८मराठी८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन

 ८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन

           - मच्छिंद्र ऐनापुरे

प्रस्तावना


मच्छिंद्र ऐनापुरे हे एक शिक्षक आणि महाजालावरील प्रसिद्ध ब्लॉग लेखक आहेत. त्यांचे लहान-मोठे बाराशेहून  अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मच्छिंद्र ऐनापुरे, जतन्यूज हे त्यांचे ब्लॉग वाचकप्रिय आहेत. ते विविध विषयांवर लेखन करीत असले तरी बालसाहित्याच्या क्षेत्रात ते आवडीने लेखन करतात. किशोर, छावा-केसरी यांतून त्यांच्या अनेक बालकथा प्रसिद्ध झाल्या आहेत.



प्रस्तुत पाठात लेखकांनी, मर्चंट नेव्हीत पहिल्या महिला कॅप्टन' हा मान मिळवणाऱ्या राधिका मेनन या केरळमधील कर्तबगार महिलेची यशोगाथा वर्णन करून सांगितली आहे. राधिका यांनी धाडस आणि हिंमत या गुणांच्या बळावर समुद्रातील अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य कशी करून दाखवली, याची माहिती आली आहे.


महत्त्वाचे मुद्दे


१. कॅप्टन राधिका मेनन यांचे संपूर्ण बालपण केरळमधील कोदुनगलर या गावी गेले. घाडस आणि हिंमत हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच होते. सागर आणि किनारा यांचा परिचय लहानपणापासूनच घडला असल्याने सागरसफरीची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. यातूनच पुढे नौसेनेत सामील होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात आकाराला आली.

२. राधिका यांनी पदवीनंतर रेडिओ कोर्स केला. प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांना समुद्री जहाजावरील संवादप्रणाली शिकायला मिळाली. त्या बळावर "शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये रेडिओ ऑफिसर या पदावर त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी मास्टर्स सर्टिफिकेट मिळवले. त्या देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन ठरल्या.

३. २२ जून २०१५ रोजी रात्री ११ वाजता ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यावर मोठे वादळ निर्माण झाले होते. त्या वादळात मच्छीमारांची एक होडी सापडली. वादळ एवढे प्रचंड होते की एकाही मच्छीमाराचे प्राण वाचण्याची शक्यता नव्हती. अशा स्थितीत कॅप्टन राधिका मेनन यांना या आपत्तीची माहिती मिळाली.

४. आपल्या ताफ्यातील साथीदारांसह बचाव कार्यासाठी सिद्ध झाल्या. वादळाचा जोर प्रचंड असल्यामुळे राधिका यांचे जहाज मच्छीमारांच्या होडीपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांचे दोन प्रयत्न अपयशी ठरले.

५. तिसऱ्या वेळी मात्र राधिका व त्यांचा चमू यांनी निकराने प्रयत्नांची शर्थ केली. सत्तर सागरी मैल या वेगाने वादळ घोंघावत होते आणि समुद्राच्या लाटा नऊ-नऊ मीटर उंचीपर्यंत उसळत होत्या. अखेरीस यश मिळाले. होडीवरील सर्व मच्छीमारांची सुटका झाली.


६. या कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाइम संघटनेने 'अॅवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅट सी' हा पुरस्कार देऊन राधिका यांना सन्मानित केले.


शब्दार्थ


डगमगणे - डळमळणे, लटपटणे, सर्व शक्ती गळून पडणे, 

निकराने-  आवेशाने, पराकाष्ठेने, जोराने (मूळ शब्द निकर = आवेश, पराकाष्ठा, जोर, कहर.)


वाक्प्रचार व त्यांचे अर्थ


(१) काहीतरी करून दाखवणे - चाकोरीबाहेरील एखादे नवीन कृत्य असे कार्य करणे.


(२) आकांताने प्रयत्न करणे - जिवाची पर्वा न करता प्रयत्न करणे.


टीप


रेडिओ कोर्स: बोटीवरील कर्मचाऱ्यांमध्ये दळणवळणासाठी एक बिनतारी संदेशवहनाची रेडिओमार्फत केली जाणारी संपर्क व्यवस्था असते. तसेच, दूरदूरच्या बोटींशी संपर्क साधणे व किनाऱ्यावरील नियंत्रणकक्षाशी संपर्क साधणे यांसाठी विशिष्ट संदेशवहन यंत्रणा असते. या व्यवस्थेला रेडिओ कोर्स' म्हणतात.


