकऱ्या.

२. शब्दसंपत्ती

प्रश्न (१) ' निर्भय'  पासून 'निर्भयता' भाववाचकनाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता, त्व, आळू, पणा' हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचकनामे पुढे लिहा :

उत्तर :- 

(1) -ता :- सुंदरता , वीरता

(2) -त्व :- नेतृत्व,  कर्तृत्व

(3) -आळू :- दयाळू, कृपाळू

(4) -पणा :- वेडेपणा , प्रामाणिकपणा

प्रश्न (२) समानार्थी शब्द लिहा :

सूर्य = ...........  अग्नी = ...........  

वसुंधरा  = ...........  दृष्टी  = ........... 

उत्तर : सूर्य -  रवी

अग्नी - आग

वसुंधरा = पृथ्वी

दृष्टी =  नजर 


प्रश्न (३) पुढील वाक्यांतील अधोरेखित / ठळक शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य  पूर्ण करा. 

 (i) सर्वांनी बेसावध राहून काम करू नये.

(ii) गाडी वेगाने चालवू नये.

(iii) शिळे अन्न खाऊ नये.

(iv) कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये.

(v) जॉन अप्रामाणिक मुलगा नाही.

उत्तरे (1) सर्वांनी सावध राहून काम करावे.

(ii) गाड़ी हळू चालवावी.

(iii) ताजे अन्न खावे.

(iv) सर्वानी कार्यक्रमास उपस्थित राहावे.

(v) जॉन प्रामाणिक मुलगा आहे.

प्रश्न (४) पुढे दिलेले  'बे' हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा: उदा.-  बेसावध

उत्तर : बेपर्वा , बेअब्रू , बेफिकीर , बेसुमार ,बेजबाबदार.

प्रश्न (५) विशेषणे- विशेष्ये यांच्या जोड्या लावा.

दोन , अंतःस्थ , निष्कांचन, शक्तिशाली, 

अग्नी, शिलाखंड , मनुष्य , संन्यासी . 

विशेषणे  -   विशेष्य

दोन  - शिलाखंड

अंतःस्थ  -अग्नी

निष्कांचन - संन्यासी

शक्तिशाली - मनुष्य

प्रश्न (६) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: 

(i) गुरूंनी दिलेले ज्ञान ग्रहण करणारा-

(ii) ग्रंथसंग्रह असलेले ठिकाण - 

(iii) ग्रंथाची देखभाल करणारा - 

(iv) होडी चालवणारा -

(v) चित्र काढणारी व्यक्ती - 

उत्तर :- (i) शिष्य (ii) ग्रंथालय (iii) ग्रंथपाल (iv) नावाडी (v) चित्रकार

प्रश्न (७) अंतर या  शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा

उत्तर:- (1) मन (2) लांबी-रुंदी

प्रश्न (८) जोडशब्द पूर्ण करा: 

(i) गोर ------  (ii) उभे ------  (iii) तासन् ------ (iv) घर-----

उत्तर :- (i) गोरगरीब (ii) उभे आडवे  (iii) तासन् तास (iv) घरदार

३. लेखननियमांनुसार लेखन 

(१) अचूक शब्द लिहा :

(i) तर्कशुद्ध / तर्कशूद्ध/ र्तकशुद्ध /(i)  र्तकशूद्ध

(ii) परीच्छेद /परिच्छेद/पारीछेद/परिछेद

(iii) शोलाखंड / शिलाखंड/शीलांखड / शिलाखंड, 

(iv) संघर्ष / संघर्ष / संघर्श / सांघर्ष

उत्तर :- (i) तर्कशुद्ध (ii) परिच्छेद (iii) शिलाखंड (iv) संघर्ष.

(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :- 

(i) कन्याकूमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पीत करावी.

(ii) खरा र्धम हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक असतो. :

उत्तर:-  (i) कन्याकुमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पित करावी. 

(ii) खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक असतो..

४. विरामचिन्हे

• पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे  घालून ती पुन्हा लिहा: 

(i) नावाड्याला सांगितले बाबा रे मला तू त्या शिलखंडावर सोड. 

(ii)  फर्लांग दीड फर्लांग अंतर पोहत जायचे होते.

उत्तरे (i) नावाड्याला  सांगितले, "बाबा रे, मला तू

त्या शिलाखंडावर सोड". 

(ii) फलॉग-दीड फर्लांग अंतर पोहत जायचे होते.

 ५. वाक्प्रचार

प्रश्न(१) पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लिहा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा:

 (i) तहानभूक विसरणे -

(ii) मंत्रमुग्ध होणे -

(iii) कोड्यात टाकणे -

उत्तर :- (i) तहानभूक विसरणे -  

 अर्थ- एखादा विषयात पूर्ण गढून जाणे.

वाक्य :-  चित्र काढताना केशव अगदी तहानभूक विसरतो.

 (ii) मंत्रमुग्ध होणे - 

 अर्थ- तल्लीन होणे, मग्न होणे. गुंग होणे,

वाक्य :- आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहून अनिता  मंत्रमुग्ध झाली.

