८मराठी २१.संतवाणी
२१. संतवाणी
(अ) संत तुकाराम
प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे.
• ऐका. वाचा. म्हणा.
आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्ने।
शब्दांचींच शस्त्रे यत्न करूं ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्द वाटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करूं ॥३॥
सकलसंतगाथा खंड दुसरा : श्रीतुकाराममहाराजांची अभंगगाथा अभंग क्रमांक १६२७
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
भावार्थ : संत तुकाराम महाराज सांगतात, “आमच्या घरी धन कोणते? तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन आहे. आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे. समाजप्रबोधनासाठी, स्वत:चे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो. कधी समाजप्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दांचा वापर करतो, तर कधी मृदू शब्दांत चर्चा करतो, बोलतो. शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो. म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो. शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो."
कवितेची मध्यवर्ती कल्पना
प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे सामर्थ्य व महत्त्व समजावून सांगितले आहे.
शब्दार्थ
संतवाणी - संतांचे अभंग.
धन - संपत्ती, दौलत.
रत्ने - हिरे, माणके, पाचू वगैरे.
शस्त्रे - हत्यारे,
यत्न - प्रयत्न , प्रयास.
जीवाचे - प्राणाचे .
जीवन - आयुष्य.
जनलोका - समाजाला .
गौरव - सन्मान.
अभंगाचा भावार्थ
शब्दांची (भाषेची) महती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात -
आमच्यासारख्या संतसज्जनांकडे शब्दरूपी रत्ने हीच दौलत आहे. आमच्या शब्दांना रत्नांचे अलौकिक मूल्य लाभलेले आहे. समाजाच्या प्रबोधनासाठी आम्ही हे शब्दरूपी शस्त्र (हत्यार) प्रयत्नपूर्वक वापरतो. ॥१॥
शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे. समाजातील लोकांना आम्ही शब्दरूपी संपत्ती बहाल करतो, शब्दाच्या परिणामकारक माध्यमातून आम्ही लोकांना उपदेश करतो.||२||
संत तुकाराम महाराज म्हणतात की, शब्द हेच आमचे दैवत आहे, देव आहे. शब्दांची महती गाऊन आम्ही शब्दांचा सन्मान करून, शब्दांची मनोभावे पूजा करतो. ||३||
कृति-स्वाध्याय व उत्तरे
कृतिपत्रिकेतील पदय पाठावरील प्रश्नांसाठी...
प्रश्न. पुढील अभंगाच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा : कृती १ : (आकलन कृती)
(१) उत्तर लिहून पूर्ण करा :
संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व कशाशी तुलना केली आहे.....
उत्तर :- संत तुकाराम महाराजांच्या मते - (१) शब्द रत्ने व शस्त्रे आहेत. (२) शब्द हे जीवनाचे सर्वस्व व शब्द हा देव आहे.
(२) सूचनेनुसार सोडवा :
(i) 'धन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:- (i) संत तुकाराम महाराजांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे ?
(ii) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात, कारण -
उत्तर:-संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात; कारण - शब्द हा त्यांचा देव आहे.
(३) एका वाक्यात लिहा :
(i) संत तुकाराम महाराज कोणते धन लोकांना वाटणार आहेत ?
उत्तर:-संत तुकाराम महाराज शब्दांचे धन लोकांना वाटणार आहेत.
(ii) संत तुकाराम महाराज प्रयत्नांनी शब्दांची कोणती वस्तू तयार करणार आहेत?
उत्तर:- संत तुकाराम महाराज प्रयत्नांनी शब्दांची शस्त्रे करणार आहेत.
कृती :-२. ( आकलन कृती )
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(i) शब्दांचीच रत्ने -
(ii) शब्दांचीच शस्त्रे
उत्तर :- (i) शब्दांचीच रत्ने -
संतमंडळी ही साधुमंडळी असतात. त्यांच्यापाशी पैसाअडका, जड-जवाहिर अशी लौकिक संपत्ती नसते. पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी 'अमूल्य रत्ने ' असे म्हटले. आहे.
