८मराठी २०.शब्दकोश (स्थूलवाचन)
२०.शब्दकोश (स्थूलवाचन)
प्रस्तावना
शब्दांचे नेमके अर्थ शब्दकोश सांगतात. आपल्या भाषिक समृद्धीसाठी शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. यासाठीच या पाठात आपण शब्दकोशाचा परिचय करून घेणार आहोत. शब्दकोश म्हणजे काय आणि शब्दांचा अर्थ शब्दकोशात कसा पाहावा, याचे या पाठात मार्गदर्शन दिलेले आहे.
शब्दकोश म्हणजे काय ?
शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह, शब्दांचा साठा, शब्दांचा ढीग, शब्दांची रास. भाषेतील सर्व शब्दांच्या संग्रहाला शब्दकोश असे म्हणतात.
एखाद्या विशिष्ट क्षेत्रात (उदा., शिवणकला, पाककला, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी) वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात.
मराठी शब्दकोश ऑनलाइन पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा......
शब्दाचे स्वरूप :
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण हजारो वाक्ये बोलतो, हजारो वाक्ये ऐकतो. आपण बोलतो ते दुसऱ्याला कळते आणि दुसरा बोलतो ते आपल्याला कळते.याचे कारण ती दोघांचीही भाषा असते.
आता पुढील चिन्हे पाहा:
र क ट ण ळ ग द. ही आपल्या भाषेतील चिन्हे आहेत. यांना अक्षरे असे म्हणतात.
आता पुढील अक्षरसमूह बघा : मवाद, फणस, ळणुळणू, कमल, णसरम, अननस,
वरील अक्षरसमूहांपैकी मवाद, ळणुळणू, णसरम हे निरर्थक अक्षरसमूह आहेत. यांतून कोणताही अर्थबोध होत नाही.
फणस, कमल, अननस हे अर्थपूर्ण अक्षरसमूह आहेत. अर्थपूर्ण अक्षरसमूहाला शब्द म्हणतात. येथे प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. अशा अर्थपूर्ण शब्दांचे वाक्य बनते. आपण आपल्या भावना, कल्पना, विचार, आपल्याकडे असलेली माहिती हे सर्व वाक्यांच्या साहाय्याने इतरांना सांगतो.रोजच्या जीवनात आपण शेकडो शब्द वापरतो. त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असतात. मात्र, काही वेळा आपल्यासमोर नवीन शब्द येतात. आपण त्या त्या वेळच्या संदर्भानुसार त्या नवीन शब्दांचे अर्थ लावतो. आपल्याला जाणवलेल्या अर्थानुसार आपण त्यांचा उपयोगही करतो. परंतु त्यांचा नेमका अर्थ कळलेला असतोच असे नाही. अशा वेळी आपण हे नवीन शब्द एक तर बिचकत विचकत वापरतो किंवा चुकीच्या अर्थाने तरी वापरतो. त्यामुळे आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते नेमकेपणाने आपण सांगू शकत नाही. हा आपला भाषिक अपुरेपणा होय.
वरील अपुरेपणा संपवण्यासाठी शब्दकोश उपयोगाला येतात.
शब्दकोशाचे फायदे :
(१) आपल्याला शब्दाचा अर्थ समजून घेता येतो.
(२) एका शब्दाला अनेक अर्थ असल्यास तेही आपल्याला समजतात.
(३) एखाद्या शब्दाला एकाच अर्थाच्या अनेक छटा असतात. शब्दकोशामुळे त्या अर्थछटा आपल्याला समजतात.
(४) जितके जास्त शब्द आपल्याला कळतात, तितके जास्त अर्थ आपण व्यक्त करू शकतो.
(५) थोडक्यात जास्त शब्द माहीत असले तर आपली भाषा समृद्ध होते. आपण कोणताही विचार किंवा कोणतीही कल्पना आपल्या शब्दांत सहज व्यक्त करू शकतो.
(६) शब्दकोशामुळे जुन्या काळातील शब्द कळतात. त्यामुळे जुन्या काळातील चालीरिती, जुन्या काळातील वस्तू, त्या काळातील पेहराव अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला मिळते.
शब्दकोश भाषा समृद्ध करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. आपण शब्दकोश सतत वापरण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे.
शब्दकोशाची उद्दिष्टे
शब्दकोशाची उद्दिष्टे
(१) प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो, हे कळणे.
(२) शब्दाला योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लावणे,
(३) शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे..
