भाषा, लिपी व व्याकरण

 प्रकरण १: आपली भाषा, लिपी व व्याकरण


भाषा म्हणजे काय ?


आपल्याला काही हवे असले किंवा काही सांगायचे असले तर आपण काय करतो ? आपल्या मनातला हा विचार आपण शब्दांनी बोलून दाखवतो. आपल्याला तहान लागली की, "मला पाणी पाहिजे" असे आपण बोलून सांगतो किंवा हाताची ओंजळ ओठांजवळ नेऊन आपण खुणेने तसे सांगतो. मनुष्य आपले विचार बोलून किंवा खुणा करून दाखवतो. पशुपक्षी काय करतात ? चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, कुत्रा भुंकतो, गाय हंबरते, घोडा खिंकाळतो व सिंह गर्जना करतो. पशुपक्षी हेही वेगवेगळे आवाज काढून आपले मनोगत व्यक्त करतात. क्रिकेट मधला अंपायर हात वरखाली करून, दूर अंतरावर आपला संदेश  खेळाडू व प्रेक्षक यांना पोचवितो.  अर्थातच हे आपल्या मनातील विचार किंवा भावना व्यक्त करण्याचे विविध प्रकार आहेत. एका अर्थाने या साऱ्या भाषाच आहेत. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.


भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे: १) स्वाभाविक किंवा नैसर्गिक व २) कृत्रिम किंवा सांकेतिक. आवाज, चेहरा व इतर हावभाव वगैरेंनी व्यक्त होणारी भाषा ही स्वाभाविक किंवा नैसर्गिक असून ती सर्व प्राण्यांत आपणांला पाहावयास सापडते. 

उदाहरणार्थ - 

आश्चर्य वाटल्यास आपण भुवया उंच करतो, नापसंती दाखवायची असल्यास आपण भुवया आकुंचित करतो, एखादी गोष्ट नाकारायची असल्यास मान आडवी हलवितो किंवा रागवायचे असल्यास डोळे वटारतो. मनुष्यप्राण्याची बोलण्याची किंवा हावभावांची भाषा व पशुपक्ष्यांची आवाजाची भाषा यांची गणना नैसर्गिक भाषेत होते. 'भाषा' हा शब्द 'भाष्' या संस्कृत धातूवरून आला असून त्याचा अर्थ 'बोलणे' किंवा 'बोलण्याचा व्यवहार करणे' असा आहे. 

आपल्या भाषेचा उपयोग बोलण्याच्या वेळेपुरताच व ऐकू येईल एवढ्या अंतरापुरताच होतो.



पण केव्हा केव्हा आपल्याला आपले विचार लिहून कळवावे लागतात. अशा वेळी आपल्या निरनिराळ्या आवाजांच्या किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक खुणा ठरविल्या आहेत, त्या खुणांचा वापर करून आपण आपले लेखन करतो.  त्याला 'लिपी' असे म्हणतात, व यांतील प्रत्येक खुणेला 'अक्षर' असे म्हणतात.

लिपीचा शोध लागल्यानंतर बोलण्यापेक्षा लिहिण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. बोलणे हे बोलून झाल्यावर नाहीसे होते म्हणून ते क्षर ( नष्ट होणारे).  पण आपले बोलणे हे लिपीत लिहून ठेवले म्हणजे पुष्कळ काळपर्यंत टिकते. ते नष्ट न होणारे म्हणून त्याला 'अक्षर' असे म्हणतात.


देवनागरी लिपी


लिपी हा शब्द लिप् म्हणजे लिंपणे, सारवणे, माखणे असा आहे. आपण कागदावर शाईने लिंपतो म्हणून त्याला 'लिपी' म्हणतात. शाईचा शोध लागण्यापूर्वी ताडपत्र, दगड किंवा ताम्रपट यांवर कोरून ठेवत होते. (लिख कोरणे) म्हणून अशा प्रकारच्या कोरून खुणा करण्याच्या पद्धतीला 'लेखन' म्हणू लागले. आपण जी लिपी वापरतो ती मराठी बालबोध लिपी. हिलाच 'देवनागरी लिपी' असे म्हणतात. ही आर्य लोकांची लिपी. त्यांनी ही आपल्याबरोबर भारतात आणली. हे लोक येथील मूळच्या द्राविडी लोकांपेक्षा वर्णाने गोरे व तेजस्वी होते. म्हणून त्यांना 'देव' म्हणत. हे आर्य शहरांत म्हणजे नगरांत राहात म्हणून ते नागरी व त्यांच्या लिपीला 'देवनागरी लिपी' असे नाव पडले. संस्कृत, मराठी, गुजराती, हिंदी या भाषांची लिपी देवनागरी आहे. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो व प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी. त्या दृष्टीने पाहता इतर लिपीपेक्षा आपली देवनागरी लिपी पुष्कळशी परीपूर्ण होत आहे. पुष्कळशी म्हणणण्याचा हेतू इतकाच की, देवनागरी लिपीने वेळोवेळी योग्य वळणे घेतली आहेत. देवनागरीतील इ व उ हे दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ किंवा लांबट उच्चार दाखविण्याची यात सोय नाही शिवाय च, ज, झ हे वर्ण दोन प्रकारे (च्य, च) उच्चारले जातात. हे किरकोळ दोष सोडून दिले, तर मराठीत बहुतेक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत. ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या व गोलाकार अशा रेषांची बनलेली आहे. या लिपीत लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. ओळ संपली की पुन्हा त्याच पद्धतीने एकाखाली एक अशा ओळींत आपण लिहीत जातो. वर्ण जोडायचे असल्यास ते एकापुढे एक किंवा क्वचित  एकाखाली एक अशा दोन्ही प्रकारे जोडतात. या लिपीतील काही अक्षरांच्या वळणांत कालांतराने थोडा फरक झालेला आढळतो. 