(ii) शब्दांचीच शस्त्रे -
संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळवता येतो, तसे शब्दरुपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षड् रिपूंचा, विकारांचा पराभव करता येतो. म्हणून संतांकडे असणारे शब्द ही शस्त्रे आहेत, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
(२)शब्द हे तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे, या
अर्थाची कवितेतील ओळ शोधा.
उत्तर:- शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
(३) कवितेतील यमक असणारे शब्द शोधा व लिहा.
उत्तर:-(१) जीवन - धन (२) देव - गौरव
कृती ३: (स्वमत / काव्यसौंदर्य)
● (१) 'शब्द वाटूं धन जनलोकां' या ओळीचा तुम्हांला
समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: शब्दांना देव मानून त्यांचा यथोचित सन्मानपूर्वक गौरव करताना संत तुकाराम महाराज म्हणतात - आमच्याकडे लौकिक अर्थाने कुठलीही धनदौलत नाही. आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो. म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात, लोकांची मने शब्दांनी स्वच्छ करतात. त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे.
(२) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात, ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : शब्दांची महती सांगताना संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात. ते म्हणतात की, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षड्विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. संतसज्जन जेव्हा जनसामान्यांना उपदेश करतात, तेव्हा जणू हे धनच लोकांना वाटतात. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे. म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनःपूर्वक उपासना करणे, हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात.
(३) 'शब्दांचे सामर्थ्य अफाट असते, ' या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा.
नमुना उत्तर : मी लहानपणी खोड्या करायचो, येता जाता शेजारच्या माझ्या मित्रांची खोड काढायचो. मी दांडगट असल्यामुळे कधी कधी त्यांना धक्का मारून खाली पाडायचो व हसायचो. ती मुले रडत रडत घरी जायची व त्यांच्या आईकडे तक्रार करायची. मग त्या मुलांच्या आया माझ्या आईशी भांडायला यायच्या. तेव्हा मी लपायचो. आई कशीबशी त्यांची समजूत काढायची. एकदा मी जेवत असताना आई माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, "हे बघ राजू, तू जेव्हा खोड्या काढतोस, तेव्हा मला किती मानहानी सहन करावी लागते. शेजारणी माझा अपमान करतात. हे तुला आवडतं का? तुला धक्का मारायचाच असेल, तर मला मार. मी खाली पडते, मला लागले नि रक्त आले तरी मी सहन करीन." ते आईचे बोल ऐकून माझे डोळे पाणावले. मी खोड्या न करण्याची शपथ घेतली. 'शब्दांचे सामर्थ्य अफाट असते, याची मनोमन खात्री पटली.
रसग्रहण
पुढील ओळीचे रसग्रहण करा :
'तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।'
उत्तर : आशयसौंदर्य : संतसज्जनांच्या असलेल्या शब्दांचे सामर्थ्य व महत्त्व या अभंगात संत तुकाराम महाराज यांनी विशद केले आहे. शब्द हे संतांचे जीवनसर्वस्व आहे, असे संत तुकाराम म्हणतात.
काव्यसौंदर्य : संत तुकाराम महाराज म्हणतात - आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन व शस्त्रे आहेत. शब्द हे आमचे जीवनसर्वस्व आहे. हे धन आम्ही लोकांना वाटतो. शब्द हाच आमचा देव आहे. या शब्ददेवाची मनोभावे पूजा करून आम्ही त्याचा सन्मान करतो.
भाषिक वैशिष्ट्ये : 'अभंग' या जुन्या लोकछंदात या कवितेची निर्मिती केली आहे. ६-६-६-४ अशा
अक्षरांचे चरण असलेला हा मोठा अभंग आहे. शब्दांची महती केवळ तीन अंतऱ्यांमध्ये पोहोचवण्याची भाषाशक्ती या अभंगात आहे. विशेष म्हणजे 'शब्दांचिच, शब्दचि, शब्देची ' या शब्दांतील 'च' या शब्दयोगी अव्ययामुळे विधानांना ठामपणा आला आहे. लोकोपदेश करताना संत तुकाराम महाराजांनी शब्दाला 'देवत्व' दिले आहे.
संत तुकाराम गाथा ( संपूर्ण अभंग) इथे वाचा
अथवा इमेज वर क्लिक करा.