(४) 'शब्दकोश' ही संकल्पना समजणे.
(५) शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे.
(६) शब्दकोश हाताळता येणे.
काय असते शब्दकोशात -
काय असते शब्दकोशात -
(१) शब्दांचा संग्रह
(२)शब्दांचे प्रमाण उच्चार
(३) व्युत्पत्ती
(४) समानार्थी प्रतिशब्द
(५) संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ
(4) अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र
(७) प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ.
शब्दकोश कसा पाहावा ?
शब्दकोश कसा पाहावा ?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अ, आ, इ यांपासून ते ह, ळ, क्ष, ज्ञ यापर्यंत सर्व मुळाक्षरे त्यांच्या क्रमानुसार माहीत हवीत. हो आयुष्यभर उपयोगी पडणारी गोष्ट आहे. आपण इयत्ता पहिलीमध्ये हे शिकलो. आता ची गरज नाही, असे समजू नये.
आता आपण शब्दकोश कसा पाहायचा, हे समजून घेऊ. समजा, आपल्याला 'पान' हा शब्द शब्दकोशात शोधायचा आहे. 'पा' हे या शब्दाचे आद्याक्षर आहे. ते 'प'च्या बाराखडीतील आहे. मूळाक्षरांमध्ये हे अक्षर कोणत्या स्थानावर येते ते लक्षात घ्या. त, थ, द, ध, न या मूळाक्षरांनंतर प हे अक्षर येते. म्हणून न हे आद्याक्षर असलेल्या शब्दांची सर्व पाने उलटून पुढे चला. प हे अक्षर सुरू झालेले दिसेल. 'प' नंतर 'प' या अनुस्वारयुक्त अक्षराने सुरू होणारे शब्द येतील. त्यांची पाने उलटा. आता 'पा' या अक्षराने सुरु होणारे शब्द दिसू लागतील. आपल्या शब्दा तील दुसरे अक्षर बघा. ते 'न' आहे. ध या अक्षरानंतर न हे अक्षर येते. असेच बघत गेल्यास 'पाधाणी' शब्द दिसेल. तो आपल्या उपयोगाचा नाही. पाधाणी 'नंतर 'पान' हा शब्द येतो. आता या शब्दापुढे दिलेले अर्थ समजून घ्या. अशा तऱ्हेने शब्दकोशात शब्द शोधायचे असतात.
कृति-स्वाध्याय व उत्तरे
कृतिपत्रिकेतील स्थूलवाचन पाठावरील प्रश्नांसाठी पाठ्यपुस्तकातील प्रश्न :
• नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द 'अकारविल्हे प्रमाणे लावा.
उत्तर : सर्व शब्द पुढीलप्रमाणे 'अकारविल्हे' होतील: (१) अंबर (२) आलोक (३) नम्रता (४) माधवी (५) मानसी (६) वनिता (७) वरद (८) शर्वरी (९) शेखर (१०) समीर (११) समीरा,
(स्वमत / अभिव्यक्ती)
(१) तुम्हांला पाठातील एखादया शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर तुम्ही तो कसा शोधाल ? सोदाहरण सांगा.
उत्तर: समजा, मला 'लिओनार्दो दा व्हिची' या पाठातील 'वाकबगार' हा शब्द शोधायचा आहे. मी वा.गो. आपटे यांचा 'मराठी शब्दरत्नाकर' हा शब्दकोश वाचनालयातून घेईन. आद्याक्षरानुसार शब्दाचा शोध आवश्यक आहे. 'वा' हे माझ्या शब्दाचे आद्याक्षर मुळाक्षरांच्या क्रमवारीमध्ये 'व' हे अक्षर 'य ,र , ल' यानंतर येते. त्यामुळे 'र' या अक्षराने सुरू होणारे शब्द पाने उलटून पुढे जावे लागेल. 'च' या अक्षराने
सुरू होणारे शब्द दिसू लागतील. आता 'वाकबगार या शब्दातील दुसऱ्या अक्षराकडे लक्ष द्यावे लागेल. दुसरे अक्षर आहे 'क'. दुसऱ्या स्थानी 'क' कधी येतो ते पाहत गेल्यास 'वाकणे', 'वाकनीस' हे शब्द दिसतात. तसेच पुढे गेल्यास 'वाकबगार' हा शब्द सापडेल. आपल्याला हवा असलेला शब्द सापडला की मग त्याच्यापुढे दिलेले सर्व अर्थ समजून घेईन.