रेडिओ कोर्स ज्याने केला आहे व बोटीवरील या संपर्क व्यवस्थेत जो कार्यरत आहे, त्याला रेडिओ ऑफिसर म्हणतात.


कृति-स्वाध्याय व उत्तरे 


कृतिपत्रिकेतील गदय पाठावरील प्रश्नांसाठी...


 उतारा क्र. १ (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३२)

(राधिका या केरळच्या ...........घरच्यांनी मोठी साथ दिली.)


प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: 


कृती १: (आकलन कृती)


*(१) चौकटी पूर्ण करा:

 (i) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव:

(ii) पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला

कोर्स :

(iii) मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज: 

उत्तरे (i) कोदुनगल (ii) ररेडिओ कोर्स (iii) संपूर्ण स्वराज


(२) कारणे लिहा :

(i) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंस

वाटायचं; कारण - 

(ii) त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता; कारण- 

उत्तरे : (२) (i) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं

वाटायचं; कारण मोकळ्या वेळेत त्यांचे नेहमी समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाटांकडे त्या आकर्षित झाल्या होत्या.


(ii) त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता; कारण त्यांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या  धोक्यांचा सामना करू शकणार नाही.


(३) आकृती पूर्ण करा :

 राधिका मेनन यांचे गुणविशेष

(i) धाडस (ii) उत्तुंग इच्छाशक्ती

(iii) रोमांचकारी प्रवासाची आवड

(iv) काहीतरी करून दाखवण्याची हिंमत


कृती २: (आकलन कृती)


(१) चौकटी पूर्ण करा:


(i) राधिका मेनन यांचे कॉलेज असलेले शहर : 

(ii) प्रशिक्षणामध्ये राधिका यांना शिकायला मिळाली : 

उत्तरे (i) कोची (ii) समुद्री जहाजातली संवादप्रणाली


(२) कारणे लिहा


(1) घरापासून लांब राहावे लागले, तरी राधिका खुश होत्या; कारण -

(ii) मुलांचा सांभाळ करण्याचे कठीण कार्य त्या पार पाडू

शकल्या; कारण -

उत्तरे :

 (२) (i) घरापासून लांब राहावे लागले, तरी राधिका खुश होत्या; कारण समुद्रावरचा रोमांचकारी प्रवास हे त्यांचे आवडीचे काम होते.

(ii) मुलांचा सांभाळ करण्याचे कठीण कार्य त्या पार पाडू शकल्या; कारण घरच्यांची त्यांना मोठी साथ होती.


(३) पुढील घटना कालानुक्रमे लिहा : 

(i) शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली.

 (ii) राधिका यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल केला.

(iii) 'ऑल इंडिया मरीन कॉलेज मध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला.

(iv) राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या.

(v) प्रशिक्षणादरम्यान त्यांना समुद्री संवादप्रणालोनी माहिती झाली.


(३) उत्तरे 

(i) 'ऑल इंडिया मरीन कॉलेज' मध्ये रेडिओ कोर्ससाठी

प्रवेश घेतला.

(ii) प्रशिक्षणादरम्यान त्यांना समुद्री संवादप्रणालीची माहिती झाली.

(ii) 'शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया' मध्ये प्रशिक्षक

रेडिओ ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली. 

(iv) राधिका यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल केला.

(v) राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या.


कृती ३: (व्याकरण कृती)


(१) पुढील नामांचे सामान्यनाम व भाववाचकनाम असे दोन गट करा :

 भाग, घाडस, हिंमत, जहाज, घर, लाट, निर्धार, जोखीम.

उत्तर:-  सामान्यनाम : भाग, जहाज, घर, लाट.

भाववाचकनाम: धाडस, हिंमत, निर्धार, जोखीम.


(२) कंसांतील सूचनांनुसार कृती करा :

(i) त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे नाकारता येणार नाही.

(होकारार्थी करा.)

(ii) रोमांचकारी प्रवासामुळे त्या खूप खूश होत्या.

(उद्गारार्थी करा.)

(iii) मुलांचा सांभाळ ही सगळ्यात कठीण गोष्ट होती.

(नकारार्थी करा.)


उत्तरे:-

(i) त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे मान्य करावे लागेल. 

(ii) किती खूश होत्या त्या रोमांचकारी प्रवासामुळे! 

(iii) मुलांचा सांभाळ यापेक्षा कठीण अशी अन्य कोणतीही गोष्ट नाही.


