शालेय प्रार्थना
(१)प्रभू राज जगती भरला
(२) राहू दे मुखी माझ्या
(३) तुझ्या वेदीवर फुले नानारंगी
1.प्रभू राज जगती भरला
प्रभू राज जगती भरला ।
करूया वंदन प्रेमे तयाला ।। धृ।।
भावभक्तीने प्रभूशी ध्याता
लव ही नुरे मन ,भव ,भय ,चिंता
कशास अन्य पसारा ।।१।।
करूया वंदन प्रेमे तयाला
प्रभू राज .............
भारती सकलही सौख्य असावे
भेदभाव ते विलया जावे
विनंती ही पदकमला ।।२।।
करूया वंदन प्रेमे तयाला
प्रभू राज .............
(२) राहू दे मुखी माझ्या
राहू दे मुखी माझ्या , गुणगान तुझे दाता ।
मजला हवे इतुके, वरदान तुझे दाता ।। धृ।।
नजरेत दिसो माझ्या , तव ज्ञानमय मूर्ती ।
तू विराजमान सदा , मम हृदय पटावरती ।
मी कधीच ना विसरू , हे स्थान तुझे दाता ।
मजला हवे इतुके ,वरदान तुझे दाता ...........।।१।।
मुखात कोणाचीही, निंदा न कधी यावी ।
कधी द्वेष कुणा नाही, ही शुद्धमती यावी ।
हरघडी मनी रहावे, हे स्थान तुझे दाता ।
मजला हवे इतुके, वरदान तुझे दाता...........।।२।।
भेटण्या पाडसाला , ही आतुरली हरणी ।
ही अतुरता यावी , या मम् अंतःकरणी ।
अंतरी सदा रहावे , हे स्थान तुझे दाता ।
मजला हवे इतुके ,वरदान तुझे दाता ...........।।३।।
(३ ) तुझ्या वेदीवर फुले नानारंगी
तुझ्या वेदीवर , फुले नानारंगी ,
फूल हे बेरंगी वाहू कसा मी ।। १।।
तुझ्या पाया पाशी नैवेद्याच्या राशी
रिकाम्या हाताने पुजू कसा मी ।। २।।
तुझ्या मंदिरात संत महा थोर
पापी मी समोर येऊ कसा मी ।। ३।।
तुझ्या राऊळात संगीत सुस्वर
सूर हा बेसूर लावू कसा मी ।। ४।।
तुझ्या अंगणात लक्ष लक्ष तारे
दिप इवलाले लावू कसा मी ।। ५।।
Comments
Post a Comment