(२) शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : शब्दकोशामुळे शब्दांचे अर्थ कळतात. बोलताना लिहिताना शब्द अचूक वापरता येतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असल्यास शब्दकोशामुळे ते अर्थ आपल्या ध्यानात येतात. आपण योग्य अर्थासाठी योग्य शब्द वापरू शकतो. बोलण्यातल्या चुका टळतील. उदाहरणार्थ बघा. 'छाटणी' या शब्दाचे 'कापणी, वर्गवारी, निवड असे तीन अर्थ दिलेले आहेत. समजा, आपल्याला कोणीतरी सांगितले की " या पुस्तकांची आकारानुसार छाटणी करा आणि गट पाडा." आपल्याला 'छाटणी' म्हणजे 'कापणी' हा अर्थ माहीत असला तर आपण बुचकळ्यात पडू, परंतु तीनही अर्थ माहीत असल्यास आपल्याला त्या वाक्याचा अर्थबोध होतो. शब्दकोडे सोडवताना मला शब्दकोशाचा खूप उपयोग झालेला आहे. तसेच, एखाद्या शब्दाची व्याकरणातील जात ओळखण्यासाठी शब्दकोशाचा उपयोग होतो. शब्दकोशामुळे नवीन नवीन शब्द कळतात. ज्ञानात भर पडते. जुन्या काळातील शब्द कळतात. त्यामुळे जुन्या काळातील चालीरिती, पोशाख यांची माहिती मिळते. असे अनेक उपयोग आपल्याला होतात.
(३) शब्दकोशासंबंधी पुढील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा :(१) शब्दकोशाचा उपयोग (२) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे
उत्तर : (१) शब्दकोशाचा उपयोग : शब्दकोशाचे अनेक उपयोग आहेत. शब्दकोशामुळे नवीन नवीन शब्द कळतात. आपली शब्दसंपत्ती वाढते. अनेकदा एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. आपल्याला फक्त एकच अर्थ माहीत असतो. पण शब्दकोशामुळे शब्दाला असलेले अनेक अर्थ आपल्याला समजतात. उदाहरणार्थ, 'पान' या शब्दाला अकरा अर्थ आहेत; हे शब्दकोशामुळेच कळते. मग बोलताना लिहिताना अशा शब्दांचा योग्य तऱ्हेने उपयोग करता येतो. आपल्याला हवी असलेली अर्थछटा व्यक्त करण्यासाठी शब्दांची अडचण येत नाही. व्याकरणाचेही ज्ञान होते. जुन्या काळातले शब्द कळल्यामुळे जुन्या काळातील चालीरिती कळतात. अशा तऱ्हेने शब्दकोशाचे अनेक उपयोग होतात.
(२) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे :
शब्दकोश पाहण्यामागे अनेक उद्दिष्टे आहेत. आपल्या भाषेतील सर्व शब्दांचा आपल्याला परिचय होणे हे सगळ्यांत मोठे आणि पहिले उद्दिष्ट आहे. शब्दकोशामुळे आपल्याला शब्दांचे प्रमाण उच्चार कळतात. शब्दांची व्युत्पत्ती कळते, ही उद्दिष्टे शब्दकोशामागे आहेत. तसेच समानार्थी प्रतिशब्द समजणे आणि त्यानुसार बदलणारे अर्थ लक्षात घेणे हीसुद्धा शब्दकोश पाहण्यामागे उद्दिष्टे आहेत. शब्दकोश पाहायची सवय केली तर शब्दकोश सहज हाताळता येईल.
आपल्या भाषेतील जास्तीत जास्त शब्द शब्दकोशात असल्यामुळे आपली भाषा आपल्याला अनेक अंगांनी व्यक्त करण्यास मदत होते. हे सुद्धा एक उद्दिष्ट आहे. प्रत्येक शब्द हा कोणता ना कोणता अर्थ व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेला असतो. म्हणजे प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. याची आपल्याला जाणीव होते. एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात, अनेक अर्थछटा असतात, हे जाणवून देणे हेसुद्धा शब्दकोशाचे एक उद्दिष्ट आहे. प्रत्येक सुशिक्षित माणसाने शब्दकोश बाळगणे किती आवश्यक असते, याचे भान निर्माण करणे हे शब्दकोशाचे एक कार्य आहे.
मराठी शब्दकोश ऑनलाइन पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा......
Comments
Post a Comment