कृती ४: (स्वमत/अभिव्यक्ती)


● मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.


उत्तर: मोठेपणी वनाधिकारी व्हावे असे मला खूप खूप वाटते. मला माहीत आहे की, वनाधिकारी बनणे खूप कठीण असते. खूप शिकावे लागते. खूप अभ्यास करावा लागतो. कठीण परीक्षा दयाव्या लागतात. शिवाय नोकरीत असताना नेहमीच जंगलात राहावे लागते. शहरातील सुखे तिथे मिळत नाहीत. आपल्या माणसांपासून दूर राहावे लागते. या अडचणी साध्या नाहीत. तरीही मी वनाधिकारी होणार. माझे हे स्वप्न आहे.


मी हे ध्येय बाळगण्यामागे कारणेही तशीच महत्त्वाची आहेत. सध्या आपली जंगले बेकायदेशीर रितीने तोडली जात आहेत. आपली जंगले नष्ट होत आहेत. जंगलातले प्राणी आपले सखेसोबती आहेत. पण त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. जंगल टिकले नाही, प्राणी वाचले नाहीत, तर माणूसही जिवंत राहणार नाही. मला पर्यावरण वाचवायचे आहे. पृथ्वीला वाचवायचे आहे. म्हणून मी वनाधिकारी होणार आहे.


उतारा क्र. २ 

प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३२ व ३३) 
२२ जून २०१५ रोजी........ घाडसामुळे शक्य झालं."

कृती १: (आकलन कृती)

(१) चौकटी पूर्ण करा
(i) वादळाची घटना घडली ती तारीख:
(ii) जेथे वादळाची आपत्ती घडली, तो किनारा
(iii) राधिका तैनात होत्या त्या जहाजाचे नांव
उत्तरे:- (i) २२ जून २०१५ (ii) गोपाळपूर
(iii) संपूर्ण स्वराज्य

(२) कारणे लिहा :
(i) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत
पोहोचण्यास अडथळे आले; कारण
(ii) आंतरराष्ट्रीय मेरीटाइम संघटनेने 'अॅवॉर्ड फॉर
एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅट सी' या पुरस्काराने राधिका मेनन यांना सन्मानित केले; कारण -
उत्तर:-(२)
 (i) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले; कारण वादळी वारा
७० सागरी मैल वेगाने वाहत होता आणि नऊ-नऊ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या.
(ii) आंतरराष्ट्रीय मेरीटाइम संघटनेने 'अॅवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅट सी' या पुरस्काराने राधिका मेनन यांना सन्मानित केले; कारण त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवून अशक्य असलेले बचावकार्य पार पाडले.

कृती २: (आकलन कृती)
(१) मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा :
उत्तर :-  सुटकेच्या मोहिमेला सुरुवात
  ◆
जहाजातले लोक बचावकार्यासाठी सज्ज झाले.
वादळाच्या शक्तीविरुद्ध जहाजावरील कर्मचारी निकराचा प्रयत्न करीत राहिले.
पहिला प्रयत्न अयशस्वी
दुसरा प्रयत्न फसल्यावर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला.

(२) चौकटी पूर्ण करा ../ उत्तर लिहा . 
(i) वादळी वाऱ्याचा वेग
(ii) उसळणाऱ्या लाटांची उंची
(ii) वादळात वाचलेल्या मच्छीमारांपैकी एकाचे नाव
 (iv) राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार

उत्तरे:- (२) (i) ७० सागरी मैल (ii)नऊ मीटर
(iii) पेरला चिन्नाराव (iv) अॅवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅट सी.




कृती ३: (व्याकरण कृती)

(१) दिलेले प्रत्यय जोडून पुढील नामांचे पूर्ण रूप लिहा : (i) मोहीम (त)
(ii) किनारा (ला) 
(iii) दुर्बीण (ने)
( iv) वादळे (चा).
उत्तरे :- 
(१) (i) मोहिमेत
(ii) किनाऱ्याला
(iii) दुर्बिणीने
 (iv) वादळांचा.