(iii) कोड्यात टाकणे -

अर्थ- कोंडीत सापडणे. 

वाक्य:-  तुला पुढचे शिक्षण घ्यायचे की नोकरी करायची, असे विचारून मोहनला काकांनी कोडयात टाकले.

प्रश्न(२) पुढील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ निवडा : 

(i) थक्क होणे

(१) न सुचणे (२) अवाक् होणे (३) मन तळमळणे

(ii) डोळ्यांखालून घालणे

(१) स्वतः तपासून पाहणे (२) डोळेझाक करणे (३) गुंग होणे.

(iii) भाकरीची प्रांत असणे

(१) श्रम करणे. (२) चिंता वाटणे. (३) पोटापाण्याची विवंचना असणे.

उत्तर : (i) थक्क होणे - अवाक् होणे. 

(ii) डोळ्यांखालून घालणे -  स्वतः तपासून पाहणे. 

(iii) भाकरीची प्रांत असणे -  पोटापाण्याची विवंचना असणे. 

तोंडी परीक्षा

प्रश्न: पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :

(१) तुम्ही स्वतःचा वाचनाचा वेग वाढवण्यासाठी काय काय कराल? 

(२) वर्गात प्रकट वाचन करताना कोणकोणते दोष आढळून येतात?

आकारिक मूल्यमापन

२. गटचर्चा

संभाषण करण्यात येणारे अडथळे आणि ते दूर करण्यासाठी करायचे प्रयत्न, यासंबंधी वर्गात चर्चा करा.

२. उपक्रम :

(१) गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून  मिळवा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. मुद्दे -  संक्षिप्त परिचय, उल्लेखनीय कार्य, मिळालेले पुरस्कार. 

(२) तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या  पुस्तकांविषयीची माहिती     पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :

 मुद्दे – पुस्तकाचे नाव, लेखक/लेखिका, पुस्तकाचा विषय, साहित्याचा प्रकार, तुम्हांला आवडलेली पात्रे,त्यांतील  तुम्हांला विशेष आवडलेल्या घटना इत्यादी.



टेस्ट सोडवा 

प्र.1. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केले कारण ................................

(1) भारतीय समाज पहायचा होता.

(2) देशाची सेवा करायची होती.

(3) समाजाची सेवा करायची होती .

पर्याय (1)एक व दोन बरोबर  (2) दोन व तीन बरोबर 

(3) एक व तीन बरोबर  (4) सर्व बरोबर 


प्र. 2. पोरबंदरमधील ग्रंथपालांने स्वामी विवेकानंदाबद्दल वापरलेला शब्द कोणता ?

(1) स्वामी  (2) संत  (3) साधू  (4) शिष्य

प्र.3  चुकीचे वाक्य ओळखा.

(1)  स्वामीजी इंग्रजी ग्रंथाचे खंड वाचत असत.

(2)  स्वामीजींनी तीन खंड वाचून  परत केले

(3)  स्वामीजी ग्रंथ न वाजता परत करत असत.

(4) स्वामीजींनी एक खंड एका दिवसात परत केला.

 प्र.4. ग्रंथपालाला दिसलेले स्वामीजींचे मानवी कक्षेच्या बाहेर चे काम कोणते ?

 (1) स्वामीजी रोज एक खंड वाचायचे .

 (2) स्वामीजी इंग्रजी ग्रंथांची खंड वाचायचे .

 (3) स्वामीजी ग्रंथालया मधून जाडजूड पुस्तक न्यायचे. (4) कोणत्याही प्रश्नाचे उत्तर स्वामीजी कंठस्थ सांगायचे.

 प्र.5 .स्वामी विवेकानंद यांना लक्षात ठेवणे कशामुळे जमत होते ? 

(1) स्वामीजी ध्यानाचा अभ्यास करत असत .

(2) स्वामीजी त्यांचे मन कुठेही एकाग्र करत असत.

(3)  स्वामीजी इंग्रजी भाषा शिकवत होते.

पर्याय :- (1) एक व तीन बरोबर . (2) दोन व तीन बरोबर.  (3) एक व दोन बरोबर. (4)  सर्व बरोबर .

प्र.6.  स्वामींच्या वाचन वेगाचा अनुभव ................येथे आला.

(1)  कन्याकुमारी  (2) पोरबंदर (3)  हिमालय (4)  खेत्री

प्र.7. स्वामीना एक खंड वाचण्यास लागलेला वेळ .......................  

(1) एक दिवस (2)  एक तास 

(3) एक आठवडा (4) तीन दिवस 

प्र.8. पोरबंदर येथे स्वामीजींनी किती खंड वाचले? 

(1)  एक    (2)   दोन    (3)  तीन    (4)  चार 

प्र.9.  पोरबंदर येथे स्वामींच्या  वाचनाचा अनुभव कोणाला आला ?

(1) लेखकाला (2)  शिष्याला 

 (3) ग्रंथपालाला   (4) महाराजांना

प्र.10. चुकीची जोडी ओळखा . 