(आ) संत सावता माळी
(आ) संत सावता माळी :
संत सावता माळी (अंदाजे १२५० ते १२९५) : नामदेवकालीन सुप्रसिद्ध संत. आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून ते भजन नामस्मरण करत शेतात-मळ्यात राबत असत. प्रत्येकात सुप्त अवस्थेत परमतत्त्व असते, ते भक्तिभावाने जागृत करायचे असते हा त्यांचा महत्त्वाचा विचार त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आणि आविष्काराच्या दृष्टीने प्रासादिक आहेत. प्रस्तुत अभंगात संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात रहावी, असे मागणे परमेश्वराकडे मागतात.
ऐका. वाचा. म्हणा.
मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी ।
आठवावें संतासी हेंचि खरें ॥१॥
पूर्ण भक्त आम्हां ते भक्ती दाविती ।
घडावी संगती तयाशींच ॥२॥
सावता म्हणजे कृपा करी नारायणा ।
देव तोचि जाणा असे मग ॥३॥
सकलसंतगाथा खंड पहिला : संत सावता माळी अभंगगाथा अभंग क्रमांक ७
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
भावार्थ :
संत सावता महाराज म्हणतात, "हे परमेश्वरा, आम्हाला कोणाजवळ काही मागणे मागायचे नाही. आम्हांला नेहमी संतांची आठवण राहावी हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे. संत हेच खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात, म्हणून आम्हांला संतांचा सहवास सतत लाभावा. त्यासाठी परमेश्वरा, कृपा करून आम्हांला संतांची भेट घडव, कारण संत हेच आमच्यासाठी देव आहेत.
कवितेची मध्यवर्ती कल्पना
संत सावता माळी यांनी प्रस्तुत अभंगात परमेश्वराकडे अनोखे मागणे मागितले आहे. संतांची संगत सतत घडावी, अशी विनवणी त्यांनी परमेश्वराकडे केली आहे.
शब्दार्थ
भक्त -उपासक.
दाविती - दाखवतात.
भक्ती - उपासना.
घडावी – मिळावी.
संगती - सोबत.
तयाशींच - त्यांचीच.
कृपा -आशीर्वाद,उपकार
नारायण - परमेश्वर .
जाणा - जाणून घ्या, समजून घ्या.
अभंगाचा भावार्थ :-
संत सावता माळी परमेश्वराकडे आळवणी करताना म्हणतात –
हे देवा आम्हांला कोणाजवळही काहीही मागणे मागायचे नाही. नेहमी संतांची आठवण कायम मनात राहावी, हीच आमची खरी मागणी आहे. संतांचे सतत स्मरण असावे हीच आमची मनीषा आहे. ।। १ ।।
संत हेच परिपूर्ण आहेत. तेच आम्हांला भक्तीचा योग्य मार्ग दाखवतात. त्यांचा सहवास आम्हांला सतत लाभावा हीच आमची मनोकामना आहे. संतांची संगत हेच आमचे मागणे आहे. ।।२।।
संत सावता माळी म्हणतात, हे ईश्वरा आमच्यावर कृपा करा व आम्हांला संतांची भेट घडवा; कारण संत हेच आमचे परमेश्वर आहेत. ।। ३ ।।
कृति - स्वाध्याय व उत्तरे
कृतिपत्रिकेतील पदय पाठावरील प्रश्नांसाठी...
प्रश्न. पुढील अभंगाच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती १ : (आकलन कृती)
(१) योग्य उत्तरे लिहा......
(i) संत सावळा महाराजांची मागणी
उत्तर:- संतांची आठवण व संगत.
(ii) संतांनी दाखवलेला मार्ग
उत्तर:- भक्तिमार्ग.
(iii) संत सावता माळी यांची नाममुद्रा
उत्तर:- सावता म्हणे.
(२) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(i) संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी?
उत्तर:-संत सावता महाराजांना संतांची संगत हवी.
(ii) संत सावळा माळी यांनी कोणाकडे मागणे मागितले आहे ?
उत्तर:-संत सावता माळी यांनी नारायणाकडे (देवाकडे) मागणे मागितले आहे.