(२) सहसंबंध ओळखून उत्तरे लिहा :
 (i) जहाज: जहाजे:: समुद्र: .............
 (ii) पुरुष :  स्त्री :: वाघ:   ............
(iii) लहान : छोटा : :  महिला :    ................
(iv) यशस्वी: अयशस्वी  : : काळाकुट्ट : ............. 
उत्तर :- (1) समुद्र(2) वाघीण (3) स्त्री(4) पांढराशुभ्र,

कृती ४ (स्वमत/अभिव्यक्ती)

(१) कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : २२ जून २०१५ रोजी रात्रीचे १२ वाजले होते. राधिका मेनन यांना त्यांच्या जहाजावरील अधिकाऱ्याने गोपाळपूर किनाऱ्याजवळच्या वादळाच्या आपत्तीची माहिती दिली. समुद्रात मच्छीमारांची एक नाव वादळात सापडली होती. राधिका यांनी तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली. वादळाचा वेग प्रचंड होता. लाटा नऊ-नऊ मीटर उंचीपर्यंत  उसळत होत्या. राधिका यांचे जहाज पुढे गेले की, लाटा त्यांना मागे ढकलायच्या. अशा प्रकारे दोन प्रयत्न वाया गेले. तिसऱ्या वेळी राधिकाच्या टीमने अधिक निकराने प्रयत्न केला. या वेळी मात्र हो टीम यशस्वी झाली. बुडणाऱ्या सात मच्छीमारांना त्यांनी वाचवले. मोहीम यशस्वी झाली.

• (२) धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे पाठा आधारे स्पष्ट करा.
उत्तर: राधिका आणि त्यांची टीम यांनी अक्षरशः स्वतःचा जीव पणाला लावून मच्छीमारांना वाचवले. वादळी वारा ७० सागरी मैल वेगाने वाहत होता. उंच उंच लाटा उसळत होत्या. अशा वेळी वादळात शिरणे म्हणजे स्वतःहून मृत्यूला मिठी मारणे होते. पण राधिका यांच्यात जिद्द होती. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची हिंमत होती. किंबहुना संकट दिसले की त्यांच्या हृदयात धाडस उसळी मारून येई. दोनदा अपयश आल्यावर त्यांनी तिसऱ्यांदा प्रयत्न करून मच्छीमारांना वाचवले. हे खरे तर राधिका यांची जिद्द, हिम्मत आणि संकटांना टक्कर देण्याचे धाडस या गुणांमुळे शक्य झाले. दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने अशा वेळी जीव धोक्यात घालणे टाळले असते. पण राधिका यांनी तसे केले नाही. म्हणूनच संकटावर मात करण्यासाठी हिंमत व धाडस लागते. हे गुण असतील तर माणूस यशस्वी होतो, असे या प्रसंगातून दिसून येते.

व्याकरण व भाषाभ्यास 

मराठीतील वर्णमाला

स्वर: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ.
 स्वरादी:-   अं ( अनुस्वार);  अः ( विसर्ग)

व्यंजने :- क, ख, ग, घ, ङ/ च, छ, ज, झ, ञ / ट, ठ, ड,  ढ,  ण/त, थ, द, ध, न/प, फ, ब, भ, म/य, र, ल, व,
श/ष, स, ह, ळ, (क्ष, ज्ञ).

संधी

पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या :

सूर्यास्त झाला.

'सूर्यास्त' हा शब्द 'सूर्य' आणि 'अस्त' हे दोन शब्द एकत्र घेऊन तयार झाला आहे. 
सूर्य + अस्त = सूर्यास्त

■ 'सूर्य' या शब्दातील शेवटचा वर्ण 'अ' आहे.
 सूर्य = स् + ऊ + र् + य्+अ


■  'अस्त' या शब्दातील पहिला वर्ण 'अ' आहे. 
अस्त = अ + स्+ त् + अ

सूर्यास्त = सूर्य + अस्त

सू+ र्  + य्+ अ + अ + स्+  त

= सू+ र्  + य् + आ + स्त

= सू+र्+ या+ स्त

= सूर्यास्त.

'सूर्य' या शब्दातील शेवटचा वर्ण 'अ' आणि 'अस्त' या शब्दातील पहिला वर्ण 'अ' एकमेकांत मिसळले व 'आ' हा नवीन वर्ण तयार झाला. म्हणजेच (अ + अ = आ असा) संधी झाला. संधी म्हणजे एकत्र येणे, सांधणे किंवा जोडणे.

एकापाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी म्हणतात.

संधींचे मुख्य प्रकार तीन आहेत : 
(१) स्वरसंधी (२) व्यंजनसंधी (३) विसर्गसंधी.

१. स्वरसंधी

सूर्य + अस्त = सूर्यास्त , हा संधी कसा झाला ते आपण पाहिले.

आता या संधीकडे आपण नीट पाहूया.