(1) बाहेर   X आत 

(2) गुरु   X   शिष्य 

(3)  शक्य X  अशक्य 

(4)   पूर्ण  X   संपूर्ण

प्र.11 . चुकीची जोडी ओळखा. 

(1)  प्रामाणिक  X   सप्रामाणिक 

(2) उभे  X  आडवे 

(3)  प्रश्न  X  उत्तर 

(4)  सुसंगत  X   विसंगत 

प्र. 12.  उताऱ्यात उल्लेख केलेले राजे साहेब कोण आहेत? 

(1)  ग्रंथपाल साहेब  (2) स्वामींचे जोडीदार  

(3)  खेत्रीचे महाराज  (4)  पोरबंदर चे महाराज 

प्र. 13 स्वामींच्या वाचन वेडाबद्दल संशय कोणी घेतला ?

(1) शिष्य            (2)  ग्रंथपाल

(3)  खेत्रीचे महाराज  (4)  पोरबंदर चे महाराज

प्र. 14 . स्वामींजींनी  लक्षात ठेवण्याचे रहस्य कोणाला सांगितले ? 

(1) शिष्य  (2) ग्रंथपाल 

(3) खेत्रीचे महाराज   (4) पोरबंदर चे महाराज 

प्र. 15 .स्वामीजींना वाचना साठी लागणारे  ग्रंथ कोण आणून देत असत ?

(1) शिष्य   (2)  ग्रंथपाल   (3) खेत्रीचे महाराज (4)  पोरबंदर चे महाराज 

प्र. 16. उताऱ्यात आलेले स्वामीजींचे गुण कोणते ?

(1)  वाचनावर केंद्र लक्ष केंद्रित करणे.

(2) स्वतःचे मन कुठेही केंद्रित करणे.

(3) रोज एक खंड वाचून पूर्ण करणे.

पर्याय :- 

(1) एक व तीन बरोबर  (2) एक व दोन बरोबर 

(3) दोन व तीन नंबर  (4) एक ते तीन बरोबर .

प्र. 17. चुकीची जोडी ओळखा. 

(1) कंठस्थ - तोंडपाठ 

(2) नेत्रेंद्रिये - डोळे 

(3) भ्रमण - भटकंती 

(4) खंड - देश

 प्र.18 .परिच्छेद वाचल्यानंतर तो कशामुळे लक्षात राहील , असे स्वामीजी सांगतात ?

 (1)  रोज वाचन करावे  लागेल .

 (2) शब्द वाक्य वाचता आले पाहिजेत .

 (3) एक दिवसात एक खंड वाचला पाहिजे.

 (4) मन ,बुद्धि व डोळे  यांची शक्ती विकसित झाली पाहिजे. 

 प्र.19.  " हिमालयापासून "  या शब्दापासून खालीलपैकी कोणते अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाहीत ?

(1) माल, माया ,मान 

(2) पाल, पाया ,पाया 

(3) सूत ,यान ,सोडून 

(4) पाय ,मानू ,पासु 

प्र.20 . " कन्याकुमारीपर्यंत"  या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणते अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाहीत ?   (1)  कन्या,  पत, माप.

(2)   कप ,पत,  न्याहरी

(3)  परी , रीत , तम 

(4)  न्यारी , कुरी , तप.

प्र. 21. खेत्री च्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये कोणती ?

(1) तर्कशुद्ध , विचारपूर्वक 

(2) प्रामाणिक - तर्कसंगत 

(3)  तर्कविसंगत ठाम 

(4)  तर्कशुद्ध -  तर्कसंगत 

प्र. 22. खेत्रीच्या महाराजांना  स्वामींनी कशाबद्दल स्पष्टीकरण दिले ? 

(1) आपल्या वाचनाचे 

(2( अद्भुत स्मरणशक्तीचे 

(3) भारत भ्रमण करण्याचे 

(4) तर्कशुध्द व तर्कसंगतीच

प्र.23 . स्वामींच्या अफाट वाचन वेगावर कोणाचा विश्वास बसला नाही ?

(1) शिष्य  (2) ग्रंथपाल  (3) खेत्रीचे महाराज  (4) पोरबंदरचे महाराज

प्र. 24. भारताची सेवा करायची तर प्रथम स्वामिनी काय करायचे ठरवले ?

(1)  वाचन केले पाहिजे.

(2)  कन्याकुमारीला गेले पाहिजे.

(3) हिमालयात परत केले पाहिजे.

(4) भारत देश पूर्ण पाहून घेतला पाहिजे.

 प्र.25 . चुकीची जोडी ओळखा.

  (1) डोळ्याखाली घालणे - डोळ्याच्या खाली घेणे.

  (2)  आडवे उभे आडवे प्रश्न विचारणे - उभे आणि  आडवे प्रश्न विचारणे 

  (3) मन केंद्रित करणे  - मन एकाग्र करणे .

(4) कंठस्थ सांगणे - तोंडपाठ सांगणे

Comments

Popular posts from this blog

HOME