कृती २ : (आकलन कृती)
(१) सूचनेनुसार कृती करा:
(i) अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा :
उत्तर:- नारायण
(ii) 'संत' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा
उत्तर:- संत सावता माळी यांना कोणाची संगत घडावी असे वाटते?
(२) कवितेतील यमक जुळवणारे शब्द लिहा :
उत्तर:- (i) कोणाशी - संतासी
(ii) दाविती - संगती
(iii) नारायणा - जाणा
कृती ३ : (स्वमत / काव्यसौंदर्य)
● (१) संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : संत सावता माळी प्रस्तुत अभंगात परमेश्वराकडे मागणे मागताना म्हणतात हे देवा, नारायणा आम्हांला कुणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हांला संतांची आठवण राहावी हीच खरी आमची मनोकामना आहे. संतसज्जन हेच आम्हांला भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून आम्हांला सतत संतांची सोबत हवी. संतांचा कायम सहवास लाभावा म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे. संत हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत. संतरूपी परमेश्वराच्या ठायी आम्ही लीन राहावे, हीच आमची मनीषा आहे.
(२) संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात, ते स्पष्ट करा.
उत्तर : संत सावता माळी आपल्या अभंगात देवाला कळकळीची विनवणी करतात की, आम्हांला संतांचे स्मरण असावे, ही आमची मनोभावना आहे. तसेच संतांचा सतत सहवास लाभावा अशी आमची तीव्र इच्छा आहे. याचे कारण असे की संत हेच आम्हांला खरा भक्तिमार्ग दाखवतात. ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो, तर खरीभक्ती काय असते, हे आम्हांला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवापाशी करतात.
(३) 'सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात' हा विचार अभंगाच्या आधारे पटवून दया.
उत्तर :- प्रस्तुत अभंगात संत सावता माळी हे परमेश्वराला अंतःकरणापासून विनवतात की हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घालून दे. संत सावता माळी यांच्या मते, संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्तिमार्ग दाखवतात. म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात. 'नलगे मुक्ती, धन, संपदा संतसंग देई सदा।।' अशी विनवणी संत तुकाराम महाराजांनीही आपल्या एका अभंगात केली आहे. कारण संत हे परमेश्वराचेच रूप आहे, अशी सर्व भक्तांची धारणा आहे. संतरूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी, ही मनोकामना या अभंगातून संत सावता माळी यांनी केली आहे.
रसग्रहण
पुढील ओळींचे रसग्रहण करा :
'सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ।।
उत्तर : आशयसौंदर्य : संत सावता माळी यांनी प्रस्तुत अभंगात परमेश्वराकडे मागणे मागितले आहे. संतसहवासाची आस त्यांच्या मनाला लागली आहे. संताच्या भेटीचा ध्यास त्यांच्या अभंगातून व्यक्त होतो. संतसंग देण्याची विनवणी त्यांनी आर्ततेने देवाजवळ केली आहे.
काव्यसौंदर्य : संत हे परमेश्वराचे रूप आहे. ते खरे भक्त आहेत. ते भक्तांना योग्य भक्तिमार्ग दाखवतात. म्हणून त्यांचे स्मरण हृदयात सतत जागे ठेवावे व त्यांचा सत्संग घडावा अशी आंतरिक इच्छा संत सावता माळी यांनी येथे व्यक्त केली आहे. ते परमेश्वराला विनवतात की हे देवा, नारायणा, माझ्यावर कृपा कर आणि देवस्वरूप असलेल्या संतांची मला गाठ घालून दे.
भाषावैशिष्ट्ये : 'अभंग' या प्राचीन लोकछंदात ही रचना केली आहे. प्रत्येक ओवीमध्ये पहिल्या तीन चरणांत सहा व शेवटच्या चरणात चार अशा अक्षरांचा हा बंध आहे. याला मोठा अभंग म्हणतात. प्रस्तुत अभंगातून भक्ताच्या हृदयातील खरा कळवळा आर्त शब्दांत व्यक्त झाला आहे. संपूर्ण अभंगात संतांची महती थेट भाषेत काळजाला भिडेल अशी मांडली आहे.
काही संतांची चरित्रे इथे क्लिक
Comments
Post a Comment