'सूर्य' या शब्दातील शेवटचा वर्ण 'अ' हा स्वर आहे.

'अस्त' या शब्दातील पहिला वर्ण 'अ' हा स्वर आहे.

'सूर्यास्त' या शब्दात हे दोन्ही स्वर एकत्र झाले आहेत.

सूर्य + अस्त = सूर्यास्त

अ + अ =  आ

जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, तेव्हा स्वरसंधी होतो. म्हणून 'सूर्यास्त' हा स्वरसंधी आहे.

एकापाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधीम्हणतात. (स्वर + स्वर =  स्वरसंधी)

लक्षात ठेवा :

(१) ऱ्हस्व स्वर - अ, इ, उ, ऋ, ल.
(२) दीर्घ स्वर - आ, ई, ऊ
(३) संयुक्त स्वर - ए, ऐ, ओ, ओ.
(४) सजातीय स्वर -  (सजातीय म्हणजे एकाच जातीचे)
- अ -आ , इ -  ई , उ - ऊ. 
(५) विजातीय स्वर (विजातीय म्हणजे भिन्न जातींचे)
-अ-इ, आ - ई, अ - उ, आ - ऊ इत्यादी.

काही स्वरसंधींचा तक्ता :

(१) सजातीय स्वर [ (अ, आ) + (अ, आ) = आ

चंद्र + अस्त = चंद्रास्त 

विद्या + अर्थी = विद्यार्थी

अजर + अमर =  अजरामर

कृपा + आशीर्वाद = कृपाशीर्वाद

तप + आचरण =  तपाचरण

 पक्व + अन्न =  पक्वान्न

गुण + अंक = गुणांक

महा + आत्मा = महात्मा

वात + आवरण = वातावरण

सर्व + अधिक = सर्वाधिक

देव + आलय = देवालय

विद्या + आलय = विद्यालय

कला + आनंद = कालानंद

गुरुत्व + आकर्षण = गुरुत्वाकर्षण

निद्रा + अधीन= निद्राधीन

राष्ट्र + अभिमान = राष्ट्राभिमान

रण + अंगण = रणांगण

राजा + आश्रय = राजाश्रय

हिम  + आलय = हिमालय

स्व + अभिमान = स्वाभिमान 

1(इ, ई) + (इ, ई.) =ई।

हरि + इच्छा = हरीच्छा

मही + ईश = महीश

गिरी + ईश = गिरीश

जननी + इच्छा = जननीच्छा

[ (उ, ऊ) + (उ, ऊ) = ऊ]

गुरु+ उपदेश = गुरुपदेश

भू + उद्धार = भूद्धार

(२) विजातीय स्वर

गण + ईश= गणेश
 सदा + एव =सदैव
 रमा+ ईश = रमेश
महा + उत्सव = महोत्सव
अति + उत्तम =अत्युत्तम
प्रति + एक = प्रत्येक
ज्ञान + ईश्वर =  ज्ञानेश्वर
महा+ ईश  = महेश 
सूर्य + उदय  =सूर्योदय
महा+ऋषी = महर्षी
इति + आदी =  इत्यादी
गंगा + ओघ =गंगौघ 
सु + अल्प = स्वल्प
सु + आगत = स्वागत

२. व्यंजनसंघी

● पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया:

सदाचार करणारे लोक सज्जन असतात. 
'सदाचार' या शब्दात 'सत् 'आणि ' आचार' असे दोन शब्द एकत्र आले आहेत.

'सत्' या शब्दातील शेवटचा वर्ण 'त्' हे व्यंजन आहे. 'आचार' शब्दातील पहिला वर्ण 'आ' हा स्वर आहे.
सत्+ आचार = सद् + आचार = सदाचार

इथे एक व्यंजन आणि एक स्वर मिळून व्यंजनसंधी झाला आहे. ( त् पुढे अ आल्यास 'त्' चा द होतो.)

'सज्जन' या शब्दात 'सत्' आणि 'जन' हे दोन शब्द एकत्र आले आहेत. 'सत्' या शब्दातील शेवटचा वर्ण 'त्' हे व्यंजन आहे. 'जन' या शब्दातील पहिला वर्ण 'ज' हे व्यंजन आहे. सत् + जन=  सज् + जन = सज्जन

इथे दोन्ही व्यंजने एकत्र येऊन व्यंजनसंधी झाला आहे. (त् पुढे ज् आल्यास 'त्' चा ज् होतो.) अशा प्रकारे व्यंजनापुढे स्वर किंवा व्यंजनापुढे व्यंजन आल्यास व्यंजनसंधी होतो.