आपण आपल्या भाषेचा व्यवहार जसा बोलून करतो, तसाच तो लिहूनही करतो; म्हणून भाषेमध्ये भाषण व लेखन या दोहोंचा समावेश होतो. भाषा अनेक प्रकारच्या आहेत. मराठी, कानडी, गुजराती, हिंदी, तमीळ, तेलगू, बंगाली आदी जशा भारतीय भाषा आहेत, तशाच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जपानी अशा परकीय भाषाही आहेत. आपल्याला इथे फक्त मराठी भाषेचाच विचार करायचा आहे.


व्याकरण व त्याची आवश्यकता


आपण जेव्हा बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपले विचार इतरांना जसे कळले पाहिजेत तसेच इतरांचे विचारही आपल्याला कळले पाहिजेत. यासाठी आपली भाषा विशिष्ट पद्धतीने बोलली किंवा लिहिली गेली पाहिजे; तरच ती शुद्ध ठरते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते. उदा. 'त्याने ग्रंथ वाचला', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पोथी वाचली', 'त्याने पोथ्या वाचल्या' अशा ठराविक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने ग्रंथ वाचतो', किंवा 'त्याने पोथ्या वाचली' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर चुकीचे ठरते. भाषेची देवाण-घेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांनाच 'व्याकरण' असे म्हणतात. भाषा कशाची बनलेली असते, वाक्याचे घटक कोणते, शब्दांच्या जाती किती, त्यांची कार्ये कोणती, शब्द कसे बनतात, त्यांचा वाक्यात वापर करताना शब्दांच्या रूपांत कोणते फेरबदल होतात, वाक्यातील शब्दांचा परस्परांशी कोणता संबंध असतो, वगैरेंचा विचार व्याकरणात केलेला असतो. व्याकरण हा शब्द 'वि + आ + कृ (= करण)' यांपासून बनलेला आहे. याचा शब्दशः अर्थ 'स्पष्टीकरण' असा आहे. आपली भाषा कशी घडते याचे स्पष्टीकरण व्याकरणात केलेले असते. आधी भाषा बनते, मग तिचे व्याकरण ठरते. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषेचा मागोवा घेत व्याकरणाला जावे लागते.

 भाषेचा प्रवाह हा अखंड चालू असतो.भाषा नदीप्रमाणे वळणे घेत जाते. भाषा कालखंडानुसार बदलत जाते.

 भाषेला अडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी  तिला योग्य वळण देणे हेच व्याकरणाचे काम. जिवंत भाषा ही सतत बदलत असते. बदल होत जाणे हेच तिच्या जिवंतपणाचे लक्षण होय. अशा वेळी व्याकरणात थोडे बदल करावे लागतात.' आपल्या भाषेतील शब्दांच्या शुद्ध रूपांचा विचार म्हणजे तिचे व्याकरण. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक व शुद्ध असावयास हवे. यासाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे.


आपल्याला मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. भाषेचा अभ्यास करायचा म्हणजे ती भाषा ज्या घटकांची बनली आहे. तिचा अभ्यास करायचा. आपण बोलताना अनेक संपूर्ण विचार क्रमाने मांडत असतो. या संपूर्ण विचारालाच 'वाक्य' असे म्हणतात. आपली भाषा ही अनेक वाक्यांची बनलेली असते. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. शब्द हा वर्णांचा बनलेला असतो. म्हणून आपण (१) वर्णविचार (२) शब्दविचार व (३) बाक्यविचार अशा क्रमाने मराठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करू.


अभ्यास


(१) भाषा कशास म्हणतात ? भाषा किती प्रकारच्या आहेत?

(२) 'लिपी' कशास म्हणतात ? देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये कोणती ?

(३) 'व्याकरण' हा शब्द कसा बनला आहे व त्याचा अर्थ काय ?

(४) मराठी भाषेचे व्याकरण शिकायचे म्हणजे कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या ?

(५) व्याकरण कशासाठी शिकायचे ?

Comments

Popular posts from this blog

HOME