एकापाठोपाठ एक येणारे व्यंजन व स्वर किंवा व्यंजन व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला व्यंजनसंधी म्हणतात. [व्यंजन + स्वर = व्यंजनसंधी, व्यंजन + व्यंजन व्यंजनसंधी] 

काही व्यंजनसंधींचा तक्ता

दिक् + विजय = दिग्विजय

पट् + मास = षण्मास

सत् + आनंद =सदानंद

चिद् + आनंद = चिदानंद 
जगत् + ईश्वर = जगदीश्वर

उत् + लेख= उल्लेख
दिक् + दर्शक=  दिग्दर्शक
उत् + ध्वस्त = उद्ध्वस्त 
वाक् + इंद्रिय = वागिंद्रिय
षट्+ रिपू= षड्रिपू
सत् + मती = सन्मती
उत् + लंघन= उल्लंघन
जगत् + नाथ = जगन्नाथ
दिक्+ अंत=  दिगंतर
तद् + आकार = तदाकार
तत् + कालीन तत्कालीन


३. विसर्गसंधी

•पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या :

दुरात्मा व दुर्जन लोकांमुळे समाज बिघडतो.

(१) 'दुरात्मा' या शब्दात 'दुः' (वाईट) आणि 'आत्मा' असे दोन शब्द एकत्र आले आहेत. 'दुः' हा विसर्गयुक्त शब्द आहे. 'आत्मा' या शब्दातील पहिला वर्ण स्वर आहे.
दु: + आत्मा=  दुरात्मा
इथे विसर्ग व स्वर मिळून विसर्गसंधी झाला आहे.

 (२) 'दुर्जन' या शब्दात 'दुः' आणि 'जन' असे दोन शब्द एकत्र आले आहेत.
'दुः' हा विसर्गयुक्त शब्द आहे. 'जन' या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन आहे.
दु: + जन = दुर्जन
इथे विसर्ग व व्यंजन मिळून विसर्गसंधी झाला आहे.
अशा प्रकारे विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गसंधी होतो.

एकापाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला विसर्गसंधी म्हणतात. 
[ विसर्ग + स्वर = विसर्गसंधी, 
विसर्ग +  व्यंजन =  विसर्गसंधी ] 

काही विसर्गसंधींचा तक्ता

अध: + मुख = अधोमुख
नभ:  + मंडल =  नभोमंडल
मन: + रंजन= मनोरंजन
अंतः + करण = अंतःकरण
दु: +गुण =  दुर्गुण
नि: + उद्योग= निरुद्योग
दु: + काळ = दुष्काळ
नि:+ कर्ष  = निष्कर्ष 
दु: + कृत्य = दुष्कृत्य
पुर : + कार = पुरस्कार
तपः + बल   = तपोबल
मनः + गत = मनोगत
मनः+ वृत्ती = मनोवृत्ती
तेजः + पुंज = तेज:पुंज 
आयुः + वेद = आयुर्वेद 
निः + विकार =  निर्विकार
दु:  + परिणाम=  दुष्परिणाम 
नि:+ फळ = निष्फळ
तिरः+ कार = तिरस्कार
वय: +कर = वयस्कर

१.  व्याकरण

• (१) पुढल जोडशब्दांचा संधी सोडवा :
संधी
(i) सुरेश
(ii) निसर्गोपचार
(iii) भाग्योदय
(iv) राजर्षी 
उत्तरे :
(i) संधिविग्रह
(ii)सुर + ईश
( iii)निसर्ग + उपचार
(iv )भाग्य + उदय
(v  )राजा + ऋषी

(२) संधी करा :
संधिविग्रह
(i)महा + ईश
(ii) राम+  ईश्वर
(iii)धारा + उष्ण
(iv) सह + अनुभूती
(v) लाभ+अर्थी 
उत्तरे:- 
संधी
(1) महेश
(2) रामेश्वर
(3) धारोष्ण 
(4) सहानुभूती 
(5) लाभार्थी

(३) पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा : 
(i) ती सगळ्यांत कठीण गोष्ट होती.
(ii) राधिका घाडसी कैप्टन होती.
(III) गुरुजींनी मुलांना शिकवले.

उत्तरे :
(i) ती सगळ्यांत कठीण गोष्ट होती. - कर्मणी प्रयोग
(ii) राधिका घाडसी कॅप्टन होती.- कर्तरी  प्रयोग
(i) गुरुजींनी मुलांना शिकवले.- भावे  प्रयोग

(४) खालील दिलेल्या शब्दातील मूळशब्द , प्रत्यय आणि समान्यरूप लिहा . 
शब्द
(i) लाटांना
(ii) वेळेला
(iii) प्रवासात
(iv) जोराच्या

उत्तरे :
मूळ शब्द:-  लाट, वेळ , प्रवास, जोर.
प्रत्यय:- ना, ला, त, च्या
समान्यरूप :-(i) लाटां (ii)  वेळे (iii) प्रवासा (iv) जोरा

(५) लिंग बदला

(i)पती-  पत्नी
(ii) मुलगी- मुलगा 

२. शब्दसंपत्ती
(१) समानार्थी शब्द लिहा :
(i) महिला-  स्त्री
(ii) समुद्र -  सागर
(iii) विवाह - लग्न 
( iv) वादळ- तुफान 

(२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
उत्तरे :-
पूर्ण x अपूर्ण
आशा x निराशा
जिवंत x मृत
सुरुवात x शेवट
यशस्वी x अयशस्वी
सन्मानित x अपमानित

(३) विशेषणे आणि विशेष्ये यांच्या  जोड्या लावा
विशेषणे:-  (i) नखरेल (ii) उत्तुंग (iii) नाजूक (iv) रोमांचकारी, 
विशेष्ये :- (i) मुलगी (ii) प्रवास (ii) इच्छाशक्ती (iv) लाटा. 
उत्तरे : (i) नखरेल-  लाटा 
(ii) उत्तुंग - इच्छाशक्ती
(iii) नाजूक-  मुलगी 
(iv) रोमांचकारी -  प्रवास.

(४) पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
(1) जहाजावर (2)  घरापासून
उत्तरे:
जहाजावर :- हार ,हाव,वर, रजा
घरापासून:- रान, पान , सून, पारा
(५) गटात न बसणारा शब्द लिहा :
(i) हिंमत / धैर्य / क्रौर्य/ साहस
(ii) लाट/समुद्र / महिला/जहाज
 उत्तरे : (i) क्रौर्य (ii) महिला.

३. लेखननियमांनुसार लेखन : (१) अचूक शब्द लिहा :
(i) कौटुंबिक /कौटुंबीक/कौटूंबिक / कौटुबीक
(ii) अधीकारी/अधिकारी/आधीकारि/अधिकारि 
(iii) इच्छाशक्ति / ईच्छाशक्ति / इच्छाशक्ती / ईच्छाशक्ती
(iv) प्रयन्त / प्रायत्न / प्रायन्त / प्रयत्न

उत्तरे : (i) कौटुंबिक  (ii) अधिकारी
(iii) इच्छाशक्ती  (iv) प्रयत्न

४. विरामचिन्हे :
• पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून ती पुन्हा लिहा :

(i) राधिका यांना सूचना पाठवली मॅडम समुद्रात एक नाव फसली आहे.
(ii) राधिका सांगतात ज्या वेळी आम्ही जहाजावर असतो त्या वेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करीत नाही.

उत्तरे : (i) राधिका यांना सूचना पाठवली, 'मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. 
(ii) राधिका सांगतात, "ज्या वेळी आम्ही जहाजावर असतो, त्या वेळेला आम्ही, आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करीत नाही. "

५. वाक्प्रचार :
(१) पुढील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा
वापर करून वाक्ये तयार करा : 
(i) युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढ असतो.
(ii) मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.

उत्तरे : (i) जिवाची बाजी लावणे.
वाक्य : - स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावली.
(ii) जिवाच्या आकांताने ओरडणे
वाक्य :- पुरामध्ये वाहून जाताना काही लोक जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.

(२) पुढील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ निवडा:
(i)वाया जाणे
पर्याय :- 
फुकट जाणे
दूर जाणे
वाहून जाणे

(ii) डगमगणे
डळमळीत होणे
डागडुजी करणे
प्रयत्न करणे
उत्तर :
(1) फुकट जाणे
(2) डळमळीत होणे

तोंडी परीक्षा

प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :

(१) कॅप्टन राधिका मेनन यांनी केलेल्या कामगिरीमध्ये धाडस व हिंमत हे गुण कसे दिसून येतात, ते समजावून सांगा.
 (२) कॅप्टन राधिका यांच्या धैर्याचे दर्शन घडवणारी वाक्ये पाठातून शोधून सांगा.

आकारिक मूल्यमापन

१. प्रकट वाचन:

• कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रजांची कविता वर्गात मोठ्याने वाचा.

२. तोंडी काम :

तुमच्या बाबतीत घडलेला किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तीबाबत घडलेला एखादा धाडसाचा प्रसंग सांगा.

३. उपक्रम :

(१) पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या मराठी बालभारती' या पाठ्यपुस्तकांतून धाडसाचे दर्शन घडवणारे पाठ शोधून काढा आणि त्यांचे वर्गात मोठ्याने वाचन करा.

*(२) पुढे दिलेल्या क्षेत्रांतील पहिली भारतीय महिला कोण, याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा :

(i) पहिली पायलट (ii) पहिली अंतराळवीर (iii) पहिली रेल्वेचालक (iv) पहिली शिक्षिका (v) पहिली डॉक्टर.


  🎆   धाडसी कॅप्टन - राधिका मेनन 🎆

🆕  स्कॉलरशिप प्रश्न   🆕 

🔶
प्रश्न 1. राधिका मेनन यांचे कोणते विशेष होते ?
  (i) सागर किनारी भटकणे 
(ii) नौसेनेत जाण्याची इच्छा 
 (iii)धाडसाने काही तरी करून दाखवण्याची हिम्मत 
 (1) एक व दोन बरोबर 
(2) दोन व तीन  बरोबर
(3) तीन  व  एक बरोबर
(4) एक ते तीन बरोबर

🔶   प्रश्न .2. राधिका मेनन कोणत्या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या? 
(1)  केरळ (2)  कोची (3)  मुंबई  (4) कोदुनगलर 

🔶प्रश्न 3.  राधिका मेनन यांनी रेडिओ कोर्स साठी कोणत्या ठिकाणी प्रवेश घेतला ?
  (1)   केरळच्या कोदुनगलर भागात 
  (2) ऑल इंडिया मारिन  कॉलेज 
 (3)   शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 
 (4)   शिपिंग कार्पोरेशन ऑफ कोची
  
🔶प्रश्न 4.  राधिका मेनन यांना अनंत अशा सागरी सफारीला जावं असं वाटायचं कारण ...................?
(1) त्या कॅप्टन झाल्या होत्या.
(2) त्यांची स्वतःची जहाज होती.
(3) त्यांना मोकळा वेळ मिळत होता .
(4) उसळणाऱ्या नखरेल लाटा पाहून त्यांची इच्छा निर्माण झाली .

🔶प्रश्न 5.राधिका मेनन यांच्या आई-वडिलांनी कोणत्या गोष्टीला विरोध केला ?
(1) नौसेनेत जायचा 
(2) सागर किनारी भटकण्याचा 
(3)शाळा शिकण्यासाठी 
(4) लग्न करण्यासाठी 

🔶प्रश्न 6. ऑल इंडिया मारिन कॉलेज हे  राधिका मेनन यांच्या घरापासून किती अंतरावर होते ?
(1) तीन किलोमीटर 
(2) तीस सेंटीमीटर
(3) तीनशे किलो मीटर 
(4) तीस किलो मीटर 


🔶प्रश्न 7. राधिका मेनन यांनी मास्टर सर्टिफिकेट साठी कोणत्या साली अर्ज केला ?
(1) 2012     (2)  2010  (3)  2015  (4) 2021
 
🔶प्रश्न 8.  राधिका मेनन यांनी प्रशिक्षक रेडिओ ऑफिसर ची नोकरी कोठे केली ?
(1)  केरळच्या कोदुनगलर भागात 
(2) ऑल इंडिया मरीन कॉलेज 
(3) शिपिंग कॉलेज ऑफ इंडिया 
(4) शिपिंग   कार्पोरेशन ऑफ कोची 


🔶प्रश्न 9. राधिका मेनन यांना कोणत्या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली ?
(1) संपूर्ण लक्ष    (2) संपूर्ण मर्चंट  
(3) संपूर्ण स्वराज  (4) संपूर्ण मरीन 

🔶प्रश्न 10. राधिका मेनन यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण झाले ?
(1)  प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर 
(2)  मास्टर सर्टिफिकेट घेतल्यानंतर 
(3)  जहाजाची  कमान सांभाळल्यानंतर 
(4)  पदवी प्राप्त केल्यानंतर 




Comments

Popular posts from this blog

HOME